অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बरगडी


 

 

 

 

 

छातीच्या पिंजऱ्याचा [⟶छाती] पुष्कळसा भाग ज्या वक्राकार छोट्या छोट्या हाडांचा बनलेला असतो, त्या प्रत्येक हाडाला ‘बरगडी’ म्हणतात. छातीच्या प्रत्येक बाजूस एकूण बारा बरगड्या असून त्यांना फासळ्या असेही म्हणतात. बरगडी लांब, बारीक व वक्राकार असूनही तिचे वर्गीकरण चापट हाडांत करतात, कारण तिच्या दोन बाजू चापट असतात. कधीकधी मानेत किंवा कमरेत जादा बरगडी उत्पन्न झाल्यास बरगड्यांची संख्या त्या बाजूस वाढते. सर्वात खालची म्हणजे बारावी बरगडी तयार न झाल्यास बरगड्यांच्या बारा जोड्यांऐवजी अकराच जोड्या आढळतात. बरगड्या वरून खाली मोजतात आणि म्हणून सर्वांत वरची ती पहिली बरगडी म्हणून ओळखतात. बरगड्यांच्या वरच्या सात जोड्या उपास्थीने (कूर्चेने) पुढच्या बाजूस उरोस्थीस (छातीच्या मध्यावरील चपट्या हाडास) स्वतंत्रपणे जोडलेल्या असतात म्हणून त्यांना ‘सत्य’ अथवा ‘पूर्ण’ बरगड्या म्हणतात. उरलेल्या पाच जोड्यांना ‘छद्म’अथवा ‘अपूर्ण’ बरगड्या म्हणतात. या खालच्या पाचांपैकी आठवी, नववी व दहावी बरगडी यांच्या उपास्थी प्रत्येकीच्या वर असलेल्या बरगडीच्या उपास्थीशी जोडलेल्या असतात. अकराव्या व बाराव्या बरगडीचे अग्र टोक (त्यावर उपास्थी नसून) मोकळेच असते व म्हणून त्यांचा उरोस्थीशी संबंध नसतो. या कारणाकरिता त्यांना ‘तरंगत्या’ बरगड्या म्हणतात.

बरगड्या एकीखाली एक असून दोन बरगड्यांच्या मधील अवकाशाला ‘आंतरापर्शुक’ अवकाश म्हणतात. हा अवकाश स्नायुथरांनी व्यापलेला असतो. या स्नायुंना बाह्य व आंतरिक आंतरापर्शुक स्नायू अशी नावे आहेत. प्रत्येक आंतरापर्शुक अवकाश मागून पुढे रुंदावत जातो म्हणते बरगड्या मागच्या बाजूस अधिक जवळ असतात, तर पुढच्या बाजूस एकमेकींपासून थोड्या दूर होतात. बरगड्यांची दिशा बदलती असून वरच्यापेक्षा खालच्या अधिक तिरप्या असतात. नववी बरगडी सर्वांत जास्त तिरपी असते व तेथून खाली तिरपेपणा कमी होत जातो. पहिल्या बरगडीपासून सातवीपर्यंत लांबी अनुक्रमे वाढत जाते व नंतर बारावीपर्यंत कमी होते. बरगड्यांची रुंदी वरून खाली कमी होत जाते. वरच्या दहा बरगड्या पुढील टोकाजवळ जास्त रुंद असतात. पहिली, दुसरी, दहावी, अकरावी व बारावी या पाच बरगड्यांत आपापले वैशिष्ट्य असते. उरलेल्या सात साधारणपणे एक सारख्याच असतात. आणि म्हणून त्यांचा उल्लेख करताना ‘प्रारूपिक’ ही संज्ञा वापरतात.

प्रारूपिक बरगडी

वर्णनाकरिता प्रारूपिक बरगडीच्या निरनिराळ्या भागांना नावे दिली आहेत. तिचे तीन प्रमुख भाग पुढीलप्रमाणे आहेत : (१) अग्र अथवा पुढचे टोक, (२) पश्च अथवा मागचे टोक आणि (३) या दोन टोकांमधील भाग अथवा अस्थिदंड.

आ. ३. डावी पहिली बरगडी (ऊर्ध्वदर्शन) : (१) अधोजश्रूशी जोडणारा भाग, (२)अधोजत्रू नीलेसाठी रंध्र, (३)अधोजत्रू रोहिणीसाठी रंध्र, (४) गुलिका.

(१) अग्र टोकाला ‘उरोस्थी टोक’ असेही म्हणतात कारण या टोकावर जोडलेल्या उपास्थीच्या माध्यमाने ते उरोस्थीस जोडलेले असते. (२) पश्च टोकाला ‘कशेरुक टोक’ असे दुसरे नाव आहे. ते मागच्या बाजूस असलेल्या कशेरुक दंडास (पाठीच्या कण्याला) जोडलेले असते. बरगडीच्या मागच्या भागावरील विशिष्ट भागांना‘शिर’, ‘मान’ आणि ‘गुलिका’ अशी नावे आहेत. शिरावर दोन पैलू असतात व ते कशेरुक दंडातील संबंधित कशेरुकाशी (मणक्याशी) सांधलेले असतात. प्रत्येक बरगडी तिच्या पश्च टोकाने कशेरुक दंडातील दोन कशेरुकांशी सांधलेली असते. शिराच्या लगेच मागच्या काहीशा चापट भागाला मान म्हणतात. मानेर पुष्कळ छोटी छोटी रंध्रे असतात व त्यांमधून रक्तवाहिन्या प्रवेश करतात. अस्थिदंड व मान ज्या ठिकाणी मिळतात तेथे असणाऱ्या छोट्या उंचवट्याला गुलिका म्हणतात. गुलिकेचे दोन भाग स्पष्ट दिसतात : (अ) सांधिक म्हणजे सांध्यात भाग घेणारा आणि (आ) असांधिक म्हणजे भाग न घेणारा. सांधिक भाग त्याच बरगडीशी संगत असलेल्या कशेरुकाच्या आडव्या प्रवर्धाशी (विस्ताराशी) सांधलेला असतो. (३) अस्थिदंड पातळ व चापट असून त्याला वरची व खालची अशा दोन कडा आणि आतला व बाहेरचा असे दोन पृष्ठभाग असतात. खालच्या कडेजवळ आतल्या पृषठभागावर जी खोबण असते तिला ‘पर्शुक खोबण’ म्हणतात व तीमधून काही अंतरापर्यंत आंतरापर्शुक रक्तवाहिन्या व तंत्रिका (मज्जा) जातात. अस्थिदंड वक्राकार असून गुलिकेपासून ५-६ सेंमी. अंतरावर जेथे त्याला अधिक बाक असतो, त्या ठिकाणाला ‘कोन’ म्हणतात.

इतर बरगड्यांची वैशिष्ट्ये

पहिली बरगडी सर्वांत जास्त वक्र असून सर्वांत लहान असते. ती रूंद व चापट असून तिचे पृष्ठभाग ऊर्ध्वस्थ (वरील बाजूस) अधःस्थ (खालील बाजूस) असतात. मानेतील काही स्नायू तिला जोडलेले असतात. त्या बाजूच्या अधोजत्रू (गळ्याच्या हाडांच्या खालील) रोहिणी व नीला तिच्या ऊर्ध्वस्थ पृष्ठभागाशी सलग्न असतात.

अकराव्या व बाराव्या बरगड्यांना मान व गुलिका हे भाग नसतात. अकरावीला अल्पसा कोन असतो व पर्शुक खोबण उथळ असते. बारावीला ही दोन्ही नसतात व ती अकरावीपेक्षा बरीच आखूड असते.

कार्ये व विकृती

फुफ्फुसे, प्रमुख रक्तवाहिन्या व हृदय यांसारख्या छातीमधील महत्वाच्या अवयवांना बरगड्यांमुळे संरक्षण मिळते. श्वसनक्रियेत भाग घेणारे अनेक स्नायू बरगड्यांना जोडलेले असल्यामुळे श्वसनक्रियेत त्या महत्वाचा भाग घेतात. बरगड्यांच्या अग्रटोकांवर उपास्थींच्या साहाय्याने उरोस्थी तरंगती असल्यामुळे बरगड्या व उपास्थी यांची स्थितिस्थापकता (विकृती निर्माण करणारी प्रेरणा काढून घेतल्यावर मूळ आकार पुन्हा प्राप्त होण्याचा गुणधर्म) उरोस्थीचा भंग सहसा होऊ देत नाही. दाब पडून बरगड्या काही प्रमाणात वाकू शकत असल्या, तरी त्यांचा आघातजन्य अस्थिभंग पुष्कळ वेळा झालेला आढळतो. अस्थिभंगात तुटलेली बरगडीची टोके अंतस्थ अवयवांना इजा करू शकतात. मधल्या बरगड्यांचा अस्थिभंग होण्याची शक्यता अधिक असते आणि कोनाच्या जवळचाच पुढचा भाग सर्वांत दुर्बल असल्यामुळे अस्थिभंग बहुधा तेथे होतो. छातीवर पडणाऱ्या दाबाने बरगड्यांची वक्रता अधिक वाढते व त्या दुर्बल भागी कोनाजवळ तुटतात. प्रत्यक्ष आघातात बरगडी कोणत्याही भागी तुटू शकते व हा प्रकार अधिक गंभीर असतो. इतर अस्थींप्रमाणेच बरगड्यांच्या अस्थिमज्जेत (हाडांच्या मध्यवर्ती पोकळीतील पेशींच्या समूहात) रक्तोत्पादन कार्य चालू असते.

काही व्यक्तींमध्ये नेहमीच्या बरगड्यांपेक्षा मानेत जादा बरगडी असते, तिला ‘ग्रैव बरगडी’ म्हणतात. या विकृतीचे प्रमाण सर्वसाधारणपणे एक टक्का असते व त्यापैकी ती दोन्ही बाजूंस असण्याचे प्रमाण ८० टक्के असते. फक्त १० टक्के लोकांतच विकृती लक्षणोत्पादक असते.

ग्रैव बरगडी पूर्ण वाढलेली किंवा अपूर्ण असते व ती बहुतकरून सातव्या ग्रैव कशेरुकापासून निघालेली असते. वाढीच्या प्रकाराशी लक्षणांचा संबंध नसतो. भुजजालिका (भुजेकडे जाणाऱ्या तंत्रिकांचे जाळे) व अधोजत्रू वाहिन्या यांवर पडणाऱ्या दाबामुळे लक्षणे उद्‌भवतात. लक्षणे स्थानिक स्वरूपाची, वाहिनीजन्य अथवा तंत्रिकादाबजन्य असू शकतात. हातास मुंग्या येणे, हात गार पडणे, हाताचा काही भाग निळा पडणे व बधीर होणे, वेदना यांसारखी लक्षणे उद्‌भवतात. कधीकधी तर्जनीचा अभिकोथ (अवयवातील रोहिणीचा आकस्मिक रोध झाल्यामुळे रक्तपुरवठा थांबून तेथील पेशींच्या समूहाचा मृत्यूहोणे) झाल्याचेही आढळते.

 

पहा : छाती.

संदर्भ : 1. Rains, A. J. H.; Ritchie, H. D. Bailey and Love’s Short Practice of Surgery, London,1977.

2. Sabiston, D. C., Ed., Davis-Christopher Textbook of Surgery, Tokyo, 1972.

3. Warwick, R.: William, P.L., Ed., Gray’s Anatomy. London, 1973.

सलगर, द. चि.; कुलकर्णी, श्यामकांत; भालेराव, य. त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate