অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रासायनी चिकित्सा

रासायनी चिकित्सा ज्या चिकित्सेत रासायनिक पदार्थांचा रोगोपचाराकरिता उपयोग करतात,तिला ‘रासायनी चिकित्सा’ म्हणतात. प्रामुख्याने संसर्गजन्य रोग व अलीकडेच कर्क रोगासारख्या मारक रोगावर केलेल्या औषधी उपचारांचा तीत समावेश होतो. सूक्ष्मजंतू, व्हायरस, प्रोटोझोआ (आदिजीव),कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), कृमी व इतर अनेक परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे सजीव) मानवी शरीरामध्ये रोग उत्पन्न करू शकतात. या सर्वांचा नाश करावयाचा;परंतु प्रत्यक्ष शरीरकोशिकांना (पेशींना) अत्यल्पही हानी पोहोचणार नाही असेच रासायनिक पदार्थ (औषध) वापरावयाचे, हा या चिकित्सेचा मुख्य उद्देश असतो. तसेच कर्करोगावरील उपचारात अपसामान्य कोशिकांचा नाश करावयाचा; परंतु प्राकृतिक (सर्वसाधारण) शरीर-कोशिका सुरक्षित ठेवावयाचा उद्देश असतो.

इतिहास

प्राचीन काळापासून आनुभविक रासायनी चिकित्सा वापरात होती. प्राचीन ग्रीक लोक मेल फर्न अथवा ॲस्पिडीयम या वनस्पतीचा आणि अमेरिकेतील ॲझेटेक इंडियन लोक चिनोपोडियम तेलाचा उपयोग कृमींच्या नाशाकरिता करित. आजही मेल फर्नचा कृमीनाशक म्हणून उपयोग केला जातो. प्राचीन हिंदू लोक कुष्ठरोगावर चौलमुग्रा तेलाचा मर्दानाकरिता उपयोग करित. भारताशिवाय ब्रह्मदेश, थायलंड व मलायातही हे तेल वापरात होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. सोळाव्या शतकात पार्यातचा उपदंशाकरिता आणि सिंकोना नावाच्या वनस्पतीच्या सालीचा (सिंकोनाबार्कचा) सतराव्या शतकापासून हिवतापावर उपयोग केला जात होता. अनेक शतके सिंकोना बार्क हे जेझुइटांचा बार्क म्हणून औषधी गुणधर्माकरिता ओळखले जात होते. जिला आधुनिक रासायनी चिकित्सा म्हणता येईल त्या शास्त्राची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी झाली.

रासायनी चिकित्सेच्या इतिहासात तीन स्पष्ट टप्पे ओळखता येतात :

  1. १८२१ पूर्वीचा किंवा पॉल अर्लिक यांच्या पूर्वीचा काळ;
  2. पॉल अर्लिक यांचा काळ आणि
  3. १९३५ नंतरचा सल्फॉनामाइडे व प्रतीजैव पदार्थांच्या शोधानंतरचा काळ.

प्रबोधन काळात (चौदाव्या ते सोळाव्या शतकांत) रसायनशास्त्र व सूक्ष्मजीवविज्ञान यांमध्ये बरीच प्रगती झाली. अनेक संसर्गोत्पादक जीवांचा शोध लागला.

जर्मन सूक्ष्मजंतुवैज्ञानिक व विकृतीवैज्ञानिक पॉल अर्लिक (१८५४−१९२५) यांना प्रयोग करते वेळी मिथिलीन ब्ल्यू हा रंजक काही विशिष्ट सूक्ष्मजंतूंनाच अभिरंजक व मारक असल्याचे लक्षात आले. त्यावरून त्यांना सूक्ष्मजंतूंना मारक ठरणारे पण पोषकाच्या (मानवी शरीरातील) कोशिकांना हानी न करणारे पदार्थ तयार करणे शक्य असल्याची कल्पना सुचली. अशा पदार्थांना त्यांनी‘जादूच्या बंदूक गोळ्या’ असे यथार्थ नावही दिले. १८९१ मध्ये मिथिलीन ब्ल्यूचा मानवी हिवतापाच्या उपचारातील प्रभावी उपयोग त्यांनी सिद्ध केला. आर्सेनिक (सोमल) संयुगांचा उपदंश व इतर स्पायरोकीटाजन्य (सर्पिल सूक्ष्मजंतुजन्य) रोगांवरील गुणकारी उपयोगही सिद्ध केला. आर्स्फि नामाइन अथवा ‘अर्लिक ६०६’ किंवा ‘सालव्हरसान’ या नावाच्या संश्लेषित (कृत्रिम रीतीने बनविलेल्या) औषधाचा शोध १९०७ मध्ये लागल्यावर आणि त्याचा औषधी उपयोग १९०९ मध्ये सिद्ध झाल्यानंतर रासायनी चिकित्साही सिद्ध झाली. या नव्या औषधांच्या चिकित्सात्मक उपयोगाच्या दृष्टीने त्यांनी ‘रासायनी चिकित्सा निर्देशांक’ अशी संज्ञाही वापरली. सर्वाधिक सह्य मात्रा व लघुतम परिणामकारक मात्रा गुणोत्तरावरून हा निर्देशांक ठरविता येतो. आज याची जागा चिकित्सा निर्देशांकाने घेतली आहे.

अर्लिक यांच्या सिद्धांताप्रमाणे परजीवींच्या कोशीकाभित्तीमध्ये विशिष्ट रासायनिक गट अथवा ‘ग्राहक’ असतात. औषधातील रासायनिक गट या ग्राहकाशी संयोजित होऊन औषधी परिणाम मिळतात. औषधाचे गुणकारी परिणाम किंवा विषारी परिणाम त्याच्या रोगोत्पादक परजीवीच्या किंवा पोषकाच्या कोशिकांच्या आसक्तीच्या प्रमाणावर अवलंबून असतात. जे औषध अंगप्रेरक अथवा अंगरागी (पोषकाच्या कोशिकांची आसतक्ती असणारे) असेल, ते विषारी आणि जे परजीवी-प्रेरक (परजीवीच्या कोशिकांची आसक्ती असणारे) असेल ते गुणकारी ठरते. अर्लिक यांना या संशोधनाबद्दल १९०८ च्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. ते आधुनिक रासायनी चिकित्साशास्त्राचे जनक मानले जातात. त्यांच्या संशोधनामुळे औषधी परिमाणातील कोशिकीय रसायनशास्त्राकडे लक्ष वेधले जाऊन नवीन संश्लेषित सूक्ष्मजंतुनाशकांचा शोध लागला.

रासायनी चिकित्सेची प्रगती

रासायनी चिकित्सेच्या पुढील प्रगतीमध्ये गेरहार्ट डोमाक (१८९५−१९६४) व त्यांचे सहकारी यांचा मोठा वाटा आहे. हे जर्मन शास्त्रज्ञ १९३८ मध्ये ॲझो रंजकावर प्रयोग करीत असताना त्यांना ‘प्रॉन्टोसील’ या पहिल्या सल्फॉनामाइडचा शोध लागला. या रंजकाची प्रयोगशाळेत आणि रोगी शरीरातील मालगोलाणूंची (स्ट्रेप्टोकॉकसांची) वाढ रोखण्याची शक्ती त्यांनी सिद्ध करून दाखविली. त्यांच्या या संशोधनावबद्दल त्यांना वैद्यकाचे १९३९ चे नोबेल पारितोषिक मिळाले.

एफ्. नीत्ती, दान्येल बोव्हे व जे. त्रेफोएल या शास्त्रज्ञांनी प्रॉन्टोसिलाचा चिकित्सत्मक गुणधर्म शरिरात त्याचे सल्फानिलामाइडात रूपांतर होण्यामुळे निर्माण होतो हे दाखवून दिल्यानंतर अनेक सल्फॉनामाइडे संश्लेषित करण्यात आली. वस्तुतः पी. गेल्मो या शास्त्रज्ञांना १९०८ मध्ये सल्फानिलामाइडाचा शोध लागला होता; परंतु त्याचा औषधी गुणधर्म समजण्यास तीस वर्षांचा दीर्घ कालावधी लागला.

एका सूक्ष्मजंतूचा दुसऱ्या सूक्ष्मजंतूमुळे झालेल्या रोगोपचाराकरिता उपयोग करण्याची कल्पना अठराव्या शतकात सुचली होती. १८७७ मध्ये लूई पाश्चर व जे. झूबेअर या शास्त्रज्ञांनी सांसर्गिक काळपुळी या रोगाचे मूत्रातील सूक्ष्मजंतू इतर सूक्ष्मजीवांच्या सान्निध्यात वाढत नाहीत, हे दाखविले होते. १८८५ मध्ये व्हिक्तॉर बाबेश या रूमेनियन शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत संवर्धन माध्यमे वापरून एक प्रकारचे सूक्ष्मजंतू दुसऱ्या प्रकारच्या सूक्ष्मजंतूच्या वाढीस प्रतिरोध करतात, हे दाखविले होते. १८९९ मध्ये आर्. एमरिख व ओ. लो. यांनी स्यूडोमोनस एरूजिनोझा (निळ्या रंगाचा पू तयार करणारे सूक्ष्मजंतू) या सूक्ष्मजंतूंबद्दल संशोधन करताना, त्यांचा अर्क गोलाणूंचा तसेच घटसर्प, पटकी, आंत्रज्वर (टायफॉइड) व प्लेग या रोगांस कारणीभूत असणाऱ्यार सूक्ष्मजंतूंचा अत्यल्प सांद्रतेतही (विद्रावातील प्रमाण अत्यल्प असतानाही) नाश करतो, हे दाखविले होते.

यानंतर जवळ जवळ पाव शतकानंतर १९२८ मध्ये सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना पेनिसिलिनाचा शोध लागला. या औषधाची परिणामकारकता सर एर्न्स्ट बोरिस चेन व सर हॉवर्ड वॉल्टर फ्लोरी यांनी ते दुसऱ्या जागतिक महायुद्धात मोठ्या प्रमाणात वापरून सिद्ध केली. या संशोधनाद्दल या तिघांना १९४५ चे वैद्यकाचे नोबेल पारितोषिक मिळाले.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate