অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फिरती शाळा एक अभिनव उपक्रम

फिरती शाळा एक अभिनव उपक्रम

विद्यार्थी शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर शाळाच विद्यार्थ्यांपर्यंत जावी ही संकल्पना प्रत्यक्षात उतवारी यासाठी सोलापूर महापालिका आणि बालकामगार प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत महापालिकेच्या बसलाच शाळेत परावर्तीत करून शाळाबाह्य मुलांना शिकविण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगाची फलश्रृती झाल्यास त्याला राज्यपातळीवर चालविण्याचा मनोदय आहे.
भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत सोलापूर जिल्ह्यात गेल्या 18 वर्षापासून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यान्वित आहे. या कालावधीत प्रकल्पाने विविध धोकादायक उद्योगात काम करणाऱ्या बालकामगारांचे शैक्षणिक पुनर्वसन केले आहे. प्रकल्पाअंतर्गत आजतागायक 14,535 बालकामगारांना प्रवेश दिला व त्यातील 10,920 बालमजूर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्याची ही कामगिरी महाराष्ट्रात उल्लेखनीय अशीच आहे.
परंतु आजही बालकामगार, शाळाबाह्य मुले आढळून येतात अशा मुलांची नावे ज्या त्या विभागातील शासनमान्य शाळेच्या पटावर आहेत. परंतु, ती शाळेत जात नाहीत. इरतत्र भटकणे किंवा बालमजुरी करणे यातच त्यांचे बालपण हरवून गेले आहे. तसेच रोजीरोटीसाठी गावोगावी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील मुलेही शिक्षणापासून वंचित आहेत. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. यासाठी शाळाबाह्य व स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी काहीतरी वेगळा प्रयोग करावा यादृष्टिकोनातून फिरती शाळेचा विचार करण्यात आला. मात्र प्रकल्पाकडे तशी स्वतंत्र आर्थिक तरतूद नसल्याने महानगरपालिकेची मदत घेण्याचा विचार पुढे आला. यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून एका बसची व्यवस्था करण्यात आली आहे. बसचे रुपांतर एका चालत्या फिरत्या वर्ग खोलीत केले आहे. ही बस शहराच्या विविध रस्त्यावर तसेच स्थलांतरित कुटुंबाच्या पालांवर जाऊन तेथील शाळाबाह्य व बालमजूर बालकांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन बसमध्येच शिकविण्याचे काम करणार आहे.
या संकल्पनेच्या पूर्तीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद प्रकल्पाकडे नाही, मात्र सोलापूर महानगरपालिकेने बससाठी स्वतंत्र ड्रायव्हर, इंधन, देखभाल व सजावट यासाठी 2,68,000 रुपयांची तरतूद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन सहकार्य केले आहे. तसेच परिवहन विभागाने मोफत बस उपलब्ध करुन दिल्याने ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे.
शिक्षणामध्ये प्रामुख्याने अक्षर ओळख, अंक ओळख, स्वच्छता, मूल्यशिक्षण, संस्कार, खेळ, गाणी, कविता, इंग्रजीचे ज्ञान तसेच हस्तकला व इतर प्रशिक्षणही देण्याचे नियोजन आहे. सदर मुलांच्या पालकांच्या आर्थिक व इतर समस्या समजावून घेऊन आवश्यक ते समुपदेशन करण्यात येईल. यासाठी बसमध्ये दोन शिक्षक, एक व्यवसाय प्रशिक्षक व एक सामाजिक कार्यकर्ता हे पूर्णवेळ कार्यरत राहणार आहेत.
यासाठी शहरातील होम मैदान, रेल्वे स्टेशन, साखर कारखाना, स्थलांतरित कामगारांच्या वस्त्या राष्ट्रीय महामार्गावरील छोट्या वस्त्या, विटभट्टी परिसर व शहरातील सर्व झोपडपट्टी परिसरात ही बस जाईल. सदर कार्यक्रम हा सुरुवातीला जानेवारी 2015 ते जून 2015 या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येईल. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाल्यास व त्याची उपयोगिता सिद्ध झाल्यास पुढील कालावधीसाठीही हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत संपूर्ण राज्यात हा उपक्रम सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सोलापूर महानगरपालिका परिवहन विभाग यांची बस उपलब्ध करुन दिल्याने व सोलापूर महानगरपालिका यांनी आर्थिक मदत केल्याने सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण समाजापुढे प्रस्थापित होईल. या योजनेतून शहरातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल व बालकांचे बालपण त्यांना परत मिळवून देण्याचा एक आगळावेगळा अभिनव उपक्रम होईल.

गोविंद अहंकारी, 
जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 5/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate