অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुदृढ भारताची संकल्पना- प्रधानमंत्री ‘मातृ वंदना’ योजना

सुदृढ भारताची संकल्पना- प्रधानमंत्री ‘मातृ वंदना’ योजना

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे तसेच माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित रहावी यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे. ही योजना राज्यात लागू करण्यास 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या मातृ वंदना योजनेविषयी थोडक्यात माहिती…

योजनेची वैशिष्ट्ये :

• राज्यात 1 जानेवारी 2017 रोजी अथवा तद्नंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.

• ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे.

• नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ अनुज्ञेय राहील.

• या योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

• पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे. या लाभासाठी महिलेचे व तिच्या पतीची सहमती पत्रे, दोघांचीही आधार संबंधित माहिती (आधार) आणि लाभार्थी महिलेचे आधार संलग्न बँक खाते अथवा पोस्ट खाते क्रमांक तसेच तिचे/ पतीचे/ कुटुंबातील सदस्याचा मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे.

• या योजनेच्या लाभाची 5000/- रुपयांची रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफीस मधील खात्यात तीन हप्त्यात जमा केली जाणार आहे.

• पहिला हप्ता एक हजार रूपये हा मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.

• दुसरा हप्ता दोन हजार रुपये हा किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.

• तर, तिसरा हप्ता दोन हजार रुपये हा प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरणाचा जन्मत: एक मात्रा बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटॅटीस बी तसेच पेन्टाव्हॅलेन्टचे 3 व ओपीव्हीच्या 3 मात्रा अथवा समतूल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.

• लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 700 रूपये (ग्रामीण भागात) व 600 रूपये (शहरी भागात) लाभ अनुज्ञेय राहील.

संपर्क

एएनएम पात्र लाभार्थींना विनाशूल्क अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारेल. हा अर्ज पुढे पाठविण्याची जबाबदारी एएनएमची राहील. राज्य स्तरावरुन संगणक प्रणालीद्वारे थेट लाभ अदा करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

• लाभाच्या पहिल्या टप्प्यासाठी तथा नोंदणीसाठी प्रपत्र 1 अ माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र व आधार संलग्न बँक/ पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक आहे. लाभाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रपत्र 1 ब माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र वर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी (ए.एन.सी) ची नोंद असणे अनिवार्य आहे. तर, लाभाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रपत्र 1 क जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत व बाळाला लसीकरणाचा पहिला खुराक दिल्याची नोंद असलेले माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

• लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार संलग्न नसल्यास ते आधार संलग्न करण्यासाठी प्रपत्र 2 अ आणि पोस्ट खाते आधार संलग्न करण्यासाठी प्रपत्र 2 ब चा वापर करावा.

• आधार संदर्भात नोंदणी/ सुधारणा करण्यासाठी लाभार्थी प्रपत्र 2 क चा वापर करेल.

• या योजनेच्या नोंदणीबाबतच्या माहितीमध्ये (पत्ता/ भ्रमणध्वनी क्रमांक/ बँक खाते क्रमांक/ नावात बदल/ आधार क्रमांक) सुधारणा करण्यासाठी प्रपत्र 3 चा वापर करावा.

• ही प्रपत्रे अंगणवाडी सेविका/ एएनएम तसेच आरोग्य संस्थेमध्ये विनाशुल्क प्राप्त होतील. तसेच लाभार्थींकडे आधार कार्ड/ बँक खाते/ पोस्ट खाते नसल्यास सदर कार्ड व खाते काढण्यासाठी अंगणवाडी सेविका/ एएनएम मदत करतील.

- संदीप गावित

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate