অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सातारा जिल्हा परिषद शाळांची शिक्षण भरारी

सातारा जिल्हा परिषद शाळांची शिक्षण भरारी

सातारा मराठा साम्राज्याची राजधानी ! इतिहासाची परंपरा, शौर्याची गाथा आणि आधुनिकतेचा ध्यास असणारा सातारा ! दऱ्या खोऱ्यांनी गडकोटांनी, गर्द जंगलांनी, नद्यांनी व्यापलेला जिल्हा ! एकीकडे मुसळधार पावसाची बरसात तर, दुसरीकडे टंचाई अशी विषम परिस्थिती असणाऱ्या साताऱ्याच्या मुशीतून अनेक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि खेळाडू तयार झाले आहेत. याचे बीज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आजही खोलवर रुजलेलं आहे.

इथल्या मातीने, दऱ्या-खोऱ्यातील परंपरेने नेहमीच नवे उपक्रम जन्माला घातले आहेत. ज्ञानरचनावाद ही सुद्धा साताऱ्याने देशाला दिलेली देणगी आहे. 2012-13 पासून कुमठे बीटमधून ज्ञानरचनावादी दृष्टीकोन अवलंबण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता बहुतांशी शाळांमध्ये या दृष्टीकोनाची वर्गरचना तयार होण्यास सुरुवात झाली. कुमठे बीट आणि वाई तालुक्यातील 80 टक्के विद्यार्थी प्रगत झाले. याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील व इतर राज्यातील सुमारे 70 ते 75 हजार शिक्षकांनी भेटी दिल्या. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्रालयाचे मुख्य सचिव आनंद स्वरुप, राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, राज्याचे सर्व शिक्षण संचालक, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश यासारख्या राज्य आणि दिव, दमण, दादरा नगर हवेली या सारख्या केंद्रशाषित प्रदेशातील उच्च पदस्थ अधिकारी भेटी देऊन ज्ञानरचनावादी दृष्टीकोन विकसीत केला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा अत्यंत चांगला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचा चेहरा मोहरा बदलला आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक शाळेमध्ये प्रवेश घ्यावा आम्ही निश्चितपणे गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये 2 हजार 713 शाळांमध्ये 1 लाख 48 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 97 टक्के शाळांना स्वत:ची सुसज्ज इमारत, सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. 609 शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. 1 हजार 542 शाळांमध्ये डिजीटल शिक्षणाची सोय, 1 हजार 972 शाळांमध्ये संगणक सुविधा, 5 हजार 900 शिक्षक, टेक्नोसॅव्ही आहेत. समाज माध्यमांच्या बदलत्या सध्याच्या युगात ब्लॉग, सॉफ्टवेअर, संकेतस्थळ, शैक्षणिक व्हीडीओ शिक्षकांनी तयार केले आहेत. यशवंत प्रयोग शाळा, ज्ञानचक्षु वाचनालय, परसबाग ही या शाळांची वैशिष्ट्ये आहेत.

भारतरत्न डॉ.आंबेडकर जि.प. शाळेचे विद्यार्थी : डॉ. राजेश देशमुख

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्रतापसिंह हायस्कुलमध्ये चौथी पर्यंत झाले आहे. ही अभिमानाची आणि गौरवाची बाब जिल्ह्यासाठी आहे. महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वारसा पुढे घेऊन जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून भावी पिढी घडवत आहोत. जिल्हा परिषदेच्या शाळा राज्यात अग्रेसर आहेत. सर्व सामान्य विद्यार्थ्यांना असामान्य बनविण्यासाठी आमचे शिक्षक मेहनत घेत आहेत. शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम भावी पिढी बनविण्याचा ध्यास आमच्या शिक्षकांनी घेतला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.देशमुख यांनी केले.

बौद्धीक क्षमतेच्या विकासाबरोबर शारीरिक क्षमतेच्या विकासावर भर देण्यासाठी दरवर्षी स्व.यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामधूनच क्रीडा प्रबोधिनी हा प्रकल्प साकारला गेला. महाराष्ट्रामध्ये एकट्या सातारा जिल्हा परिषदेचे 67 टक्के विद्यार्थी क्रीडा प्रबोधिनीत आहेत. यातील 53 विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत नैपुण्य दाखवत आहेत. सातारा जिल्ह्याने सन 2016-17 मध्ये शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. पायाभूत व संकलीत चाचणीमध्ये गणित विषय महाराष्ट्रात प्रथम, वाई तालुका भाषा विषयामध्ये महाराष्ट्रात द्वितीय आला आहे. राज्यातील पहिल्या 20 तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील 3 तालुके अग्रेसर आहेत.

जिल्हा परिषद शाळांनी अधिकारी, पदाधिकारी घडले: राजेश पवार

जिल्हा परिषदेतील शाळांमधून अनेक अधिकारी, पदाधिकारी घडले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणात अग्रेसर आहेत. अशा शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण, अर्थ आणि क्रीडा सभापती राजेश पवार यांनी केले.

राज्यातील पहिल्या 20 केंद्रांमध्ये जिल्ह्यातील 17 केंद्र अग्रेसर आहेत. ज्ञानरचनावादी दृष्टीकोन व त्यावर आधारित आकर्षक वर्गरचना, मोफत मध्यान भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके. महाबळेश्वर सारख्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी थंडीमुळे शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून कोळसा आणि झडीसाठी अनुदान दिले जाते. असा प्रगतीमय विचार करणारी सातारा जिल्हा परिषद राज्यात एकमेव असेल. यशवंत गुरुकुल योजना, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, मार्गदर्शन वर्ग, दर्जेदार विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास, विद्यार्थ्यांना बाल आनंद मेळावे, किशोरी मेळावे, लोकनृत्य, बाल नाट्य, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. ही या शाळांचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत.

मुक्तहस्ताने निसर्गाने या जिल्ह्यावर आपली जशी उधळण केली आहे, तशी निसर्गसंपन्न जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनीही विद्यार्थी घडविताना विविध उपक्रमांनी उधळण केली आहे. ही जिल्ह्याच्या वैभवशाली परंपरेत घातलेली भरच होय.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शाळांवर आधारित ‘शिक्षण भरारी’ ही चित्रफीत तयार करण्यात आली आहे. ही चित्रफीत https://www.youtube.com/watch?v=4F8MHO8NriM या लिंकद्वारे युट्युबवर तसेच www.sataradio.com वर चित्रफित दालनामध्ये पाहता येईल.

- प्रशांत सातपुते

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/12/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate