অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भविष्य घडविणारी अरततोंडीची शाळा

भविष्य घडविणारी अरततोंडीची शाळा

गोंदिया जिल्हा ग्रामीण आणि नक्षलग्रस्त भाग असूनसूद्धा येथील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला नाही. असा संदेश देणारी उपक्रमशील शाळा म्हणजे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरततोंडी/ दा येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होय.

या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांद्वारे शिक्षणासाठी सतत अभिनव उपक्रम राबविले जातात. त्यामुळे ही शाळा शैक्षणिक दर्जासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रगण्य मानली जात आहे.

अरततोंडी या गावातील गावकरी देखील शाळेच्या विकासकामात व विद्यार्थी घडविणाऱ्या सर्व उपक्रमामध्ये हिरीरीने सहभागी होतात. त्यामुळे सन 2012 पासून गावची शाळा, आमची शाळा या उपक्रमात तालुका स्तरावर ही शाळा प्रथम क्रमांक पटकावित आहे.

येथे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच त्यांचे सामान्य ज्ञान, आवडी निवडी व छंद जोपासल्या जातात. त्याकरीता एकलव्य ज्ञानवर्धीनी सामान्य ज्ञान स्पर्धा, ग्रामगीत संस्कृती ज्ञान परीक्षा, चित्रकला स्पर्धा इत्यादीचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न नागरिक घडवित आहे. गावकऱ्यांनी 80 हजार रुपये वर्गणी जमा करुन वर्गणीच्या निधीतून विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी संगीत व क्रीडा साहित्य खरेदी केले.

विद्यार्थ्याकरीता गणवेश व शालेयपयोगी साहित्यांची खरेदी केली. बौद्धिक व शारीरिक विकासासाठी आवश्यक त्या वस्तू विद्यार्थ्यांना शाळेतच सहजपणे उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला चालना मिळाली आहे.

या सर्वांसोबतच विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व पटवून देण्याकरीता शाळेमध्ये मिनी बॉल बचत बँक सुरु करण्यात आली. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी 20 हजार रुपये जमा केले आहे. शाळेत माझा वाढदिवस, सामान्य ज्ञान स्पर्धा, प्रश्न मंजुषा, तारखेचे महत्व सांगणारा पाढा, बालसभा यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमासोबतच शाळा संगणकीय शिक्षणाच्या दृष्टीनेही परिपूर्ण आहे.

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी, त्यांच्या ज्ञानात व संवेदनशीलतेत भर पडावी याकरीता समृद्ध वाचनालय, विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन परिपक्व होण्याकरीता नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेत परसबाग व बगीचा निर्माण करण्यात आला आहे. परसबागेतून मिळणारा भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरण्यात येतो.

अशाप्रकारे ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, संघ, मातापालक संघ व गावकऱ्यांच्या सहकार्याने ही शाळा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासोबतच त्यांच्या प्रगतीपथाकडे लक्ष देऊन आहे.

 

-जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate