অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधुमेह

मधुमेह

  1. सामान्य प्रक्रिया
    1. अन्नाचे रुपांतर ग्लुकोजमधे केले जाते
    2. ग्लुकोज पेशींमधे प्रवेश करते
    3. पेशी या ग्लुकोजला ऊर्जेत रुपांतरित करतात
    4. अन्न हे ऊर्जेत रुपांतरित केल जातं
  2. मधुमेहाची चिन्हे
  3. आपण साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे का महत्वाचे आहे?
  4. उच्च रक्तदाबाविषयी अधिक माहिती
  5. कोलेस्टेरॉल बद्दल
  6. मधुमेहाच्या नियोजनासाठी
    1. व्यायाम
    2. मधुमेहात त्वचेची निगाः
    3. शरीराचं नियमित निरीक्षण करा आणि खालीलपैकी कोणतंही लक्षण दिसल्यास डॉक्टरांना सांगा
    4. त्वचेच्या योग्य काळजीसाठी सूचना
    5. जखमांची काळजी घेणे
    6. आपल्याला पुढील लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा
    7. मधुमेहामधे घ्यावयाची पायाची काळजी
    8. तोंडाचे आरोग्य
    9. आपल्याला पुढील चिन्हं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्याः
    10. डोळ्यांची काळजी

मधुमेह झालेला असताना शरीर अन्नाचे रुपांतर ऊर्जेत कसे करते आणि होणारे बदल यांची सामान्य प्रक्रिया पुढे समजावून सांगितली आहे.

सामान्य प्रक्रिया

अन्नाचे रुपांतर ग्लुकोजमधे केले जाते

आपण जे अन्न घेतो त्याचे रुपांतर पोटामधे एका इंधनात केले जाते, त्याला आपण ग्लुकोज म्हणतो, ही एक प्रकारची साखर असते.  ग्लुकोज हे रक्तप्रवाहात जाते आणि शरीरातील लाखों पेशींपर्यंत पोचविले जाते.

ग्लुकोज पेशींमधे प्रवेश करते

स्वादुपिंड नांवाचा एक अवयव इन्शुलिन नांवाचे रसायन तयार करतो.  हे इन्शुलिन सुध्दा रक्तप्रवाहात जाते आणि पेशींपर्यंत प्रवास करते.  तिथे ते ग्लुकोजला मिळते आणि त्याला पेशीत प्रवेश करायला मदत करते.

पेशी या ग्लुकोजला ऊर्जेत रुपांतरित करतात

पेशी या शरीराला ऊर्जा देण्यासाठी ग्लुकोजचे ज्वलन करतात. मधुमेह असतो त्यावेळी होणारे बदल याप्रमाणेः
मधुमेहामुळं शरीराला अन्नातून ऊर्जा मिळायला अवघड जातं.

अन्न हे ऊर्जेत रुपांतरित केल जातं

या स्थितीतही पोटामधे आपण घेतलेल्या अन्नाचं रुपांतर ग्लुकोजमधे केलं जातं. हे ग्लुकोज रक्तप्रवाहात जातं.

परंतु बहुंतांश ग्लुकोज हे पेशींमधे शिरु शकत नाही कारणः

  • पुरेसे इन्शुलिन उपलब्ध नसेल.
  • भरपूर प्रमाणात इन्शुलिन उपलब्ध असेल, परंतु ते ग्राहकांना (रिसेप्टर्स) उघडू शकत नसेल
  • सर्वच ग्लुकोज पुढे पाठविलं जाण्यासाठी फार थोडे रिसेप्टर्स असतील.
  • पेशी ऊर्जा निर्माण करु शकत नाहीतः
    बहुतांश ग्लुकोज हे रक्तातच राहते.  या स्थितीला हायपरग्लायसेमिया (यालाच अतिरक्तशर्करा किंवा उच्च रक्त शर्करा असेही म्हणतात) म्हणतात.  पेशींमधे पुरेसे ग्लुकोज नसेल तर, त्या पेशी शरीराचे कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक ऊर्जा तयार करु शकत नाहीत.
  • मधुमेहाची चिन्हे

    मधुमेह असलेल्या लोकांना विविध प्रकारची लक्षणे दिसतात.  त्यापैकी काही खालीलप्रमाणेः

    1. वारंवार लघवीला लागणे
    2. खाजरी त्वचा
    3. दृष्टी धूसर होणे
    4. थकवा किंवा अशक्तपणा वाटणे
    5. पायांमधे बधीरपणा किंवा मुंग्या येणे
    6. अतिशय तहान लागणे
    7. कापणे / जखमा लवकर ब-या न होणे
    8. नेहमी खूप भूक लागल्यासारखे वाटणे
    9. वजन कमी होणे
    10. त्वचेचे संक्रमण

    आपण साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे का महत्वाचे आहे?

    • अधिक काळपर्यंत उच्च रक्तशर्करा असणे विषकारक असते.
    • कालांतराने, अति प्रमाणातील ग्लुकोज हे रक्तवाहिन्या, मूत्रपिंडं, डोळे आणि शिरांचे नुकसान करते परिणामी शरीराच्या महत्वाच्या अवयवांचं कायमस्वरुपी नुकसान होऊ शकतं.
    • चेतापेशींच्या समस्या (न्यूरोपॅथी) पायामधे किंवा शरीराच्या अन्य भागांमधे संवेदना नष्ट होण्यास कारणीभूत ठरु शकतात.  रक्तवाहिन्यांच्या रोगामुळं (आर्टेरियोस्क्लेरॉसिस) हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि रक्ताभिसरणाच्या समस्या होऊ शकतात.
    • डोळ्यांच्या समस्यांमधे डोळ्यातील रक्तवाहिन्यांचे नुकसान, डोळ्यामधे दाब येणे (ग्लाऊकोमा), आणि डोळ्याच्या भिंगावर पडदा येणं (मोतिबिंदू) यांचा समावेश होतो.
    • मूत्रपिंडाचा रोग (नेफ्रॉलॉजी) हा मूत्रपिंडातून घाण बाहेर काढून टाकणं थांबवितो.  उच्च रक्तदाबामुळं (हायपरटेन्शन) हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात.

    उच्च रक्तदाबाविषयी अधिक माहिती

    जेव्हा हृदयाचे स्पंदन होते तेव्हा त्याव्दारे रक्त हे रक्तवाहिन्यांमधे पंप केले जाते आणि त्यांच्यामधे दबाव निर्माण होतो. एका सुदृढ व्यक्तीमधे, रक्तवाहिन्या या स्नायूंनी बळकट आणि लवचिक असतात.  हृदय जेव्हा त्यांच्यामधून रक्त पंप करते तेव्हा त्या प्रसरण पावतात.  सामान्य स्थितीत हृदय हे प्रति मिनिट 60 ते 80 वेळा स्पंदन करते. प्रत्येक स्पंदनाच्या वेळी रक्तदाब वाढतो आणि दोन स्पंदनांच्या दरम्यान हृदय तेव्हा विश्रांती घेते तेव्हा तो कमी होतो.  रक्तदाब हा दर मिनिटाला आपल्या शारीरिक स्थिती, व्यायाम किंवा झोपेमुळं बदलत राहतो, परंतु तो सामान्यतः 130 / 80 इतका एका प्रौढासाठी असावा.  या पातळीपेक्षा अधिक रक्तदाब हा उच्च समजला जातो.

    उच्च रक्तदाबाची साधारणतः कुठलीही लक्षणं नसतात, वस्तुतः अनेक लोकांना अनेक वर्ष रक्तदाब असतो परंतु त्यांना त्याची कल्पनाही नसते. त्याचा ताणाशी, अस्वस्थतेशी किंवा अतिक्रियाशील राहण्याशी संबंध नसतो. आपण एक शांत, आरामशीर व्यक्ती असू शकता आणि तरीही आपल्याला रक्तदाब असू शकतो.  अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक, हदय विकाराचा झटका, हदय बंद पडणे किंवा मूत्रपिंड निकामी होणे असे होउ शकते, ह्या पैकी सर्वच प्रसंग जीवासाठी घातक असतात.  त्यामुळेच उच्च रक्तदाबाला हळूवारपणे मारणारा रोग असं ब-याचदा म्हटलं जातं.

    कोलेस्टेरॉल बद्दल

    शरीरातील कोलेस्टेरॉलच्या उच्च पातळीमुळे हृदय विकार होण्याची शक्यता चारपटीने वाढते.  रक्तातील अतिरिक्त कोलेस्टेरॉलमुळं रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जाड कडक थर जमा होतो.  हे कोलेस्टोरॉल किंवा थर जमण्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती जाड, कडक आणि कमी लवचिक बनतात.  परिणामी हदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि काही वेळा अडविला जातो.  रक्तप्रवाहात अडथळा येतो तेव्हा छातीत वेदना किंवा अँजायना उद्भवते.  हृदयाला होणारा रक्तपुरवठा जेव्हा तीव्र स्वरुपात बिघडतो किंवा पूर्णतः थांबतो तेव्हा हदयविकाराचा झटका येतो.  उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल ह्यांच्या जोडीला मधुमेह असेल तर स्ट्रोक आणि हदयविकाराचा झटका होण्याचा धोका सोळापटीनं वाढतो.

    मधुमेहाच्या नियोजनासाठी

    आहार, व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता आणि शक्यतो इन्शुलिनचे इंजेक्शन किंवा तोंडावाटे औषधे (डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे) घेणे हे मधुमेहाच्या उपस्थितीमुळं उत्पन्न होणा-या गुंतागुंती टाळण्याचे काही उपाय आहेत.

    व्यायाम

    व्यायाम करण्यामुळं रक्तातील साखरेची पातळी कमी होते, आणि ग्लुकोज वापरण्याची शरीराची क्षमता सुधारते.  प्रति तास 6 किलोमीटर चालण्यामुळं 30 मिनिटांत 135 उष्मांक (कॅलरीज) जळतात तर सायकल चालवण्यामुळं 200 उष्मांक जळतात.

    मधुमेहात त्वचेची निगाः

    मधुमेह झालेल्या लोकांनी त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.  मोठ्या प्रमाणातील ग्लुकोजमुळं विषाणू आणि बुरशीला पोषक वातावरण तयार होते रक्ताभिसरण कमी राहिल्यानं शरीर स्वतःला हानीकारक विषाणूंपासून वाचवू शकत नाही.  शरीराच्या संरक्षक पेशी हानिकारक विषाणू नष्ट करु शकत नाहीत.  अतिग्लुकोजमुळं डिहायड्रेशन होतं, यामुळं त्वचा कोरडी आणि खाजरी बनते.

    शरीराचं नियमित निरीक्षण करा आणि खालीलपैकी कोणतंही लक्षण दिसल्यास डॉक्टरांना सांगा

    • त्वचेचा रंग, रचना, किंवा जाडी ह्याच्यांत बदल झाल्यास
    • कोणतेही चट्टे किंवा व्रण
    • विषाणू संक्रमणाची प्रारंभिक चिन्हे, जसे लालसरपणा, सूज, फोड किंवा त्वचा हाताला गरम लागणे
    • गुप्तांग किंवा गुदद्वाराच्या भागात, काखेत किंवा स्तनांखाली किंवा पायांच्या बोटांमधे खाजणे, बुरशीच्या संक्रमणाचा हा संकेत असतो
    • बरी न होणारी जखम

    त्वचेच्या योग्य काळजीसाठी सूचना

    • नियमितपणे हलका साबण किंवा कोमट पाण्याने अंघोळ करा
    • अति गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा
    • अंघोळ केल्यानंतर अंग स्वच्छ कोरडे करा म्हणजे ज्या ठिकाणी अतिरिक्त ओलावा  होईल अशा त्वचेच्या घड्यांमधे अधिक लक्ष देता येईल जसे काख, गुप्तांग, आणि पायाची बोटे.  ह्या भागांमधे अधिक ओलावा राहिल्यास बुरशीचे संक्रमण होण्याचा धोका वाढतो.
    • त्वचा कोरडी ठेवू नका.  जेव्हा तुम्ही कोरडी, खाजणारी त्वचा खरवडता तेव्हा तुम्हीच त्वचा तोडता आणि विषाणूंना मार्ग मिळतो
    • त्वचा ओलसर रहावी यासाठी भरपूर द्रव पदार्थ प्यावेत

    जखमांची काळजी घेणे

    कधीतरी कापणे किंवा खरचटणे हे टाळता येत नाही.  मधुमेह असलेल्या लोकांनी किळकोर जखमांकडं विशेष लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून संक्रमण होणार नाही.  किरकोळ कापणे आणि खरचटणे ह्यावर तत्काळ उपाय केला पाहिजे.

    • साबण आणि कोमट पाण्याने शक्य तितकी लवकर जखम धुवा.
    • अल्कोहोल किंवा अँटीसेप्टीक लावू नका कारण त्यात असलेल्या आयोडीनमुळं त्वचेला त्रास होतो.
    • एखादं अँटी-बायोटीक क्रीम केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं वापरा.
    • जखमेचा भाग हा निर्जंतुक बँडेज किंवा गॉज, जसे बॅन्ड एड वापरुन झाकून सुरक्षित ठेवा.

    आपल्याला पुढील लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा

    1. एखादा गंभीर स्वरुपाचा घाव किंवा भाजल्याची जखम झाल्यास
    2. त्वचेवर कुठेही विषाणू संक्रमण दर्शविणारा लालसरपणा, पू, सूज किंवा वेदना असल्यास
    3. गोलकृमी, गुप्तांगाजवळ खाज किंवा विषाणू संक्रमणाची अन्य चिन्हे असल्यास

    मधुमेहामधे घ्यावयाची पायाची काळजी

    मधुमेहात, आपल्या शरीरातील अति प्रमाणातील ग्लुकोजमुळं, शीरा खराब होण्यानं, पायांमधील संवेदना आणि जाणीव नष्ट होऊ शकते.  अशावेळी पायाची काळजी घेण्यासाठी काही सोपे उपाय इथं दिले आहेतः

    1. पुरेशा उजेडात दररोज पायांचे जवळून निरीक्षण करा.  कापणे किंवा खरचटणे, त्वचेचे तुकडे पडणे, फोड, व्रण, लाल ठिपके किंवा सूज आहे का ते पाहा.  पायांच्या बोटांच्या खाली आणि मधे पाहायला विसरु नका.
    2. पाय नियमितपणे धुवाः हलका साबण आणि कोमट पाण्याने दररोज नियमितपणे पाय धुवावेत.
    3. पायाच्या बोटांची नखं नियमितपणे कापावीत
    4. पादत्राणे वापरुन पायांची काळजी घ्यावी

    तोंडाचे आरोग्य

    • दररोज, व्यवस्थितपणे घरच्याघरी दातांची निगा राखल्यास ते दीर्घकाळ निरोगी राहतात.
    • ब्रश करणेः आपला टूथब्रश कसा आहे ?  घट्ट ? आणि कडक ?  त्यामुळे हिरड्या सोलवटून निघतात आणि त्यांचं नुकसान होतं.  मऊ प्रकारचे केस असलेला टूथब्रश तत्काळ वापरायला लागा.
    • ब्रश करण्याचे तंत्रः
      • दिवसातून किमान दोनवेळा ब्रश करा.
      • ब्रश करताना त्याचे केस हे हिरड्या आणि दांत यांच्यामधल्या जागेत ठेवून हलक्या हाताने फिरवा.  त्यामुळं याठिकाणी अडकून बसलेले विषाणू निघून जातात.
      • त्यानंतर गालाच्या आतील, जीभ आणि दातांच्या चावण्याचा भाग इथं हलकेपणानं फिरवून दांत साफ करा.  दांत घसाघसा घासू नका अन्यथा हिरड्या आणि दांतांचं नुकसान होतं.
      • विषाणू हे ब्रशच्या केसांवर वाढतात.  आपला टूथब्रश दर तीन महिन्यांनी आणि आजारपणानंतर बदला .
      • प्रत्येक जेवणानंतर हलकेच फ्लॉसींग करणं हा दांत स्वच्छ ठेवण्याचा उत्कृष्ट उपाय आहे.

    आपल्याला पुढील चिन्हं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्याः

    • आपण ब्रश केल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर हिरड्यांतून रक्त आल्यास
    • आपल्या हिरड्या लाल, सुजलेल्या किंवा नाजूक झाल्यास
    • आपल्या हिरड्या दातांपासून बाजूला ओढलेल्या असल्यास
    • हिरड्यांना स्पर्श केल्यास आपले दांत आणि हिरड्या यांच्यात पू आल्यास
    • कवळी फिट बसण्याच्या पध्दतीत काही बदल झाल्यास
    • आपण चावत असताना आपले दांत एकमेकांवर ज्या पध्दतीनं बसतात त्यात काही बदल झाल्यास
    • आपल्या तोंडात घाण वास किंवा वाईट चव सतत राहिल्यास

    डोळ्यांची काळजी

    मधुमेह असलेल्या व्यक्तीला मोतिबिंदू किंवा ग्लाऊकोमा होण्याची शक्यता दुप्पट असते.  रक्तातील ग्लुकोजची पातळी दीर्घकाळपर्यंत उच्च राहिल्यास डोळ्यातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना नुकसान होतं, आणि ज्याला डायबेटिक रेटीनोपॅथी म्हणतात तो विकार होतो.  वस्तुतः डायबेटीक रेटीनोपॅथी हे मधुमेहींदरम्यान अंधत्व येण्याचं मुख्य कारण आहे.

    मधुमेहाचं एकदा का निदान झाल्यास, डोळ्यांची दरवर्षी आणि आवश्यक वाटल्यास सखोल तपासणी करा.  पुढील लक्षणे असल्यास एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्याः

    • आपल्या दृष्टीच्या टप्प्यात ठीपके, तरंगते पदार्थ किंवा जाळे दिसणे, धूसर दिसणे, स्पष्ट प्रतिमा न दिसणे, काळे ठिपके, डोळ्यात वेदना किंवा सातत्यानं लालसरपणा यासारख्या अनाकलनीय समस्या जाणवल्यास.

     

    स्त्रोत : पोर्टल कंटेन्ट टिम

    अंतिम सुधारित : 4/10/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate