অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औषधे (Drugs)

मनुष्य किंवा प्राणी यांच्या रोगांचे निदान करण्यासाठी, रोगांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा रोगांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे पदार्थ. वैद्यकीय व्यवसायातील हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. शारीरिक आणि मानसिक आजार दूर करण्यासाठी किंवा शारीरिक वेदना घालविण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. इतिहासकालपूर्व कालापासून मानवाने औषधांचा वापर केलेला आहे. आज उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या औषधांमुळे जगभरातील लक्षावधी लोकांना आरोग्यदायी आणि दीर्घायुषी जीवन लाभले आहे. प्रत्येक वर्षी पेनिसिलीन आणि जीवाणूनाशक औषधांमुळे न्यूमोनिया, परिमस्तिष्कज्वर, क्षयांसारख्या घातक, संसर्गजन्य रोगांपासून अनेक जणांचे प्राण वाचले आहेत. लशीकरणामुळे देवीसारख्या रोगांचे निर्मूलन झाले आहे, तर वेदनाशामक औषधांमुळे वेदना दूर करणे शक्य झाले आहे.

इ.स. १९०० सालापर्यंत जगभरातील लोकांना औषधे नीटशी माहीत नव्हती. उदा., इ.स. १९३० ते ४० पर्यंत सल्फा औषधे आणि प्रतिजैविकांचा वापर होत नव्हता. त्यापूर्वी जगभर न्यूमोनिया झालेल्या व्यक्तीपैकी सु. २५% व्यक्ती मृत्युमुखी पडत असत. मात्र, या रोगावरील औषधांमुळे मृत्यूचे प्रमाण ५% एवढे कमी झाले. इ.स. १९५५ साली पोलिओच्या लसीचा वापर सुरू झाला. त्यावेळी दरवर्षी हजारो जणांना पोलिओच्या विषाणूंचा संसर्ग होत होता; परंतु या लसीचा वापर केल्यानंतर पोलिओच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. केवळ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये पोलिओ संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या इ.स. १९५५ ते १९६० या पाच वर्षांत सु. ४०,००० पासून ३,००० पर्यंत कमी झाली. इ.स. १९०० साली मनुष्याचा सरासरी आयु:काल ४५ वर्षे होता. आधुनिक औषधांमुळे हा आता ६८ वर्षे झालेला आहे.

औषधांमुळे जसे रोगांपासून बचाव होतो तसे त्यांच्या अयोग्य वापरामुळे रोग उद्भवतात किंवा मृत्यूही ओढवतो. उदा., अ‍ॅस्पिरीन हे एक सुरक्षित, बहुउपयोगी औषध समजले जाते; तथापि, चुकून जास्त प्रमाणात अ‍ॅस्पिरीन घेतल्यामुळे लहान बालके मृत्युमुखी पडली आहेत. अल्कोहॉल, कोकेन, हेरॉईन आणि अन्य अंमली पदार्थांच्या सेवनाने गंभीर समस्या निर्माण होतात. सर्व ओषधे शरीरावर एकापेक्षा अधिक प्रकारे परिणाम करतात. उदा., चेतासंस्थेवरील औषधे हृदयावर अनिष्ट परिणाम करु शकतात. अशा औषधांचा हृदयावरील परिणाम सहपरिणाम मानला जातो.

औषधांचा अभ्यास करणारे वैज्ञानिक कोणताही रासायनिक पदार्थ जो सजीवांवर परिणाम करतो त्यास औषध (ड्रग) मानतात. येथे मात्र वर दाखविल्याप्रमाणे वैद्यकीय उपयोगासाठी वापरलेला पदार्थ असा औषधाचा अर्थ घेतला आहे. अल्कोहॉल, तंबाखू यांसारखे सेवन केले जाणारे शरीरावर परिणाम करणारे पदार्थही औषध मानले जातात. औषधांचे वर्गीकरण विविध प्रकारे करता येते. अवस्थेनुसार (स्नायू, द्रव व वायू), औषधे कशी घेतली जातात त्यानुसार ( तोडांने, अंत:क्षेपणाद्वारे (इंजेक्शनद्वारे) किंवा हुंगून) किंवा रासायनिक संरचनेनुसार औषधांचे गट पाडता येतात. औषधवैज्ञानिक मात्र मुख्यत्वे औषधांचे शरीरावर कसे परिणाम होतात, हे पाहतात. यानुसार सामान्यपणे वेगवेगळ्या औषधांचे पुढीलप्रमाणे गट केले जातात:

१.  संसर्गाला प्रतिबंध करणारा औषधे

२. संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करणारी औषधे

३. हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणारी औषधे आणि

४. चेतासंस्थेवर परिणाम करणारी औषधे.

संसर्गाला प्रतिबंध करणारी औषधे

जीवाणू, विषाणू यांचा नाश करणार्‍या, त्यांची संख्या मर्यादित ठेवणार्‍या औषधांना प्रतिसूक्ष्मजीवी औषधे म्हणतात. प्रतिजैविके, सल्फा औषधे जीवाणूंवर मात करतात. निसर्गात आढळणार्‍या सूक्ष्मजीवांपासून प्रतिजैविके मिळतात तर सल्फा औषधे कृत्रिमरीत्या तयार करतात.

पेनिसिलीन किंवा इतर प्रतिजैविकांची मात्रा अधिक असल्यास रोगकारक जीवाणूंचा नाश होतो आणि मात्रा कमी असल्यास जीवाणूंची संख्या मर्यादित राखून शरीरातील नैसर्गिक प्रतिकारक्षमतेद्वारे जीवाणूंना नाश होतो.

सल्फा औषधांमुळे जीवाणूंच्या संख्येवर मर्यादा घातली जाते. काही वेळा मात्र, सल्फा औषधे आणि इतर कृत्रिम प्रतिसूक्ष्मजीवी औषधांमुळे अपेक्षेप्रमाणे जीवाणूंचा नाश होत नाही, असे आढळून येते विषाणूंमुळे उद्भवलेल्या रोगांवर मात करण्यासाठी प्रतिविषाणू औषधे देतात. उदा., एझेड्टी हे औषध एड्स रोगावर दिले जाते.

संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करणारी औषधे

संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी दोन प्रकारची औषधे वापरतात.

(१) लस,

(२) प्रतिसिरम यापैकी काही औषधे, खासकरुन पोलिओची लस, अन्य प्रभावी औषधे नसल्यामुळे मौल्यवान मानली जातात. लसींमध्ये विशिष्ट रोग निर्माण करणारे जीवाणू अर्धवट किवा मृत अवस्थेत असतात. लसीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या लसीमुळे, विशिष्ट रोगाचा सामना करणारी प्रतिपिंडे निर्माण होतात. अशा प्रकारे लस एखाद्या रोगाचा संसर्ग झाल्यास प्रतिकार करण्यसाठी शरीराला प्रतिक्षम बनवते.

पटकी, घटसर्प, यकृत, शोथ (कावीळ), गोवर, देवी या रोगांवर लस आता उपलब्ध असून लसीकरणामुळे देवीच्या रोगाचे निर्मूलन शक्य झाले आहे.

प्रतिसिरम आणि ग्लोब्युलिनमुळे, लसींप्रमाणे विशिष्ट संसर्गजन्य रोग रोखता येतात. या औषधांमध्ये आधीपासूनच विशिष्ट रोगाची प्रतिपिंडे असतात. लसींच्या तुलनेत, प्रतिसिरमद्वारे संसर्ग जलद रोखला जातो.

मात्र हे संरक्षण तात्पुरते असते. एखाद्या व्यक्तीला अशा रोगाचा संसर्ग झाल्यास आणि त्याने रोगाची प्रतिबंधक लस घेतलेली नसल्यास हे औषध देतात. घटसर्प, धनुर्वात या रोगांवर प्रतिसिरम देतात तर यकृताशोथ, धनुर्वात व आलर्क रोग यांवर ग्लोब्युलिन देतात.

हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणारी औषधे

हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणार्‍या औषधांना हृदसंवहनी औषधे म्हणतात. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांवर इलाज करण्यासाठी या औषधांचा उपयोग करतात. अनेक देशांमध्ये या रोगांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसत आले आहे. या रोगावरील औषधांचे चार प्रकार आहेत:

(१) ही औषधे हृदयाची स्पंदने अधिक जोमदार करतात, त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. हृदय पंपाचे कार्य ज्यावेळेस दुर्बल झालेले दिसून येते, त्यावेळेस याप्रकारची हृदबलवर्धक औषधे देतात. डायगॉक्झिन आणि डीजीटॉक्झिन ही मोठ्या प्रमाणात जाणारी कार्डीओटॉनिक आहेत.

(२) हृदयविकारावरील काही औषधे सूक्ष्म रक्तवाहिन्या विस्फारतात. हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवणार्‍या धमन्यांचा मार्ग अरुंद झाल्यास ही औषधे देतात. चालताना किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना जर छातीत कळा येत असतील, तर अशा व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांचा मार्ग विस्फारण्यासाठी या औषधांचा वापर करतात. अ‍ॅन्जायना पेक्टोरिस नावाचा हा आजार असून त्यावर आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट आणि नायट्रोग्लिसरीन ही औषधे देतात.

(३) रक्तदाब कमी करण्यासाठी अतिरक्तदाबरोधी (अँटीहायपरटेन्सिव) औषधे देतात. वाहिनी-विस्फारक आणि इतर अनेक प्रकारची औषधे अतिरक्तदाबरोधी आहेत. वाहिनी विस्फारक अरुंद रक्तवाहिन्यांच्या भित्तिकेतील स्नायू शिथील करून रक्तदाब कमी करतात. इतर अतिरक्तदाबरोधी औषधे वेगळ्या प्रकारे परिणाम साधतात.

(४) इतर काही औषधे रक्ताच्या गाठी होऊ देत नाहीत, तर काही औषधे रक्तातील गाठींचे तुकडे करतात.

चेतासंस्थेवर परिणाम करणारी औषधे

या प्रकारची औषधे मुख्यत: मेंदू आणि चेतासंस्थेच्या इतर भागांवर परिणाम करतात. या औषधांमध्ये अल्कोहॉल, कॅफीन, कोकेन, अफू, मादक पदार्थ आणि झोपेच्या गोळ्या आदींचा समावेश होतो. वेदनाशामक औषधे बेशुद्धावस्था न आणता किंवा चव, स्पर्श अशा संवेदना कमी न करता वेदना कमी करतात. उदा., वेदनाशामक औषधांमुळे एखाद्या व्यक्तीची डोकेदुखी थांबते; परंतु एखादी वस्तू गरम किंवा थंड आहे. हे ओळखण्याच्या त्या व्यक्तीच्या संवेदनक्षमतेवर फारसा परिणाम होत नाही. वेदनाशामक औषधांचे दोन प्रकार आहेत:

(१) गुंगी आणणारे,

(२) गुंगी न आणणारे. दोन्ही प्रकारच्या औषधांनी वेदना दूर होतात. अ‍ॅस्पिरीन हे गुंगी न आणणारे वेदनाशामक आहे, तर कोडिन आणि मॉर्फीन ही गुंगी आणणारी वेदनाशामके आहेत. तीव्र जखमा आणि कर्करोगाच्या वेदना शमविण्यासाठी गुंगी आणणारी वेदनाशामके देतात.

शुध्दिहारके संवेदना घालवतात. सामान्य शुध्दिहारके सर्व शरीराच्या संवेदना हळूहळू घालवत व्यक्तीला बेशुद्धावस्थेत नेतात. मोठी शस्त्रक्रिया करताना ही औषधे देतात. क्षेत्रीय शुध्दिहारके विशिष्ट भागापुरतीच कार्य करतात. दात डोळे इत्यादींचे इलाज करताना अशी औषधे देतात.

हॅल्यूसिनोजन प्रकारच्या औषधांमुळे व्यक्तीला इच्छेप्रमाणे भ्रम होतात. यामुळे संवेदना, भावना आणि तर्कबुद्धीवर परिणाम होतो. मानसिक आजारांवर ही औषधे वापरली जातात. उद्दीपित करणार्‍या औषधांमुळे झोप आणि थकवा दूर होतो. कॅफीन, कोकेन इत्यादी औषधे या प्रकारात मोडतात. या औषधांमुळे चेतासंस्थेची क्रियाशीलता वाढते आणि व्यक्तींला उल्हीसित वाटते. मात्र औषधांचा अंमल संपला की अस्वस्थता वाढते.

चिंतारोधी आणि संमोहक औषधांमुळे ताण, चिंता दूर होतात. अल्कोहॉल, शामक आणि मन:शामक ओषधांचा यात समावेश होतो. मन:शामक औषधे पुरेशा कमी प्रमाणात घेतल्यास व्यक्ती सुस्त न होता शांत होते. मोठी मात्रा घेतल्यास त्या व्यक्तीला झोप येते. सतत ही औषधे घेत राहिल्यास ती व्यक्ती औषधाच्या अधीन होते. मानसिक रुग्णांवर इलाज करताना मानसोपचारतज्ज्ञ मन:शामक औषधे देतात.

या औषधांमुळे रुग्णांची भीती, चिंता दूर होऊन विचारांना दिशा मिळते. शामकामुळे व्यक्तीला जास्त झोप लागते. ज्या व्यक्तींना नैसर्गिक झोप कमी लाभते अशा व्यक्तींना शामक औषधे देतात. अल्कोहॉलमुळे चेतासंस्थेचे कार्य मंद होते आणि हालचाली सुस्तावतात.

औषधांचे अन्य प्रकार

वर उल्लेख केलेल्या औषधांखेरीज वैद्यकशास्त्रात इतरही औषधांचा वापर करतात. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत.

मूत्रल औषधे मूत्राशयाच्या विकारावर दिली जातात. काही रुग्णांमध्ये पुरेशी प्रमाणात मूत्रनिर्मिती होत नाही. त्यामुळे शरीरात बाहेर टाकावयाचे पदार्थ, द्राव, क्षार साचत जातात. मूत्रल औषधांमुळे वृक्कामार्फत पुरेशी मूत्रनिर्मिती होते आणि मूत्रावाटे हे पदार्थ बाहेर टाकले जातात.

शरीरातील विविध ग्रंथीमार्फत संप्रेरके स्त्रवली जातात. वाढ आणि प्रजनन ही कार्ये संप्रेरकांमार्फत नियंत्रित होतात. प्राण्यांमधील आणि माणसातील काही संप्रेरके सारखीच असतात आणि काही संप्रेरके कृत्रिम रीत्या तयार करण्यात येतात. काही रुग्णांमध्ये पुरेशा प्रमाणात संप्रेरके उत्पन्न होत नाहीत.

अशा परिस्थितीत त्या रुग्णांना बाहेरुन पुरवठा करावा लागतो. उदा., मधुमेहाच्या एका प्रकारात इन्सुलिन या संप्रेरकाची निर्मिती होत नाही. अशा रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते: तसेच गर्भधारणा टाळण्यासाठी ज्या गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जाते, तीसुद्धा संप्रेरके आहेत. गर्भनिरोधक औषधे स्त्रीच्या शरीरातील प्रजनन प्रक्रियेत बदल घडवून आणतात.

जीवनसत्त्वे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्यांच्या अभावामुळे मुडदूस, स्कर्व्ही यांसारखे रोग उद्भवतात. संतुलित आहारातून पुरेशी जीवनसत्त्वे मिळतात. मात्र, त्यांचा अभाव असल्यास ती औषधांतून पुरवण्यात येतात.

प्रतिअर्बुदे कर्करोगाच्या पेशींचा नाश करतात. या प्रकारची विविध औषधे तयार करण्यात आली आहेत. मात्र, ही औषधे कर्करोगाच्या पेशींबरोबर शरीरातील निरोपी पेशींना धक्का पोचवतात.

औषधांचे कार्य

औषधे वेगवेगळ्या मार्गांनी दिली जातात. परंतु, शरीरात पोहोचली की सर्व औषधे सारख्याच पद्धतीने म्हणजे पेशींक्रियांच्या वेगात बदल घडवून अपेक्षित परिणाम साधतात. बहुतांशी औषधे तोंडाने घेतली जातात. काही औषधे इंजेक्शनमधून, हुंगून किंवा त्वचेवर चोळून देतात.

औषध देण्याची पद्धत हे औषधाचे स्वरुप आणि कोणत्या कारणासाठी दिले जाते यानुसार ठरते. उदा., रसायने, शुध्दिहारके नाकावाटे फुफ्फुसात जातात. मलमे उपचार करायच्या भागावर चोळली जातात. औषधे देण्याच्या प्रत्येक पद्धतीचे फायदे-तोटे आहेत. उदा., तोंडावाटे औषध घेणे हा सर्वांत सोपा, सुरक्षित मार्ग समजतात. मात्र, जठरातील पाचकरसांमुळे काही औषधांचा परिणाम कमी होतो. इंजेक्शनमुळे वेदना होतात आणि जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.

औषध देण्याच्या पद्धतीवरील संशोधनातून नवीन पद्धती विकसित झाल्या आहेत. उदा., एका उपकरणात, त्वचेवर त्वचापारक पलिस्तर (ट्रान्सडर्मल पॅच) लावतात. हे बॅंडेजच्या स्वरुपात असून त्यात औषध असते आणि ते औषध हळूहळू, सतत त्वचेतून झिरपत रक्तात मिसळते.

हृदयाभोवती असलेल्या वाहिन्या विस्फारण्यासाठी द्यावयाचे नायट्रोग्लिसरीन या पद्धतीने देतात. मोठ्या प्रमाणावर औषधाचा पुरवठा सतत करण्यासाठी रोपनीय (इम्प्लांटेबल) पंपाचा वापर करतात. यात एक लहान धातूची काठीयुक्त चकती असून त्यात औषध भरलेले असते. शस्त्रक्रियेने हा पंप शरीरात बसवतात. त्यामुळे सतत औषधाचा पुरवठा करता येतो. औषध संपल्यावर इंजेक्शनने या साधनांमध्ये पुन्हा औषध भरता येते.

तोंडावाटे, नाकावाटे किंवा अंत:क्षेपणाद्वारे दिलेली औषधे रक्तप्रवाहात मिसळतात आणि रक्तवाटे पेशींपर्यंत पोहोचतात. पेशींमध्ये औषधाची क्रिया घडून येते. डोळ्यांतील अंजन, त्वचापारक पलिस्तर, क्षेत्रीय शुध्दिहारक, नासिका फवारे अशी औषधे मात्र रक्तप्रवाहात मिसळण्यापूर्वीच त्यांचे कार्य घडते. जेव्हा ही औषधे यथावकाश रक्तप्रवाहात मिसळतात तेव्हा त्यांचे प्रमाण व क्षमता एवढी कमी होते की त्यांचा पेशींवर विशेष परिणाम होत नाही.

सर्व औषधे पेशींकडून होणार्‍या क्रियांमध्ये बदल घडवून अपेक्षित परिणाम साधतात. औषधांचा पेशींवर परिणाम कसा होतो हे समजण्यासाठी औषधवैज्ञानिकांनी ‘ग्राही सिद्धांत’ विकसित केला आहे. या सिद्धांतानुसार, प्रत्येक पेशीतील रासायनिक अभिक्रिया पेशींकडून होणार्‍या क्रियांचे नियंत्रण करतात.

प्रत्येक नियंत्रक अभिक्रियेमुळे पेशींमध्ये विशिष्ट क्रिया सुरु होते, थांबते किंवा क्रियेचा वेग वाढतो वा कमी होतो. औषधे पेशींतील एक किंवा जास्त रासायनिक क्रियांमध्ये बदल घडवतात. पेशीमध्ये रासायनिक अभिक्रियांवर नियंत्रण राखणारे जे ग्राही रेणू असतात, त्या रेणूंशी औषधाचे रेणू जोडले जातात आणि त्यामुळे हे बदल घडून येतात.

ग्राही सिद्धांतामुळे औषधाचे कार्य कसे चालते, हीच माहिती मिळत नाही. तर एखादे औषध काय करु शकते किंवा काय नाही, हे समजते. औषधांची आंतरक्रिया पेशींतील रासायनिक क्रियांवर नियंत्रण करणार्‍या ग्राही रेणूंवरच होत असल्याने ती केवळ या क्रियांच्या वेगात घडवून आणतात, कोणतीही नवीन क्रिया घडवून आणू शकत नाहीत.

बहुधा, औषधे आणि शरीर यांच्यातील आंतरक्रिया एका दिशेने होत नाही. औषधे पेशींकडून होणार्‍या क्रियेत बदल करतात आणि शरीरप्रक्रियांमुळे औषधांमध्ये बदल होतो. त्यामुळे औषधांपासून नवीन पदार्थ तयार होतात. हे पदार्थ मूळ औषधापेक्षा कमी क्रियाशील असतात. याला ‘औषधांची चयापचय प्रक्रिया’ किंवा ‘ जैवरुपांतरण’ म्हणतात.

औषधांपासून स्वरसंरक्षण करण्याची शरीराची ही एक पद्धत आहे. बव्हंशी जैवरुपांतरण यकृतात घडते. रोगग्रस्त यकृत निरोगी यकृताच्या तुलनेत रुपांतरणाला जास्त वेळ घेते. अशा वेळी डॉक्टर रोगग्रस्त यकृत असणार्‍या रुग्णांना औषधांची की मात्रा देतात. अन्यथा औषध जास्त काळ शरीरात राहून विपरित परिणाम घडण्याची शक्यता असते.

सर्व औषधांचे शरीरावर उपयुक्त किंवा घातक परिणाम होऊ शकतात. उदा., एखादे औषध हृदयाची स्पंदनक्रिया अधिक जोमदार करणारे, वेदना शामविणारे किंवा अन्य इष्ट परिणाम करणारे असते; पंरतु, तेच औषध अधिक प्रमाणात घेतल्यास शरीरावर अनिष्ट परिणाम होतात.

औषधांचा परिणाम सर्व शरीरावर होतो कारण ती रक्तप्रवाहातून शऱीरभर पसरतात. त्यामुळे शरीराच्या एका भागावर परिणाम होण्यासाठी दिलेल्या औषधांचे दुसर्‍या भागांवरही चांगले-वाईट परिणाम होऊ शकतात. उदा., वेदना शमविण्यासाठी बर्‍याचदा मॉर्फीन देतात. परंतु हे मॉर्फीन मेंदू व मज्जारज्जूतील पेशींवर परिणाम करते आणि त्यामुळे वेदनांची संवेदना कमी होते. मात्र त्यामुळे श्वास मंद होणे, वांती होणे, बद्धकोष्ठता होणे असे अन्य अनिष्ठ परिणाम घडून येतात.

औषधांचे प्रतिकूल म्हणजे त्यांच्या इष्ट परिणामांशिवाय होणारे अनिष्ट सहपरिणाम तीन प्रकारचे असतात : एक पार्श्व परिणाम (साइड इफेक्ट), दुसरा अधिहर्षता परिणाम (अ‍ॅलर्जी) आणि तिसरा विषारी प्रतिक्रिया (टॉक्सिक इफेक्ट) सर्व औषधांचे पार्श्व परिणाम होत असतात. उदा. मॉर्फीनमुळे काही घातक परिणाम होतात आणि ते गृहीत असतात.

रक्तदाबावरील काही औषधांमुळे डोके दुखते. बहुतेक औषधांचे पार्श्व परिणाम तीव्र नसतात आणि त्यामुळे त्या औषधांचा वापर थांबवावा लागत नाही. काही वेळा एखाद्या रुग्णाला विशिष्ट औषधाची (उदा. अ‍ॅस्पिरिन, पेनिसिलीन) अधिहर्षता असते; परंतु अधिहर्षता तीव्र असल्यास अशी व्यक्ती त्या औषधाला संवेदनशील असल्याचे मानतात. काही वेळा, औषधांमुळे विषारी अभिक्रिया घडून येते. त्यामुळे पेशींचा नाश होतो आणि प्रसंगी रुग्णाला मृत्यू ओढवतो.

ज्या व्यक्ती औषध म्हणून अल्कोहॉल, अ‍ॅफिटामाइन, बार्बिट्युरेट किंवा मादक पदार्थ मोठ्या मात्रेत घेतात, अशा व्यक्ती त्या औषधांवर अवलंबून राहतात. या औषधांच्या वापरानुसार कालांतराने शरीरात ती ‘सहन’ करण्याची क्षमता निर्माण होते आणि वापर चालू राहिल्यास ती वाढते. म्हणून इष्ट परिणाम साधण्यासाठी अशा व्यक्तींना औषधाची मात्रा वाढवावी लागते. औषधांची शारीरिक किंवा मानसिक गरज निर्माण होण्याच्या या अवस्थेला व्यसनाधीनता म्हणतात. ही औषधे घेण्याचे थांबविल्यास गंभीर आजार उद्भवतात.

शरीरातील टाकाऊ पदार्थांबरोबर औषधेही शरीराबाहेर टाकली जातात. औषधे पेशांमधून रक्तात मिसळतात आणि वृक्कात (मूत्रपिंड) पोहोचतात आणि मूत्रावाटे बाहेर टाकली जातात. घाम, अश्रू तसेच मलाद्वारेही औषधे शरीराबाहेर टाकली जातात. काही शुध्दिहारके पूर्णपणे उच्छवासातून बाहेर सोडली जातात.

औषधे सामान्यपणे व्यापारी नावांनी विकली जातात. मात्र प्रत्येक औषधाच्या वेष्टणावर, औषधनिर्मिती करणार्‍या कारखान्याचे नाव, औषधातील प्रमुख रासायनिक घटक, मिसळलेले इतर घटक, वापरण्यासंबंधी सूचना, अनिष्ट परिणाम/अधिहर्षता यांविषयी सूचना, औषधाची किंमत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषधाची परिणामकारता कधी संपते ती मुदत, (समाप्ती तारीख) या बाबी नमूद केलेल्या असतात.

 

स्त्रोत : कुमार विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate