অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आरोग्य विमा - आरोग्यविज्ञान

आरोग्य विमा - आरोग्यविज्ञान

हवा शुद्ध राहील व भरपूर प्रमाणात खेळेल अशी व्यवस्था करावी लागते. औद्योगिक कारखान्यातील धुरामुळे अगर त्यात उत्पन्न होणाऱ्या वायूमुळे आणि धुळीमुळे हवा शुद्ध राहत नाही. म्हणून योग्य ते उपाय करणे हे आरोग्यविज्ञानाच्या च कक्षेत येते. कुजणारे पदार्थ, मलमूत्र, केरकचरा यांमधून दुर्गंधी व जंतू निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांची वेळच्या वेळी विल्हेवाट लावणे हे सार्वजनिक आरोग्य खात्याचे महत्त्वाचे काम आहे.

हे पदार्थ त्वरित निकालात काढणे अशक्य असल्यास तात्पुरता उपाय म्हणून त्यांवर जंतुनाशक द्रव्यांचे फवारे मारतातपिण्याच्या पाण्यातून अपायकारक जंतूंचा शरीरात प्रवेश होऊ शकतो म्हणून शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे फार महत्त्वाचे आहे. जेथे असे शुद्ध पाणी पुरविता येणे शक्य नसते तेथे पिण्याच्या पाण्यावर लक्ष ठेऊन अशा पाण्याच्या साठ्यात भांडी घासणे, कपडे धुणे, स्‍नान करणे, जनावरे धुणे वगैरे कारणांनी ते अशुद्ध होणार नाही. अशी दक्षता घ्यावी लागते. पाण्याच्या साठ्याजवळ कोणी अनधिकृत व्यक्ती पोचू शकणार नाही हे पाहणे जरूर आहे. नारू झालेला माणूस पाण्यात उतरला, तर त्याच्या पायातील नारूची अंडी पाण्यात उतरून त्यांचा संसर्ग दुसऱ्याला होऊ शकतो. विहिरीला पायऱ्या असल्यास त्या बंद करून पाण्यापर्यंत कोणी पोचणार नाही अशी व्यवस्था करावी लागते.

शक्यतर विहिरीचे तोंड बंद करून पंपाने पाणी काढण्याची व्यवस्था असावी म्हणजे पाणी दूषित होण्याचा संभव नाहीसा होतो. विहिरीच्या भोवती चांगली फरशी करून तेथून पाणी झिरपून परत विहिरीत जाणार नाही अशी व्यवस्था करणे जरूर असते. पाण्याची वारंवार तपासणी करून ते दूषित झालेले नाही याची खात्री करून घ्यावी लागते. जरूर तेव्हा पाण्यात क्लोरीन किंवा पोटॅशियम परमँगॅनेट यांच्यासारखी जंतुनाशक औषधेही वापरावी लागतात.

खाद्यपदार्थ व भाजीपाला शुद्ध व स्वच्छ असावे यासाठी बाजार, मंडई व दुकाने यांवर नियंत्रण ठेवावे लागते. त्याठिकाणचा परिसर स्वच्छ राहील, धूळ, माशा वगैरे खाद्यपदार्थांवर बसणार नाहीत अशी तजवीज करावी लागते. खराब झालेल्या व खाण्याला अपायकारक असलेल्या पदार्थांचा नाश करावा लागतो. उपाहारगृहे व खाणावळी यांच्या स्वच्छतेबद्दल व तेथील नोकरांच्या निरोगीपणाबद्दल खात्री करून घ्यावी लागते. त्यासाठी खास नियम करून त्यांची सक्त अंमलबजावणी करावी लागते.

ज्या ठिकाणी पुष्कळ लोक एका वेळी जमतात अशी ठिकाणे म्हणजे शिक्षणसंस्था, वसतिगृहे, मंडई, बाजार, सभागृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक वाहनांचे अड्डे, जत्रा वगैरे ठिकाणी आरोग्यकारक सुख-सोईकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. यात्रेसारख्या प्रसंगी दळण-वळणाच्या साधनांच्या सुलभ सोयीमुळे दूर अंतरावरून पुष्कळ लोक एकत्र जमतात. अडीअडचणीत राहून, मिळेल ते खाऊन राहण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते म्हणून यात्रेसारख्या प्रसंगी खास माणसे नेमून स्वच्छतेबद्दल काळजी घ्यावी लागते.

अन्नपदार्थांपैकी दुधाबद्दल विशेष जपावे लागते. गोठे, दुभती जनावरे, दुधाची भांडी यांची व दुध हाताळणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळण्याची विशेष खबरदारी घ्यावी लागते. तसेच दूध योग्य कसाचे आहे की नाही याबद्दल वारंवार तपासणी करणे अगत्याचे असते.

रोग उत्पन्न झाल्यास त्यांचा परिहार करण्यासाठी रुग्णांलयाची व्यवस्था असणे जरूर आहे. संसर्गजन्य आणि साथीचे रोग यांच्या नियंत्रणासाठी खास यंत्रेणीची जरूरी असते . रुग्णाला रुग्णालयात पोचविण्यासाठी रुग्णवाहक गाड्यांची व्यवस्था करणे अवश्य असते.

आरोग्य खात्याचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे समाजात प्रचार करून, स्वच्छता व आरोग्य यांबद्दल वेळोवेळी माहिती पुरविणे हे होय. त्याकरिता स्वास्थ्य प्रदर्शने, श्राव्यदृश्यप्रचार आणि शिक्षण संस्थांमधून विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणे व त्यांची वेळोवेळी तपासणी करणे ह्या गोष्टी कराव्या लागतात.

जन्ममृत्युनोंद, मृत्युकारणांचे विश्लेषण वगैरे गोष्टी सांख्यिकी-शास्त्राच्या (संख्याशास्त्राच्या) मदतीने करून समाजाला वेळोवेळी सूचना देणे हेही आरोग्यविज्ञानाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

नागरी आणि ग्रामीण जीवनपद्धतींमध्ये फरक असल्यामुळे नागरी आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टींकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. नगरांची वाढ फार झपाट्याने होत असल्यामुळे काही कठीण सम-स्यांना तोंड द्यावे लागते. उदा., वाढत्या शहरांतून उत्पन्न होणाऱ्या झोपडपट्ट्या व त्यांपासून जनतेच्या आरोग्याला असणारा धोका. अशा झोपडपट्ट्या नाहीशा करणे शक्य नसल्यास त्यांना निदान किमान सुखसोई पुरविणे जरूर असते. पाणी, मुताऱ्या, संडास, उजेड वगैरे गोष्टी झोपडपट्ट्यांमध्ये उपलब्ध करून सार्वजनिक आरोग्याला असणारा धोका शक्य तेवढा कमी करण्याचा प्रयत्‍न करणे, हे महानगरपालिकांचे कर्तव्य आहे. शिवाय सार्वजनिक मुताऱ्या व संडास योग्य अंतरावर बाधूंन ते स्वच्छ ठेवणे, लोकांच्या मनोरंजनासाठी मोकळी मैदाने, बागा, वस्तुसंग्रहालये बांधणे या गोष्टीही नगरांमध्ये अत्यावश्यक असतात.

 

सार्वजनिक कसाईखाने बांधून तेथे मारली जाणारी जनावरे रोगग्रस्त नाहीत अशी खात्री करण्यासाठी विशेष यंत्रणा ठेवावी लागते. सांसर्गिक रोग असलेल्या प्रदेशांतून येणाऱ्या प्रवाशांमुळे ते रोग नगरात फैलावू नयेत म्हणून विलग्नवासाची (क्वारंटाइनची) सोय करणे, लहान लहान उद्योगधंदे उदा., पिठाच्या गिरण्या, स्फोटक पदार्थ तयार करणे कारखाने, विजेवर चालणारे कारखाने वगैंरेसारख्या उद्योगांसाठी परवाना पद्धत घालून देऊन त्यांपासून सार्वजनिक आरोग्याला अपाय होणार नाही अशी तजवीज करणे वगैरे अनेक जबाबदाऱ्या नगरपालिकांवर कायद्याने घातल्या असून त्या पार पाडण्यासाठी त्यांना खास अधिकारही देण्यात आलेले असतात.

नागरी जीवनाच्या मानाने ग्रामीण जीवनात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणीपुरवठा. खेड्यांमध्ये विहिरीशिवाय इतर पाणीपुरवठा क्वचितच असतो. विहिरींवर नियंत्रण कसे ठेवावे याबद्दल वर थोडक्यात सांगितलेच आहे. अलीकडे या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्यामुळे शक्य तितक्या अधिक खेड्यांतून नळाने पाणी पुरविण्याचा प्रयत्‍न सरकारमार्फत होत आहे. सांडपाण्याची व्यवस्था खेड्यांमध्ये उघड्या गटारांतूनच होते. परंतु त्यापासून घाण व डास उत्पन्न होऊन आरोग्याला धोका उत्पन्न होतो. त्यासाठी खेड्यांमध्येही सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मोठा बिकट झालेला असून त्यावर काही उपाय योजणे जरूर झाले आहे. खेड्यांमध्ये ग्रामपंचायती स्थापन करून त्यांच्यामार्फत असले प्रश्न स्थानिक सहकार्याने सोडविण्याचा प्रयत्‍न होत आहे.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate