অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विभागीय आयुक्तांची अनोखी स्वच्छता मोहीम

विभागीय आयुक्तांची अनोखी स्वच्छता मोहीम

वेळ सकाळी 7 वा. स्थळ शहागंज परिसरातील महात्मा गांधी यांचा पुतळा. ध्येय शहराची साफसफाई. महात्मा गांधीच्या पुतळ्याला नमन, पुष्पार्पण, अभिवादन. त्यानंतर हातात झाडू घेऊन स्वत: विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर परिसरातील स्वच्छता, साफसफाई करतात. खरंच राज्यात असं पहिल्यांदाच घडत असेल, की शासनाचे सर्व कार्यालये एकाच दिवशी एकदाच शहरात अनोख्या पद्धतीनं नियोजनबद्धरित्या यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबवितात. पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करतात. लोकंही या मोहिमेत उत्सफूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छतेची शपथ घेतात.

स्वच्छता हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. स्वच्छता केवळ शासकीय कार्यालये, महापालिकेची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. महात्मा गांधीजींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले त्यात त्यांनी राजनैतिक स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता महत्त्वाची असल्याचे सांगितले. महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपणाला, भारतमातेला मुक्त केले. स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपल्या देशाच्या विकासासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी अस्वच्छतेतून मुक्ती देण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र आणि स्वच्छ औरंगाबाद करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतेबाबत आग्रह धरून, जागरूक राहून इतरांनाही यासाठी प्रेरित करणे महत्त्वाचे आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून लोकचळवळ उभारली. त्याचाच प्रत्यय आजच्या स्वच्छता मोहिमेतून आला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने देखील महाराष्ट्र स्वच्छता अभियानात देशात आघाडी घेतली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र स्वच्छता अभियानाला प्रथम प्राधान्य देऊन राज्य सरकार सर्व सामान्यांच्या हित आणि विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाने आठवड्यातून दोन तास असे एकूण वर्षातील एकूण शंभर तास श्रमदान करण्याचा आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प तडीस नेण्यास कटीबद्ध असल्याचे दाखवून दिले पाहिजे. आज झालेल्या स्वच्छता अभियानातून प्रत्येकालाच श्रमदानाचे महत्त्व कळले. शिवाय स्वच्छतेबाबत जागृतीची जबाबदारीही आपल्यावर असल्याचे समजल्यास मदत झाली.

विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी स्वत: महात्मा गांधी पुतळा ते सिटी चौक आणि सिटी चौक ते गुलमंडी परिसराची पाहणी करून स्वच्छता, साफसफाई केली. सोबत इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील स्वच्छता करत होते. महाविद्यालयीन, शाळा, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधीही या अभियानात हिरीरीने सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ करत होते. अशाचप्रकारे शहरातील प्रमुख अशा 42 ठिकाणी शासनाच्या कार्यालयातील अधिकारी –कर्मचारी यांनी अनोख्या पद्धतीचे एकाच दिवशी स्वच्छता अभियान राबवून जनतेत जागृती केली. या अभियानात जवळपास एक लाख नागरिक, युवक – युवती जोडल्या गेले. परंतु आपण एवढ्यावरच समाधान न मानता यापुढे ही शहर, शहराबाहेरील, जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी, पर्यटनस्थळांच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवावे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला नवी ओळख निर्माण करून द्यावी. या स्वच्छतेच्या अभियानातून पर्यटन व्यवसायालाही चालना मिळण्यास मदत होईल. स्वच्छतेची ही ओळख निर्माण करून विकासाचा ध्यास घेऊ, असेही उपस्थितांना स्वत:च्या कृतीतून डॉ. भापकर यांनी संदेश दिला.

मी घाण करणार नाही आणि दुसऱ्याला करू देणार नाही. सर्वप्रथम स्वत:पासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्ली, वस्तीपासून, माझ्या गावापासून, कार्यस्थळांपासून स्वच्छतेच्या कामाला सुरूवात करेल. जगातील इतर देशाप्रमाणे मीही अस्वच्छता करणार नाही. गावोगावी याबाबत इतरांनाही प्रेरित करेल. इतर 100 व्यक्तींनाही स्वच्छतेची शपथ घ्यायला लावेल. माझे स्वच्छतेचे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करेल, याचा मला विश्वास असल्याची शपथही डॉ. भापकर यांनी उपस्थितांना दिली.

अत्यंत साधे, सरळ, आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊन स्वत:च्या आचरणातून इतरांना संदेश देणारे डॉ. भापकर इतरांनाही अशा कार्यातून सातत्याने प्रेरणा देत असतात. आज तर चक्क त्यांनी पुन्हा स्वत: हातात झाडू घेऊन शहराचा भाग स्वच्छ केला. खरोखरच त्यांचे कार्य भविष्यात देशाला, राज्याला आणि पर्यटननगरी औरंगाबादला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईलच, यात शंका नाही.

लेखक: श्याम टरके

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate