অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रंथी

वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या शरीरात विविध प्रकारचे स्राव स्रवणार्‍या पेशीसमूहाच्या संरचनांना ग्रंथी म्हणतात. मात्र काही ग्रंथी एकपेशीयदेखील असतात. ग्रंथींपासून शरीराला आवश्यक स्राव निर्माण होतात, तर काही ग्रंथी शरीरातील अनावश्यक उत्सर्जक घटकदेखील तयार करतात.

वनस्पतींमधील ग्रंथी

काही वनस्पतींच्या पानामध्ये किंवा देठात किंवा लुसलुशीत खोडात पांढरा चिकासारखा स्राव निर्माण होतो (उदा., विलायती शेर, रूचकी किंवा रुई). हा चीक औषधी असतो. काही वनस्पतींत बाह्यत्वचेवर अधिरोम किंवा केस असतात. ते सरळ असतात. त्या अधिरोमात काही ग्रंथी असतात. त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्राव निर्माण होतात. काहींत आम्लधर्मी तर काहींत अल्कधर्मी, तर काही ग्रंथींत विषासारखी जीवरसायने निर्माण होतात. त्यांचा स्पर्श झाल्यास मानवी त्वचेवर पुरळ निर्माण होतात. फुलांमध्ये असणार्‍या मधुरसग्रंथी मधुरस तयार करतात. डिंक, राळ, तेले तयार करणार्‍या ग्रंथी, सूचीपर्णी तसेच लिंबुवर्गीय वनस्पतींतही ग्रंथी आढळतात. पाणी बाहेर टाकणार्‍या जलग्रंथी मेचासारख्या वनस्पतीत आढळतात. या ग्रंथी पर्णवृताच्या पायथ्याशी फुगवटा असलेल्या ठिकाणी असतात. साध्या स्पर्शाने त्यातील स्राव किंवा पाणी बाहेर येते. काही वनस्पतींत या ग्रंथी पानांच्या कडांजवळ असतात. त्यांतून थेंबाच्या रूपांतून पाणी बाहेर टाकले जाते. कीटकभक्षक वनस्पतींत (कलशपर्णी व ड्रॉसेरा यांच्यात) पाचकरस तयार करणार्‍या  ग्रंथी आढळतात. या वनस्पती कीटकांना सापळ्यांत पकडून मारतात आणि स्रावाच्या मदतीने त्यांचे पचन करतात.

मानवी शरीरातील ग्रंथी

मानवी शरीरात असंख्य ग्रंथी असतात. ग्रंथीतील पेशींची संख्या, आकार, रचना, ग्रंथीत उत्पन्न होणार्‍या स्रावाचा प्रकार व स्रावोत्पादन क्रिया यांनुसार ग्रंथींचे वर्गीकरण करतात. काही ग्रंथी एकाच पेशीच्या बनलेल्या असतात. उदा., पचन व श्वसन संस्थांतील श्लेष्म निर्माण करणार्‍या चषक पेशी. शरीरातील बहुतांशी ग्रंथी अनेक पेशींनी बनलेल्या असतात (उदा., यकृत, स्वादुपिंड, जननग्रंथी इत्यादी). ज्या ग्रंथींचा स्राव उत्पन्न होण्यासाठी त्यांच्या पेशींचा अपकर्ष अथवा र्‍हास व्हावा लागतो त्यांना पेशीस्रावी ग्रंथी म्हणतात (उदा., त्वचेतील स्नेह ग्रंथी). काही ग्रंथींच्या पेशी स्रावातून अंशत: झडतात; त्यांना अंडपेशी स्रावी ग्रंथी म्हणतात (उदा., काखेतील व वृषणकोशाच्या त्वचेतील स्वेद ग्रंथी, दुग्धोत्पादक ग्रंथी). काही ग्रंथी फक्त पातळ पाण्यासारखा स्राव निर्माण करतात व त्यांच्या पेशींमध्ये कोणताही बदल होत नाही; त्यांना स्रावी ग्रंथी म्हणतात (उदा., त्वचेतील पुष्कळशा स्वेद ग्रंथी व स्वादुपिंड).

काही ग्रंथींचा स्राव खास नलिकांवाटे बाहेर पडून योग्य ठिकाणी जातो. अशा ग्रंथींना बहि:स्रावी अथवा नलिका ग्रंथी म्हणतात (उदा., स्वेद ग्रंथी, अश्रुग्रंथी, लाला ग्रंथी, यकृत, वृक्क). काही ग्रंथींना नलिका नसतात व त्यांचा स्राव थेट रक्तप्रवाहात किंवा लसिकेत मिसळून योग्य कार्यस्थळी नेला जातो. अशा ग्रंथींना अंत:स्रावी अथवा नलिकारहित अथवा वाहिनीविहीन ग्रंथी म्हणतात (उदा., पियूषिका, तृतीयनेत्र ग्रंथी, अवटू ग्रंथी, परावटू ग्रंथी, यौवनलोपी ग्रंथी, अधिवृक्क). या ग्रंथीतील स्रावांना संप्रेरके म्हणतात. अवटू ग्रंथींतून थायरॉक्सिन हे संप्रेरक तयार होते. काही ग्रंथींचे कार्य वरील दोन्ही प्रकारे घडते. त्यांना मिश्रग्रंथी म्हणतात (उदा., स्वादुपिंड, वृषण आणि अंडकोश). स्वादुपिंड ग्रंथीमध्ये स्वादुरस तयार होतो व हा रस वाहिनीतून छोट्या आतड्यात नेला जातो. तसेच स्वादुपिंडात इन्शुलीन व ग्लुकॅगॉन नावांची दोन संप्रेरके निर्माण होतात आणि ती थेट रक्तात मिसळतात. यकृत ही मानवी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे.


कुलकर्णी, किशोर; पाटील, चंद्रकांत

स्त्रोत -मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/29/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate