অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वृक्षलागवडीसाठी शाळांचाही सहभाग...

वृक्षलागवडीसाठी शाळांचाही सहभाग...

वैश्विक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आणि वृक्षसुरक्षा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यासाठी राज्य शासनाचे विविध विभाग आणि लोकसहभागातून राज्यभर वृक्षलागवडीचा व्यापक कार्यक्रम गेल्या वर्षी राबविला गेला. गेल्या वर्षी १ जुलै रोजी राज्यात सुमारे 2 कोटी वृक्षांची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आणि हा प्रकल्प यशस्वी झाला. येत्या तीन वर्षात 50 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट वन विभागाने केले असून येत्या 1 जुलै ते 7 जुलै या काळात 4 कोटी वृक्षारोपणाच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन समाजातील सर्व स्तरातील लोकांना करण्यात आले आहे.

राष्ट्रीय वननिती, 1988 मधील धोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन/ वनीकरण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतशील आणि अग्रगण्य राज्य आहे. राज्यातील 307 लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 61.35 लाख हेक्टर म्हणजेच साधारणपणे 20 टक्के इतकी जमीन वृक्षाच्छादित आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदलेला निसर्ग, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी आणि दुष्काळ या माध्यमातून निसर्ग गेल्या काही वर्षात जाणीव करुन देत आहे. पर्यावरणाचे असंतुलन, असमतोल, वाढते प्रदूषण आणि त्यातून होत असलेली पर्यावरणीय बदल ही यामागील महत्वाची कारणे आहेत.

वैश्विक तापमानातील वाढ व हवामानातील बदल यांची तीव्रता व परिणामकारकता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल, संतुलन, संवर्धन आणि सुरक्षा राखणे यासाठी वृक्षलागवडीचा कार्यक्रम शासनाच्या विविध खात्यांच्या सहभागातून राबविला जाणार आहे. त्यानुसार राज्यातील शाळांच्या आवारात रोपांची लागवड केली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी, जैवविविधता, दुर्मिळ वनसंपदा त्यांचे संरक्षण, रक्षण आणि संवर्धन यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, यासाठीदेखील प्रबोधन केले जाणार आहे. वाढते प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, विरळ ओझोन थर, समुद्र सपाटीत वाढ, नैसर्गिक आपत्ती आणि यातून होणारे प्रचंड आर्थिक नुकसान हे मानवाच्या प्रगतीला बाधा पोहोचत आहे. पृथ्वीला होत असलेल्या हानीला थांबविणे एवढेच पुरेसे नसून पृथ्वीला पर्यावरण ऱ्हासाच्या संकटापासून वाचविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आता जगाच्या सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत.

या मोहिमेत शाळांचा सहभाग सर्वांत महत्त्वाचा असून, त्या अनुषंगाने कार्यक्रमाचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. राज्यातील शाळांमध्ये भौतिक सुविधांबाबतच्या निकषांमध्ये शाळेच्या आवारात मोठ्या झाडांची लागवड सावलीसाठी करण्याचा अंतर्भाव आहे. राज्यांतील शाळांमध्ये भौतिक सुविधांबाबतच्या निकषांमध्ये शाळेच्या आवारात मोठया झाडांच्या सावलीसाठी करण्याचा अंतर्भाव आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी, जैवविविधता, दुर्मिळ अशा वनसंपदेचे रक्षण व त्याचे संवर्धन याबाबत संस्कारक्षम वयात जाणीव व आवड निर्माण व्हावी यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीत शाळांमध्ये वृक्षारोपण योजना व अन्य कार्यक्रम पावसाळ्यापासून राज्यातील शाळांमध्ये वृक्षारोपण योजना व अन्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना एक विद्यार्थी, एक झाड अशा योजनेसाठी झाड दत्तक म्हणून देऊन अश्या झाडांचे जनावरांपासून संरक्षण, पाण्याची व्यवस्था करुन झाडे जगविण्यासाठी उद्युक्त करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या वन विभागाने २ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेला. त्यामध्ये इतर शासकीय विभागाने सुद्धा मोलाची कामगिरी बजावली होती. या लोकचळवळीच्या यशामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील दोन कोटी वृक्ष लागवड उपक्रमाचा गौरव केला. हा उल्लेखनीय उपक्रम असाच चालू ठेवला गेला पाहिजे असे सांगितले. याच पार्श्वभूमीवर येत्या तीन वर्षा मध्ये ५० कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट हे महसूल आणि वन विभागाने आखले आहे.

वृक्ष लागवडीसाठी स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, खाजगी उद्योजक, उद्योजकता सामाजिक दायित्व (Corporate Social Responsibility),सहकारी संस्था, विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी मंडळे व संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेता येणार आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमामुळे महाराष्ट्राला हरित राज्य म्हणून देशामध्ये नावलौकिक मिळेल अशी आशा आहे. चला तर मग आपण यामध्ये आपला खारीचा वाटा उचलू या आणि राज्याच्या प्रगती मध्ये हातभार लावूया.

-वर्षा फडके,

वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/27/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate