অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विकलांग चिकित्सा

विकलांग चिकित्सा

विकलांग चिकित्सा आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक विशेष शाखा. अस्थी, सांधे, त्यांच्यात हालचाल घडवून आणणारे स्नायू व कंडरा [हाडे व स्नायू जोडणारे पांढरे, चमकदार, तंतुमय रज्जू; ⟶ कंडरा] आणि या हालचालींवर नियंत्रण ठेवणारे तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) यांचे रोग व विकार, त्यांच्यामुळे होणारी व्यंगे व अपंगत्व, त्याचप्रमाणे अपघातजन्य इजा तसेच पुनर्वसन या सर्वांचा या शाखेत विचार (कारणमीमांसा, निदान व उपचार) केला जातो.

विकलांग चिकित्सा म्हणजे ऑर्थोपेडिक्स हा शब्द ऑर्थोस म्हणजे सरळ आणि पेडॉस म्हणजे मूल या ग्रीक शब्दांवरून आला आहे. इ. स. १७४१ मध्ये निकोलस आंद्रे या पॅरिसमधील वैद्यांनी ल ऑर्थोपेडी या ग्रंथात लहान मुलांच्या व्यंगांवर उपाय करण्यासंबंधी विवेचन केले. त्यावरून शारीरिक व्यंगांसंबंधी विवेचन करणारे शास्त्र म्हणून ऑर्थोपेडिक्स हा शब्द प्रचारात आला आणि इंग्रजीत तो तसाच रूढ झाला.

इतिहास

आदिमानवाला बंधफलकाचा (शरीराच्या भागाचे-तुटलेल्या हाडाचे-संरक्षण करण्यासाठी व तो हलू नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या फळीसारख्या साधनाचा) तसेच इतर साधनांचा उपयोग माहीत होता. उत्खननात सापडलेल्या मृतांच्या शरीरावर अशी साधने वापरल्याचे आढळले आहे. बंधनफलकाचा उपयोग ५,००० वर्षापूर्वी ईजिप्तमध्ये केल्याचे आढळले आहे.

अस्थी, त्यांचे विकार, अपघाती अस्थिभंग, संधि-स्खलन (सांध्यातून हाड निखळणे) आणि हाडांचा क्षय यासंबंधी पाश्चात्त्य वैद्यकात हिपॉक्रॉटीझ (इ. स. पू. सु. ४६०-सु. ३७७) यांच्या काळापासून व भारतात २,५०० ते ३,००० वर्षापूर्वी सुश्रुताच्या काळापासून माहिती होती. त्याचे वर्णन त्यांच्या ग्रंथांतून आढळते आणि त्यांपैकी पुष्कळसे सिद्धांत व उपाययोजना अजूनही लागू पडतात. गेलेन यांनी (इ. स. १३०-२००) पृष्ठवंश (पाठीच्या कण्याची) विद्रूपता (व्यंग) नीट करण्याचा प्रथम प्रयत्न केला होता.

पाश्चात्त्य वैद्यकात इ. स. सु. १५०० नंतर शरीरशास्त्राच्या अभ्यासामुळे आणि इतर विज्ञान शाखांतील ज्ञानवाढीमुळे ‘विकलांग चिकित्सा’ या शाखेतही खूप प्रगती झाली आहे. सांध्यांच्या संबंधातील माहितीत विल्यम हंटर (१७१८-८३) यांनी) आणि स्नायू, स्नायूंची कार्ये व हाडांची वाढ यांच्या संबंधातील माहितीत जॉन हंटर (१७२८-९३) यांनी भर घातली. ऑर्ब (स्वित्झर्लंड) येथे झां आंद्रे व्हेनेल यांनी कंकालाच्या (सांगाड्याच्या) विद्रूपतेवर उपचार करणारी पहिली संस्था स्थापन केली.

विकलांग चिकित्साविषयक शस्त्रक्रिया तंत्रावर जॉन हिल्टन (१८०४-७८) यांच्या ऑन रेस्ट अँड पेन या पुस्तकाचा खूप प्रभाव पडला होता. आंतॉन्यो स्कार्पा (१७५२-१८३२) ह्या इटालियन वैद्यांनी वक्रपाद विद्रूपतेचे [पिळवटले जाऊन पावलाच्या स्थानात किंवा आकारात निर्माण झालेल्या जन्मजात विद्रूपतेचे; ⟶ पाऊल] प्रथम तपशीलवार वर्णन लिहिले.

झाक डेलपेक (१७७७-१८३२) आणि जॉर्ज एफ्. एल्. श्ट्रोमायर (१८०४-७६) या दोन शस्त्रक्रियाविशारदांनी वक्रपाद विद्रूपतेवर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली. श्ट्रोमायर जर्मन असल्याने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ही चिकित्सा जर्मनीतच उपलब्ध होती. लंडन येथील शस्त्रक्रियाविशारद विल्यम जे. लिट्ल (१८१०-९४) यांनी स्वतःच्या वक्रपाद विद्रूपतेवर १८३६ मध्ये श्ट्रोमायर यांच्याकडून शस्त्रक्रिया करवून घेतली होती. त्यांनी लंडनमध्ये १८३८ मध्ये रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटल काढले. त्यांना इंग्लंडमधील या चिकित्सेचे जनक मानतात. ऑन्टोनिस मातीआसन ह्या बेल्जियन शस्त्रक्रियाविशारदांनी १८५४ मध्ये विद्रूपतेच्या उपचारात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रथम उपयोग केला. आल्बेर्ट होफ्फा (१८५९-१९०८) या जर्मन शस्त्रक्रियाविशारदांनी १८९० मध्ये जन्मजात श्रोणि-संधी स्थानभ्रंशावर (ऊर्वस्थी व श्रोण्यस्थी म्हणजे मांडी व कमरेच्या हाडांमधील खुब्याच्या सांध्यातील हाड निखळल्यावर) पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली.

ह्यू ओएन टॉमस (१८३४-९१) स्वतः शस्त्रक्रियाविशारद नसतानाही अस्थिभंगासंबंधी त्यांनी बरेच लिहिले. पायाच्या अस्थिभंगांवरील इलाजात उपयोगी असे बंधफलक साधन त्यांनी शोधले. ते आजही उपयुक्त असून ते टॉमस बंधफलक (बाहू व पाय यांच्या अस्थिभंगासाठी वापरण्यात येणारा धातूचा बंधफलक; वरच्या बाहूला वा पायाला घट्ट बसणारे कडे एका टोकाला व त्यापासून निघणारे व खाली जाणारे दोन गज त्याला असतात) म्हणून ओळखले जाते. सर रॉबर्ट जोन्स (१८५८-१९३३) यांच्या कार्यापासून इंग्लंडमध्ये आधुनिक विकलांग चिकित्सेस सुरुवात झाली.

तसेच आधुनिक विकलांग चिकित्सेच्या विकासास हातभार लावणारांमध्ये अमेरिकेतील एल्. ए. सेअर, हेन्ऱी. जी. डेव्हिस, सी. एफ्. टेलर, ई. एच्. ब्रॅडफर्ड, जे. बी. ब्राउन यांची नावे प्रामुख्याने घेता येतील. आर्. डब्ल्यू. लोव्हेट (१८५९-१९२४) यांनी बॉस्टनमध्ये बालपक्षाघात व पाठीच्या कण्याच्या वक्रतेसंबंधी लिहिले. शरीरातील हाडे कापण्याची विजेवर चालणारी करवत एफ्.एच्. आल्बी (१८७६-१९४५) यांनी १९०९ साली शोधून काढली.

तीमुळे शस्त्रक्रियेतील प्रगतीत भर पडली तसेच त्यांनी अस्थिभंगाच्या इलाजासाठी खुली शस्त्रक्रिया केली व अस्थिरोपणाचा (हाड एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी वा दुसऱ्या शरीरात बसविण्याचा) प्रथम प्रयोग केला. आर्. ए. हिब्ज (१८६९-१९३२) आणि आल्बी यांची नावे पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेसंबंधी घेतली जातात. मायकेल होक (१८७४-१९४४) यांचे नाव व्यंगे व लुळ्या पडलेल्या सांध्यावरील शस्त्रक्रिया यांच्याशी व रॉयल व्हिटमन (१८५७-१९४६) यांचे नाव ऊर्वस्थिभंगाच्या उपचारांशी निगडित आहे. विलिस कॅम्बेल (१८६९-१९३२) या शस्त्रक्रियाविशारदांनी विकलांग चिकित्सेतील आधुनिक पद्धती व तंत्रे विकसित करण्याची महत्त्वाची कामगिरी केली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून विकलांग चिकित्सा ही वैद्यकाची विशेष शाखा म्हणून गणली जाऊ लागली. तसेच इतर शास्त्रांत जी प्रगती झाली तीमुळे या शाखेतील रोगांचे अचूक निदान आणि वैद्यकीय व शस्त्रक्रियेचे उपचार यांमध्येही या शतकात खूप प्रगती झाली आहे.

इतर शास्त्रांतील शोधांत क्ष-किरणांचा शोध (व्हिल्हेल्म कोनराट राँटगेन, १८९५), संमोहनविद्या (ब्रेड, १८४२) आणि निर्जंतुक शल्यतंत्र (जोसेफ लिस्टर, १८४२) यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. तसेच पेनिसिलीन (अलेक्झांडर फ्लेमिंग, १९२९) व इतर प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचे शोध, धातुविज्ञान व प्लॅस्टिकनिर्मितीतील प्रगती यांचाही उल्लेख करावा लागेल. शिवाय पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांतील अनुभवांमुळे या शाखेत खूप प्रगती होऊन ती वैद्यकाची पूर्णपणे विशेष शाखा म्हणून ओळखली जाऊ लागली.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate