অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आरोग्यसेवेपुढच्या समस्या

काही समस्यांमुळे आरोग्यसेवांवरचा एकूण खर्च वाढत चालला आहे. शासकीय आरोग्यसेवा यामुळे अडचणीत येत आहेत. यावरही काही पर्याय आहेत. उदा. आरोग्यसेवेची रचना त्रिस्तरीय करून प्राथमिक स्तरावर 60-70% आरोग्यसेवा देता आल्यास बराच खर्च वाचतो. निरनिराळया देशांमध्ये यासाठी निरनिराळया प्रकारची प्राथमिक आरोग्यसेवेची व्यवस्था आहे.

वाढता खर्च आणि तंत्रज्ञान

सर्व शासकीय आरोग्यसेवांपुढे हे एक मोठे आव्हान आहे. आरोग्यसेवांचा खर्च सतत वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञान,यंत्रसामुग्री, मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांचे वाढते प्रमाण या सर्वांमुळे आरोग्यसेवांवरचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक शासनांसमोर हा खर्च कसा पेलायचा हे एक आव्हान आहे. अनेक युरोपियन देशांतून भारतात परदेशी नागरिक उपचारासाठी येतात. याचे कारण त्या देशांमधल्या आरोग्यसेवा पु-या पडत नाहीत आणि त्यांची प्रतीक्षा यादी वाढत आहे.

शहरे-खेडे विषमता

 

अनेक देशांमध्ये कमी अधिक ग्रामीण भाग असतोच. अमेरिका व युरोपमध्ये देखील असे ग्रामीण भाग आहेत. अविकसित देशांमध्ये 70-80% पर्यंत ग्रामीण जनता असते. बहुतेक देशांमध्ये खेडे-पातळीवर आरोग्यसेवा पुरवणे हे मोठे अवघड काम आहे. याचे मुख्य कारण ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती बरी नसते आणि सामाजिक सोयी कमी असतात. यामुळे डॉक्टर आणि नर्सेस त्या ठिकाणी रहायला तयार नसतात. यामुळे अनेक देशांमधील खेडयांमध्ये प्रशिक्षित आरोग्य कार्यकर्ते नेमून काम चालवले जाते. निरनिराळया देशांमध्ये असे कार्यकर्ते निरनिराळया नावांनी ओळखले जातात. काही देशांमध्ये परिचारिकांनाच आणखी प्रशिक्षण देऊन ग्रामीण आरोग्यसेवा चालवल्या जातात.

डॉक्टरची आणि नर्सेसची टंचाई

अनेक विकसित देशांमध्ये डॉक्टरी पेशाकडे ओढा कमी असल्यामुळे मनुष्यबळाची टंचाई आहे. या टंचाईमुळे गरीब देशातले डॉक्टर आणि नर्सेस प्रगत देशात पगार आणि राहणीमानाच्या ओढीने स्थलांतर करतात. युरोप,अरब देश, अमेरिका, कॅनडा इ. देशांमध्ये गरीब देशांमधून असे स्थलांतर झालेले आहे. भारत, क्युबा, ब्राझील, फिलीपाईन्स इ. देशांमधून गेली अनेक वर्षे डॉक्टर आणि नर्सेस देशांतर करत असल्याने या देशांमध्ये आरोग्यसेवा कमजोर झालेल्या आहेत. अमेरिकेत प्रत्येक रुग्णालयात भारतीय डॉक्टर्स आणि नर्सेस सापडतात हे त्याचमुळे.

औषधांच्या किंमती

गेल्या काही वर्षात औषधांमध्ये खूप संशोधन होऊन नवनवीन औषधे उपलब्ध झाली आहेत. या औषधांची किंमत पूर्वीच्या औषधांच्या तुलनेने जास्त आहे. यामुळे आरोग्यसेवांचा खर्च वाढत चालला आहे. आजही लोकांचा आरोग्यसेवेच्या खर्चाचा एक मोठा भाग औषधांचाच असतो.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate