অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिक्षणसेवक ते अधिकारी ...एक प्रेरणादायी प्रवास !

शिक्षणसेवक ते अधिकारी ...एक प्रेरणादायी प्रवास !

दिनांक ८ फेब्रुवारी २०१४... एका स्वप्नपूर्तीचा दिवस ! राहुल रेखावार (IAS) सरांनी भामरागड जि. गडचिरोली येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी माझे ‘मी अधिकारी होणारच !’ या विषयावर व्याख्यान व कार्यशाळा आयोजित केली होती. त्याच दिवशी लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे पद्मश्री प्रकाश आमटे व सौ.मंदाकिनी आमटे यांच्या शुभ हस्ते माझ्या ‘मी अधिकारी होणारच !’ या डी.व्ही.डीचे अत्यंत साध्या घरगुती समारंभात विमोचन करण्यात आले. मी अधिकारी झालो... माझी पत्नीही अधिकारी झाली.. आपल्यासोबत हजारो गरीब, आदिवासी व उपेक्षित युवक युवतीही प्रशासनात अधिकारी म्हणून यावेत यासाठी आम्ही तीन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर ‘स्पार्क फाऊंडेशन’ मार्फत राबवित असलेल्या ‘LET’S BE LIGHT.. LET’S SPREAD LIGHT !’ या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला होता व उज्ज्वल भवितव्याच्या वाटचालीसाठी ऊर्जाही मिळाली होती. परतीच्या प्रवासात गाडी घनदाट जंगलातून धावत होती. माझ्या डोळ्यांसमोर स्वत:चा ‘शिक्षणसेवक ते अधिकारी’ हा संपूर्ण जीवन प्रवास चित्रपटासारखा सरकू लागला.

परिस्थिती हीच प्रेरणा !

नांद्खेड सुमारे ६०० लोकसंख्येचे अकोला जिल्ह्यातील डोंगरांच्या कुशीत वसलेले माझ्या मामाचे छोटेसे खेडे ! येथेच दि.२८ मे १९८१ रोजी माझा जन्म झाला. संपूर्ण बालपण बुलडाणा जिल्ह्यातील खुमगाव या १२०० लोकवस्तीच्या मूळ गावी गेले. घरात वडील, आई, दोन बहिणी प्रीती व माधुरी आणि धाकटा भाऊ श्रीकांत असे एकूण सहा जण. चार एकर कोरडवाहू शेती हाच कुटुंबाचा प्रमुख आधार ! पुढे कर्जबाजारीपणामुळे दोन एकर विकल्याने उरलेल्या दोन एकरातल्या उत्पन्नात कशी बशी गुजराण होत होती. वडील त्या काळात एम.ए.एम.कॉम झालेले होते. त्यांना अध्यात्म, ज्योतिष, साहित्य, राजकारण इत्यादी विविध विषयांच्या वाचनाची प्रचंड आवड ! संपूर्ण पंचक्रोशीत विद्वान व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. शेती, ढेपीचे दुकान, कडबा कुट्टीचा व्यवसाय, फेडरेशन ग्रेडर, एल.आय.सी., ज्योतिष केंद्र इत्यादी विविध क्षेत्रात त्यांनी उदरनिर्वाहासाठी प्रयत्न केला, मात्र ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशा स्वभावामुळे ते कोठेही स्थिर झाले नाहीत व फारसे उत्पन्नही मिळविले नाही. त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण भार आईलाच पेलावा लागे. ती फक्त सहाव्या इयत्तेपर्यंत शिकलेली, मात्र कमालीची कष्टाळू, समंजस व सोशिक! तिच्या माहेरची परिस्थितीही हलाखीचीच.

लहान वयापासून तिला कष्टच करावे लागले. त्यामानाने सासरची परिस्थिती मी पाच वर्षांचा होईपर्यंत बरी होती. मात्र पुढे पुढे अत्यंत हलाखीची होत गेली. घरच्या शेतीसोबतच लोकांच्या शेतात आईला मजुरीला जावे लागे. तिच्या महिन्याच्या मजुरीच्या हजार-बाराशे उत्पन्नातच आमच्या मीठ भाकरीची सोय व्हायची. त्यामुळे भाकरी आहे तर तेल नाही, अशावेळी लाल मिरच्यांची चटणी पाण्यात भिजवून भाकरीसोबत खाण्याचा प्रसंग नेहमीच यायचा. उन्हाळा व दिवाळी अशा तीन महिन्यांच्या सुट्टीत वडील वगळता आम्ही सर्वजण मामाकडेच जायचो. तेथून आई वर्षभराच्या दाळ-दान्याची, पेरणीच्या बी-बियाण्याची सोय करूनच येत असे. बऱ्याचदा सावकाराकडून कर्ज घेवूनही पेरणी करावी लागे. बालपणी गरिबी, तिचे चटके ह्या बाबी फारशा कळायच्या नाहीत. आजूबाजूला सर्व परिस्थितीही अशीच हलाखीची असल्याने त्याबद्दल वाईटही वाटायचे नाही. मी शाळा, अभ्यास, पत्ते, क्रिकेट, पोहणे, डाब-डुबली, विटी-दांडू, कंचे यात धिंगा मस्तीतच मग्न असायचो. मात्र वर्गात नेहमी पहिला क्रमांक असायचा. असेच सातवीपर्यंतचे शिक्षण खूमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले. सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेत मी तालुक्यात पहिला, जिल्ह्यात तिसरा व शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रातून २३ वा आलो होतो.

माझ्या यशाच्या बातम्या विविध वृत्तपत्रात छापून आल्या होत्या. यामुळे माझी अभ्यासाची आवड व आयुष्यात काहीतरी मोठे काम करण्याचा आत्मविश्वास वाढला. आठवी शिकण्यासाठी नांदुरा या तालुक्याच्या गावी जावे लागत होते. तेथील शिक्षण, राहणे, जेवणाचा खर्च घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे परवडण्यासारखा नव्हता. यावेळी माझे चुलत भाऊ रामेश्वर व वहिनी रंजनाताई देवासारखे माझ्या मदतीला धावून आले. त्यांनी माझे आठवी ते बारावी संपूर्ण शिक्षण, पुस्तके, कपड्यांचा खर्च केला. स्वत:च्या मुलासारखे मला सांभाळले. माझ्यातल्या शिक्षणाच्या ऊर्मीला नवसंजीवनी दिली. अन्यथा मीही आज माझ्या इतर मित्रांसारखे गावाकडेच शेती किंवा गुरे-ढोरे सांभाळण्याचे काम करीत असतो. मी बारावी विज्ञान शाखेतून PCM ला ८९% व PCB ला ८६% घेवून उत्तीर्ण झालो. चांगल्या कॉलेजला प्रवेश घेवून इंजिनिअर, डॉक्टर होऊ असे मला वाटत होते. मात्र पुन्हा आर्थिक संकट आ वासून समोर उभे होते.

घरात मी सर्वात मोठा, बहिणींचे शिक्षण व लग्न, धाकट्या भावाचे शिक्षण, आई वडिलांना लवकरात लवकर आधार देणे या सर्वांसाठी उपयुक्त व स्वस्त एकच पर्याय समोर होता डी.एड. करून शिक्षक होणे. नाईलाजाने व अनिच्छेनेच मी बुलडाण्याला शासकीय डी.एड.ला प्रवेश घेतला. सोप्या अभ्यासक्रमामुळे माझे डी.एड.ला मन लागत नव्हते. मुळातच मी खूप एकलकोंडा व मितभाषी होतो. मात्र हळूहळू डी.एड.चे विविध उपक्रम, मित्र, होस्टेल लाईफ यामुळे मी बराच खुललो. अवांतर कादंबरी, कविता, कथा वाचनातून व प्रत्यक्ष अनुभवातून व्यक्तिमत्त्व विकसित होत होते. कविता, लेख लिहायला लागलो. स्थानिक वृत्तपत्रातून ते छापूनही यायला लागले. रामेश्वर भाऊ, मामा यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली. हसत खेळत दोन वर्षे निघून गेली. मात्र खऱ्या संघर्षाची सुरूवात अजून व्हायची होती.

डी.एड. ची परीक्षा देवून घरी आलो आणि घरची परिस्थिती पाहून अक्षरश: हादरून गेलो. वडिलांना वेडेपणाचा झटका आल्याने त्यांचे पूर्ण मानसिक संतुलन बिघडले होते. रात्रभर जागणे, दिवा लावणे, कपडे फाडणे, भिंतीत खिळे ठोकणे, मारणे, रात्री स्मशानात जाणे अशा त्यांच्या विक्षिप्त वागण्याने घरातले सर्वजण भेदरले होते. माझी परीक्षा असल्याने ह्या गोष्टी माझ्यापासून लपवण्यात आल्या होत्या. दिवसरात्र काबाडकष्ट करून आई पुरती खंगली होती. बहिण-भाऊ यांच्या कोवळ्या मनाला ही सर्व परिस्थिती डागण्या देत होती. रडून उपयोग नव्हता. मी सर्व जबाबदारी स्वत: स्विकारली अन् एका नव्या संघर्षाला सामोरे जायला तयार झालो. वडिलांना नागपूरला डॉ.सुधीर भावे यांच्याकडे उपचारासाठी नेले. औषध लागू पडले. वडिलांच्या वागण्यात सुधार झाला. मात्र दर महिन्याला नागपूरवारी व किमान २००० रुपये खर्च कायमचा मागे लागला.

औषधांच्या साईड इफेक्टमुळे वडिलांना अस्थिर मधुमेह व पार्किन्सन हा असाध्य आजार जडला. त्यांचे शरीर सतत हलत राहायचे. पार्किन्सन आजारावर अद्याप प्रभावी औषधांचा शोधच लागला नाही, असे डॉक्टर सांगत. त्यामुळे हतबल होऊन वडिलांची ती अवस्था पाहण्यापलीकडे आपण फार काही करू शकत नाही, अशी बोचणी सारखी मनाला लागून राहायची. कादंबरीतले, कॉलेजचे स्वप्नवत जीवन व वास्तविक जीवन यामधली दाहकता मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. दरम्यानच्या काळात तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी कंत्राटी तत्त्वावर प्रतिमाह ३००० रु. मानधनावर शिक्षणसेवक पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यावर बराच वादंग झाला. त्यामुळे पुढे दीड वर्षे जिल्हा परिषदेची जाहिरात यायला लागली व बेरोजगारीची हीच दीड वर्षे खूप काही शिकवून गेली.

लेखक: प्रशांत भा. वावगे व रश्मी तेलेवार-वावगे,

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, नागपूर.

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate