অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नांदेडचा शूर बालक अब्दुल रौफच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

नांदेडचा शूर बालक अब्दुल रौफच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

आयुष्याच्या वळणावरील अगदी सुरुवातीचा टप्पा म्हणजे बालपण. हे वय खेळण्या-बागडण्याचं तसंच ते आपल्या भोवतालच्या वातावरणातून शिकण्याचं. या वयातच सामाजिक बांधिलकीचे संस्कार घडतात. याच वयात माणसाची शूरवृत्तीही बरेचदा दिसून येते. बालवयातील याच शूरवृत्तीचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान म्हणजे, ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’. दरवर्षी या मानाच्या पुरस्कारावर मराठी मोहर उमटते हे ही अभिमानास्पद. यावर्षी हा मान मिळवला आहे पाण्यात बुडण्यापासून दोन मुलींना वाचविणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ इजाज अब्दुल रौफ या बालकाने.

अब्दुल रौफच्या धाडसाची कहाणी

पार्डी गावाशेजारून वाहणाऱ्या नदीवर दोन हजार फूट लांब, 60 फूट रूंद आणि 20 फूट खोल असा एक बंधारा आहे. या बंधाऱ्यावर 30 एप्रिल 2017 ला गावातील काही महिला व मुली कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यातील एका मुलीचा पाय घसरून ती बंधाऱ्यात पडली. तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणीने पाण्यात उडी घेतली. मात्र, ती ही बुडायला लागली. हे चित्र पाहून दोन अन्य मुलींनी बुडणाऱ्या मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने त्याही बुडू लागल्या. बुडणाऱ्या मुलींचा आवाज ऐकून लोक तलावावर मदतीसाठी गेले. यावेळी शेताकडे निघालेल्या अब्दुल रौफ ने बंधाऱ्या जवळील लोकांचा जमाव बघत तिकडे धाव घेतली.

जमावातील कोणीच पाण्यात उडी घेण्याचे धाडस दाखवत नव्हता. मात्र अशात अब्दुल रौफ ने प्रसंगावधान व धाडस दाखवून पाण्यात उडी घेतली. 20 फूट खोल पाण्यात तो मुलींचा सतत शोध घेत राहिला व त्याने यातील तब्बसुम आणि आफरीन या दोन मुलींचे प्राण वाचवले. दुर्दैवाने यातील दोन मुलींचा मृत्यु झाला. अब्दुल रौफ ने धाडस दाखवून दोन मुलींना बंधाऱ्यात बुडण्यापासून वाचविले. त्याच्या साहसाची नोंद घेत त्याला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

अब्दुल रौफ हा पार्डी येथील राजाबाई कनिष्ठ महाविद्यालयात 10 व्या वर्गात शिकत असून भारतीय लष्करात रूजू होऊन त्याला देशसेवा करायची आहे. त्याचे वडील होमगार्ड आहेत. अब्दुल ला एक थोरली बहीण व थोरला भाऊ आहे. 11 व्या वर्षापासूनच अब्दुल पोहणे शिकला. याशिवाय कबड्डी, हॉलीबॉल, रनिंग हे त्याचे आवडते खेळ आहेत.

शहराच्या ठिकाणीही अभावानेच गेलेला अब्दुल रौफ केवळ आपल्यातील धाडस आणि शौर्याच्या बळावर मानाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीत दाखल झाला आहे. तो सध्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनाच्या सरावात सामील झाला आहे. यावर्षी आशिया खंडातील 10 देशांचे राष्ट्रप्रमुख प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणाऱ्या दिमाखदार पथसंचलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. अब्दुल रौफ ला उघड्या जिप्सीमधून सन्मानाने या खास परदेशी पाहुण्यांसह देशातील मान्यवरांना अभिवादन करण्याची संधीही मिळणार आहे. दिल्लीच्या वास्तव्यात तो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटून आशीर्वाद घेणार आहे. अब्दुल रौफच्या शौर्याची गाथा महाराष्ट्रासह देशावासियांना प्रेरणादायी अशीच आहे.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराविषयी

भारत देशाच्या वेगवेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. चार श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.

यावर्षी या पुरस्कारासाठी देशभरातून 200 अर्ज आले होते. केंद्र शासनाच्या 10 मंत्रालयासह 31 संस्थाच्या समितीने या अर्जांची छाननी केली. यातून वर्ष 2017 च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी देशातील सात मुली आणि 11 मुले अशा एकूण 18 बालकांची निवड करण्यात आली आहे.

-रितेश मोतीरामजी भुयार

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 9/5/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate