অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नवजात बालकांसाठी मातृदुग्ध पेढी

मातेचे दूध हे बाळासाठी संतुलित आहार आहे. बाळाला मातेच्या दुधावर जोपासणे इतकी दुसरी कोणतीही मोठी गुंतवणूक असू शकत नाही. मातेचे दूध न मिळाल्यामुळे जगात 13 लाख ते साडेअठरा लाख बालकांचा मृत्यू होतो. यावर मात करण्यासाठी मातृदुग्ध पेढी ही संकल्पना जगभर राबविली जाते. जगभर 517 मातृदुग्ध पेढ्या कार्यरत आहेत. पुण्यातील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातही नोव्हेंबर 2013 पासून मातृदुग्ध पेढी कार्यरत आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि युनिसेफच्या संयुक्त विधानाप्रमाणे ‘जे बाळ आपल्या मातेचे दूध घेऊ शकत नाही अशा बाळास आपल्याच मातेचे काढलेले किंवा मातृदुग्ध पेढीतले दूध सर्वात उत्तम आहे. भारतात जेथे जीवंत प्रसुतीमागे बाळमृत्यू प्रमाण प्रतिहजारी 87 आणि पहिल्या महिन्यात बालमृत्यू प्रमाण हे प्रतिहजारी 43 इतके आहे तेथे मातृदुग्ध पेढीची प्रतिबंधक वैद्यकीय उपाय योजना उपयोगी पडू शकते. भारतात सध्या 13 मातृदुग्ध पेढ्या असून त्यापैकी मुंबईत पाच आहेत. त्यामध्ये जे.जे. हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, राजीव गांधी हॉस्पिटल, ठाणे, के.ई.एम. हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल यांचा समावेश आहे. इतर मातृदुग्ध पेढ्या गोवा, बडोदा, सूरत, हैदराबाद, होशगाबाद, उदयपूर व पुणे येथे बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून हॉस्पिटल आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा दोन मातृदुग्ध पेढ्या पुण्यात आहेत. ही एक अशी संस्था आहे जिथे दान केलेल्या मातृ दुधाचे संकलन, तपासणी, प्रक्रिया, साठवण वाटप केले जाते. हे दूध अशा बालकांसाठी वापरले जाते ज्यांचे या मातांशी कुठलेही नाते संबंध नसतात.

बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात नोव्हेंबर 2013 मध्ये कार्यान्वित मातृदुग्ध पेढीसाठी बँक ऑफ बडोदाने 11 लाख 55 हजार रुपयांची देणगी दिली. ही मातृदुग्ध पेढी स्थापन करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची दूरदृष्टी व बालरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. संध्या खडसे यांचे परिश्रम फलदायी ठरले.

मातृदुग्ध पेढीचे स्थान हे नवजात शिशु अतिदक्षता कक्ष किंवा प्रसूती पश्चात कक्षाशेजारी असते. पेढीचा प्रमुख हा मातृदूग्ध पेढीचे पर्यवेक्षण, नियोजन, विकास आणि मूल्यमापन यांची अंमलबजावणी करतो. दुग्धन व्यवस्थापन परिचारिका, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, जीवरसायन शास्त्रज्ञ, परिचर, सामाजिक कार्यकर्ता व समुपदेशक असे कर्मचारी असतात.

मातृदुग्ध कोण दान करू शकतात

  • दुग्धन आई जिला अतिरिक्त दूध येते व जिला कुठलाही संसर्गजन्य रोग नसावा. (उदा. एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, सी, सिफीलीस, क्षयरोग).
  • अकाली जन्माला आलेल्या बाळांचे माता, आजारी किंवा छिन्न ताळू असलेल्या बाळांच्या माता, अशा माता ज्यांनी हल्लीच आपल्या बाळाला काही काणास्तव गमावले आहे.
  • दाता जे दुग्धपेढीमध्ये वैद्यकीय तपासणी व रक्त तपासणी पेढीच्या खर्चाने करून घेण्यास इच्छुक आहेत.
  • आरोग्यकारक दुग्धन माता.

कोण दान करु शकत नाहीत

  • कमर्शिअल सेक्स वर्कर.
  • कुटुंबात अतिविकृती प्रकरण असलेले गट.
  • एचआयव्ही पॉझिटीव्ह, हिपॅटायटीस बी, सी, व्हीडीआरएल पॉझिटीव्ह, अवयव किंवा ऊतकचा प्राप्तकर्ता.
  • औषधे, तंबाखू, दारुचे व्यसनाधीन, इतर कुठलेही आत्यंतिक वैद्यकीय आजार असलेली व्यक्ती.
  • एखादी व्यक्ती जी मनाने किंवा स्वखुशीने दुग्धदानासाठी तयार नाही.

लाभार्थी कोण आहेत

  • अति धोका असलेले नवजात बाळ (मुदतपूर्व जन्म झालेले बाळ, कमी वजन असलेले बाळ) जे बाळ आपल्या आईपासून प्रसूतीनंतर उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे किंवा कुठल्याही दुसऱ्या चिंताजनक वैद्यकीय आजारामुळे दूर झाले आहेत.
  • सर्वदेही बधिरीकरण करून केलेलं सिझेरियन शस्त्रक्रिया.
  • माता ज्यांचे स्तनाग्र सपाट किंवा अधोमुख आहेत.
  • माता ज्यांनी जुळे, तिळे किंवा चतुष्क बाळांना जन्म दिले असेल.
  • दुग्धन नसलेली माता जिने नवजात बाळाला दत्तक घेतले असेल तर

पेढीतील आवश्यक साहित्य सामग्री

  • ब्रेस्ट मिल्क पंप- मॅन्युअल व इलेक्ट्रॉनिक.
  • मातृ दुग्ध साठवण्याठी पात्र : पायरेक्स किंवा प्रोपिलीन याने बनवलेले पात्र.
  • किंवा मोठे तोंड असलेले दंडगोलाकार स्टेनलेस स्टीलचे घट्ट झाकण असलेले पात्र.
  • 20° अंश सेल्सिअस तापमानाला दूध साठवण करू शकणारे हिमकारी यंत्र ज्यामध्ये सुग्रही तापमापी गजर असेल.
  • स्वयंचलित वितुषार असलेले शीत कपाट.
  • वातानुकूलक आणि जनरेटर.
  • शेकर वाटर बाथ विथ थर्मोस्टेटिक कंट्रोल.
  • सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेचा ब्रेक अप.

साठवण कशी करावी

  • दूध हे पात्रामध्ये साठवण करून घट्ट झाकण लावून, शीत पेटीत, जमा केल्याच्या तारखाप्रमाणे ठेवले पाहिजे. सामान्य तापमान (15-25° सेल्सिअस) मातृ दूध हे चार ते सहा तासापर्यंत व्यवस्थित राहू शकते.
  • फ्रीजमध्ये हेच दूध पाच ते सात दिवसांपर्यंत तसेच शीत पेटीत (-20° सेल्सिअस) ते सहा महिन्यांपर्यंत व्यवस्थित राहू शकते.
  • वितळण झालेले फ्रीजमधील दूध हे 24 तासासाठी सुरक्षित असते.
  • हे दूध उकळणे व सूक्ष्मलहरीकरण करणे अयोग्य आहे.

वितरण कसे करावे

  • विनंतीनुसार बाळाचे नाव व नोंदणी क्रमांक टाकून मातृ दुध हे आईस पॅक असलेले वॅक्सीन कॅरियरमधून वितरीत केले जाते.
  • सर्वात आधी साठवलेले दूध प्रथम वितरीत केले जाते.
  • वितरीत झालेले दूध सामान्य तापमानाला आल्यानंतर 4-6 तासामध्ये वापरले गेले पाहिजे.

गुणवत्ता शाश्वती

  • मार्गदर्शन निरिक्षणासाठी एक नोंदवही ठेवली पाहिजे.
  • प्रत्येक नमुन्याचे गुणधर्म जपून ठेवण्यासाठी नियमितपणे संवर्धन केले पाहिजे.
  • निर्जंतुकीकरण केल्यानंतर जंतू आढळणे हे अमान्य आहे.


आईचे दूध हे बाळ व मातेमधील एक सुरेख, भावनिक, पोषक व बौद्ध‍िक बंध आहे. प्रत्येक प्रजातीसाठी ते वैशिष्ट्यपूर्ण असते. आईच्या दुधातील प्रत्येक घटक हा बाळाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थ असते. आईच्या दुधात रोगप्रतिकारक क्षमता असते. तसेच विविध अत्यावश्यक पोषक द्रव्ये व संप्रेरके यांनी ते परिपूर्ण असते. मानवाने कितीही प्रगती केली तरी आईच्या दुधाची तुलना इतर प्राणी मात्राच्या दुधाशी होऊ शकत नाही. ज्याअर्थी भारतामध्ये कमी वजनाच्या बाळांची व मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांना नियमितपणे पुरेशी दुधाची पुरवणी झालीच पाहिजे. यासाठी मातृदुग्ध पेढीची गरज अतुलनीय आहे. तसेच मातृदुग्ध पेढी ही एक स्वस्त संकल्पना असून ती नवजात शिशुच्या संपूर्ण जपणुकीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

- डॉ. सोमनाथ सलगर,
सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र विभाग,
बै.जी. शासकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे-०१
संपर्क : ९८८१२८७०६५
ईमेल-drsomnathsalgar@gmail.com

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate