অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रुग्णालय


रुग्णाच्या रोगाचे निदान करणे आणि त्यावर वैद्यकीय व शस्त्रक्रियात्मक उपचार करणे यांसाठी उभारलेली, योग्य कर्मचारी वर्गाची व साधनसामग्रीची तरतूद असलेली संस्था म्हणजे रुग्णालय होय. रुग्णालयात उपचार काळात काही रुग्णांची निवासाची सोय करणे आवश्यक असते. आरोग्य तपासणी व प्रसूती यांसारख्या आरोग्य व शारीरिक स्वास्थ टिकविण्याशी संबंधित असलेल्या बाबींचीही रुग्णालयात व्यवस्था असावी लागते. जेथे रुग्ण प्रत्येक भेटीनंतर घरी परत जातो असे चिकित्सालय वा दवाखाना यांच्यात व रुग्णालयात फरक करणे जरूरीचे आहे. त्याचप्रमाणे वृद्धदुखण्यातून उठलेले रुग्ण गरीब व्यक्ती यांच्याकरिता चालविण्यात येणारा व वैद्यकीय सेवा थोडी वा मुळीच पुरविली जात नाही असा आश्रम आणि रुग्णालय यांत भेद करणे आवश्यक आहे.

रुग्णालयाचा इंग्रजी प्रतिशब्द ‘हॉस्पिटल’ हा लॅटिन भाषेतील hospitium (याचा अर्थ जिथे पाहुण्यांचे वा अतिथींचे स्वागत होते अशी जागा) या शब्दावरून व hospitalis या विशेषणावरून आलेला आहे. हॉस्पिस, हॉपिताल, हॉटेल,स्पिटल व होस्टेल ही संबंधित शब्दरूपे आहेत. आधुनिक इंग्रजी भाषेत हॉस्पिटल हा शब्द ‘घर’ (होम) असे सूचित करण्यावर भर देण्यात येतो. हॉटेल हा शब्द पथिकाश्रम वा खानावळ या अर्थआने वापरला जातो. फ्रेंच भाषेतील‘हॉतेल द्यू’ ही संज्ञा मात्र सार्वजनिक रुग्णालय या अर्थाने वापरली जाते.

अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपावेतो रुग्णालय ही सामान्यतः कारागृहापेक्षा थोडीशी बरी अशी जागा होती आणि कित्येकांना मृत्युगृहाइतकी त्याची भीती वाटत असे. विसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास अतिप्रगत वैद्यकीय तंत्रे वापरून रुग्णांची शक्य तेवढी उत्तम परिचर्या करणारी रुग्णालये ही जटिल संस्था बनली आहेत.

बरीचशी रुग्णालये आता तिहेरी कार्य करतात

  1. रुग्णांचे संगोपन करण्यात वैद्यकीय व्यवसायाला मदत व पाठबळ देणे;
  2. आरोग्य सेवा व्यवसायांत प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे;
  3. रोगाचे कारण व त्यावरील उपाय शोधण्यासाठी वैद्यकीय संशोधनाच्या सुविधा पुरविणे. अशा प्रकारे वैद्यकीय संगोपन, अध्यापन व संशोधन ही तीन कार्ये रुग्णालयाची मूलभूत तत्त्वे बनलेली आहेत.

इतिहास

रुग्णाची काळजी घेणे ही समाजजीवनातील एक मूलभूत गरज आहे सर्व समाजांत आजारपणाला तोंड देण्याकरिता काही ना काही व्यवस्था अस्तित्वात असल्याचे आढळते. ही मूलभूत गरज असल्याचे आढळते. ही मूलभूत गरज असल्याचे तिचा लोकांच्या सामाजिक व आर्थिक विकासाशी नेहमीच जवळचा संबंध जोडलेला गेलेला आहे. मानवाने जेव्हा प्रथम समाजव्यवस्था स्थापन केली तेव्हाच रुग्णांच्या एकत्रीकरणाकरिता व त्यांची काळजी घेण्यासाठी व्यवस्था असलेल्या जागा उभारण्यात आल्याचा काही पुरावा अस्तित्वात आहे. वैद्यकीय उपचारांचा नेहमी धार्मिक सेवेशी संबंध जोडण्यात आलेला आहे. प्रारंभीचे धर्मगुरू वैद्याचे वा औषधे देणाऱ्या माणसाचेही काम करीत असत. इ.स.पू. ४,००० इतक्या जुन्या काळात ख्रिश्चनपूर्व धर्मात काही देवदेवतांचा रोगमुक्तीशी संबंध असल्याचे मानले जात होते. सॅटर्न, ॲस्क्लेपिअस वा हायजिया या देवतांची मंदिरे वैद्यकीय शाळा व उपचाराखलील किंवा निरीक्षणाखालील रुग्णांसाठी विश्रांतिस्थाने म्हणून वापरली जात. ग्रीस, ईजिप्त, बॉबिलोनिया व भारतातही अशी मंदिरे अस्तित्वात होती, असे ऐतिहासिक नोंदीवरून दिसून येते.

देशव्यापी रुग्णालयांची व्यवस्था असलेला भारत हा पहिलाच देश असावा इ.स. ४०२ च्या सुमारास फाहियान या चिनी प्रवाशांनी भारताला भेट दिली व येथे अनेक ठिकाणी रुग्णालये आढळल्याचे त्यांनी नमूद केले आहे. श्रीलंकेतून इ. स. पू. ४३२ च्या सुमारास रुग्णालये होती असे निश्चितपणे माहित आहे व त्याहीपूर्वी बुद्ध काळात भारतात रुग्णालये होती असे निश्चितपणे माहित आहे व त्याहीपूर्वी बुद्ध काळात भारतात रुग्णालये स्थापन करण्यात आलेली होती. सम्राट अशोक (इ.स. पू. तिसरे शतक) यांनी बांधलेल्या १८ रुग्णालयांत आधुनिक रुग्णालयांसारखी काही लक्षणे आढळतात. या रुग्णालयात आधुनिक रुग्णालयांसारखी काही लक्षणे आढळतात. या रुग्णालयात स्वच्छतेवर भर देण्यात येई. रुग्णांवर दयाबुद्धीने उपचार करण्यात येत व आहार चिकित्सा प्रचारात होती.

ख्रिस्ती धर्माच्या आरंभामुळे रुग्णालयांच्या स्थापनेस मोठी चालना मिळाली व रुग्णालये ही चर्च संघटनेची अभिन्न भाग बनली. इ. स. ३३५ मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टंटीन यांनी काढलेल्या हुकूमनाम्यानुसार रोम, कॉन्स्टँटिनोपल, एफेसस व रोमन साम्राज्यातील इतर भागांत रुग्णालये विकसित करण्यात आली. इ.स. ३६९ मध्ये सीझारीआ येथे सेंट बेसिल यांनी रुग्णालय स्थापन केले. रोममध्ये पश्चिम युरोपातील पहिल्या सार्वजनिक धर्मादाय रुग्णालयाची स्थापना फॅबिओला या ख्रिश्चन स्त्रीने चौथ्या शतकात केली. या शतकापावेतो रोमन साम्राज्यातील ख्रिश्चन चर्च सदस्यांनी कुष्ठ रोगी, अपंग, अंध आणि गरीब यांच्याशी रुग्णालये स्थापन केली होती.

फ्रान्समधील लीआँ येथील हॉतेल द्यू ५४२ साली व पॅरिस येथील हॉतेल द्यू ६६० मध्ये सुरू झाले. या रुग्णालयांत रुग्णांच्या शारीरिक व्याधी बऱ्या करण्यापेक्षा त्यांच्या आत्म्याच्या कल्याणाकडे अधिक लक्ष दिले जाई. मठवासी त्यांच्यातील आजाऱ्याची ज्या प्रकारे काळजी घेत तो अनभिज्ञ लोकांपुढे आदर्श निर्माण झाला. मठांमध्ये रुग्णशाळा असे व तेथे रुग्णांना उपचारासाठी नेण्यात येई. मठात औषधालय व बऱ्याचदा औषधी वनस्पितयुक्त बाग असे. मठांनी तेथील आजारी मठवासीयांखेरीज यात्रेकरू व इतर प्रवाशांसाठीही आपले दरवाजे खुले ठेवले होते. आठव्या ते बाराव्या शतकापर्यंत या मठ संस्थाच यूरोपातील रुग्णालीय सेवा पुरविणाऱ्या एकमेव संस्था होत्या.

रुग्णांकरिता सामाजिक मदतीची कल्पना मध्ययुगीन काळात उत्तम प्रकारे रुजली होती. पाश्चिमात्य ख्रिश्चन देशांतून ही कल्पना जेवढी प्रबळ होती तेवढीच पौर्वात्य मुसलमानी देशांतही होती. स्पेन, उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया या भागांत अरबी साम्राच्यातील ३४ रुग्णालये होती. त्यांपैकी दमास्कम (११६०) व कैरो (१२७६) येथील रुग्णालये सर्वांत मोठी व उत्तम व्यवस्था असलेली होती. कैरो येथील रुग्णालये सर्वांत मोठी व उत्तम व्यवस्था असलेली होती. कैरो येथील रुग्णालयात ज्वर रुग्ण, जखमी रुग्ण, नेत्ररोगाचे रुग्ण यांच्याकरिता व महत्त्वाच्या रोगांकरिता स्वतंत्र विभाग होते. तेथे पुरुष व स्त्री परिचारिकाही काम करीत. यांशिवाय व्याख्यानासाठी खोल्या, मोठे ग्रंथालय, स्वयंपाकगृहे, अनाथ अर्भकगृह व प्रार्थनागृह यांचीही व्यवस्था होती. ही बहुतेक रुग्णालये ख्रिश्चन धर्मीयांनी सुरू केलेली होती. मुसलमानांनी तो तो प्रदेश पादाक्रांत केल्यामुळे तो ताब्यात घेऊन नंतर त्यात अधिक सुधारणा केल्या.

मध्ययुगात रुग्णालयांच्या स्थापनेतही धार्मिक प्रभावाचे वर्चस्व चालूच राहिले. अकरव्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेल्या धर्मयुद्धाच्या (क्रूसेड्‌सच्या) काळात रुग्णालयांच्या स्थापनेचा वेग वाढला. धर्मयोद्धयांचा पराभव होण्यास शत्रूपेक्षा साथीचे व इतर रोग अधिक कारणीभूत ठरले. वाहतुकीच्या मार्गावर लष्करी रुग्णालये स्थापन झाली. सेंट जॉन पंथाच्या नाइटस हॉस्पिटॅलर्स या गटाने पवित्र भूमीत (पॅलेस्टाइनमध्ये) २,००० रुग्णांची सोय असलेले रुग्णालय स्थापन केले. मध्ययुगीन काळात वैद्य व शस्त्रक्रियाविशारद यांचे कार्यक्षेत्र रुग्णालयांपासून अलगच होते ११३३ मध्ये लंडन येथे सेंट बार्‌थॉलोम्यू रुग्णालय स्थापन झाले. त्या वेळीही वैद्य, औषधे तयार करून विकणारे व शस्त्रक्रियाविशारद आपापल्या घरी वा कार्यालयात आपला व्यवसाय करीत.

अगदी अनाथ व मरणोन्मुख रुग्णालयाचा आश्रय घेत. प्रबोधन काळात (सोळाव्या-सतराव्या शतकांत) रोगमुक्तीतील वैज्ञानिक बाजूवर भर देण्यात आला. धर्मसुधारणेच्या काळात (सोळाव्या शतकात) आठव्या हेन्रींनी लंडनच्या सेंट बार्‌थॉलोम्यू रुग्णालयाला वर्षांसन नेमून दिल्यावर रुग्णालयांना धर्मातीत आधार मिळण्यास प्रारंभ झाला. मध्ययुगीन काळात बहुतेक सर्व रुग्णालये मठांशी संलग्न होती व फारच थोडी शहरवासियांनी बांधलेली होती. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस लंडन वगळता इंग्लंडमध्ये इतरत्र एकही रुग्णालय नव्हते. १७१९ मध्ये काही शहरवासी व वैद्य यांनी मिळून धर्मादाय संस्था स्थापन करून वेस्टमिन्स्टर रुग्णालयाचा प्रारंभ केला. त्यानंतर गाय (१७२४), सेंट जॉर्ज (१७३३), लंडन (१७४०) वगैरे लंडनमधील बहुतेक मोठी सर्वसाधारण रुग्णालये १७६० पर्यंत स्थापन झाली.

अठराव्या शतकात मिडलसेक्स रुग्णालय देवीच्या रुग्णांसाठी, लॉक रुग्णालय गुप्तरोगांसाठी, सेंट ल्युक रुग्णालय मानसिक रोगांसाठी विशेष रुग्णालये स्थापन झाली. या नव्या विचारसरणीचा ब्रिटनमधील इतर भागांतही प्रसार झाला. अठरव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटनमधील बहुतेक लहानमोठ्या शहरांत रुग्णालये निघालेली होती. ब्रिटनबरोबर यूरोपातही रुग्णालयांची वाढ झाली. १८३० मध्ये एकट्या पॅरिसमध्ये ३० रुग्णालये होती व त्यांत २०,००० रुग्णशय्या होत्या. हॉतेल द्यू या सर्वांत जुन्या रुग्णालयात १,००० रुग्णशय्या होत्या. जर्मन भाषिक प्रदेशांतही रुग्णालयांची संख्या वाढली. यूरोपातील खंडीय भागातील बहुतेक रुग्णालये सरकारी मालकीची होती.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate