অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घरातला हिंसाचार व कारणे

घरातला हिंसाचार

आमच्या दवाखान्यात यशोदा इतकी वर्षे अंगदुखीसाठी म्हणून येते,पण ही साधी कष्टाची अंगदुखी नसून दारूडया नव-याची मारहाण आहे हे कळायला उशीरच झाला खरा. तिच्या कोपरावर खरचटलेले आणि गालावर वळ पाहिल्यावरच मला शंका आली. खोदून विचारल्यावर तिने खरी कहाणी सांगितली. गेली वीस वर्षे हा छळ जवळजवळ रोज संध्याकाळी चालू आहे, आणि तिच्या चार लेकी हे सर्व भरल्या डोळयांनी पहातपहातच लहानाच्या मोठया झाल्या आहेत. आता ही सवय मोडणे अवघड आहे, सुरुवातीसच काही उपाय केला असता तर हा छळ कदाचित थांबू शकला असता. शेकडा सुमारे चाळीस घरांमध्ये स्त्रियांना मारहाण होते. त्यात मुख्य प्रकार म्हणजे नव-याने बायकोला मारणे, याशिवाय सास-याने सुनेला मारणे, भावांनी बहिणीला मारणे, क्वचित मुलांनी आईला मारणे हेही प्रकार घडतात. शिवीगाळ, लाथा, थपडा, डोके आपटणे आणि काठी चपलांनी मारहाण, कधी कधी चक्क खूनसुध्दा! एवढे होऊन तक्रार क्वचितच होते. बाईचा जन्म म्हणून या सर्व गोष्टी खपून जातात.

घरातल्या हिंसाचाराची कारणे

दारूडे नवरे तर मारहाण करतातच, पण दारूडे नसलेलेही तितकेच मारझोड करतात. गरिबी हे कारण म्हणाल तर श्रीमंत घरामध्येही मारहाण होते, धार्मिक घरामध्येही असे प्रकार घडतात. शेतकरी, कामगार, व्यापारी, बडे नोकरदार अशा सर्व कुटुंबातही असे प्रकार घडतच असतात. वरवर दिसणारी कारणे क्षुल्लक असतात, उदा. जेवण आवडले नाही, सासूशी नीट बोलली नाही, इ. पण खरी कारणे वेगळी असू शकतात. लैंगिक असमाधान/ समस्या, हुंडा, जमीन जुमल्याचा वाटा, नव-याचे इतर स्त्रियांशी संबंध अशी अनेकानेक कारणे यात असू शकतात. विशेष म्हणजे भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही ही समस्या आहे. याला प्रगत देशही अपवाद नाहीत. मात्र भारतात काही विशेष घटक यात कारणीभूत ठरतात. मुलीचे लग्नावेळी वय लहान असणे, शिक्षणाचा अभाव, स्त्रियांना अर्थार्जनाची संधी नसणे (त्या कष्ट कमी करत नाहीत) जुळवून केलेली लग्ने (मुलगी देणे), एकत्र कुटुंबपध्दतींचा रामरगाडा, जातपातीच्या तटबंद्यांमुळे शेजार समाजाचा आधार नसणे, कायदेशीर मदत जवळपास उपलब्ध नसणे वगैरे अनेक कारणांमुळे स्त्रियांची कुचंबणा होते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate