অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हिवताप, किटकजन्य आजार टाळा

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत किटकजन्य आजारामध्ये हिवताप, डेंगीताप, चिकुनगुन्या, जे.ई., हत्तीरोग इत्यादी आजाराचा प्रार्दुभाव डासांपासून होतो. तसेच जून महिन्यात भारतात सर्व ठिकाणी मान्सून येत असल्यामुळे व जास्तीचा पाऊस पडत असल्यामुळे या महिन्यात डासोत्पती स्थानामध्ये जास्तीची वाढ होते व हिवताप व किटकजन्य आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी व कोणकोणत्या प्रतिबंधात्मक उपाय योजनाची अंमलबजावणी करावी याबद्दल थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे आहे.

हिवताप हा सर्वात जास्त पसरणारा आजार आहे. या आजाराचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीपासून होतो. ही मादी स्वच्छ साचलेल्या पाण्यावर अंडी घालते. जसे घराच्या छतावरील मडकी, टायर्स, कप, साचलेले डबके इत्यादी. लक्षणे – रुग्णास कडाडून थंडी वाजणे, थंडीनंतर रुग्णास 102-105 डेंग्री सेल्सीयसपर्यंत ताप येणे. डोके दुखणे, रुग्ण अर्धवट शुद्धी किंवा बेशुद्ध होणे, ठराविक कालावधीनंतर ताप चढणे किंवा पुन्हा उतरणे. उपचार- नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत रक्त तपासून दूषित आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याने क्लोराेक्वीन व प्रायमाक्वीन गोळ्याचा उपचार घ्यावा.

डेंगी ताप

हा ग्रुप बी अरबी या डेंगी विषाणुमुळे प्रसरणारा ताप आहे. गेल्या 15 वर्षात 200 देशातील 25 लक्ष लोकांना या आजाराची लागण झाली आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने ग्रस्त असतात त्यापैकी 5 टक्के लोक या आजाराचे बळी पडतात. डेंगी ताप या आजाराची लागण एडीस इजिप्तीस नावाच्या डासाच्या मादीमार्फत होते. हे डास श्रीमंत डास म्हणून ओळखले जातात. हे डास ओळखण्यासाठी त्याचा काळा रंग व त्याच्या पायावरील पांढरे पट्टे टायगर बॅन्ड लक्ष वेधून घेतात.

लक्षणे

डोके दुखी, थंडी वाजून ताप येणे, तीव्र सांधे व पाठदुखी, रुग्णास हालचाल करणे अशक्य होणे, क्वचीत प्रसंगी रुग्णास ताप येऊन रुग्णाच्या नाका-तोंडाद्वारे रक्त येणे, रुग्ण बेशुद्ध (शॉक) मध्ये जाणे. संशयीत डेंगी रुग्णास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात, सामान्य रुग्णालयात दाखल करावे.

चिकुनगुन्या

या आजाराचा प्रसार एडिस इजिप्ताय नावाच्या डासामार्फत होतो. या डासाची उत्पती स्वच्छ व साठवलेल्या पाण्यात होते.

लक्षणे

ताप येणे, डोके दुखणे, उलट्या व मळमळ होणे, अंगावर पुरळ येणे, सांधे दुखी हे प्रमुख लक्षणे आहे. हा आजार सर्व वयोगटात आढळून येतो. सदरील रोगावरील तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात, सामान्य रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. जपानिज इन्सेफालायटिज मेंदूज्वर जे.ई या रोगाचा प्रसार क्युलेक्स विष्णोई या डासाच्या मादीपासून होतो. या डासाची उत्पती भात शेती पाण्यात व स्वच्छ पाण्याच्या डबक्यात होते. विशेषत: 15 वर्षाखालील मुलामध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते.

हत्तीरोग

हत्तीरोगाचा प्रसार क्युलेक्स क्युकीफेशीएटस नावाच्या डासांच्या मादीपासून होतो. हे डास घाण पाण्यावर अंडी घालतात. हत्तीरोग हा लवकर न कळणारा आजार असल्यामुळे सर्वांचे या रोगाकडे दुर्लक्ष होते. परिणामी रुग्णास हत्तीपाय व अंडीवृद्धी आजार उद्भवतात त्यामुळे शरीराला विद्रुपता येते. राज्य शासनाने एमडीए मोहिम सन 2004 पासून राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये 0 ते 2 वर्षा पर्यंतची बालके, गरोदर माता व अतिवृद्ध व्यक्ती सोडून सर्व लोकसंख्येत डिईसी गोळ्याची एक मात्रा सतत पाच वर्ष खाऊ घातली जाते. तसेच अंडवृद्धीच्या रुग्णांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करावी व योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्याने मोफत अंडवृद्धी शस्त्रक्रिया करुन घ्यावी. ही शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.

वरील सर्व आजाराची जननी आपल्या घराभोवतालची अस्वच्छता होय. त्यासाठी साधे व सोपे उपाय केल्यास भयंकर आजारापासून आपला बचाव निश्चित होऊ शकतो. त्यासाठी खालील उपाय योजना राबविणे गरजेचे आहे. आपल्या घराभोवताली पाणी साचू देऊ नका, घरातील सर्व साठवलेले पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करा. या साठ्यातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरड्या करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत. त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावे. पांघरुन घेवून झोपावे. संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादी वेळीच विल्हेवाट लावा.

संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी असावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकऊ ऑईल टाकावे. वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. या सर्व बाबी प्रत्येकाने घरी केल्यास डासाची उत्पती होणार नाही व डास चावणार नाही म्हणजेच योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवेल.

 

- डॉ. एम.टी. साळवे, जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, ०९ जुलै, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate