অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोकसंख्या आणि आरोग्य

लोकसंख्या आणि आरोग्य

लोकसंख्या आणि आरोग्य

1. 2005 साली भारत देशाची लोकसंख्या सुमारे 110 कोटी होती. भारताकडे जगातील फक्त 2.5% जमीन असून दर चौरस कि.मी मध्ये भारतात सरासरी 334 माणसे राहतात. भारतात एकूण 593 जिल्हे आहेत.

2. भारतातले दरडोई उत्पन्न दरवर्षी 720 डॉलर्स असून नॉर्वे देशात ते 60000 डॉलर्स म्हणजे भारताच्या सुमारे 80 पट आहे. दक्षिण आशियात देखील थायलंड या देशात भारताच्या चौपट दरडोई उत्पन्न आहे. देशातली 35% जनता दारिद्रय रेषेखाली असून त्यांचे उत्पन्न दिवसाला 50 रु. पेक्षा कमी आहे. याउलट मालदिव या छोटयाशा देशात अशी गरिबी 1% ही नाही. भारतात 15 वर्षावरील जनतेत साक्षरतेचे प्रमाण फक्त 61% आहे तर दक्षिण कोरीयात ते 100% आहे. प्राथमिक शिक्षणात95% मुलांची पटनोंदणी असून दक्षिण कोरियात ती 100% आढळते. मानव विकास निर्देशांक भारतात 0.6 आहे तर थायलंडमध्ये तो 0.8 इतका आहे. स्त्रियांच्या बाबतीत भारतातला विकास निर्देशांक थायलंडच्या मानाने कमीच आहे. भारतात28% जनता शहरांमध्ये राहते. 72 % जनता खेडयांमध्ये रहात आहे.

3. भारतात दर हजारी पुरुष लोकसंख्येस 933 स्त्रिया आहेत. म्हणजेच स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. 15 वर्षापेक्षा लहान मुलांचे प्रमाण भारतीय लोकसंख्येत 35% आहे म्हणजेच भारताचे सरासरी वयोमान कमी भरते. 60 वर्षावरील वृध्द व्यक्तींची संख्या भारतात 8% असून जपानमध्ये ती 26% तर कोरीयामध्ये 12% इतकी आहे. याचाच अर्थ भारतातील लोकसंख्या तुलनेने जास्त तरुण आहे हे चांगले आहे.

4. भारतातला जन्मदर सुमारे दर हजारी 24 असून जर्मनीमध्ये तो केवळ 8 तर थायलंडमध्ये 13च्या आसपास आहे. भारतीय स्त्रीला सरासरी 2.7 मुले होतात तर न्यूक्रेन देशात फक्त 1 तर थायलंड मध्ये 1.6 इतका कमी प्रजनन दर आहे. याचाच अर्थ भारतीय लोकसंख्या अजूनही वाढती आहे. भारतात संततीप्रतिबंधक साधने वापरण्याचे प्रमाणे फक्त 56% आहे. यात शस्त्रक्रिया आणि तात्पुरती साधने ही दोन्ही धरलेली आहेत.

5. भारतात दरहजारी मृत्यूप्रमाण 7.6 असून अरब अमीरातीत ते केवळ 1 आणि मालदीव मध्ये फक्त 3 आहे.

6. भारतात कुपोषणाचे प्रमाण खूप आहे. अल्पवजनी मुलांचे प्रमाण 46% असून ते 2015 पर्यत ते 27% इतके खाली आणायचे आहे.

7. भारतातला अर्भक मृत्यूदर दर 1000जन्मामागे 57 (श्रीलंकेत 11) असून आपल्याला सहस्त्रक उद्दिष्टांप्रमाणे तो2015 पर्यत तो 27 इतका खाली आणायचा आहे. पाच वर्षापेक्षा लहान बालकांच्या मृत्यूचे प्रमाण दर हजार जन्मांमागे भारतात 85 असून ते 2015पर्यंत आपल्याला निम्म्याने कमी करायचे आहे. श्रीलंकेत हे प्रमाण 16 तर मालदीवमध्ये फक्त 3 इतके कमी आहे.

8. गोवर लसीकरणाचा दर हा एकूण लसीकरणाचा एक चांगला निर्देशांक आहे. भारतातील बालकांमध्ये हे प्रमाण फक्त 60% इतके असून आपल्याला 2015 पर्यंत ते 90% च्या वर न्यायचे आहे.

9. भारतातील माता मृत्यूदर दर हजार जन्मांमागे 3 इतका असून 2015 पर्यंत आपल्याला तो 1 च्या खाली आणायचा आहे. यासाठी सुरक्षित प्रसूतींचे प्रमाण सध्या 54% आहे ते 84% पर्यंत वाढवावे लागेल. आपल्या शेजारच्या श्रीलंका देशात हजारी मातामृत्यूदर 0.24 इतका आहे. तर थायलंडमध्ये हा दर फक्त 0.14 इतका आहे.

10. एच.आय.व्ही. चे प्रमाण (15 ते 50 वयोगट) भारतात दर लाख लोकसंख्येस 900इतके आहे. हिवताप - मलेरियाचे प्रमाण दर लाख आजारसंभव लोकसंख्येस 169इतके आहे. तर टीबी -क्षयरोगाचे प्रमाण 312 इतके आहे'

11. भारतात सुधारीत - सुरक्षित पाणीपुरवठा असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण 2001 मध्ये85% इतके होते. मात्र आमच्या मते हा आकडा विश्वासार्ह नाही कारण अनेक खेडयांमध्ये पाण्याची टंचाई असते आणि भूजल प्रदूषित असते.

12. भारतामध्ये स्वच्छताविषयक सोयी सर्वसाधारणपणे 52% सर्वसाधारण जनतेस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात हेच प्रमाण फक्त 32% आहे. भारतात शहरी भागातही हे प्रमाण फक्त 63% आढळते.

13. भारतात 23% बालके 2.5किलो पेक्षा कमी वजनाची जन्मतात तर या विभागात इंडोनेशियात ते सर्वात कमी म्हणजे 6% आहे. 3 वर्षापेक्षा लहान बालकांमध्ये उंची खुरटलेल्या मुलांचे प्रमाण भारतात 38% आहे तर श्रीलंकेत ते फक्त 14% आहे. सर्व जगात क्रोएशिया देशात याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 1% आहे.

14. भारतात दोन वर्षांनंतरही स्तनपान चालू असलेल्या बालकांचे प्रमाण 66% आहे. 6महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान मिळणा-या बालकांचे प्रमाण - 37% एवढेच आहे.

15. तीन वर्षाखालील बालकांमधले अल्पवजनी बालकांचे प्रमाण भारतात 46% तर थायलंडमध्ये ते 9% इतके कमी आहे. सर्व जगात का्रेएशिया,आणि युक्रेन देशांत ते फक्त 1% इतके कमी आहे.

16. भारतात बालकांच्या आजारांचे प्रमाण बरेच आहे. दर हजारी लोकसंख्येत भारतात 9बालकांना अतिसार, आणि 22 मुलांना न्यूमोनिया होतो. भारतातील 6-35 महिने वयोगटातील दर 1000 बालकांमध्ये 792 बालकांना रक्तपांढरीचा आजार असतो.

17. नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण भारतात दर हजार जिवंत जन्मांमागे 37 असून सिंगापूर देशात ते फक्त 1 तर मालदीवमध्ये 8 इतके कमी आहे. याचाच अर्थ असा की भारतामध्ये बाळंतपणाच्या वेळी योग्य सेवा मिळत नाही. एकूणच भारत हा प्रजनन आरोग्याच्या बाबतीत अत्यंत मागास देश आहे यात शंका नाही.

18. सरासरी अपेक्षित आयुर्मान भारतामध्ये फक्त 65 असून जपानमध्ये ते 82 तर मालदीव व श्रीलंका या देशात ते 73 इतके चांगले आहे. याचा अर्थ असा की या प्रगत देशात मृत्यूदर कमी आहे. भारतात एकूण मृत्यूंपैकी 24% मृत्यू हे बालमृत्यू असतात (5 वर्षाखालील बालकांमध्ये) हेच प्रमाण थायलंडमध्ये फक्त 4%इतके आहे.

भारतात काही महत्त्वाच्या आजारांचे दर लाखास प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. टीबी -क्षयरोग (79), मलेरिया (29), हत्तीरोग (आजारसंभव लोकसंख्येत 239) कुष्ठरोग (13),एच.आय.व्ही. (15 ते 50 वयोगटात910), हृदयविकार व रक्त वाहिन्यांचे विकार (3422), मधुमेह (2792), कर्करोग (19) अंधत्व (1120- मुख्यत्वे मोतीबिंदू)

19. निरनिराळया सांसर्गिक आजारांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण पाहता भारतात टी.बी.,न्यूमोनिया, अतिसार, कावीळ आणि टायफाईड हे सांसर्गिक आजार मुख्य दिसतात. दर लाख लोकसंख्येत टी.बी मुळे 33 व्यक्ती मरण पावतात तर कॅन्सर मुळे 49मरण पावतात. मात्र हे प्रमाण हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांच्या बाबतीत सर्वात जास्त असून दर लाख लोकसंख्येत 188 व्यक्ती केवळ या एका कारणाने दगावतात.

20. एकूण मृत्यूंच्या हिशेबात 53% मृत्यू हे असांसर्गिक आजारांमुळे होतात. (हृदयविकार आणि कर्करोग). टी.बी-क्षयरोगामुळे या तुलनेत फक्त 4% मृत्यू होतात. तसेच पक्षाघात (मेंदूतील रक्ताची गाठ किंवा रक्तस्त्राव) मुळे यातील 7% मृत्यू होतात असे दिसते.

21. अपेक्षित आयुर्मान :पुरुष 67 वर्ष, स्त्रिया 72 वर्ष, सरासरी 70 वर्ष

22. आयोडीनयुक्त मीठ मिळणा-या कुटुंबांचे प्रमाण 50%.

23. धूम्रपानाचे प्रमाण - पुरुष 47%, स्त्रिया 17%

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate