‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे…. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म’…. भोजनालाही आपल्या दैनंदिनीत यज्ञकर्माचे महत्त्व द्यावे, हा आशय व्यक्त करणारी ही प्रार्थना. शालेय पोषण आहार ही विद्यार्थ्यांचा आहार गुणात्मक आणि पोषणमूल्यदृष्ट्या वृद्धिंगत करणारी योजना. या योजनेला नवीन आयाम जोडतांना शासनाने त्यात स्नेह भोजन व अतिथीभोजन हे उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यामुळे या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढविणे शक्य झाले आहे. मात्र ही योजना केवळ शासकीय उपक्रम म्हणून नव्हे तर आधी उल्लेखिलेल्या प्रार्थनेतील वचनाप्रमाणे ‘यज्ञकर्म’ म्हणून राबविली जात असल्याने पारोळा तालुक्यात उत्तम कामगिरी होत आहे. सकारात्मक अधिकारी, अधिकारी आणि शिक्षकांच्या प्रतिसादाला समाजाने दिलेला आश्वासक प्रतिसाद या बळावर ही योजना उत्तम प्रकारे राबविली जात आहे. आणि याचा परिणाम मुलांच्या शाळेतील उपस्थितीवरही दिसून आला आहे.

पारोळा तालुक्यात 164 शाळा असून त्यातून 24 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती पालकांच्या सक्रिय सहभागातून तयार करण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली असता चहुत्रे या मंगरूळ गटातील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्नेह भोजनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहता आला. इयत्ता पहिली ते आठवी असे वर्ग असणाऱ्या या शाळेत 211 विद्यार्थी संख्या आहे. केंद्रप्रमुख बी.आर. पारधी व मुख्याध्यापक डी.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यान्न भोजनाची तयारी सुरु होती. आजच्या स्नेह भोजनाचं आयोजन गावचे सरपंच तानाजी मोरे यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त होत. पुरी भाजी, व्हेज पुलाव आणि जिलबी असा बेत होता.

स्वयंपाक तयार करतांनाही सात्विकता जपण्यात येत होती. चुली भोवती रांगोळी काढून. आपुलकीने स्वयंपाक बनविणाऱ्या बचत गटाच्या मावशाही या योजनेच्या यशस्वीतेसाठी जबाबदार. स्वयंपाक झाल्यावर जेवणासाठी मुलांचे रांगेने येणे शिस्तीत हात धुणं आणि नंतर ओळीने पंगतीत बसणं. शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने मुलांना शुद्ध पाण्याचे जार उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच स्टेनलेस स्टीलचे ताट…. ग्लास… पंगतीचा थाटमाट. मग शिस्तीत अन्न वाढायला सुरुवात. त्यानंतर हात जोडून प्रार्थना आणि मग उदरभरण. असा हा शिस्तबद्ध शिरस्ता.

चहुत्रे गावाप्रमाणेच संपूर्ण तालुक्यात रोज कुठे ना कुठे असे स्नेह भोजन शाळांमध्ये आयोजित होत आहे. ऐच्छिक असलेला हा उपक्रम राबविण्यासाठी आता समाजातून स्वतः हून पुढाकार घेतला जात आहे. वाढदिवस, लग्न, धार्मिक समारंभ, निरोप समारंभ, राष्ट्रीय सण, स्थानिक महत्त्वाचे दिवस, प्रसंगांचे औचित्य साधून हे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जात आहेत. तालुक्यातील प्रत्येक शाळेत किचन शेड उभारण्यात आले आहेत. धान्य ठेवण्यासाठी सुरक्षित व्यवस्था, स्वच्छता या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. शिवाय दररोजच्या जेवणासाठी एका पालकास अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. त्यामुळे अन्नाच्या दर्जाबाबत पालकांच्या सुचना आपोआप मिळतात. त्यात गरजेनुसार सुधारणा होते, असे या तालुक्याच्या अधिक्षिका राजेश्वरी संधानशिवे यांनी सांगितले.

एरवी देण्यात येणाऱ्या पोषण आहारात दर सोमवारी खिचडी व पूरक आहार म्हणून मिठाई, राजगिरा लाडू, मुरमुरा लाडू, चिवडा या पैकी एक पदार्थ, मंगळवारी भाजी भात, त्यात चवळी, वाटाणा, हरभरा या कडधान्यांचाही वापर केला जातो. बुधवारी वरण भात, गुरुवारी पुन्हा भाजी भात, शुक्रवारी वरण भात, शनिवारी खिचडी याप्रमाणे पदार्थांचा समावेश असतो. या वेळापत्रकात स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामुळे मुलांना वेगळा व पौष्टिक मेन्यु चाखायला मिळतो. बदल होतो आणि समाजाचा सहभाग वाढतो. शाळे विषयी मुलांविषयी आपुलकी निर्माण होते, हे विशेष. जळगाव जिल्ह्यात पोषण आहारासंदर्भात पारोळा तालुक्यातील उपक्रमांची दखल आता राज्य पातळीवरही घेण्यात आली आहे. एखादी योजना केवळ शासकीय उपक्रम म्हणून न राबविता पवित्र कार्य म्हणून राबविली तर त्याचे चांगले परिणाम हमखास दिसतात. पारोळा तालुका हे त्याचे आदर्श उदाहरण ठरेल यात शंका नाही.

लेखक: मिलिंद मधुकर दुसाने,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

माहिती स्रोत: महान्यूज