অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंत:स्रावी ग्रंथी

अंत:स्रावी ग्रंथी ( Endocrine glands)

मानवी काही अंत:स्रावी ग्रंथी

शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींना नलिकाविरहित ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींमध्ये विशिष्ट रासायनिक पदार्थ म्हणजेच संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके ग्रंथीद्वारे थेट रक्तात स्रवली जातात. यामुळे सजीवांना त्यांच्या शरीराच्या आतील व बाहेरील बदलत्या परिस्थितीनुसार विविध क्रियांमध्ये मेळ साधणे शक्य होते. संप्रेरकांचे निमंत्रण पश्चप्रदाय पध्दतने होते शरीराच्या निरनिराळ्या भागात काम करणार्‍या विविध अंतःस्रावी ग्रंथी मिळून अंतःस्रावी संस्था बनते.

अंतःस्रावी संस्था आणि चेतासंस्था शरीरक्रिया नियंत्रित करतात. त्यांमध्ये दोन ठळक फरक आहेत. अंतस्रावी संस्थेत संप्रेरकांची क्रिया हळूहळू होते आणि त्यांचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. याउलट, चेतासंस्थेची प्रतिक्रिया जलद होते आणि ताबडतोब प्रतिसाद दिला जातो. विशिष्ट ऊतींपर्यंत संप्रेरके पोहोचण्यासाठी अंतःस्रावी संस्था ही रक्ताभिसरण संस्थेवर अवलंबून असते, तर चेतासंस्थेतील एकमेकांना जोडलेल्या चेतापेशींद्वारे संदेशवहन होते. अंतःस्रावी संस्था आणि चेतासंस्था या दोन्हींमध्ये जीवरासायनिक पदार्थांवाटे माहिती संक्रमित होते.

वेगवेगळ्या शरीरक्रिया होत असताना शरीरातील ऊतींच्या कार्यानुसार संप्रेरके पाझरतात. शरीरातील ऊतींचा विकास, चयापचय, प्रजनन इ. क्रियांवर या संप्रेरकांचे परिणाम घडून येत असतात. अंतःस्रावी ग्रंथी भ्रूणस्तरातील निरनिराळ्या थरांपासून उत्पन्न होतात. मात्र काही अंतःस्रावी ग्रंथींचे निरनिराळे भाग निरनिराळ्या भ्रूणस्तरांपासून  उत्पन्न  होऊन नंतर एकत्र येऊन त्यांची ग्रंथी बनलेली दिसते. पीयूषिकेचे तीन भाग अथवा अधिवृक्क ग्रंथींचे दोन भाग अशी याची उदाहरणे सांगता येतील. मानवी शरीरातील वेगवेगळ्या अंत:स्रावी ग्रंथींचे थोडक्यात वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

पीयूषिका

अंतःस्रावी ग्रंथींमधील ही एक प्रमुख ग्रंथी आहे. ही ग्रंथी अनेक संप्रेरके उत्पन्न करते. यापैकी वृध्दिसंप्रेरक स्नायू हाडांच्या वाढीला चालना देते. पीयुषिकेतून पाझरणारी संप्रेरके विविध अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य नियंत्रित करतात.

तृतीय नेत्र पिंड

ही ग्रंथी मध्यप्रमस्तिष्कापासून म्हणजे मोठ्या मेंदूच्या मध्यभागापासून उत्पन्न होते. मेलॅटोनिन या संप्रेरकाच्या निर्मितीबरोबरच ही ग्रंथी जैविकचक्र नियंत्रित करते.

अवटु

ही ग्रंथी मानेच्या मध्यभागी असून थायरॉक्सिन व कॅल्सिटोनिन अशी संप्रेरके  निर्माण करते. शरीराची वाढ व चयापचय क्रियेत ही संप्रेरके महत्त्वाची कार्ये करतात. स्रवलेली संप्रेरके साठवून ठेवू शकणारी ही एकमेव ग्रंथी आहे. या ग्रंथींच्या अंतःस्रावात आयोडीन असते.

परावटू

अवटु ग्रंथीच्या पार्श्वभागात या चार ग्रंथी असतात. या ग्रंथी पॅराथॉर्मोन नावाचे एकच संप्रेरक उत्पन्न करतात. हे संप्रेरक कॅल्शियमाच्या व फॉस्फरसाच्या चयापचयाचे नियंत्रण करते.

यौवनलोपी किंवा हृदोधिष्ठ

ही ग्रंथी हृदयाजवळ छातीच्या पिंजर्‍यात असते. या ग्रंथीतून निर्माण होणार्‍या थायमोसिन या संप्रेरकामुळे प्रतिकारशक्ती निर्माण करणार्‍या पेशींची संख्या वाढते व टी पेशी परिपक्व होतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. ही ग्रंथी यौवन प्रारंभानंतर आकाराने लहान होत जाते.

स्वादुपिंड

या ग्रंथीत लांगरहान्स द्वीपकातील पेशी संप्रेरके निर्माण करतात. लांगरहान्सची द्वीपके दहा लाख असून प्रत्येक द्वीपकात ३,००० पेशी असतात. या पेशी चार प्रकारच्या असतात : (अ) आल्फा पेशी २० % असतात व त्या ग्लुकागॉन संप्रेरक निर्माण करतात. यामुळे यकृतातील ग्लायकोजेनाचे ग्लुकोजामध्ये रूपांतर होते. (आ) बीटा पेशी ७० % असतात. त्या इन्शुलिनाची निर्मिती करतात. त्यामुळे रक्तातील साखर कमी होते.  (इ)   डेल्टा पेशी ५ % असतात व त्या सोमॅटोस्टॅटिन हे संप्रेरक उत्पन्न करतात. सोमॅटोस्टॅटिन हे इन्शुलीन व ग्लुकागॉनवर नियंत्रण ठेवते. तसेच आतड्यातील ग्लुकोजाचे शोषण व हालचाल यांवरही नियंत्रण ठेवते. (ई) पी.पी. पेशी ५ % असून स्वादुपिंडीय पॉलिपेप्टाइडाची निर्मिती करतात. या पेशी पाचकरसावर नियंत्रण ठेवतात.

अधिवृक्क

या ग्रंथीचे ‘बाह्यक’ व ‘मध्यक’ असे दोन भाग असून ते भ्रूणाच्या निरनिराळ्या थरापासून निर्माण होतात. बाह्यकापासून तीन संप्रेरके निर्माण होतात : (अ) क्षार नियंत्रक, (आ) प्रथिने, कर्बोदके व मेद यांच्या चयापचयाचे नियंत्रक. (इ) जननग्रंथी, पोषक आणि मध्यकातून अ‍ॅड्रेनॅलीन किंवा नॉरअ‍ॅड्रेनॅलीन ही संप्रेरके स्रवतात. ही संप्रेरके आणीबाणीच्या किंवा भावनिक प्रसंगी स्रवतात आणि हृदय व संवहनी संस्थेला उद्दीपित करतात. अ‍ॅड्रेनॅलिनामुळे चयापचय क्रियांनाही उत्तेजन मिळते व रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. म्हणून अधिवृक्क ग्रंथीला ‘आणीबाणीची ग्रंथी’ म्हणतात.

वृषणग्रंथी व (९) अंडाशय

पुरुषांमध्ये वृषणग्रंथी टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांमध्ये अंडाशय इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके निर्माण करतात. ही संप्रेरके प्रजननाचे कार्य चालू ठेवतात.

अधश्चेतक

ही मेंदूतील ग्रंथी असून तिच्यात स्वायत्त चेतासंस्थेची प्रमुख केंद्रे असतात. शरीरातील तापमान, पाणी, क्षार व ग्लुकोज यांचे प्रमाण संतुलित ठेवण्याची केंद्रे या ग्रंथीत असतात. ही ग्रंथी पीयूषिकेचेही नियंत्रण करते. ही पीयूषिकेला जोडलेली असून हिच्यापासूनचा स्राव पीयूषिकेतील स्राव निर्माण करणार्‍या पेशींना उत्तेजित करतो.

जठर व आतड्यातील ग्रंथी

या ग्रंथी जठराच्या व आतड्याच्या श्लेष्मल पटलात असतात. आतड्यातील हालचालींवर व अन्नशोषणावर या ग्रंथी नियंत्रण ठेवतात.

मूत्रपिंड (वृक्क) : मूत्रपिंडे तीन संप्रेरके निर्माण करतात : (अ) रेनीन : हे सोडियमच्या पातळीवर नियंत्रण ठेवते. संप्रेरकामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व रक्तदाब वाढतो. (आ) एरिथ्रोपोएटिन : या संप्रेरकामुळे अस्थिमगजात तांबड्या रक्तपेशी उत्पन्न होण्यास चालना मिळते. (इ) कॅल्शिट्रिऑल : यामुळे लहान आतड्यात कॅल्शियम व फॉस्फरस शोषले जाऊन हाडांची वाढ होते.

वार : गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयाला गर्भ (भ्रूण) ज्यामुळे जोडलेला असतो ती वार तात्पुरती अंतःस्रावी ग्रंथी म्हणून कार्य करते. गर्भाच्या वाढीसाठी व गरोदरपण व्यवस्थित पार पाडण्यासाठी आवश्यक संप्रेरकाची निर्मिती ही ग्रंथी करते.

बहुधा, एक किंवा अनेक ग्रंथींद्वारा अतिस्रावामुळे किंवा अल्पस्रावामुळे अंतःस्रावी संस्थेचे रोग निर्माण होतात. संप्रेरकाच्या अतिस्रवण्याने शरीरात अर्बुद होतात किंवा पेशींची अभिवृध्दी होते. पीयूषिकेपासून पाझरणार्‍या संप्रेरकामुळे काही अंतःस्रावी ग्रंथी अतिस्राव किंवा अल्पस्राव पाझरतात. अल्पस्राव होण्यामागे शस्त्रक्रियेमुळे किंवा प्रारणांमुळे ऊतींचा नाश, ऊतींचा क्षय, आहार व संप्रेरक निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या विकरांमध्ये जन्मजात दोष, इ. कारणे असतात. मानवाप्रमाणेच सस्तन प्राण्यांमध्ये अंत:स्रावी संस्थेत अधश्चेतक, पीयूषिका, तृतीय-नेत्रपिंड, अवटू, परावटू, यौवनलोपी, स्वादुपिंड, अधिवृक्क, वृषण, अंडाशय इ. ग्रंथींचा समावेश होतो. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्येही काही ग्रंथी असतात, मात्र त्या बहुतांशी चेतापेशींचे गुच्छच असतात. उदा., संधिपाद (ऑर्थोपोडा)  प्राण्यांमध्ये डोळ्यात, मेंदूत आणि गंडिकांमध्ये अशा गुच्छवजा ग्रंथी असतात. त्यांच्यामुळे प्रजनन, कात टाकणे, शरीरातील पाण्याचे संतुलन, रक्तातील ग्लुकोजाची पातळी आणि हृदयाचे ठोके इ. क्रियांचे नियमन होते. संधिपादांमध्ये अंडाशय तसेच नरसंप्रेरक पाझरणारी ग्रंथी अशा अंत:स्रावी ग्रंथी असतात.

प्रधान, शशिकांत

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate