অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तातडीच्या आरोग्यसेवेसाठी बाईक अॅम्बुलन्स सज्ज

तातडीच्या आरोग्यसेवेसाठी बाईक अॅम्बुलन्स सज्ज

कुठल्याही अपघातानंतर प्रथमोपचार हा अतिशय महत्त्वाचा असतो. अपघातानंतर कमीत कमी कालावधीत जर अपघातग्रस्त व्यक्तींवर प्रथमोपचार केले गेले तर ती व्यक्ती अपघातातून वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून ही तातडीची आरोग्यसेवा पुरवून लोकांचे प्राण वाचविण्याच्या या प्रकल्पात आपला सहभाग असणे निश्चितपणे आनंददायी आहे." राज्य शासनाच्या  महत्त्वाकांक्षी 'बाईक अॅम्बुलन्स' प्रकल्पामध्ये सहभागी असलेले डॉ. राकेश मांडवलकर सांगत होते. प्रकल्पात सहभागी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. निमित्त होते मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथील जी.एम.सी. जिमखाना सभागृहात आयोजित 'मोटार बाईक अँबुलन्स इमर्जन्सी सेवा' लोकार्पणाचं.

मुंबईतील रहादारीमुळे बऱ्याच रुग्णांना आपत्कालीन आरोग्यसेवा पुरविणे जिकरीचे होऊन बसते. यावर उपाय म्हणून राज्याच्या आरोग्य विभागाने 'बाईक अॅम्बुलन्स सेवा' सुरू केली आहे. या सेवेचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राहुल नार्वेकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

अतिशय दिमाखदार रीतीने पार पडलेल्या या सोहळ्याच्या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या बाजूलाच अत्याधुनिक अशा वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज आशा १० 'बाईक अँबुलन्स' सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याने सर्वांच्याच नजरा त्यावर खिळल्या होत्या. बाईकच्या हँडलवर स्मार्टफोन बसविण्यात आला होता. या स्मार्टफोनवरच या बाईकला आपत्कालीन अवस्थेतील रुग्णांची माहिती उपलब्ध होण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय वैद्यकीय उपकरणे आणि औषधी ठेवण्याची व्यवस्था बाईकवर तीन ठिकाणी करण्यात आलेली आहे.

कार्यक्रमस्थळी सर्वप्रथम आरोग्यमंत्र्यांचं आगमन झालं. त्यांनी या अॅम्बुलन्सना भेट देत त्याची व्यवस्थित चाचपणी केली. आरोग्यमंत्र्यांनी स्वतः बाईक ॲम्बुलन्सवरील सायरनची कळ दाबून तपासणी केली तसेच बाईक अॅम्बुलन्ससाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय उपकरणांची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. या दोघांनीही बाईक अॅम्बुलन्सची पाहणी केली तसेच त्याविषयीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर दोन्ही मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून हा आगळावेगळा प्रकल्प राज्याच्या आरोग्यसेवेसाठी लोकार्पित केला.

कार्यक्रमस्थळी प्रवेशद्वार ओलांडून आत प्रवेश केला की, आरोग्य विभागाच्या योजना आणि विविध प्रकल्प यांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाविषयी भेट देणारे लोकांची आस्थेने विचारपूस करत होते. त्याबद्दल माहिती घेत होते. प्रकल्पाचे औपचारिक लोकार्पण झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या प्रकल्पाच्या निमित्ताने एक स्वप्न वास्तवात आले असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरोग्य विभागाच्या या प्रकल्पाचे भरभरून कौतुक केले.

राज्याच्या आरोग्यसेवेचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच या प्रकल्पाला अर्थसहाय्य पुरविणाऱ्या आयडीबीआय बँक आणि बिव्हिजी इंडिया यांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

लेखक: अजित बायस

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate