অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन

राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन

सुदृढ आणि सुरक्षित गर्भवती महिलांसाठी योजना

प्रत्येक गर्भवती स्त्रीला निरोगी बालक आणि सशक्त गर्भधारणेची अपेक्षा असते. परंतु कुपोषणामुळे आई व बाळाच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. देशात दररोज सुमारे 1500 महिला आणि किशोरवयीन मुली गर्भधारणा आणि बाळाच्या जन्माशी संबंधित समस्येने मरण पावतात. कुपोषणाच्या समस्येमुळे दरवर्षी सुमारे 10 दशलक्ष महिला आणि किशोरवयीन मुलींना गर्भधारणेदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा बाळांना संसर्ग होतो. अपंगत्व येते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान आई व गर्भाची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. यासाठी राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत विशेष प्रयत्न केले जात आहेत. याविषयी सांगताहेत मिशनच्या संचालक सुप्रभा अग्रवाल.

आईची महती एवढी मोठी आहे की ‘स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी’ अशा शब्दात तिचे वर्णन करूनही समाधान होत नाही. त्यामुळे कुणी तिला देवाच्या तर कुणी गुरूच्या रुपात पाहतो. कुणी मायेचा अथांग सागर म्हणून तिचे वर्णन करतो. तर ‘देव सर्वत्र असू शकत नाही म्हणूनच त्याने आई निर्माण केली’ हे ज्युंचे सुभाषित आईची महती व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. आई, मदर, माँ, मॉम, बा आदी शब्द दिसायला व उच्चारायला अगदी छोटे. मात्र त्यामध्ये सर्व जगाचा समावेश होतो. प्रत्येक धर्मात, भाषेत आई या शब्दाला अगाध प्रेमाचा अर्थ आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर स्त्रीचादेखील आई म्हणून जन्म होतो. अशा आईची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे असते. ती सुदृढ राहिली तर बाळाचीही सुदृढ व निरोगी वाढ होते. त्यामुळे माता व बाळाच्या सुदृढ आरोग्याचा वसा जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनने घेतला आहे.

गरोदर महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. गरोदर मातांच्या अशक्तपणामुळे जगभरात दरवर्षी सुमारे 30 लाख मृत बाळांचा जन्म होतो. तर 37 लाख नवजात बालकांचा मृत्यू जन्मानंतर लगेच अथवा महिनाभरात होतो. गरोदर मातेच्या आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे किंवा तिला काही आजार झाला असल्यास त्यादरम्यान आरोग्याविषयी विशेष खबरदारी न घेतल्यामुळे बाळ मृत जन्माला येणे किंवा महिनाभरात ते मरण पावणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. शिवाय बाळ सुदृढ व निरोगी जन्माला न आल्यास भविष्यातही त्याला आरोग्याविषयी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

सुरक्षित मातृत्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे

• महिला गर्भवती होण्यापूर्वी तिचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहील, याची काळजी घ्यावी.

• प्रत्येक गर्भधारणेदरम्यान किमान चार वेळा प्रशिक्षित आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्याकडून प्रसुतीविषयी काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. तपासण्या वेळेवर होणे गरजेचे आहे.

• डॉक्टर, नर्स तसेच प्रशिक्षित सहाय्यकाच्या देखरेखीखाली बाळाचा जन्म व्हावा.

• बाळ जन्मण्याबाबत गुंतागुंत असल्यास गरोदर माता आणि तिच्या बाळाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

• बाळाला जन्म दिल्यानंतर माता व बाळाची आठवडाभर किमान दर 24 तासाला नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जन्मानंतर सहा महिन्यांनी अशी तपासणी आवश्यक आहे.

एचआयव्ही चाचणी

गर्भवती महिला आणि तिचा जोडीदार यांनी एचआयव्ही चाचण्या वेळेत करून घ्याव्यात. त्या पॉझिटिव्ह आल्यास बाळाची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. गर्भावस्था, जन्म आणि बाळाला दूध पाजताना बाळाला हा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे मनात शंका असो अथवा नसो या चाचण्या करून प्रशिक्षित समुपदेशकाचे (आरोग्य कर्मचाऱ्याचे) मार्गदर्शन घ्यावे.

सुरक्षित मातृत्वाची त्रिसूत्री

सर्व गरोदर महिलांना निरोगी आणि सुरक्षित बाळंतपणाची खात्री देणे म्हणजेच सुरक्षित मातृत्व म्हणता येईल. निरोगी प्रजननासाठी सुरक्षित मातृत्व महत्त्वाचा घटक ठरतो. सुरक्षित मातृत्व म्हणजेच निरोगी गर्भधारणा आणि बाळाचा सुरक्षित जन्म देण्याची आईची क्षमता. याची सुरुवात गर्भधारणेपूर्वीपासून सुरू होते. गर्भधारणेपूर्वी मातेचे पोषण आणि निरोगी-सुदृढ जीवनशैली, बाळ जन्मापूर्वी घेतलेली योग्य काळजी, शक्य होईल तेथे आरोग्याविषयी उद्भवलेल्या समस्यांवर वेळीच योग्य उपचार व प्रतिबंध ही सुरक्षित मातृत्वाची त्रिसूत्री म्हणता येईल.

जागतिक आरोग्य संघटनेचा पुढाकार

सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाची सुरुवात 1987 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी केली. विकसनशील देशांमधील गरोदरपणातील अडचणी आणि प्रसूतीदरम्यान होणारा मृत्यूचा दर कमी करण्याचा याचा मुख्य उद्देश आहे. विकसनशील देशांमध्ये गर्भधारणेपूर्वी, जन्मपूर्व आणि जन्मोत्तर माता व बालकाला आवश्यक सेवा मिळत असल्याची खात्री व पर्यवेक्षण या कार्यकमांतर्गत केले जाते.

कुपोषणमुक्तीसाठी योजना

गरिबी, दुर्गम भाग अथवा अज्ञानामुळे महिला चांगल्या आरोग्य सेवांपासून वंचित राहतात. परंतु राज्य शासन महिलांसाठी अनेक योजना राबवत असल्याने महिलांना प्रसूतीपूर्व व प्रसुतीनंतरच्या सर्व आरोग्य सुविधा मिळत आहेत. राज्यात राष्ट्रीय आरोग्य मिशन आणि इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या एमआयवायसीएन (मॅटरनल, इन्फंट ॲण्ड यंग चाइल्ड न्यूट्रिशन) या कार्यक्रमांतर्गत लहान मुलांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणावर घटला आहे. शिवाय शासनामार्फत गरोदर मातांसाठी जननी सुरक्षा योजना व जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

जगभरातील 30 टक्के प्रजननक्षम आणि 42 टक्के गरोदर मातांना लोह कमतरतेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासन ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवत आहे. अंगणवाडीसेविकांमार्फत आदिवासी भागात गरोदर मातांना पोषण आहार दिला जात आहे.

सुरक्षित मातृत्वाच्या दृष्टीने महिलांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य केंद्रांना काही सूचनावजा शिफारशी केल्या आहेत.

कुटुंब नियोजन

गर्भधारणेचे नियोजन कसे करावे, दोन गर्भधारणेत किती अंतर असावे, गरोदर मातेचे वय आदींविषयी माहिती जोडप्यांना दिली जाईल याची खात्री करणे.

प्रसूतीपूर्व काळजी

गर्भाची वाढ व्यवस्थित होत आहे का, काही वैद्यकीय गुंतागुंत होणार असल्यास त्याची खबरदारी घेऊन वेळीच योग्य उपचार करणे.

स्वच्छता

प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीपश्चात माता व बाळाच्या देखभालीसाठी प्रशिक्षित व कौशल्ययुक्त मदतनीस असावे. त्यांना उपकरणांचे ज्ञान असावे. सुरक्षित प्रसूतीची खात्री करायला हवी.

प्राथमिक काळजी

संवेनशील आणि अधिक धोक्याच्या गर्भधारणेसाठी आवश्यक असणारी सर्व काळजी घ्यावी आणि योग्यवेळी निदान करण्यात यावे.

निरोगी मातांची मुले बालपण आनंदाने जगतात, उत्साहाने शाळेत जातात. निरोगी जीवन जगून सर्व गोष्टींमध्ये आघाडीवर असतात. गर्भधारणेपूर्वी आणि प्रसूतीपूर्व काळात मातेच्या आरोग्याची विशेष काळजी घेतल्यास अर्भक अथवा नवजात बाळ शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यास मदत होते. हे बाळाच्या दीर्घायुष्याच्या वाटचालीसाठी महत्त्वाचे असते.

शब्दांकन- प्रा. गणेश तारे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate