অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसुतीनंतर शारीर‍िक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित रहावी, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे. तसेच महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या मातृ वंदना योजनेविषयी...

मातृ वंदना योजनेची वैशिष्ट्ये

• मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे. ही योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असून या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असणार आहे.

• केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचना, निकष, कार्यपद्धती व विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्यामार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच त्यांना या योजनेसाठी राज्यस्तरीय समन्वय अधिकारी म्हणून घोषित केले आहे.

• राज्यात 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.

• ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.

• नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ अनुज्ञेय राहील.

• या योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.

योजनेचा लाभ कसा मिळेल

• पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे.

• उक्त लाभासाठी महिलेचे व तिच्या पतीचे सहमती पत्रे, दोघांचीही आधार संबंधित माहिती (आधार) आणि लाभार्थी महिलेचे आधार संलग्न बँक खाते अथवा पोस्ट खाते क्रमांक तसेच तिचे / पतीचे / कुटुंबातील सदस्याचा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

• प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफीसमधील खात्यात एकूण रुपये 5000/- रुपयांची रक्कम तीन हप्त्यात जमा केली जाणार आहे.

• पहिला हप्ता रुपये 1000/- हा मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.

• दुसरा हप्ता रुपये 2000/- हा किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.

• तिसरा हप्ता रुपये 2000/- हा प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरणाचा जन्मत: एक मात्रा बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटॅटीस बी तसेच पेन्टाव्हॅलेन्टचे 3 व ओपीव्हीच्या 3 मात्रा अथवा समतूल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.

• लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत रुपये 700/- (ग्रामीण भागात) व रुपये 600/- (शहरी भागात ) लाभ अनुज्ञेय राहील

मातृ वंदना योजनेसाठी संपर्क

ग्रामीण क्षेत्र : एएनएम पात्र लाभार्थींना विनाशूल्य विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल व परिपूर्ण अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे सादर करेल. हा अर्ज भरण्याची जबाबदारी एएनएमची राहील. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे जमा करतील. विहित संकेतस्थळावर तालुका अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरण्यात येईल. राज्यस्तरावरुन संगणक प्रणालीद्वारे थेट लाभ अदा करण्यात येईल.

नगरपालिका क्षेत्र : एएनएम पात्र लाभार्थीना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल. परिपूर्ण अर्ज हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करतील. मुख्याधिकारी विहित संकेतस्थळावर लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरतील.

महानगरपालिका क्षेत्र : मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रात एएनएम पात्र लाभार्थीं महिलेला विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारतील. परिपूर्ण अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.

मातृ वंदना लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

• लाभाच्या पहिल्या टप्प्यासाठी तथा नोंदणीसाठी प्रपत्र 1 अ माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र व आधार संलग्न बँक / पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक आहे.

• लाभाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रपत्र 1 ब माता व बाल संरक्षण प्रमाणपत्रावर किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी (ए.एन.सी) ची नोंद असणे अनिवार्य आहे.

• लाभाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रपत्र 1 क जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत व बाळाला लसीकरणाचा पहिला खुराक दिल्याची नोंद असलेले माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

• लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार संलग्न नसल्यास ते आधार संलग्न करण्यासाठी प्रपत्र 2 अ आणि पोस्ट खाते आधार संलग्न करण्यासाठी प्रपत्र 2 ब चा वापर करावा.

• आधारसंदर्भात नोंदणी / सुधारणा करण्यासाठी लाभार्थी प्रपत्र 2 क चा वापर करेल.

• या योजनेच्या नोंदणीबाबतच्या माहितीमध्ये (पत्ता/भ्रमणध्वनी क्रमांक/बँक खाते क्रमांक/ नावात बदल / आधार क्रमांक ) सुधारणा करण्यासाठी प्रपत्र 3 चा वापर करावा.

• सदर प्रपत्रे अंगणवाडी सेविका / एएनएम तसेच आरोग्य संस्थेमध्ये विनाशुल्क प्राप्त होतील. तसेच लाभार्थींकडे आधार कार्ड / बँक खाते/ पोस्ट खाते नसल्यास सदर कार्ड व खाते काढण्यासाठी अंगणवाडी सेविका/एएनएम मदत करतील.

• या योजनेतून मातांना योग्य मार्गदर्शन, आहार प्राप्त होणार आहे.

संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, पालघर.

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate