অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोटशूळ

पोटशूळ

उदरगुहेतील अंतस्त्यांच्या (यकृत, प्लीहा, आतडी इ. इंद्रियांच्या) विकृतीमुळे उद्‌भवणाऱ्या व पोटात उत्पन्न होणाऱ्या वेदनांना पोटशूळ म्हणतात. पोटशूळ ही सर्वसाधारण संज्ञा असून उदरगुहेतील आंत्र (आतडी), पित्तनलिका, मूत्रवाहिनी इ. विशिष्ट इंद्रियांसंबंधीच्या वेदनांचा त्यात समावेश असतो. इंद्रियपरत्वे या वेदनांना आंत्रशूल, पित्तशूल पित्ताशय; पित्ताश्मरी वगैरे निरनिराळी नावेही देतात.

अंतस्त्यजन्य वेदनांचे तीन प्रकार आहेत : (१) अंतस्त्यजन्य वेदना, (२) अन्यत्र वेदना (मूळ कारण जेथे आहे तेथे न जाणवता अन्य भागात जाणवणाऱ्या वेदना) आणि (३) स्थानिक अरक्तताजन्य (रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने, सामान्यतः रक्तवाहिनी आकुंचित झाल्याने, उद्‌भवणाऱ्या;इश्‌कीमिक) वेदना.

अंतस्त्यजन्य वेदना

विकृत अंतस्त्याच्या स्नायुभित्तीतील आंतस्त्यिक तंत्रिका तंतूंवरील (मज्जातंतूंवरील) ताण वाढल्यामुळे या वेदना उत्पन्न होतात. त्या उदरगुहेच्या खोल भागात कधीकधी विरामी स्वरूपाच्या असून पुष्कळ वेळा आंत्ररोध किंवा पित्तनलिकारोधापासून उत्पन्न होतात. वृक्कशूलातही (मूत्रपिंडाच्या शूलातही) अशाच वेदना मूत्रवाहिनीरोधापासून उत्पन्न होतात. अंतस्त्याचा शोथ (दाहयुक्त सूज) अंतस्त्यजन्य वेदनांची तलसीमा कमी करतो व म्हणून कोणतीही अल्पशी चेतना वेदना उत्पन्न करण्यास समर्थ असते.

अन्यत्र वेदना

अंतस्त्यांचे शोथजन्य, रक्तस्त्रावोत्पादक किंवा अर्बुदजन्य (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठीमुळे उद्‌भवणाऱ्या) विकार उदरगुहेच्या भित्ति-पर्युदरावर पर्युदर क्षोभ उत्पन्न करतात. भित्ति-पर्युदर आणि अंतस्त्य-पर्युदर यांना पुरवठा करणाऱ्या तंत्रिका मेरुरज्जूच्या (पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या व तंत्रिका तंतूनी बनलेल्या दोरीसारख्या भागाच्या) एकाच खंडापासून निघत असल्यामुळे अंतस्त्य वेदना उदर भित्तीवर अन्यत्र वेदना म्हणून जाणवतात. पोटशूळाच्या प्रमुख कारणांमध्ये पर्युदरक्षोभ हे

तीव्र पोटशूळाचे विश्लेषण

विश्लेषण

जठर छिद्रण

आंत्रपुच्छशोथ

तीव्र अग्निपिंडशोथ

पित्ताशयशूल

वृक्कशूल

बृहदांत्राचा पूर्ण रोध

लघ्वांत्ररोध

वेदना स्थान

अधिजठर

नाभी

अधिजठर किंवा उजवा अधःपर्शुक

उजवा अधःपर्शुक  आणि अधिजठर

कंबर

अधोजठर

नाभी

वेदना विकिरण

संपूर्ण उदरगुहा व डावा खांदा

कालांतराने उजवी श्रोणिखात

पाठ व संपूर्ण उदरगुहा

उजवी स्कंधास्थी

जांघेकडे

उदरगुहेच्या दोन्ही बाजू

वेदना प्रकार

तीव्र

विरामी व कालांतराने सतत

सतत

विरामी किंवा एकसारख्या

विरामी

विरामी

विरामी

गांभीर्य

अती गंभीर

गंभीर

अती गंभीर

अती गंभीर

अती गंभीर

गंभीर

गंभीर

सुरुवात व कालमर्यादा

ताबडतोब व टिकाऊ

जलद व काही तास

एकाएकी व टिकाऊ

एकाएकी व काही तासपर्यंत

एकाएकी काही मिनिटे  ते काही तास

हळूहळू व कित्येक दिवस

जलद व काही तास ते काही दिवस

अधिक दुःसह होण्याचे कारण

हालचाल

चालणे ज्या स्नायूवर आंत्रपुच्छ असते त्यांच्या हालचालीचा परिणाम

धक्के बसणे

इतर सहलक्षणे

अवसाद व उलट्या

उलट्या व ज्वर

उलट्या व अवसाद

उलट्या

उलट्या, वारंवार लघवी होणे व रक्तमेह

बद्धकोष्ठ, कालांतराने उलट्या

उलट्या

प्राकृतिक लक्षणे

उदर भित्तीची अती दृढता

उजव्या श्रोणिखातेच्या भागात स्पर्शासह्यता व दृढता

कालांतराने उदर  भित्तीची दृढता

उजव्या अधोजठर भागात स्पर्शासह्यता

दोन्ही बाजूस फुगवटी, गुदांत्र फुगवटी

उदरगुहेच्या मध्यभागी फुगवटी, गुदांत्र फुगवटी

विशिष्ट तपासणी

क्ष-किरण :मध्यपटलाखाली हवा संचय

रक्तद्रवातील व मूत्रातील अमायलेझची वाढ

क्ष-किरण :अश्मरीची शक्यता

क्ष-किरण :अश्मरीची शक्यता

क्ष-किरण :आंत्रद्रव्य पातळी

क्ष-किरण :आंत्रद्रव्य पातळी

[बृहदांत्र – मोठे आतडे; लघ्वांत्र – लहान आतडे; अधिजठर – जठराच्या  पुढे असणारा उदराचा वरचा मधला भाग; अधःपर्शुक – सर्वांत खालच्या बरगडीखालील उदराचा भाग; अधोजठर – उदराचा खालचा मध्यवर्ती व पुढे असणारा भाग; विकिरण - प्रसारण; श्रोणिखात – धडाच्या तळाशी मागच्या बाजूस असलेल्या हाडांच्या रुंद कुंडासारख्या रचनेतील खळगा; अश्मरी – सामान्यतः अजैव (वा खनिज) द्रव्य एकत्र गोळा होऊन तयार होणारा खडा .

एक कारण असते. अन्यत्र वेदनांचे उत्तम उदाहरण म्हणजे मध्यपटलालगतच (छातीची पोकळी आणि उदरगुहा यांचे विभाजन करणाऱ्या स्नायुयुक्त पटलाच्या लगतच) असलेल्या मध्यवर्ती पर्युदरक्षोभामुळे उत्पन्न होणाऱ्या खांद्याच्या टोकावरील वेदना हे होय. यकृत विकृतीत उजव्या खांद्याच्या मागच्या भागात अन्यत्र वेदना होतात.

पर्युदरक्षोभजन्य वेदनांबरोबर खोल स्पर्शासह्यत्व (स्पर्श केल्यास तो सहन न होणे) आणि पुष्कळ वेळा उदर भित्तीतील स्नायूंची दृढताही आढळते. अंतस्त्य वेदनांपेक्षा या वेदना अधिक स्थिर (सतत जाणवणाऱ्या) असून त्या भोसकल्यासारख्या वा कापल्यासारख्या असतात.

स्थानिक अरक्तताजन्य वेदना

कायिक, हृदीय किंवा अंतत्स्य यासंबंधीच्या स्नायूंच्या रक्तपुरवठ्यात व्यत्यय येऊन स्थानिक अरक्तता उत्पन्न होताच वेदना उत्पन्न होतात. अंतर्गळात आतडे पाशग्रस्त होऊन अडकलेल्या भागाच्या रक्तपुरवठ्यात व्यत्यय येऊन स्थानिक अरक्तता उत्पन्न होऊन पोटशूळ सुरू होतो. कधीकधी आंत्रबंधातील आंत्र रक्तवाहिनी बिघाडामुळे स्थानिक अरक्तता उत्पन्न होऊन वेदना सुरू होतात.

प्रकार

पोटशूळाचे दोन प्रकार आढळतात : (१) तीव्र आणि (२) चिरकारी (दीर्घकालीन).

तीव्र पोटशूळ

तीव्र पोटशूळ हे वैद्यकातील एक महत्त्वाचे क्षण असून त्याकडे तातडीने लक्ष पुरविण्याची मोठी जबाबदारी वैद्यावर असते. कारण काही रोगांमध्ये, उदा., आंत्रपुच्छशोथ (ॲपेंडिसायटीस) किंवा पित्ताशयशोथ पित्ताशय, तातडीची शस्त्रक्रियाच जीवदान देण्यास समर्थ ठरते. याकरिता प्रत्येक वैद्याने पोटशूळाचे कारण शोधण्याचा कसून प्रयत्न करणे आवश्यक असते. पुष्कळ वेळा रोगी रुग्णालयात दाखल करणे हितावह ठरते.

कोष्टकात तीव्र पोटशूळाच्या काही महत्त्वाच्या कारणांचे विश्लेषण दिले आहे.

चिरकारी पोटशूळ

चिरकारी पोटशूळ आणि अग्निमांद्य या तक्रारी करणाऱ्या रोग्यांपैकी बहुतेकांना सेंद्रिय विकृती नसल्याचे आढळून येत असल्यामुळे त्यांचा उल्लेख पुष्कळ वेळा ‘मनःकायिक विकार’म्हणून करतात. परंतु अनेक वेळा गंभीर रोगात चिरकारी पोटशूळ हे एक लक्षण असल्यामुळे त्याचे कारण शोधण्याचे सर्व प्रयत्न प्रथम केल्यानंतरच त्यास मनःकायिक ठरवणे योग्य असते.

चिरकारी पोटशूळ असलेल्या रोग्याला पुष्कळ वेळा त्याला काय होते त्याचे नक्की वर्णन करता येत नाही. असे असूनही ही तक्रार बहुसंख्य रोगी करतात. रोग्याकडून मिळालेल्या रोगेतिहासाच्या वर्णनावरून रोगस्थानाचा (उदा., आंत्रमार्ग, अग्निपिंड वगैरे) अंदाज करता येतो. आंत्रमार्गबाह्य भागातील विकृतिदर्शक लक्षणे रोग्याच्या वर्णनातून मिळतात. रोगाची सुरुवात, लक्षण स्थान, दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध वगैरे माहिती रोगनिदानास मदत करते. क्षुधानाश व शारीरिक वजनातील घट आनि पोटशूळ ही उदरगुहेतील एखाद्या गंभीर रोगाची लक्षणे असू शकतात.

निदानाकरिता संपूर्ण शारीरिक तपासणी आवश्यक असते. या शिवाय प्रयोगशाळेतील रक्त, मूत्र व मल तपासण्या, तसेच क्ष-किरण तपासणी व गुददर्शनीच्या (गुदाची तपासणी करण्याकरिता ते उघडे करण्यास मदत करणाऱ्या) उपकरणाच्या साहाय्याने केलेली गुदांत्रदर्शन परीक्षा उपयुक्त असतात.

चिरकारी पोटशूळ हे पुढील विकृतींमध्ये एक लक्षण असू शकते. (१) चिरकारी पित्ताशयशोथ, (२) पित्ताश्मरी, (३) चिरकारी प्रत्यावर्ती (वारंवार होणारा) अग्निपिंडशोथ अग्निपिंड, (४) चिरकारी आंत्र-अंधवर्धशोथ (आतड्याच्या स्नायवीय आवरणातून त्याचे आतील बुळबुळीत आवरण बाहेर पडून तयार झालेल्या पिशवीसारख्या भागाची दाहयुक्त सूज), (५) चिरकारी आंत्ररोध, (६) चिरकारी पर्युदरशोथ (बहुधा क्षयरोगजन्य), (७) सार्वदेहिक विकृती व विषाक्तता; उदा., पश्चमूलक्षय (मेरुरज्जूतील तंत्रिकांच्या पश्च वा पृष्ठीय जुडग्यांचा व प्रेरक तंत्रिकांच्या मुख्य शाखांचा क्षय), शिशाची विषबाधा, (८) अग्निपिंडाचा कर्करोग.

पोटशूळ हे वैद्यांना बुचकाळ्यात पाडणारे व महत्त्वाचे लक्षण असल्याचे वरील वर्णनावरून लक्षात येते. पुष्कळ वेळा निदानाकरिता विशिष्ट तपासण्या अपरिहार्य असल्यामुळे रोग्यास रुग्णालयात ठेवणे हितावह असते. कोणताही पोटशूळ मनःकायिक विकार ठरविण्यापूर्वी सर्व तपासण्या होणे जरूर असते. कोणत्याही पोटदुखीवर पोट चोळण्याचा घरगुती उपाय कटाक्षाने टाळला पाहिजे. या उपायाने मूळ विकृती अती गंभीर बनण्याचा मोठा धोका असतो; उदा., आंत्रपुच्छशोथात पोट चोळल्यास आंत्रपुच्छ भित्ती भेदून संसर्ग सबंध उदरगुहेत पसरण्याचा धोका असतो.

लेखक : य. त्र्यं. भालेराव

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : पोटशूळ हा शब्द व्यापक आहे. ह्यात पित्ताश्मरी, मूत्राश्मरी ह्यांत होणारा शूल, आतड्यात होणारा शूल तसेच पचनज व्रण ह्यामध्ये आमाशय आणि ग्रहणी ह्यांत होणारा शूल, आंत्रपुच्छजन्य शूल अशा अनेक शूलांचा समावेश होतो. त्यांचे उपचार त्या त्या ठिकाणी दिलेले आहेत. अश्मरी; आंत्रपुच्छशोथ; आंत्रशूल;पचनज व्रण; पित्ताश्मरी.

लेखक : शुभदा अ. पटवर्धन

संदर्भ : 1. Chamberlain, E. N.; Ogilvie, C. Symptoms and Signs in Clinical Medicine, Bristol, 1974.

2. Harvey, A. M. and others, Ed., The Principles and Practice of Medicine, New Delhi, 1974.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate