অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यकृत

सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत आढळणारा हा एक मोठा ग्रंथीवजा अवयव आहे. तो आद्य अग्रांत्रापासून (आतड्याच्या सुरुवातीच्या भागापासून) निर्माण झालेला असतो. मानवासहित सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत त्याची रचना आणि कार्य सारखेच असते. ‘यम्‌’ व ‘कृ’ या मूळ संस्कृतातील धातूंपासून ‘यकृत’ हा शब्द बनलेला असून शरीरातील अनेक क्रियांचे नियमन करणारा अवयव असा अर्थ त्यात अभिप्रेत आहे. जवळजवळ पाचशे निरनिराळ्या प्रकारची कार्ये यकृतामार्फत होतात आणि हा जीवनावश्यक अवयव काढून टाकल्यास १ ते ५ दिवसांच्या आत हमखास मृत्यू ओढवतो.यकृताच्या रचनेत कोशिकांच्या (पेशींच्या) भित्तिका असतात.

आंत्रामधून येणारे रक्त आणि पोषक द्रव्ये विपुल प्रमाणात असलेले के शिकांतून (सूक्ष्म वाहिन्यांतून) येणारे रक्त यांचे यकृतात अभिसरण होते. या रक्तावर यकृतातील एंझाइमांचे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांचे) नियंत्रण असते. फायब्रिनोजेन, रक्तरस, अल्ब्युमीन, कोलीनएस्टरेज या रक्तातील महत्त्वाच्या घटकांचा उगम यकृतातच होतो.

पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणावस्थेत रक्तातील कोशिकांची पैदास यकृतातच होते. दैहिक अभिसरणावाटे वाहणाऱ्या रक्तातून विषारी द्रव्ये बाजूस काढून टाकणे व त्यांचे अवक्रमण (रेणूंचे तुकडे करण्याची क्रिया) करणे, तसेच रक्तात जर हॉर्मोनांचे (अंतःस्रावी ग्रंथींकडून येणाऱ्या उत्तेजक स्रावांचे) प्रमाण वाढले, तर ऑक्सिडीकरण  हायड्रॉक्सीकरण  किंवा संयुग्मन करून हे प्रमाण कमी करणे या क्रियाही यकृतातच घडतात.

रक्तातील कणरूपी द्रव्याचा यकृतातील कोटरिकांच्या (नीला कोशिकांनी बनलेल्या क्षेत्रांच्या) भित्तीत असलेल्या भक्षिकोशिकांद्वारे नाश केला जातो. रक्ताची गाळणक्रिया, शर्करा व जीवनसत्त्वे या उपयुक्त पदार्थांचा साठा करणे, प्रथिने, प्रतिपिंडे (शरीरात आलेल्या बाह्य पदार्थांचा प्रतिकार करण्यासाठी निर्माण होणारी प्रथिने), अन्न पाचकरस यांची निर्मिती करणे व निरुपयोगी द्रव्यांचे उत्सर्जन करणे ही यकृताची काही महत्त्वाची कार्ये आहेत. आपल्या आहारात यकृताचा समावेश केला, तर प्रथिने, वसा (स्निग्ध पदार्थ), अ, ब, ड व ई ही जीवनसत्त्वे, तसेच लोह व तांबे हे आवश्यक घटक आपल्या शरीराला मिळतात.रक्तशुद्धी व रक्तवृद्धी होत असतानाच यकृतात पित्ताचे स्रवण होत असते. हा स्राव प्रथम पित्ताशयात साठविला जातो आणि नंतर तो ग्रहणीत (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात) सोडला जातो. पित्तामुळे वसेचे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांपासून बनणारे दृढ मिश्रण) तयार होते व यामुळे तिचे पचन सुलभ होते.

मानवेतर प्राण्यांतील यकृत

अपृष्ठवंशी प्राण्यांना यकृत नसते. फक्त कवचधारी प्राण्यांत यकृत-अग्निपिंड या नावाची एक लहान ग्रंथी असते. पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणात यकृताची वाढ झपाट्याने होते; पण पूर्ण वाढ झालेल्या प्रौढ प्राण्यात यकृताच्या कोशिकांचे विभाजन होताना आढळत नाही. मात्र शस्त्रक्रिया किंवा अशा काही कारणास्तव जर यकृताचा लहानसा भाग कापला गेला, तर तेथील कोशिकांचे झपाट्याने विभाजन होऊन पूर्ववत यकृत तयार होते.

कृंतक (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या) प्राण्यात यकृताचे वजन त्याच्या शरीराच्या वजनाच्या ५% असते, तर मानवात हे सु. २% म्हणजे सरासरी १.५ किग्रॅ. इतके असते. यकृताचे आकारमान जरी निरनिराळ्या प्राण्यांत वेगवेगळे असले, तरी त्यातील रक्ताभिसरणाचा आराखडा सारखाच असतो.यकृत हे सर्व पूर्ण वाढ झालेल्या पृष्ठवंशी प्राण्यांत आढळते व वरवर सारखे दिसते; पण त्यात विकासाच्या दृष्टीने फरक आहेत.

यकृत व रक्ताभिसरण यांसंबंधीची माहिती यकृताचे कार्य समजण्यास आवश्यक आहे. जीवरसायनशास्त्राच्या दृष्टीने यकृताचे कार्य जटिल स्वरूपाचे आहे. मानवी यकृताचे कार्य जरी जटिल स्वरूपाचे असले, तरी रचनात्मक दृष्टीने त्याचा अभ्यास करणे सुलभ आहे.पृष्ठवंशी प्राण्यांतील आदिम प्राण्यांत हॅगफिश व लँप्री यांचा समावेश होतो. लँप्रीचे यकृत आकारमानाने लहान व फक्त एक खंडाचे असते.

हॅगफिशमध्ये मात्र द्विखंडी यकृत आढळते. माशांचे यकृत मोठे व रचनात्मक दृष्ट्या इतर पृष्ठवंशी प्राण्यांसारखे असते. काही माशांत भ्रूणविकास होत असताना पित्ताशय व पित्तनलिका यांचा नाश होतो व यामुळे प्रौढावस्थेत, विशेषकरून उपास्थिमत्स्यांत (ज्यांचा सांगाडा कूर्चेचा बनला आहे अशा माशांत) यांचा अभाव असतो.

अस्थिमत्स्यांत पित्ताशय आढळतो व त्याचे आकारमानही मोठे असते. माशाच्या यकृताचे महत्त्व त्याच्या वसा संश्लेषणक्षमतेत आहे. याचीच परिणती माशाच्या यकृतापासून तेल व जीवनसत्त्वे मिळण्यात होते.उभयचर (जमिनीवर व पाण्यातही वास्तव्य करणाऱ्या) प्राण्यांचे यकृत खंडयुक्त असते व त्यांना पित्ताशयही असतो. यकृताला रक्ताचा पुरवठा उदरीय नीलेपासून व यकृत प्रवेशिका नीलेपासून होतो. सरीसृप (सरपटणाऱ्या) प्राण्यांपैकी सापात एकाच खंडाचे लांब यकृत असते.

कासव, मगर इत्यादींत यकृत दोन खंडांचे असून हे दोन खंड जोडलेले असतात. बहुतेक सर्व सरीसृप प्राण्यांत पित्ताशय आढळतो. पक्ष्यांचे यकृत खंडयुक्त असले, तरी सुटसुटीत असते. पित्ताशयाचा अभाव असला, तरी भ्रूणावस्थेत पित्ताशयाची आद्यावस्था आढळते. कबुतरात यकृताच्या प्रत्येक खंडापासून एक पित्तनलिका ग्रहणीत जाते.

सस्तन प्राण्यांचे यकृत खंडयुक्त असते इतकेच नव्हे, तर खंडाच्या रचनेतही फरक आढळतात. जर हे फरक वरवरचे असतील, तर यकृत एकीकृत समजले जाते. असे यकृत मानवी शरीरात, देवमाशात व इतर अनेक रवंथ करणाऱ्या प्राण्यांत आढळते. अशा यकृतात प्रवेशिका नीला व यकृत नीला एकमेकांशी काटकोन करतात. याउलट जेव्हा यकृताचे खंड निश्चित असतात तेव्हा प्रवेशिका नीला व यकृत नीलेच्या मोठ्या शाखा एकमेकींशी समांतर असतात. एकीकृत यकृताचा भाग कापून काढणे निश्चित खंड असलेल्या यकृताच्या भागापेक्षा कठीण असते.

लँप्री सोडून इतर सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत यकृत हे त्रिमितीय जालिकेसारखे असते. या जालिका अधिस्तराच्या पट्टिकांनी जुळविलेल्या असतात. यालाच मूलोतक म्हणतात. या रचनेतच रिक्तिका तयार होतात व त्यांतून कोटरिकांची निर्मिती होते. यकृताचा पृष्ठभाग मूलोतकाच्या एककोशिक स्तराने आच्छादिलेला असतो. मानवासह सर्व पृष्ठवंशी प्राण्यांचे यकृत म्हणजे कोशिकांचा एक सलग समूह असतो. या समूहात दंडगोलीय नलिका इतस्ततः विखुरलेल्या असतात. यकृताची तुलना एखाद्या इमारतीशी केली, तर या इमारतीत अनेक अनियमित दालने असून ती एकमेकांशी जोडलेली असतात.

या दालनांच्या भिंती यकृत कोशिकांच्या बनलेल्या असतात. अशा संयोजित भित्तीच्या रचनेस ‘म्युरालियम’ असे म्हणतात. कोटरिका यकृतातील रिक्तिकांत लोंबत्या स्थितीत आढळतात. कोटरिकांच्या भित्तीतील कोशिकांस के. डब्ल्यू. कुफर या जर्मन शरीरविज्ञांच्या नावावरून कुफर कोशिका असे म्हणतात. या कोशिकांत भक्षिकोशिकांची क्षमता असते. यकृताच्या कोशिकांवर रिक्तिकांच्या बाजूस सूक्ष्म रसांकुर असतात. यामुळे कोशिकांचा पृष्ठभाग वाढतो व या पृष्ठभागातून अन्नद्रव्ये असलेला विद्राव शोषला जातो. या शोषलेल्या अनावश्यक द्रव्यांचे उत्सर्जन कोशिकांतून कोशिकांच्या बाजूस असलेल्या पित्ताच्या सूक्ष्म कोशिकांत होते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate