অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिक्षकाच्या शब्दातलं बळ

शिक्षकाच्या शब्दातलं बळ

मोहन महाराज हे निंभा (ता. दिग्रस) या गावात व्यवसाय करायचे. ढकलगाडीवर. व्यवसाय कुठला? चक्क गुटखा पुडी विकण्याचा ! कुठे? अगदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ. मुलांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थांसोबत ते गाडीवर गुटखा पुड्या विकायचे. आमीन चौहान, त्याच शाळेतले तेव्हाचे शिक्षक आणि आता मुख्याध्यापक. त्यांना हे खुपायचं. ही गुटखाविक्री बंद कशी करायची? हा त्यांच्यापुढचा प्रश्न. कारण शाळेजवळ १०० मीटर्स परिसरात गुटखाविक्रीबंदीचा नियम बहुसंख्य ठिकाणी पाळला जात नाही, याची त्यांना कल्पना होती.


आमीनगुरूजींनी संवादाचा मार्ग अवलंबला. एक दिवस हिंमत करून मोहन महाराजांना सांगितलं, “शाळेजवळ गुटखाविक्री करू नका.”

“तुम्ही मला इथून हटविणारे कोण?” महाराजांचं प्रत्युत्तर. त्यांना तोपर्यंत कोणीच कधी हटकलेलं नव्हतं. त्या दिवशी तरी महाराज ढकलगाडी लोटत शाळेपासून दूर निघून गेले.

आमीनसर सांगतात, “त्या क्षणी मला बरं वाटलं की, ब्याद निघून गेली. पण हा माणूस आता काय आफत आणतो म्हणून भीतीही वाटत होती.” दुसर्‍या दिवशीही तो गुटखाविक्रीला शाळेपाशी आलेला नव्हता. मग त्यांनी थेट मोहन महाराजांच घर गाठलं. शिक्षकांना दारात पाहून महाराजही थोडे गडबडलेच. म्हणाले, “दोन दिवसांपासून धंदा झालेला नाही. घराजवळ पाहिजे तशी विक्री होत नाही. गावात बाकीचेही गुटखा विकतात. मग मलाच मनाई का?” एव्हाना भोवताली लोक जमलेले. आमीन यांनी त्यांचं सारं ऐकून घेतलं. जवळच महाराजांचा नातू उभा होता. आमीन चौहान यांनी युक्ती केली. ढकलगाडीला लटकवलेली एक गुटखा पुडी फोडली. म्हणाले,“महाराज, हा तुमचा नातू ना? याला खाऊ घालू का गुटखागु? महाराज म्हणाले, “नको नको.”

“बरोबर, हे जहर तुम्ही आपल्या नातवाला कसं खाऊ घालणार? जसा हा तुमचा नातू तशीच गावातली मुलं समजा. हे जहर विकणं बंद करा. दुसरा छोटा-मोठा धंदा पाहा. आम्ही तुम्हाला मदत करू.” आमीन चौहान निघाले.

आता अमीन गुरूजींना शाळेच्या रस्त्यावर मोहन महाराज भेटतात. तीच ढकलगाडी असते. आणि गाडीवर असतो हिरवा, ताजा भाजीपाला. आमीन त्यांच्याकडून भाजी विकत घेतात, अनेक वेळा गरज नसली तरीही! भाजीविक्रीतून महाराजांनी अनेक ग्राहक जोडले. एकाने शेतविहिरीची योजना सांगितली. अर्ज केला. विहीर मंजूर झाली. महाराजांच्या शेतात काम सुरुदेखील झालं. आता ते स्वतःच्या शेतातला भाजीपाला विकतील.

“गुटख्यासारखं जहर विकणं बंद करून मी समाजाला पौष्टिक भाजीपाला विकू लागलो, ते केवळ आमीनगुरूजींमुळेच!” मोहन महाराज कृतज्ञपणे सांगतात.

खरंच! शिक्षकाच्या शब्दात असं बळ असतं. विषाला अमृत करण्याचं!

आमीन चौहान,मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंभा, ता. दिग्रस जि. यवतमाळ पिन ४४५२०३ मो. ९४२३४०९६०६.

लेखकः नितीन पखाले, यवतमाळ
नवी उमेद नेटवर्क

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate