অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यशवंत डॉ. बाबासाहेब काझी

यशवंत डॉ. बाबासाहेब काझी

डॉ. बाबासाहेब काझी हे सध्या टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाच्या तुळजापूर येथील शैक्षणिक संकुलात सहयोगी प्राध्यापक म्हणून गेली 11 वर्षे कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेत प्राचार्य म्हणून तर तत्पूर्वी सुरत येथील सेंटर ऑफ सोशल स्टडीज या संस्थेत संशोधन सहयोगी म्हणून कार्यरत होते.

डॉ. काझी यांना आज जरी शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक जीवनात स्थैर्य लाभले असले तरी ते सहजासहजी मात्र लाभलेले नाही. अत्यंत प्रतिकूल कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीवर मात करत त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे दि. 28 मार्च, 1960 त्यांचा जन्म झाला. वडिल श्री.तय्यब काझी वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. त्यात पत्नी आणि चार मुलांचे संगोपन करायचे म्हणजे कठीणच.

परंतु डॉ. काझी हे लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचे असल्याने ते अभ्यासात चमक दाखवू लागले. त्यामुळे त्यांना पाचवीपासून जिल्हा परिषदेच्या कोल्हापूर स्कूलमध्ये टाकण्यात आले. पाचवी ते दहावी पर्यंत ते या शाळेत होते. या शाळेतील शिक्षकांनी खऱ्या अर्थाने आपल्याला घडविले हे ते कृतज्ञतापूर्वक नमूद करतात. दहावीत जवळपास 80% गुण मिळाल्यानंतर त्यांनी विज्ञानशाखेत प्रवेश घेतला. पण तीन महिन्यातच त्यांच्या लक्षात आले की, आपली आवड विज्ञान शाखेची नसून कला शाखेची आहे आणि त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. बारावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी त्याच महाविद्यालयातून बी.ए. (इंग्रजी साहित्य) पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली.

मित्राच्या मार्गदर्शनानुसार टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेत प्रवेश परिक्षेच्या माध्यमातून त्यांना प्रवेश मिळाला. दोन वर्षाच्या एम.ए.इन सोशल वर्क (कम्युनिटी डेव्हलपमेंट) या अभ्यासक्रमापैकी एक वर्ष व्यवस्थित पार पडले आणि काही अडचणींमुळे त्यांच्या या शिक्षणात खंड पडला. दरम्यान त्यांनी 1983 मध्ये पुणे विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या आणि संज्ञापन या विषयातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतु टाटा संस्थेतील आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडावा लागला, याची रुखरुख त्यांना होती. म्हणून त्यांनी 1984 साली संस्थेतील दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.

टाटा संस्थेतील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डॉ. काझी यांनी कम्युनिटी आऊट रिच प्रोग्राम या संस्थेतर्फे धारावीत प्रकल्प अधिकारी म्हणून वर्षभर काम केले. त्यानंतर मिरज येथील इन्स्टिट्युट ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट अँड ॲक्शन या ग्रामीण भागातील स्वयंसेवी संस्थेत समन्वयक म्हणून काम केले. तेथेच त्यांची नझिरा यांच्याशी भेट होऊन या भेटीचे विवाहात रुपांतर झाले.

दरम्यान, डॉ. काझी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्यांना संशोधन पाठ्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी 'महाराष्ट्रातील मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा अभ्यास' या विषयावर शिवाजी विद्यापीठात डॉ. अंबादास माडगुळकर व डॉ. अंबेकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी साठी संशोधन सुरु केले. 1994 साली त्यांना पीएचडी मिळाली. पीएचडी करित असतानाच त्यांनी कोल्हापूर येथील शाहू इन्स्टिट्युट मध्ये समाजकार्य विषयाचे अध्यापन केले आणि त्यांनतर सुरत येथील सेंटर फॉर सोशल स्टडीज या संस्थेत संशोधन सहायक म्हणून ते रुजु झाले. त्यापुढे त्यांची कारकीर्द बहरतच गेली.

भारत सरकारच्या शैक्षणिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत त्यांना इंग्लंड आणि स्वीडन या देशात काही महिने अध्यापन करण्याची संधी मिळाली. त्यांचे सामाजिक विषयांवरील अनेक चिंतनपर लेख आजवर प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांच्या पीएचडीच्या प्रबंधावर आधारित पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

डॉ. काझी यांचा मुलगा अरिफ याने आयआयटी वाराणशी येथून बी टेक ची पदवी संपादन केली आणि आज तो स्वतंत्र व्यवसाय करीत आहे. तर कन्या अनिस हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातून बी. टेक ची पदवी संपादन केली असून सध्या ती जर्मनीतील टेक्नीकल युनिव्हर्सिटी, म्युनिक येथे एम टेक करीत आहे. यासाठी तिला डॅड स्कॉलरशीप मिळाली.

डॉ. काझी यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात वेळप्रसंगी पडेल ते काम केले. कधी पुस्तकाच्या दुकानात तर कधी पेट्रोल पंपावर. पण परिस्थितीपुढे कधी हार मानली नाही आणि शिक्षणही अर्धवट सोडले नाही. अत्यंत जिद्दीने, परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळविलेले यश हे आजच्या युवकांना निश्चितच प्रेरणादायी आहे.

डॉ. काझी यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा !

लेखक: देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती‍)(प्रशासन)

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 7/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate