অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतकरी पुत्राने रोवला यशाचा झेंडा

शेतकरी पुत्राने रोवला यशाचा झेंडा

घरची परिस्थिती जेमतेम.. वडील शेतकरी.. शेतात राबराब राबायचे. अहोरात्र शेतात काम करून वडिलांनी शिकविण्याचा उचललेला विडा.. अशा शेतीमय कौटुंबिक परिस्थितीतून लोणार तालुक्यातील शारा येथील संजय डव्हळे यांनी शिक्षण घेतले. घरची जेमतेम परिस्थिती असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेशिवाय पर्याय नव्हता. तसेच भौगोलिक परिस्थितीही त्याचप्रकारची असल्यामुळे शिक्षणाला मोठ्या शहरात जाणे अशक्यच.

संजय डव्हळे यांची शिक्षणाची सुरुवात शारा गावातील जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा येथून झाली. त्यानंतरचे शिक्षण शिवाजी हायस्कूल लोणार येथे झाले. शिक्षण शास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी संजयने अमरावती गाठले. अमरावती येथील शासकीय अध्यापक विद्यालयात डी.एड करण्यात आले. कालांतराने संजय डव्हळे पुणे येथे पुढील शिक्षणासाठी गेला. तेथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपणास जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी व्हायचे असे स्वप्न असल्याचे गावात आल्यानंतर मित्रांकडे संजय बोलून दाखवित असे. तेच स्वप्न आज संजयने साक्षात खरे करून दाखविले आहे. 

या यशामुळे त्यांच्या आई वडिलांना झालेला आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आई-वडील व लहान भाऊ वैभव डव्हळे यांच्या पाठींब्यामुळेच मला यश हे मिळाले आहे, असे ते बोलून दाखवितो. लहान भाऊ असलेल्या वैभवने त्यांना नेहमी पाठिंबा दिला. अपयश आल्यास खचून न जाता जोमाने कामाला लागणे, निराशावादी न राहणे हे सर्व वैभवमुळे संजयला जमले. लहान भाऊ त्याचा पाठीराखा झाला. त्याच्या या यशामध्ये कुटुंबियांचा मोठा सहभाग आहे. संजयला स्पर्धा परीक्षा देऊन अशाप्रकारे प्रशासनात करीअर करता येते, याबाबत कुणीही मार्गदर्शन केले नाही. त्याने मनाशी बांधलेली खुणगाठ व ध्येय पूर्तीसाठी केलेल्या अथक परिश्रमाने संजयला हे यश प्राप्त झाले. 

संजय आई-वडिलांचे कष्ट वारंवार पाहत होता. त्याला वाटायचे आपली आई शेतात काम करते. तीचे कष्ट वाया जावू द्यायचे नाही. तिने शिक्षणाला दिलेले पैसे कारणी लावायाचे. संजयने कोणत्याही परिस्थितीत आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे, हे ध्येय मनाशी बाळगले व आपणास अधिकारी बनून प्रशासनात जायचेच हे स्वप्न मनी बाळगले. संजय सतत स्पर्धा परीक्षा द्यायचा. प्रथम त्याने सन 2014 मध्ये नायब तहसीलदार पद मिळविले. मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने चिकाटीने 2015 वर्षातील राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा दिली. या परीक्षेत घवघवीत यश मिळवित संजयने तहसिलदार पद मिळविले. त्यावेळेस त्याचे उपजिल्हाधिकारी पदाची इच्छा केवळ अर्ध्या गुणाने पूर्ण झाली नाही. तेव्हा पासून तो आणखीनच चिकाटीने अभ्यासाला लागला. त्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तहसिलदार पदाची मिळालेली संधी त्याने न घेता व कसलाही विचार न करता अभ्यासाचा पाढा जोमाने सुरू ठेवला. अभ्यास ऐके अभ्यास करीत तो आपल्या स्वप्नपूर्तीकडे आगेकूच करीत होता.

ही संधी त्याला 2016 मध्ये मिळाली. या संधीचे सोने करायचे त्याने ठरविले. 2016 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत राज्यातून तिसरा क्रमांक घेऊन संजयने आपल्या घवघवीत यशाचा ठसा पुन्हा एकदा उमटविला. लोणार तालुक्यातील शारासारख्या गावातून या शेतकरी पुत्राने गावात आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. संजय डव्हळे यांच्या निवडीची वार्ता गावात कळताच त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लेखक - निलेश तायडे
माहिती सहायक, बुलडाणा

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/25/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate