অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांधे

शरीराच्या अस्थींच्या सांगाड्यातील दोन किंवा अधिक हाडांचा एकमेकांशी रचनात्मक संपर्क साधणाऱ्या स्थानांना संधी किंवा सांधा म्हणतात. आधार देणे, नाजुक अवयवांचे संरक्षण करणे व शरीराची सुसंबद्घ हालचाल घडवून आणणे ही सांगाड्याची प्रमुख कार्ये सांध्यांच्या मदतीने पार पाडली जातात.

प्रकार : सांध्यांमुळे जी हाडे जोडली जातात त्यांच्या हालचालींच्या शक्यतेनुसार सांध्यांचे मुख्यतः तीन प्रकार असतात.

पूर्णतः अचल किंवा स्थिर सांधे : कवटीच्या हाडांना एकमेकांशी जोडणाऱ्या सीवनी आणि जबड्याच्या हाडांमध्ये रोवलेली दातांची मुळे. अशा अचल सांध्यांमध्ये दोन हाडांमधील फटी तंतुमय (सूत्रल) ऊतकांनी भरलेल्या असल्यामुळे त्यांना तंतुमय सांधे असे म्हणतात.

अंशतः चल किंवा उपास्थियुक्त सांधे : दोन मणक्यांमधील सांधे; कंबरेच्या पुढच्या भागातील दोन्ही बाजूंच्या हाडांना (जघनास्थींना) जोडणारा प्रस्तरसंधी. अशा उपास्थियुक्त (कूर्चायुक्त) सांध्यांमध्ये दोन हाडांच्या दरम्यान सूत्रल उपास्थीची गादी असल्यामुळे थोडी हालचाल झाल्यास उपास्थी दाबली जाऊन नंतर ती पूर्ववत होऊ शकते. [⟶ उपास्थि].

पूर्णतः चल असणारे संधिकलायुक्त सांधे : गुडघा, कोपर, खांदा इत्यादी. अशा संधिकलायुक्त सांध्यांमध्ये उपास्थीने आच्छादित अशा हाडांच्या पृष्ठभागांवर आणि संपूर्ण सांध्याभोवती असलेल्या आवरणाच्या आतील बाजूस गुळगुळीत संधिकला असते. संधिजलाच्या स्रावामुळे हा पृष्ठभाग ओलसर राहून हालचालींमधील घर्षण कमी होते. हालचालींच्या विविधतेनुसार चल सांध्यांचे अनेक उपप्रकार आहेत.

रचना

सांध्यांच्या रचनेत एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या हाडांच्या पृष्ठभागाबरोबरच इतर ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकासमूहांचा) सहभागही महत्त्वाचा असतो. सांध्यांमध्ये जोडला जाणारा हाडाचा भाग इतर भागांपेक्षा किंचित पसरट आणि जाळीदार (छिद्रल) असतो. त्याच्या पृष्ठभागावर सांध्यांच्या प्रकारानुसार सूत्रल ऊतक, सूत्रल उपास्थी किंवा काचेसारखी कठीण काचाभ उपास्थी आढळते. सांध्यांच्या बाहेरच्या बाजूस दोन हाडांना जोडणारे पांढऱ्या सूत्रल ऊतकांचे मजबूत संधिबंध असतात. त्यांच्यामुळे सांध्यांच्या कोणत्याही हालचालीच्या वेळी त्याचे घटक (हाडे) एकमेकांपासून फार दूर जाऊ शकत नाहीत व सांध्याला स्थैर्य प्राप्त होते. अस्थिबंधाची टोके हाडांभोवतालच्या पर्यास्थिकलांशी एकजीव झालेली असतात. त्यांच्या मधला भाग सांध्याभोवती असलेल्या सूत्रल ऊतकाच्या आवरणावर (संधिकोशावर) घट्ट बसलेला असतो.

संधिकलायुक्त सांध्यांची रचना अधिक गुंतागुंतीची असते. एकमेकांच्या संपर्कात येणारे हाडांचे पृष्ठभाग परस्परांना अनुरूप अशा (अंतर्गोल-बहिर्गोल) आकाराचे असतात. त्यांच्यावरील काचाभ उपास्थीच्या आवरणात सफाईदार हालचालींसाठी आवश्यक असा गुळगुळीतपणा आढळतो. तरीही हे आवरण शरीराचा भार सहन करण्याइतके मजबूत असते. संपूर्ण सांध्याभोवती असलेला संधिकोश हालचालीला वाव देण्यासाठी सैलसर असतो. त्याच्या बाहेरच्या बाजूस अस्थिबंध घट्ट चिकटलेले असतात, तर स्नायुबंध (कंडरा) आणि स्नायू मुक्तपणे हालचाल करू शकतात. संधिकोशाचा आतील पृष्ठभाग गुळगुळीत संधिकलेने (पटलाने) आच्छादलेला असतो. हे पटल सांध्याच्या अंतर्भागातील काचाभ उपास्थी आणि प्रत्यक्ष भार सहन करणारे इतर ऊतक (असल्यास) सोडून इतर सर्व पृष्ठभागावर पसरलेले असते. त्यातून स्रवणारा स्निग्ध संधिरस पोषण आणि वंगण अशी दोन्ही कार्ये करतो. काही सांध्यांमध्ये (उदा., गुडघे) अंतःस्थित अस्थिबंध असतात. तसेच हाडामधील खोबणीचा उथळपणा कमी करण्यासाठी तिच्याभोवती उपास्थीची वर्तुळाकार चकती असते. या दोन्ही घटकांमुळे सांध्यांचे स्थैर्य वाढण्यास मदत होते.

सांध्यांच्या हालचाली

अंशतः चल सांध्यांमध्ये दोन हाडांच्या पृष्ठभागांचे किंचित जवळ येणे अथवा दूर जाणे अशी हालचाल घडू शकते. मणक्यांच्या पृष्ठभागांमधील अंतर अशा पद्घतीने पाठीच्या मागेपुढे किंवा बाजूला झुकण्याच्या हालचालींबरोबर बदलत असते. गर्भिणी अवस्थेत कंबरेच्या (कटिमेखला) अस्थिबंधांचे शिथिलीभवन झाल्यामुळे तेथील सांध्यांची हालचाल अधिक मुक्तपणे होऊन प्रसूतीस मदत होते.

पूर्णतः चल सांध्यांमध्ये विविध अक्षांभोवती निरनिराळ्या हालचाली घडून येऊ शकतात. त्या हालचाली व त्यांनुसार सांध्यांचे उपवर्ग खालीलप्रमाणे होतात.

आडव्या अक्षाभोवती उघडझाप केल्याप्रमाणे हालचाल : उदा., कोपर, गुडघा, बोटे इत्यादींसाठी बिजागरी सांधा असतो. अशाच प्रकारची डोक्याची हालचाल (होकार दर्शविणे) कवटीच्या तळाचा भाग आणि मानेतील पहिला मणका (ॲटलास) यांच्यात होत असते.

सांध्याच्या पलीकडील भाग शरीराच्या मध्यरेषेकडे आणणे (अभिवर्तन) किंवा उलट दिशेने दूर नेणे (अपवर्तन) : बिजागरी सांध्यात थोड्या प्रमाणात अशा प्रकारची हालचाल होऊ शकते (उदा., बोटे); परंतु खांदा किंवा खुबा (श्रोणिसंधि-कंबर व मांडीचे हाड यांतील सांधा) यांमध्ये असणाऱ्या उखळी सांध्यात ती अधिक परिणामकारक रीत्या होते.

वरील दोन्ही प्रकार मिळून होणारी वर्तुळाकारातील हालचाल (पर्यावर्तन) : ही हालचाल उखळी सांध्यात होऊ शकते. तसेच मनगट, जबडा, तळहात व तळपायांना बोटांशी जोडणारे सांधे यांमध्येही दोन अक्षांभोवती हालचाल होऊ शकते. खोगीर सांधे आणि स्थूलक सांधे असे प्रकार येथे आढळतात.

हाडाच्या उभ्या अक्षाभोवती होणारी हालचाल (घूर्णन) : यासाठी आवश्यक खुंटी सांधा (कीलकसंधी) मानेतील पहिला व दुसरा मणका (ॲटलास व ॲक्सिस; शिरोधर व अक्ष कशेरुक)यांच्या दरम्यान असतो. डोक्याची नकारदर्शक हालचाल तेथे घडून येते. कोपराच्या खालील हाताचा भाग (प्रबाहू) ज्या दोन हाडांनी बनलेला असतो त्यांच्या दरम्यान दोन्ही टोकांना असेच सांधे असतात. त्यामुळे अंतरास्थी (अल्ना) हे हाड स्थिर राहून बाह्यास्थी (रेडिअस) हे हाड स्वतःभोवती फिरते आणि तळहात पालथा किंवा उताणा होणे अशा हालचाली घडून येतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate