অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाण्याचे प्रदूषण

पाण्याचे प्रदूषण

हवा – पाणी – अन्न या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी हि दोन नंबरची गरज आहे.  आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे.  प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात.  पाणी प्रदूषित होण्याची अनेक करणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.

अनेक मार्गाने पाणी प्रदूषित होत आहे.  वेगवेगळ्या कारखान्यातले दुषित पाणी ओढ्यावाटे नदीपत्रात सोडले जाते.  गावातले – शहरातले सांडपाणी – घन पाणी नदीपत्रात सोडले जाते.  या दोन्ही कारणांनी मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रदूषण वाढते.  पावसाच्या वाहत्या पाण्याबरोबर माती – गाळ – कचरा – घाण मिसळते आणि पाणी दुषित होते.  याशिवाय घराच्या छोट्या कारणाने पाणी प्रदूषित होतच असते.  नदीनाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची मळी स्पेंन्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं.  केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे.  अशा कितीतरी गोष्टींमुळे पाणी गढूळ होत, दुषित होत.  रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी दुषित होते.  पाण्यात मिसळल्या गेलेल्या रसायनात त्यामुळे बदल होत जातात आणि त्यातून जी नवीनच हानिकारक रसायने तयार होतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते.

माणूस आज जी रसायने बनवतोय आणि वापरतोय त्यामुळे पाणी दुषित होते.  कीड, रोग आणि नियंत्रण करणाऱ्या रसायनांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रश्न निर्माण होतात.  काही रसायने पाण्यातील कीड अळ्या, नको असलेले मासे, पणवनस्पती संपवण्यासाठी पाण्यात मुद्दाम मिसळली जातात.

पिकांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कीड – रोग नियंत्रणासाठी रासायनिक औषधे मारली जातात.  त्यांचा अंश जमिनीवर [पडून पावसाच्या पाण्याने अगर दिलेल्या पाण्याद्वारे भूगर्भातल्या पाण्यातसुद्धा या औषधांचे अंश गेल्याचे आढळून आले आहे.  म्हणजे जमिनीखालील पाणीसुद्धा या रसायनामुळे प्रदूषित होतेय, हा सर्वात मोठा धोका म्हणावा लागेल.

केमिकल कारखान्यांच्या आसपासच्या ८ – १० किलोमीटरवरील सर्व पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊन त्या दुषित पाण्यामुळे पिकांना, जनावरांना आणि माणसांना हानी पोचल्याची जगभर उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणचे पाणी तपासले असता त्यात डीडीटी आणि इतर रसायनाचे अंश आढळून आले.

आणि विशेष म्हणजे आपण ऐकतो की जहाजातील तेल समुद्राच्या पाण्यावर कित्येक मैल पसरले आणि त्या समुद्रातील जीवसृष्टी धोक्यात आली.  म्हणजे आज जे पाणी आहे ते चोहोबाजूंनी प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे.  असे पाणी आपल्या पिण्यात, वापरण्यात आल्याने अनेक आजार – धोके निर्माण झाले आहेत.

म्हणून पाणी प्रदूषित – दुषित होऊ नये म्हणून प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे.  शेतकऱ्यांनी नदी – नाले – ओढ्यातल्या पाण्यात, वापरत आणलेल्या पाणीस्त्रोतात कीड – रोग – नियंत्रणाची औषधे रसायने सोडू नयेत, पंप वगैरे धुवू नये, त्याची दक्षता घ्यावी.

केमिकल कारखान्यांनी अगर इतर कारखान्यांनी आपले सांडपाणी नद्यांत न सोडता त्याचे शुद्धीकरण करून शेतीसाठी झाडांसाठी वापरावे.  याची काही उत्तम उदाहरणे दुध डेअऱ्यांनि घालून दिलेली आहेत.  सोनई दुध संघाने सांडपाण्यावर हजारो फळझाडं उभी करून एक उत्पादनाचे साधनं उभं केलं आहे.  कागद आणि साखर कारखान्यांतील माळी आणि इतर द्रवरूप पदार्थ बेजबाबदारपणे कुठेही सोडू न देता त्याची प्रक्रिया करून वापर करावा म्हणजे पाणी दुषित व्हायचे टळेल.

पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करूनच मग ते पिण्यासाठी वापरावे अशी आजची सगळीकडे स्थिती निर्माण झाली आहे.  पाणी तापवून घेणे सर्वांत उत्तम आणि पाणी तपासणी अहवालानुसार त्याचे शुद्धीकरण करून घेऊनच पिण्यासाठी वापरावे.

कीड – रोग – तन नियंत्रणासाठी जी औषधं मारतो – फवारतो त्यांच्या बाबतीतही ती पाण्याद्वारे मातीतून भौगार्भातल्या पाण्याला दुषित करणार नाहीत अगर भूपृष्ठावरील जलसाठ्याला प्रदूषित करणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

पाणी प्रदूषण हे १००% मानवानिर्मित आहे.  ते निसर्गनिर्मित नाही.  म्हणूनच प्रत्येकाने मी पाणी दुषित करणार नाही, असे ठरवून स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी या मोहिमेत सहभाग घेतला तर नक्कीच पाण्याचे प्रदूषण आपण कमी करू शकू आणि आपणच आपल्यासाठी स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी मिळवू शकू.

 

स्त्रोत - कृषी प्रवचने प्रल्हाद यादव

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate