অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यवसाय ही उत्तम संधी

व्यवसाय ही उत्तम संधी

नोकरीच्या पाठीमागे न लागता तरुणांनी छोट्या-मोठ्या व्यवसायाकडे वळावे. व्यवसाय ही उत्तम संधी आहे, असा संदेश बागडे पापड गृह उद्योगचे सुनील बागडे हे आपल्या पापड उद्योगातून देत आहेत. वाई येथील सुनील बागडे गेले कित्येक वर्षे बाहेरुन पापड विकत घेऊन सायकलवरुन घरोघरी जाऊन विकत होते. यातून होणारा नफा त्यातून त्यांनी मोटर सायकल खरेदी केली. मार्केटींग करताना त्यांना चांगला नफा होऊ लागला. त्यामधून त्यांनी एक थ्री व्हीलर खरेदी केली आणि त्यावर स्पीकरद्वारे प्रसिद्धी करुन मार्केटींग करु लागले. यावेळी केवळ पापड न विकता लोणची, कुरवड्या, चटण्या असे अन्य पदार्थही पापडासोबत विक्री करु लागले. मार्केटींगमधून आता उत्पादन क्षेत्रात येण्याचा त्यांनी विचार केला.
पापडाला मागणी मोठी असून त्याच्या उत्पादनासाठी कमी भांडवल लागते, असा विचार करुन श्री.बागडे यांनी वाई येथील औद्योगिक वसाहतीत भाड्याने जागा घेतली आणि त्यांनी बागडे पापड गृह उद्योग सुरु केला. आज ते उडीद, बटाटा, तांदुळ, नाचणी, ठेचा, पालक असे पापडाचे विविध प्रकार उत्पादित करतात. पूर्वीचा असणारा मार्केटींगचा अनुभव त्याच्या जोरावर सध्या ते दररोज 50 किलो पापड विकतात. त्यांच्याकडे सहा महिला आणि दोन पुरुष असे आठजण काम करतात.

मुलाने नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसायात उतरावे ही त्यांची इच्छा असून त्याचसाठी त्यांनी हा व्यवसाय स्वत:च्या मुलाला सुरु करुन दिला आहे. व्यवसाय ही उत्तम संधी ते मानतात. छोट्याशा व्यवसायातून परिश्रम, चिकाटी आणि सातत्य याच्या जोरावर भविष्यात मोठा उद्योग निर्माण केला जाऊ शकतो. यामधून स्वत:बरोबरच देशाच्याही आर्थिक प्रगतीमध्ये भर घालता येते, असे श्री.बागडे बोलून दाखवितात.घर बसल्या छोटा-मोठा व्यवसाय करुन चांगला फायदा मिळविता येतो. त्यासाठी परिश्रमाची जोड हवी. त्याशिवाय थेट उत्पादन प्रक्रियेत न उतरता प्रथम मार्केटींगमध्ये अनुभव घ्यावा. त्यानंतरच उत्पादन यशस्वी होऊ शकते हे श्री.बागडे यांनी आपल्या व्यवसायातून दाखवून दिले आहे. तरुणांनीही नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसाय करावा, मात्र त्यासाठी योग्य निवड आणि परिश्रम हे हवेतच. अधिक माहितीसाठी सुनील बागडे 8623807074 संपर्क करावा.

लेखक - प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/7/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate