অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रशांत वावगे STI झाले

प्रशांत वावगे STI झाले

आईच्या इच्छेखातर वडिलांचे तेरावे, सर्व धार्मिक विधी, गोड जेवण आदी माझी इच्छा नसतानाही आटोपले. मामांनी दिलेल्या कर्जातूनच हे सर्व पार पडले. आजारपणाने वयाच्या ५४ व्या वर्षी झालेल्या वडिलांच्या अकाली निधनाने सर्व बाबतीत आम्ही पोरके झाले होतो. हताश होऊन रडत बसल्याने काहीही साध्य होणार नव्हते. अकाली वैधव्य आलेली आई, बहिणींचे लग्न, भावंडांचे शिक्षण हे सर्व पार पडण्यासाठी थोरला मुलगा या नात्याने मला फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतूनही पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहणे व झेप घेणे आवश्यक होते. अशातच मनाला उभारी देणारी एक घटना घडली. माझ्या मित्राचे भाऊ प्रवीण भोपळे विक्रीकर निरीक्षक म्हणून रुजू झाले होते. त्यांची आर्थिक स्थितीही हलाखीची होती. शिवाय ‘कर्णिक प्रकरणामुळे’ निवड होऊनही त्यांना कोर्टात जावे लागले. शेवटी सत्याचा विजय झाला व त्यांना नियमित ऑर्डर मिळाली. त्यानंतर एमपीएससी परीक्षा नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने राबविण्यास सुरुवात झाली होती.

आजवरच्या एकूण अनुभवातून माझे कर्तव्य व्यवस्थित पार पडण्यासाठी मला स्वत:चे आर्थिक उत्पन्न वाढवणे, समाजात प्रतिष्ठा मिळवणे व समाजासाठी विधायक कार्य करणे या सर्व बाबी प्राप्त करण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा सर्वोत्तम पर्याय वाटला. वयाच्या पंचविसाव्या वर्षी मी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरूवात केली. नोकरी व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून हे करणे भाग होते. दरम्यान माझी वसाडी येथे बदली झाली. तेथील मुख्याध्यापक सुलताने सर वेळ, शिस्त व कर्तव्य याबाबतीत खूपच कडक होते. त्यामुळे मलाही खूप चांगल्या सवयी लागल्या व प्रामाणिकपणे विद्यादानाचे कर्तव्य बजावून शिक्षक पदालाही न्याय देता आला. आमची शाळा आदर्श शाळा म्हणून जिल्ह्यात नावारूपाला आली. सन २००६ ला PSI/STI/ASST ची १२०० पदांची मोठी जाहिरात आली होती. ही माझ्यासाठी सुवर्णसंधी होती. त्यावेळी आमच्या भागात कोणतेही क्लासेस किंवा मार्गदर्शनही उपलब्ध नव्हते. पुण्या-मुंबईला जाणे शक्य नव्हते. मी व माझे शिक्षक मित्र यांनी एक ग्रुप तयार करून एका कॉम्प्युटर क्लासमध्ये गटचर्चा पद्धतीने अभ्यासाला सुरूवात केली. विषय वाटून घेवून सामुहिक चर्चेतून चांगला अभ्यास होऊ लागला. काही मित्रमंडळी व नातेवाईक उपहासाने आमची टिंगल टवाळीही करीत. मी मात्र अधिकारी होण्याच्या एकाच ध्येयाने झपाटून गेलो होतो. स्पर्धा परीक्षेतील यश हिच वडिलांना खरी श्रद्धांजली होईल म्हणून मी रात्रंदिवस जीव तोडून अभ्यास केला. त्यावेळी साधारणत: तीन ते चार वर्षे परीक्षा प्रक्रिया चालत असे. मी पहिल्याच प्रयत्नात पूर्व, मुख्य व मुलाखत असे तिन्ही टप्पे पार केले. दि.२२ जानेवारी २००९ ला विक्रीकर निरीक्षक म्हणून नागपूरला रुजू झालो. सर्व परिस्थिती एकदम पालटून गेली. अनेक ठिकाणी सत्कार झाले, वर्तमानपत्रात फोटो छापून आले. सर्व नातेवाईक ओळखायला लागले. लग्नासाठी चांगले प्रस्तावही यायला लागले. दरम्यान माझी मोठी बहिण प्रीती हिचा विवाह डॉ. नवीनचंद्र देवकर यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने व हुंडा न देता आनंदात पार पडला. यानिमित्ताने विवाह जुळवणे हा अनुभवही खूप काही शिकवून गेला.

नवे क्षितीज ...नवे आकाश !

आमचे संपूर्ण कुटुंब लवकरच नागपूरला स्थलांतरित झाले. लहान भाऊ इंजिनिअरींगसाठी नाशिकला गेला. नागपूरला माझ्या स्वप्नांना नवे आकाश खुले झाले होते. विहिरीतला बेडूक तळ्यात व तळ्यामधून सागरात यावा, तशी माझी अवस्था झाली होती. प्रशासनात आणखी मोठे पद मिळविण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. पुन्हा नोकरी व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरु केली. सोबत अभ्यासाला माझ्यासारखेच ग्रामीण भागातून आलेले अनेक STI मित्र व मैत्रिणीही होत्या. आमच्यामध्ये लवकरच चांगली मैत्री झाली व अभ्यासासाठी एक चांगला ग्रुपही तयार झाला. येथेच माझी व रश्मी तेलेवार हिची मैत्री झाली. खरे तर तिला पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. आजवर नोकरी, जबाबदारी यामुळे कधी प्रेम, लग्न या गोष्टींचा विचार करायलाही वेळ मिळाला नव्हता. मात्र रश्मीच्या बाबतीत सोबत ऑफिस, सोबत अभ्यास, दोघांचेही विचार सारखेच, आवडी-निवडी सारख्याच यामुळे आमच्यातल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते आम्हालाही कळले नाही. याच काळात आर्थिक हातभार व अभ्यासाला मदत म्हणून मी स्टडी सर्कल नागपूर या स्पर्धा परीक्षेतल्या नामांकित संस्थेत लेक्चर्स घ्यायला सुरूवात केली.

सन २००९ मध्ये राज्यसेवा परीक्षांचा बदललेला अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती यामुळे परीक्षार्थीमध्ये प्रचंड गोंधळ होता. मात्र स्टडी सर्कल नागपूर येथे आनंद पाटील सर व वैशाली पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाचा खूपच फायदा झाला. रश्मीचे वडील ठाणेदार होते व तिची आर्थिक परिस्थितीही खूप चांगली होती. तिच्या लग्नासाठी उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक अशी स्थळेही यायला लागली होती. शिवाय तिची जातही वेगळी होती. आमच्यामधील जात व आर्थिक स्तर ह्या दोन्ही भिंती पार करण्यासाठी मला यावर्षी वर्ग एकचे पद मिळवणे आवश्यक होते. तरच आमच्या प्रेमाचा विजय होणार होता. STI होण्यासाठी वडिलांच्या निधनाने प्रेरणा दिली होती तर यावेळी रश्मीचे प्रेम माझी प्रेरणा बनले होते. पुन्हा आम्ही दोघेही रात्रंदिवस अभ्यासाला लागलो. नोकरीमुळे अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नव्हता. दोन महिने विनावेतन रजा घेतली. या काळात घरखर्चासाठी रश्मीने मदत केली. आमच्या कष्टाचे चीज झाले.

राज्यसेवा परीक्षा २००९ मधून दोघांचीही महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेत निवड झाली. दोघांच्याही आनंदाला पारावर राहिला नाही. दरम्यानच्या काळात आमच्या प्रेमाची चाहूल लागल्याने रश्मीच्या वडिलांनी तिची बदली यवतमाळ येथे करून घेतली होती. निवड झाल्यावर मी व रश्मी दोघांनीही रश्मीच्या घरच्यांना आमच्या लग्नाबद्दल खूप समजावून सांगितले. मात्र आंतरजातीय विवाह व समाज काय म्हणेल? यामुळे त्यांचा विरोध कायम होता. माझ्या घरीही बहिणीचे लग्न व्हायचे असल्याने सौम्य विरोध होता. एकविसाव्या शतकातही पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय विवाहासाठी दोन राजपत्रित अधिकाऱ्यांना ‘लोक का्य म्हणतील ?’ यामुळे विरोधाला सामोरे जावे लागत होते. अखेर नाईलाजाने आम्ही १ जानेवारी २०११ रोजी नोंदणी पद्धतीने मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत विवाह केला. त्यानंतर प्रचंड सामाजिक विरोध झाला. मात्र आ. शिरीषदादा मधुकरराव चौधरी. श्री. खानंदे साहेब, विक्रीकर उपायुक्त यांच्या विशेष मदतीने व आमच्या प्रामाणिक प्रयत्नांनी लवकरच तो मावळला. दोन्हीकडचे नातेवाईक, समाजातील प्रतिष्ठित राजकीय मंडळी व मित्रांच्या उपस्थितीत अकोल्याला आमच्या विवाहाचा स्वागत समारंभ थाटामाटात पार पडला. अखेर आमच्या प्रेमाचा विजय झाला !

लवकरच लहान बहिण माधुरीचा विवाहही विशाल भुडके यांच्याशी आनंदाने पार पडला. आता लहान भाऊ श्रीकांतही अभियंता होऊन रिलायन्समध्ये काम करतोय. आई सामाजिक कार्य व अध्यात्म यामध्ये व्यस्त असते. आम्ही दोघेही सुखी व संपन्न वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहोत. प्रशासनात आज आम्ही दोघेही पतीपत्नी प्रामाणिकपणे काम करीत आहोत. सोबतच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ‘स्पार्क फाऊंडेशन’ च्या माध्यमातून हजारो गरीब, आदिवासी व उपेक्षित युवक युवतीही प्रशासनात अधिकारी म्हणून यावेत यासाठी महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, जाणीव जागृती शिबिरे, सामाजिक उपक्रम यांचे आयोजन करीत आहोत. हा लेखन प्रपंच ही त्याचाच एक भाग आहे.

आमच्यासारख्याच प्रतिकूल परिस्थितीत उजेडाची स्वप्ने घेवून उज्ज्वल भवितव्याच्या आकाशात झेपावलेल्या एका पाखराच्या पंखांना जरी यातून क्षणभर का होईना प्रेरणेचे बळ व लढण्याची ऊर्जा मिळाली तरी आमच्या लिहिण्याचे सार्थक होईल.

लेखक: प्रशांत भा.वावगे व रश्मी तेलेवार-वावगे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, नागपूर.

ईमेल: pbwawge@gmail.com

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 8/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate