অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परावटु ग्रंथि

(पॅराथायरॉइड ग्लँड). गळ्यातील अवटू ग्रंथीच्या अगदी जवळ तिच्या पश्चभागी आणि बहुतकरून तिच्या प्रत्येक खंडाची पश्चकडा आणि तिचे आवरण यांमध्ये असलेल्या, हरभऱ्याच्या डाळीएवढ्या, प्रत्येक बाजूस दोन अशा असलेल्या छोट्या अंतःस्त्रावी ग्रंथींना (ज्यांचा स्त्राव एकदम रक्तात मिसळतो अशा वाहिनीविहीन ग्रथींना) परावटू ग्रंथी म्हणतात. अंतःस्त्रावी ग्रंथींमध्ये त्या सर्वांत लहान आहेत. त्यांचा आकार अंडाकृती किंवा दुहेरी बहिर्गोल भिंगासारखा असून रंग पिवळसर-करडा असतो. प्रत्येक ग्रंथी सर्वसाधारणपणे ६ मिमी. लांब, ३ ते ४ मिमी. रुंद आणि १ ते २ मिमी. जाड असते व तिचे वजन साधारणपणे ५० मिग्रॅ. असते. प्रत्येक बाजूच्या वरच्या ग्रंथीला 'ऊर्ध्वस्थ' परावटू ग्रंथी आणि खालच्या ग्रंथीला 'अध:स्थ' परावटू ग्रंथी म्हणतात. अवटू ग्रंथीच्या ऊतकापेक्षा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या -पेशींच्या -समहापेक्षा) या ग्रंथींचे ऊतक हलके असते व प्रत्येक ग्रंथी पातळ संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकाच्या वेष्टनात असते.

आ. १. भ्रूणातील परावटू ग्रंथी : (१) अवटू ग्रंथी, (२) गिलायू (टॉन्सिल), (३) अधःस्थ परावटू ग्रंथी, (४), यौवनलोपी ग्रंथी, (५) ऊर्ध्वस्थ परावटू ग्रंथी, (६) ग्रसनी कोष्ठ-१, (७) ग्रसनी कोष्ठ-२, (८) ग्रसनी कोष्ठ- ३, (९) ग्रसनी कोष्ठ-४.

उत्पत्ती

इ. स. १८८० पर्यंत या ग्रंथींचे अस्तित्व अज्ञात होते. १९०० च्या सुमारास त्यांचे अवटू ग्रंथीपासून असलेले स्वतंत्र स्थान मान्य झाले. भ्रूणातील क्लोमाच्या कमानींपैकी (भ्रूणमध्यस्तरापासून बनलेल्या मानेतील कमानींपैकी) तिसऱ्या व चौथ्या कमानींपासून या ग्रंथींची उत्पत्ती होते. त्या भ्रूणातील अंतःस्तरापासून बनतात. भ्रूणाच्या वाढीबरोबरच त्यांचा अवटू ग्रंथीशी जवळचा संबंध प्रस्थापित होत जातो. अधःस्थ ग्रंथी तिसऱ्या ग्रसनी (घसा) कोष्ठापासून आणि ऊर्ध्वस्थ ग्रंथी चौथ्या ग्रसनी कोष्ठापासून तयार होतात म्हणून त्यांना अनुक्रमे परावटू - ३ आणि -४ असेही संबोधितात. अधःस्थ ग्रंथी कधीकधी यौवनलोपी ग्रंथींबरोबरच (उरामध्ये अग्रभागी असणाऱ्या आणि प्रौढपणी जवळजवळ नाहीशा होणाऱ्या ग्रंथींबरोबरच) छातीतही जाऊन वाढतात, तर कधी कधी मानेत समाईक ग्रीवा रोहिणीच्या (मानेतील रेहिणीच्या) द्विशाखित होण्याच्या ठिकाणाजवळच राहतात.

संख्या आणि रचना

परावटू ग्रंथीची संख्या अनिश्चित असते. बहुधा त्या एकूण चार असतात. कधीकधी परावटू ऊतक ठिकठिकाणी विखुरलेले आढळते. मानवात परावटू ग्रंथींची जास्तीत जास्त संख्या १२ पर्यंत आढळली आहे. कदाचित त्या फक्त तीनच असण्याचीही शक्यता असते. परावटू ग्रंथी ऊतक माशाखेरीज सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत आढळते. ग्रंथींची संख्या चारापेक्षा अधिक असल्यास त्यांना 'अतिरिक्त परावटू ग्रंथी' म्हणतात.

परावटू ग्रंथींची सूक्ष्मदर्शकीय रचना वयोमानाप्रमाणे बदलणारी असते व हा बदल त्यांचे आधारद्रव्य कमीजास्त असण्यामुळे होतो. आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षात आधारद्रव्य फार नाजूक असते, परंतु प्रौढावस्थेत त्याचे पडदे बनून ग्रंथी खंडप्राय दिसते, तरीही रोहिण्या आणि नीला यांचे जाल जेवढे ठळकपणे दिसते तेवढे आधारद्रव्य कधीच दिसत नाही. सहाव्या वर्षापर्यंत ज्या कोशिका दिसतात त्यांना 'स्वच्छ प्रमुख कोशिका' म्हणतात. सातव्या वर्षाच्या सुमारास 'अँसि़डोफिलिक' कोशिका आणि दहाव्या वर्षाच्या सुमारास 'ऑक्सिफिल' कोशिका दिसू लागतात (या दोन्ही प्रकारच्या कोशिका अम्लीय रंजकाने सहज रंगविता येतात व त्यावरून त्यांचे अस्तित्व कळून येते). या कोशिका निरनिराळ्या नसून एकाच कोशिकेच्या स्त्रावोत्पादनाच्या दृष्टीने होणाऱ्या अवस्था असाव्यात.

इतर अंतःस्त्रावी ग्रंथींप्रमाणेच या ग्रंथींना भरपूर रक्तपुरवठा असतो. कारण त्यांचा स्त्राव [→हॉर्मोने] रासायनिक निरोप्याचे काम रक्तप्रवाहातूनच शरीराच्या इतर भागांत पोहोचल्यास करू शकतो. ऊर्ध्वस्थ अवटू रोहिणी व अधःस्थ अवटू रोहिणी यांच्या शाखांपासून त्यांना शुद्ध रक्त मिळते. या ग्रंथींना भरपूर लसीका वाहिन्याही (ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या सूक्ष्म नलिकाही) असतात. तंत्रिका (मज्जा) पुरवठा अनुकंपी तंत्रिका तंत्रापासून [→तंत्रिका तंत्र] होतो. मज्जावरणरहित (मायेलीन नावाच्या स्निग्ध पदार्धसदृश पदार्थाचे आवरण नसलेल्या) तंत्रिका शाखा रोहिणी शाखांबरोबरच ग्रंथींच्या ऊतकात विखुरलेल्या असतात; परंतु त्या स्त्रावोत्पादनाशी संबंधित नसतात. अवटू ग्रंथींच्या उच्छेदन शस्त्रक्रियेच्या वेळी परावटू ग्रंथींच्या रक्तपुरवठ्यास इजा न होण्याची विशेष काळजी घ्यावी लागते.

कार्य

परावटू ग्रंथींच्या मुख्य अंतःस्त्रावाला 'परावटू हॉर्मोन' (पॅराथोर्मोन) म्हणतात. ते सरल-शृंखला पेप्टाइड आहे. शरारातील कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचयाकरिता (शरीरातील भौतिक व रासायनिक घडामोडींकरिता) ते आवश्यक असून अग्र पोष ग्रंथीचे या ग्रंथीवर काहीही नियंत्रण नसते. रक्त आणि ऊतकांतील या दोन खनिजांचे गुणोत्तर कायम ठेवण्याचे प्रमुख कार्य या हॉर्मोनाचे असते. प्राकृतिक (सर्वसाधारण) रक्तरसात कॅल्शियमाचे प्रमाण प्रत्येक १०० मिलि. मध्ये ८.५-१०.० मिग्रॅ. आणि अकार्बनी फॉस्फरसाचे प्रमाण तेवढ्याच रक्तरसात २.५-४.५ मिग्रॅ. असते. ग्रंथीच्या स्त्रावोत्पादनावर रक्तरसातील आयनीभूत (विद्युत् भारित अणूच्या स्वरूपातील) कॅल्शियमाचेच फक्त नियंत्रण असते. कॅल्शियमन्यूनता स्त्रावोत्पादन वाढविते, तर कॅल्शियमाधिक्य स्त्रावोत्पादन घटविते. आंत्रमार्गातील (आतड्याच्या मार्गातील) कॅल्शियमाचे अभिशोषण, कॅल्शियमाचा हाडातील साठा कमीजास्त करणे, मूत्र आणि मलातून होणारे कॅल्शियमाचे उत्सर्जन या क्रियांचा परावटू हॉर्मोनाशी संबंध असतो. यांशिवाय फॉस्फेटांचे मूत्रातून होणारे उत्सर्जन वाढविण्याचे कार्य हे हॉर्मोन वृक्क (मूत्रपिंड) नलिकांच्या पुन्हा अभिशोषणक्षमतेवर परिणाम करून करते. एच्. कॉप यांनी १९६१ साली परावटू हॉर्मोना शिवाय कॅल्सिटोनीन नावाचे आणखी एक हॉर्मोन या ग्रंथीच्या स्त्रावात असल्याचे दाखवून दिले आहे. ही दोन्ही हॉर्मोने एकमेकांस विरोधी आहेत. परावटू हॉर्मोन हाडातील कॅल्शियम बाहेर आणून रक्तरसातील कॅल्शियमाची पातळी वाढवते, तर कॅल्सिटोनीन नेमका उलट म्हणजे ही पातळी कमी करण्याचा परिणाम करते. या विरोधी क्रियाशीलतेमुळे रक्तरसातील कॅल्शियमाची पातळी एकसारखी राहून तीत भरमसाठ चढउतार होत नाहीत. कॅल्सिटोनीनाचे परावटू ग्रंथीपेक्षा अवटू ग्रंथीत अधिक उत्पादन होते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate