অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धुम्रपान आरोग्यास घातक आहे...

धुम्रपान आरोग्यास घातक आहे...


भारतात तंबाखूसेवनाचे प्रमाण अधिक आहे. 2012 साली महाराष्ट्र शासनाने गुटख्यावर बंदी आणली. प्रत्येक सिगारेट जीवनातील सात मिनिट कमी करते. त्याबरोबरच पालकांच्या धुम्रपानामुळे लहान मुलांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता 6 पट अधिक असते हेही तितकेच महत्त्वाचे. प्रत्येक बिडीच्या पाकीटावर ‘स्मोकिंग इज इन्जुरस टू हेल्थ’ असा इशारा दिलेला असतो. पण एखादी गोष्ट करू नका म्हटले की ती केली जाते. त्याचप्रमाणे धूम्रपानाचे आहे. धूम्रपानामुळे सावकाश पण, वेदनादायी मृत्यु ओढवतो, हे सत्य आहे.
भारतात सर्वात जास्त प्रमाण हे मौखिक कर्करोगाचे आहे. हे प्रमाण सुमारे 20 टक्के आहे आणि ते जगात सर्वाधिक आहे. सुमारे 1 टक्के लोक कर्करोगाची पूर्वस्थिती असलेले रुग्ण आहेत. दरवर्षी आपल्याकडे सुमारे एक लाख लोकांना मौखिक कर्करोगाची लागण होते व त्यातील सर्वसाधारणपणे अर्धे लोक एक वर्षाच्या आत मृत्युमुखी पडतात. कारण त्यांचे निदान वेळेवर झालेले नसते. पुरुषांमध्ये पहिल्या तर स्त्रियांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्करोगाच्या प्रकारामध्ये 30 ते 40 टक्के प्रमाण मौखिक कर्करोगाचे आहे.
कष्टकरी आणि कामगार वर्गात बिडी लोकप्रिय असल्यामुळे भारतात बिडी उद्योग वाढला. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार आणि तामिळनाडू या राज्यात तंबाखूचे उत्पादन घेतले जाते. तंबाखूमध्ये असलेल्या निकोटिन या घटकामुळे मानवी शरीराला तंबाखूची सवय लागते. निकोटिन या विषारी रसायनाचा एक थेंब सुद्धा मानवी शरीरास मारक असतो. निकोटिन शिवाय तंबाखूमध्ये 4000 पेक्षा जास्त विषारी रसायने असतात.
भारतात विडी, सिगारेट, सिगार, चिरूट, चुट्टा, धुमती, पाईप, हुकली, चिलीम आणि हुक्का अशा विविध प्रकारात तंबाखू सेवन केले जाते. त्याशिवाय गुटखा, तपकीर, बज्जेर, मशेरी, तंबाखू असलेली टूथपेस्ट अशा रीतीने तंबाखूचा वापर केला जातो. तपकिरीचे नाकाद्वारे सेवन केले जाते. बज्जर तपकीर हिरड्यांना लावली जाते. गुजरातमध्ये स्त्रिया याचा वापर जास्त करतात. मशेरी तंबाखू भाजून त्याची पावडर दंतमंजन म्हणून वापरली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. भारतात 54 टक्के विडीच्या स्वरुपात तर 19 टक्के सिगारेटच्या स्वरुपात धूम्रपान केले जाते. 1 कोटी सिगारेट भारतात सेवन केल्या जातात. भारतीय सिगारेटमध्ये डांबर व निकोटीनचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे. तंबाखूचा धूर व धुम्रपान यामध्ये अनेक विषारी रसायने असतात. त्यामध्ये हायड्रोजन साईनाईड हा विषारी वायू, अमेनिया हे फरशी, स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे रसायन, अर्सेनिक हे मुंग्यांना मारण्याचे रसायन, नेप्थॅलिन बॉल या कपड्यावरील किटाणुंना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, ऍसिटोन हे भिंतीवरील रंग व नेलपेंट काढण्यासाठी वापरले जाणारे रसायन, कार्बन मोनाक्साईड हा कारच्या धुरातील विषारी वायू असतो. गुटख्यामध्ये तंबाखू, सुपारी, चुना, काथ तसेच मॅग्नेशियम कार्बोनेट, शिसे असैनिक असे विषारी पदार्थ असतात. त्यातील शिसे लहान मुलांच्या बौद्धीक विकासाला घातक असते. गुटखा जास्त दिवस पावडर स्वरुपात रहावा व त्यांचा गुठल्या बनू नये म्हणून गुटख्यात मॅग्नेशियम कार्बोनेट मिसळतात.
Buy tobacco, get cancer free म्हणजेच तंबाखूबरोबर कर्करोग मोफत असा सावधानतेचा इशारा दिला जातो. तंबाखूसेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. दरवर्षी सुमारे अडीच लाख लोकांना तंबाखूमुळे कर्करोगाचे निदान होते. मौखिक कर्करोगामध्ये तोंडामध्ये पांढऱ्या रंगाचे चट्टे उटतात. तोंड पूर्णपणे उघडले जात नाही. तिखट मसालेदार पदार्थ खाणे त्रासदायक होते. या प्रकाराचे वेळेत निदान न झाल्यास उपचार करणे कठीण होते.
केस व तोंडाला दुर्गंधी, हिरड्याला इजा, दातांवर काळे-पिवळे डाग, नाकाने वास घेण्याची क्षमता कमी होणे, अकाली वृद्धत्त्व, रोग प्रतिकारकशक्ती कमी होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, एकाग्रता कमी होणे असे अनेक दुष्परिणाम तंबाखूसेवनाचे आहेत. या सगळ्यांचा विचार करता तंबाखू व्यसन थांबवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीने पाऊल टाकले पाहिजे.

 

-डॉ. अभय केशव परळीकर
दंतशल्यचिकित्सक, सेवा रूग्णालय, कोल्हापूर 
(संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर)

माहिती स्रोत: महान्यूज, शुक्रवार, २७ मार्च, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate