অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तापाचे रोगनिदान : तक्ता आणि मार्गदर्शन

तापाचे रोगनिदान

ताप हे लक्षण अनेक संस्थांशी निगडित असल्याने त्याचे नेमके रोगनिदान केल्याशिवाय योग्य उपचार करता येत नाहीत. प्राथमिक आरोग्यसेवेच्या दृष्टीने सोबतच्या तक्त्यात तापाशी निगडित आजाराचे निदान करण्यासाठी तक्ता व मार्गदर्शक दिलेले आहे. रोगनिदान तक्ता आणि मार्गदर्शक ही साधने कशी वापरावीत हे आपण आधी शिकलो आहोत. आधी आपण तापासंबंधी रोगनिदान मार्गदर्शकाबद्दल माहिती घेऊ या. हा रोगनिदान मार्गदर्शकात 0-6 वयोगटातील मुले सोडता सगळयांना लागू आहे. यात पहिल्या विभागात गर्भपात व बाळंतपणाबद्दल प्रश्न आहे. अर्थात हा भाग गर्भपात किंवा बाळंतपण झालेल्या स्त्रियांसाठीच लागू आहे. यानंतर श्वसनसंस्थेशी निगडित विभाग आहे. यात सर्दीताप,घसादुखी, न्यूमोनिया, इ. आजार आहेत. यानंतरच्या विभागात क्वचित होणारे काही आजार म्हणजे कावीळ, पू-जंतुरोग, मेंदूसूज आणि सांधेसूज हे आजार दिलेले आहेत. चौथ्या व शेवटच्या विभागात थंडीतापाचे आजार आहेत. यातून उरलेला आजार म्हणजे विषमज्वर धरावा. मात्र आजकाल एडस् या आजाराची देखील शक्यता मनात धरावी. या मार्गदर्शकातील क्रम महत्त्वाचा आहे. यात काही प्रश्न विचारायचे आहेत तर काही साध्या तपासण्या करायच्या आहेत. यातले काही आजार साधे, काही मध्यम तर काही गंभीर स्वरुपाचे आहेत.

इतर चिन्हे

रोगनिदान मार्गदर्शकातील काही महत्त्वाचे मुद्दे आता विचारात घेऊ या.

सूज

सूज म्हणजे शरीराच्या कोठल्याही भागातील आकारमानात वाढ होणे. सूज अनेक प्रकारची, अनेक कारणांमुळे येऊ शकते. मार लागणे, मुरगळणे, जंतुदोष,पाणी साठून, रक्त साठून किंवा कर्करोग वा इतर गाठ यांपैकी कशानेही सूज येऊ शकते. ठणका, गरमपणा, दुखरेपणा, असेल तर अशी सूज बहुधा जंतुदोषाच्या'दाहा' मुळे असते.

कावीळ

रक्तामधल्या एका विशिष्ट द्रव्याचे (बिलीरुबीन) प्रमाण वाढले की'कावीळ' होते. लघवी गडद पिवळी होणे, डोळयात पिवळेपणा दिसणे, नंतर चेहरा व त्वचेवरही पिवळेपणा दिसणे या क्रमाने चिन्हे दिसतात. डोळयातला पिवळेपणा मात्र दिवसा उजेडातच दिसू शकतो. कृत्रिम प्रकाशात तो अजिबात दिसत नाही.

काविळीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे

यकृताची सूज आणि दुखरेपणा (म्हणजे दाबल्यावर दुखणे) : यासाठी उजव्या बरगडीखाली बोटांनी तपासून यकृताची वाढ, दुखरेपणा कळू शकतो. निरोगीपणात मोठया माणसांमध्ये यकृत बोटांना अजिबात लागत नाही. लहान मुलांमध्ये ते बरगडीखाली एका बोटाच्या रुंदीइतके लागते. काही वेळा यकृत बोटाला वाढल्यासारखे लागत नाही पण दुखरेपणा असतो. हा दुखरेपणा ही सांसर्गिक काविळीची महत्त्वाची खूण आहे. डोळयांचा पिवळेपणा बहुधा यानंतर येतो.

मान ताठरणे

'मेंदूसूज' किंवा 'मेंदूच्या आवरणाला सूज' या आजारात मान (कधीकधी पाठही) ताठरते. या ताठरण्याचे कारण म्हणजे मेंदूभोवतीचे आवरण सुजून मणक्यातून जाणा-या चेतारज्जूच्या हालचाली दुख-या, अवघड होतात. यासाठी तपासणी करायची असल्यास रुग्णाला उताणे झोपवा. या अवस्थेत डोक्याखाली आपला हात ठेवून रुग्णाचे डोके उचलण्याचा प्रयत्न करा. असे करताना मान जडावणे, रुग्णाच्या चेह-यावर वेदना दिसणे यावरून 'मान ताठरल्याचे'अनुमान काढता येते. याचबरोबर वागण्याबोलण्यात फरक असेल तर नातेवाईकास तसे स्पष्ट विचारून माहिती मिळू शकते.

घसासूज आणि टॉन्सिलसूज

घसा पाहण्यासाठी तोंड पूर्ण उघडायला लावावे. तोंड उघडलेल्या अवस्थेत 'आ' म्हणायला लावावे. त्याच क्षणी घशाची पूर्ण तपासणी करता येते. या वेळी घशाची पाठभिंत , बाजू, टॉन्सिलच्या ग्रंथी,इत्यादींची पटकन पाहणी करावी. लहान मुलांचा घसा मूल रडतानाच चांगला तपासता येतो. ब-याच वेळा लहान मुलाचा घसा जिभेवर चमचा दाबून पाहावा लागतो, नाही तर तपासणी नीट होऊ शकत नाही. सोबत बॅटरीचा उजेड असला तर जास्त चांगले. बॅटरी नसेल तर उन्हाकडे तोंड करून घसा तपासता येईल. घशामध्ये पुढील बाबी तपासाः

घसा सुजलेला व लालसर आहे काय, यासाठी निरोगी घसा कसा दिसतो याचे चित्र मनात तयार पाहिजे. यासाठी नेहमी घसा बघणे आवश्यक आहे.

टॉन्सिलच्या गाठी

टॉन्सिलच्या लालसर सुजलेल्या गाठी म्हणजे 'टॉन्सिल'येणे. साधारणपणे पाच-दहा वर्षे वयापर्यंत टॉन्सिलच्या गाठी मोठयाच असतात. त्यानंतर त्या लहान होत जातात. त्या लालसर व सुजलेल्या दिसल्यास किंवा त्यातून 'पू' येत असल्याचे दिसल्यास रोगनिदान सोपे होते. नेहमी नेहमी टॉन्सिल सुजत असल्यास अशा टॉन्सिलच्या गाठी आक्रसलेल्या दिसतात.

घटसर्प म्हणजे

घशात किंवा टॉन्सिलवर पांढरट पडदा येणे. हा पडदा संबंधित भागाला घट्ट चिकटलेला असतो व काढण्याचा प्रयत्न केला तर काढलेल्या जागेतून रक्त येत राहते. घटसर्प लसीकरणामुळे हल्ली फारसा दिसत नाही. पण हा आजार घातक आहे. घटसर्प आढळल्यास ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे.

घसा, टॉन्सिलला सूज असेल तर बहुधा गळयात अवधाण येते. ब-याच वेळा मुले'गळयात दुखते-गाठ आली' हीच पहिली तक्रार सांगतात. अशा वेळी घसा तपासावा.

डेंगू व चिकनगुण्या

या दोन आजारांमध्ये शरीर फार दुखते. हे आजार साथीच्या स्वरुपात येतात. मात्र साथीच्या सुरुवातीस रोग लगेच कळून येत नाही, यासाठी मनात तशी शक्यता धरावी लागते. यापैकी डेंगू आजार जास्त घातक आहे. यात काही रुग्णाच्या शरीरातून रक्तस्राव होऊ शकतो.

घसा व टॉन्सिल सुजून घशाचा रस्ता बारीक झाल्यास घास गिळायला त्रास होतो. अशा वेळी पातळ पदार्थ प्यायला द्यावे लागतात. म्हणून गोळ्यांऐवजी पातळ औषध दिलेले चांगले.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 6/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate