অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त सुर्यकांत ठाकूर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त सुर्यकांत ठाकूर

क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त सुर्यकांत ठाकूर

राज्यातील खेळाडू व संघटकांना विविध प्रकारचे क्रीडा पुरस्कार देऊन क्रीडा रत्नांचा गौरव राज्य शासनामार्फत केला जातो. रायगड जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्रात अग्रणी स्थान आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते व क्रीडा मंत्री विनोद तावडे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील सुर्यकांत ठाकूर यांना देऊन मुंबई येथे गौरविण्यात आले. यावर्षी कबड्डी क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा सुर्यकांत ठाकूर यांच्या नावाने रायगडला प्राप्त झाला आहे. ठाकूर हे उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे रहिवाशी आहेत. त्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत क्रीडा क्षेत्र स्वीकारुन एक नावलौकिक मिळविला आहे. क्रीडा क्षेत्रात मिळालेल्या यशाच्या कारकिर्दीबाबत ही छोटीशी ओळख.

खेळ म्हटलं की, संघ भावना, कौशल्य, संघटनात्मक कार्य आले. आपल्याला उर्जितावस्था प्राप्त करुन देणारा व संघटनेतून काम कसे करावे याचे खरे उदाहरण म्हणजे सुर्यकांत ठाकूर आहे. कबड्डी क्षेत्रातील त्यांचे नांव आज घेतलं जातय ते म्हणजे कबड्डी महर्षि स्व.बुवा साळवी यांच्या परिसस्पर्शाने पावन झालेले क्रीडा कार्यकर्ते म्हणजे सुर्यकांत ठाकूर. आजपर्यंत जास्तीत जास्त क्रीडा क्षेत्राला झोकून दिले असेल ते म्हणजे कबड्डी क्षेत्र, या क्षेत्रात त्यांनी जिल्ह्याबरोबर राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत संयोजनात उत्तम भरारी मारुन आपलं नाव उच्चस्थानी पोहोचवले आहे.

त्यांच्या कारकिर्दीत एखाद्या कर्मयोग्याला अवंचित करेल अशी त्यांची कबड्डी क्षेत्रावर असीम निष्ठा, त्याग आणि पडेल ते काम झोकून देऊन सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ऊर्जा त्यांच्या ठाई आहे. ही ऊर्जा उराशी बाळगून त्यांनी राष्ट्रीय पंच, क्रीडा संघटक, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, खोखो, कॅरम, सायकलिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष, बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष, ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष, कर्नाळा स्पोर्टस अकेडमीचे सेक्रेटरी, सिडको स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष, मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्शन कमिटी सदस्य व रायगड जिल्ह्यात अनेक संघटनांवर ते विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांना याआधी आगरी भुषण पुरस्कार, शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार, रायगड भुषण पुरस्कार आगरी समाजरत्न पुरस्कार, उत्कर्ष गौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते शासनाचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्राबरोबर त्यांनी भेंडखळ ग्रामपंचायतीचे सरपंचपदही भुषविले आहे.

श्री.ठाकूर हे सिडकोमध्ये काम करीत असतांना त्यांनी अखिल भारतीय कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण केली. एवढेच नव्हे तर रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यात आयोजित अश्विनीकुमार भोईर, दादोजी गावंड अथवा राजीव गांधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संघ व्यवस्थापक व संयोजन समितीत काम केले आहे. 2007 साली पनवेल येथील कर्नाळा स्पोर्टस क्रीडांगणावर झालेल्या दुसऱ्या वर्ल्डकप कबड्डी स्पर्धा, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेलतर्फे आयोजित राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत विविध समित्यांवर काम केले आहे. अवधुत तटकरे मित्र मंडळ रोहातर्फे आयोजित राज्य व राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विविध समित्यांवर उत्तम कार्य, 14 जून 2007 मध्ये रायगड एन्डो-नेपाळ कबड्डी स्पर्धा, 8 मार्च 2010 रायगड-थायलंड महिला कबड्डी सामना, 2010 मध्ये 4 थी कार्पोरेट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, 2011 मध्ये मुंबई येथे अखिल भारतीय विद्यापीठ कबड्डी स्पर्धा, 2014 मध्ये महाड येथे झालेल्या राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये पदाधिकारी, संयोजन समितीवर, संघ व्यवस्थापक म्हणून तसेच क्रीडांगणे तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

आधुनिक कबड्डी मातीवरुन मॅटवर आली तरीही त्याचे तंत्र आत्मसात करुन प्रो कबड्डीच्या नवीन नियमांचे अवलोकन करुन ते अनेक ठिकाणी संयोजन समितीत काम करुन स्पर्धा यशस्वी करीत असतात. पंच कमिटी, तांत्रिक समिती, संयोजन समिती, सल्लगार समिती, प्रसिद्धी समिती, क्रीडांगण समिती अशा अनेक समित्यांवर त्यांची यशस्वी कारकिर्द आजपर्यंत घडत आहे. कबड्डीची मातीचे मैदाने कशी बनवावी, याचे उत्कृष्ट मार्गदर्शन कसे करावे व याबाबतची प्रात्याक्षिके सुर्यकांत ठाकूर यांच्याकडूनच शिकण्यासारखी आहेत. त्यामुळेच त्यांना राज्यात ज्या ज्या ठिकाणी राज्य व राष्ट्रीय स्पर्धा भरविल्या जातात त्या ठिकाणी क्रीडांगणे बनविण्यासाठी पाचारण केले जाते. श्री.ठाकूर यांनी कबड्डीमध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत तसेच अनेक खेळांच्या स्पर्धेत राज्य संघाचे प्रशिक्षक व्यवस्थापक म्हणून अनेकवेळा काम पाहिले आहे.

एवढे करत असतांना हा गुणी क्रीडा कार्यकर्ता केव्हाही प्रसिद्धीच्या ओघात आला नाही त्यापासून दूरच राहिला, “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या उक्तीप्रमाणे ठाकूर हे आपले क्रीडा क्षेत्रातील कार्य करतच राहिला, कोणत्याही फळाची अपेक्षा त्यांनी केव्हाच केली नाही. ज्या ज्या ठिकाणी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कार्य करीत असतांना मानधनाला त्यांनी स्पर्शही केला नाही. सुर्यकांत ठाकूर यांचा क्रीडा क्षेत्रातला सक्रीय सहभाग पाहिला की असे वाटते, असा हुरहुन्नरी क्रीडा कार्यकर्ता आदर्शवत असाच म्हणावा लागेल.

श्री.ठाकूर प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, मला हे मिळालेले यश हे जिल्हा व राज्य कबड्डी असोसिएशनचे आजी, माजी पदाधिकारी, सदस्य व रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडुंमुळे मिळाले आहे. त्यांच्यामुळेच या शिखरापर्यंत पोहोचता आले आहे आणि यापुढेही मी क्रीडा क्षेत्रात शेवटपर्यंत कार्यरत राहून असेच कार्य पुढे चालू ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

- हिरामण भोईर

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/23/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate