অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय अन्न सुरक्षितता

भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण

(The Food Safety and Standards Authority of India - FSSAI)

“देशांतर्गत अन्नसुरक्षिततेबाबत नियंत्रण आणि निरीक्षण करून सार्वजनिक आरोग्य जोपासण्यासाठी ऑगस्ट 2011 मध्ये ‘भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरणा’ची (FSSAI) स्थापना करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे असून या प्राधिकरणाअंतर्गत 5 प्रादेशिक कार्यालये आणि 78 प्रयोगशाळा काम करतात. जाणून घेऊया भारतातील या महत्त्वपूर्ण संस्थेविषयी...”

अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा, 2006 नुसार ‘भारतीय अन्नसुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरणा’ची (The Food Safety and Standards Authority of India - FSSAI) स्थापना करण्यात आली. विविध मंत्रालये आणि विभागांकडून वेगवेगळे कायदे आणि आदेशांनुसार अन्नाशी संबंधित जे जे मुद्दे हाताळले जात होते, ते सर्व मुद्दे आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदींचे एकत्रीकरण या प्राधिकरणाअंतर्गत करण्यात आले.

अन्नपदार्थांना विज्ञानाधिष्ठित मानांकने लागू करणे, अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री व आयात या घटकांचे नियमन करणे, तसेच खाण्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न उपलब्धीची हमी देणे यासाठी ‘भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरणा’ची निर्मिती करण्यात आली. ‘अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायद्या’च्या अंमलबजावणीचे प्रशासकीय मंत्रालय म्हणून भारत सरकारचे ‘आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय’ कामकाज पाहते.

केंद्र सरकारद्वारे पदार्थ विज्ञानाचे ज्ञान असणारी प्रसिद्ध व्यक्ती किंवा केंद्रीय सचिवापेक्षा कमी पद नसणार्‍या व्यक्तीची प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. ‘अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा, 2006’अंतर्गत ‘भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरणा’स खालील कार्ये करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत

‘भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरणा’चे अधिकार

  • अन्नपदार्थांशी संबंधित मानांकने आणि मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यासाठी नियंत्रणाची चौकट आखणे आणि त्यानुसार अधिसूचना काढण्यात आलेल्या विविध मानांकनांची अंमलबजावणी करण्यासाठी खास यंत्रणेचा निर्देश करणे.
  • अन्न व्यवसायांसाठी अन्न सुरक्षितता व्यवस्थापन यंत्रणांचे प्रमाणीकरण करणार्‍या प्रमाणीकरण मंडळांच्या अधिस्वीकृतीची प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वे घालून देणे.
  • प्रयोगशाळांच्या अधिस्वीकृतीच्या प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आणि अधिस्वीकृत प्रयोगशाळांची अधिसूचना काढणे.
  • अन्न सुरक्षितता आणि आहार यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या क्षेत्रांविषयीचे धोरण आणि नियम तयार करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांना शास्त्रशुद्ध सल्ला आणि तांत्रिक पाठबळ पुरवणे.
  • खाल्ले जाणारे अन्न, अन्नातील दूषित घटक, अन्न उत्पादनात आढळणारे विविध दूषित घटकांचे अंश, धोक्यांची लागण आणि फैलावासह संभाव्य धोके ओळखणे आणि जलदगती दक्षता यंत्रणा उभारणे या सर्व बाबींसंदर्भातील माहिती गोळा करणे आणि ती काळजीपूर्वक पडताळून पाहणे.
  • जनता, ग्राहक, पंचायती इत्यादींना अन्न सुरक्षितता आणि तिच्याशी संबंधित मुद्द्यांची विश्‍वासार्हता आणि नेमकी माहिती जलद गतीने मिळण्यासाठी देशभर माहितीच्या जाळ्याची उभारणी करणे.
  • अन्न व्यवसायांमध्ये असलेल्या किंवा त्या व्यवसायात उतरण्याची इच्छा असलेल्या लोकांना प्रशिक्षण कार्यक्रमांची सुविधा पुरवणे.
  • अन्न, सांडपाणी आणि कृषी उत्पादनात कसलेही विषारी अंश नसण्याबाबतची मानके (फायटो-सॅनिटरी) या विषयीच्या आंतरराष्ट्रीय तांत्रिक मानांकनांच्या विकसनामध्ये सहभाग देणे.
  • अन्न सुरक्षितता आणि अन्न मानांकनांविषयी सर्वसामान्य जागृतीला प्रोत्साहन देणे.

 

स्त्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate