অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मालेगावचा ‘आपला दवाखाना’

मालेगावचा ‘आपला दवाखाना’

स्वतःच्या नावाची कुठेही प्रसिद्धी न करता चार-सहा लोकांनी एकत्र येवून लोकांनी, लोकांसाठी चालवलेला मालेगावचा ‘आपला दवाखाना’. सार्‍याजणीच्या या खबरलहरियातून गावोगावच्या अनेक लोकांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.

काही शब्द आयुष्यात आपण पहिल्यांदा ऐकतो. त्या शब्दांचा अर्थही पटकन समजत नाही, पण त्यातील वैचित्र्य जाणवत राहतं. काही वेळा अर्थ समजत नसला तरी त्या शब्दाची भीती वाटावी, असा अनुभव आपण घेत असतो. सहा वर्षांपूर्वी मालेगावी ‘चिकन गुनिया’ नावाचा आजार संबंध गावभर पसरला.

दोनतीन दिवस ताप आणि पुढील दोन-तीन दिवस शरीरातील प्रत्येक हाडामध्ये कमालीच्या वेदना, ही या चिकन गुनियाची अवलक्षणं आणि वैशिष्ट्य! आता मुळात ‘चिकन गुनिया’ हा शब्दसमूह डॉक्टरी पेशातल्या लोकांशिवाय सर्वसामान्यांना माहीत असायचं काही कारण नाही आणि गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्रात कुठे ‘चिकन गुनिया’ची साथ आल्याचंही ऐकिवात नाही. त्यामुळे ‘चिकन गुनिया’ लोकांना होतोय हे ऐकणं-समजणं त्यावेळी विचित्र वाटायचं.

पण मग प्रत्येक घरात एक रुग्ण चिकन गुनियाने बिछान्यावर पडला आणि शहरवासीय भविष्यात ‘चिकन गुनिया’ हा शब्द आणि त्यातील अर्थ कधी विसरणार नाहीत अशी परिस्थिती मालेगावकरांची होऊन गेली. बरं हा या चिकन गुनियावर ऍलोपॅथीमध्ये जालीम उपाय उपलब्ध नाहीत. त्यामुळे स्थानिक डॉक्टरांनी काही तरी वेदनाशामके द्यायची,

समाधानासाठी इंजक्शन टोचायचं, पेशंटच्या मागणीवरून सलाईन लावायची, असं सगळं चाललं होतं. डॉक्टर्सकडे रुग्णांच्या अक्षरशः रांगा लागायच्या. झोपडपट्टीत राहणार्‍या, तळागाळातल्या लोकांसाठी ‘चिकन गुनिया’ हा आजार भयंकर होऊन बसला. औषध-इंजक्शनला पैसे नाहीत, कामावर जाणं अजिबात शक्य नाही आणि रोज पोटाची खळगी तर भरली पाहिजेच. अशा परिस्थितीत त्याच वर्षी मालेगावच्या कॅम्प भागात सुरू झालेला ‘आपला दवाखाना’ लोकांसाठी ‘मसिहा’ बनून आला.

‘चिकन गुनिया’चे शेकडो रुग्ण ‘आपला दवाखाना’मध्ये त्या महिन्या-दोन महिन्याचा कालखंड उपचार घेऊन गेले. पैशांची गरज नव्हती, मेडिकल स्टोअर्समध्ये जाण्याची गरज नव्हती. सरळ यावं उपलब्ध डॉक्टरला दुखणं दाखवावं, औषध-इंजेक्शन्स घ्यावीत. सुट्या गोळ्या, ज्या ङ्गॅमिली डॉक्टरांकडे दिल्या जातात, त्या तर दिल्या जात होत्याच, पण बाहेरच्या मेडिकल स्टोअर्समध्ये वेष्टनामध्ये असणार्‍या प्रथम दर्जाच्या सर्व प्रकारच्या गोळ्या रुग्णाला उपलब्ध करून दिल्या जात.

रात्री बारा-बारा वाजेपर्यंत पेशंटची गर्दी असायची आणि अखेरचा रुग्ण तपासल्याशिवाय ‘आपला दवाखाना’ कधी बंद होत नसे. बरं ‘ङ्गी’चं काय? तर ते ऐच्छिक! स्टीलचा डबा ठेवलेला. तुम्हाला पेलवेल, शक्य होईल तेवढे पैसे डब्यात टाका, किती टाकले हे कोणी बघणार नाही, एवढेच का टाकले? म्हणून कोणी विचारणार नाही, कमी टाकले म्हणून औषधे कमी दिली, कमी दर्जाची दिली असंही नाही. एक अत्यंत आगळावेगळा, समाजसेवेचा उपक्रम ‘आपला दवाखाना’च्या रूपानं मालेगावी सुरू झाला.

या ‘आपला दवाखाना’च्या प्रारंभीची कथाही अशीच विलक्षण आहे. कोईमतूर हे भारतातील एक सुप्रसिद्ध शहर! या शहरामध्ये वास्तव्य करीत असलेल्या एका सत्पुरुषाने एकेदिवशी लग्नसमारंभाच्या नंतर कार्यालयाबाहेर पडलेल्या पत्रावळीत उष्टे खाणार्‍या भिकारी-गोरगरीब लोकांना पाहिले.

कुत्री-डुकरे आणि हे उपाशी लोक एकाच ‘पंक्तीत’ अन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. त्या सत्पुरुषाच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. भारतीय समाजव्यवस्थेत असणारी ही हृदयद्रावक विषमता त्याला काही स्वस्थ बसू देईना. आणि त्यातून निघाले ‘अन्नलक्ष्मी भोजनालय’! या भोजनालयाचे वैशिष्ट्य असे, तुम्ही हवे ते खा आणि तुमच्या खिशाला परवडेल, शक्य होईल तेवढे पैसे दानपेटीत टाका. तुमचे बिल सातशे रुपये झाले आहे आणि तुम्हाला तीनशेच देणं शक्य आहे, काही हरकत नाही. तीनशे टाका आणि घरी जा. कोणी तुम्हाला विचारणार नाही, कमी का टाकले म्हणून?

‘अन्नलक्ष्मी’ हा उपक्रम तिथे कमालीचा लोकप्रिय झाला. केवळ गोरगरीब, सर्वसामान्यच तेथे येऊन खाण्याचा आनंद घेऊ लागले असे नाही; तर श्रीमंत लोकही तिथे येऊ लागले. उपक्रमाचे माहात्म्य लोकांना समजले होते. त्यामुळे एक वर्ग शक्य नसल्यामुळे पैसे कमी टाकत होता किंवा टाकत नव्हता आणि दुसरा वर्ग शक्य असल्यामुळे घेतलेल्या अन्नपदार्थाच्या किमतीपेक्षा दुप्पट-तिप्पट-चारपट-पाचपट असे दान करीत होता.

आज ‘अन्नलक्ष्मी’मध्ये सेवा देण्यासाठी शहरातील मोठमोठे लोक, ज्यामध्ये सी. ए., वकील, डॉक्टर्स, मोठाले व्यापारी असे नंबर लावून असतात. कोणी वेटर, कोणी स्वयंपाक्याच्या हाताखाली मदतनीस, कोणी काही, कोणी काही असे काम ठरलेल्या दिवशी येऊन करतात. लोक खाण्याचा आनंद घेतात आणि कामाचाही घेतात. ‘अन्नलक्ष्मी’ अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.

या उपक्रमाविषयीची माहिती आपला दवाखाना स्थापन करणार्‍या लोकांच्या वाचनात आली. शिवाय इगतपुरीच्या विपश्यना शिबिरांमध्येही शिबिरांची ङ्गी घेतली जात नाही, दानपेटीमध्ये शक्य असेल तर दान टाकावे अशी अपेक्षा असते, याचादेखील अनुभव त्यांनी घेतला होता. या दोन्ही ठिकाणी देऊ केलेली सेवा किती अनमोल आहे, हे लक्षात घेऊन आपणही असेच काही तरी सुरू करावे हा ध्यास मनात रुजला. त्यातून मालेगावी कशाची गरज आहे, याचा अभ्यास सुरू झाला. तेव्हा लक्षात आलं, की अगदी साधं थंडीतापाचं मलेरिया-फ्ल्यू यासारखं दुखणं असलं तरी गवंडी-शेतमजूर-बिगारी-टेलर-मिस्तरी-भांडेवाल्या-घरकाम करणार्‍या बायका यासारख्या अत्यंत सामान्य परिस्थितीत जगणार्‍या समाजातल्या खूप मोठ्या वर्गाला हे दुखणं आर्थिकदृष्ट्या पेलवत नाही.

दोन-तीन इंजेक्शन, गोळ्या-औषध असं सर्व मिळून येणारं बिल हे त्याच्या आवाक्याबाहेर असतं. बरं, या वर्गातील प्रत्येक घटकाला बिछान्यावर पडणं, विश्रांती घेणं पोटाच्या मागणीपुढे शक्यच नसतं. अशा वर्गासाठी काहीही वैद्यकीय सेवा आपण उपलब्ध करून द्यावी असं अभ्यासाअंती ठरलं. बस्! तयारी सुरू झाली. भाड्याची जागा, औषधं-गोळ्या-प्राथमिक उपचार करण्यासाठी लागणारी उपकरणं आणि मुख्य म्हणजे डॉक्टर!

‘आपला दवाखाना’च्या कर्त्याधर्त्यांमध्ये कोणीच डॉक्टर नव्हतं. मग अशा डॉक्टरचा शोध सुरू झाला आणि संपलाही. एक चांगला डॉक्टर सापडला. लवकरच आषाढी एकादशी होती. महाराष्ट्राचं लाडकं लोकदैवत पंढरीचा राणा अर्थात श्रीविठ्ठल! खरं तर सर्वसामान्य मराठी माणसाचे नतमस्तक होण्याचे एकमेव परमपावन ठिकाण म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाची पावलं!

आपला दवाखानाही असाच सर्वसामान्यांसाठी असणारा उपक्रम! मग आषाढी एकादशीपेक्षा अधिक योग्य आणि चांगला मुहूर्त दुसरा कोणता असणार? अशाच एका आषाढी एकादशीला ‘आपला दवाखाना’ या समर्पक शीर्षकाने मालेगावी एक अत्यंत आगळावेगळा समाजसेवी प्रकल्प सुरू झाला, जो आज अत्यंत धडाक्याने सुरू आहे. सर्वांना स्वतःचा वाटावा, ज्याचे ब्रीदवाक्य आहे, ‘लोकांचा लोकांनी, लोकांसाठी चालविलेला’ असा हा ‘आपला दवाखाना’! अत्यंत समर्पक नाव असलेला! दवाखाना सुरू करताना एक गोष्ट नक्की ठरली होती, या दवाखान्यात कोणाकडून उपचाराचे मूल्य कदापि मागण्यात येणार नाही. येणार्‍या रुग्णाला कितीही रुपयांचे औषध-गोळ्या लागल्या तरीही त्याला त्याची जाणीव करून दिली जाणार नाही. दानपेटी ठेवली जाईल, शक्य असेल तेवढे पैसे रुग्णाने टाकावे वा शक्य नसतील तर टाकू नये. पैसे टाकणे ही त्याची ऐच्छिक गोष्ट असेल. परंतु पैसे नाही म्हणून उपचाराशिवाय कोणी येथून विन्मुख जाणार नाही याची खूणगाठ मनाशी बांधली गेली.

सहा वर्षांपूर्वी ‘आपला दवाखाना’ सुरू झाला त्या वेळी दवाखाना कसा चालेल? प्रतिसाद कसा मिळेल? लोक याचे स्वागत कसे करतील? पैशाचे काय? असे अनेक प्रश्‍न समोर उभे होते. आपला दवाखाना सुरू झाला आणि पुढे ‘चिकन गुनिया’ची भयकारी सामूहिक व्याधी मालेगावकरांवर येऊन कोसळली.

या व्याधीच्या वेळी ‘आपला दवाखाना’चा कॅम्प विभागात कमालीचा उपयोग झाला. पहिल्यांदा तर इंजेक्शन-गोळ्या, तपासणी या आपल्याकडे असणार्‍या रुपया-दोन रुपयात होऊ शकतात, ही गोष्टच लोकांना विश्वास ठेवण्यासारखी वाटत नव्हती. पण मग हळूहळू अशा प्रकारचा दवाखाना उघडण्यात आला आहे. त्यात खाजगी दवाखान्यासारखेच चांगले उपचार मिळतात, पैशाची बळजबरी नाही, याचा प्रचार आपोआप होत गेला आणि गर्दीचा विक्रम होऊ लागला. बाहेरच्या जगात किती दैन्यावस्था आहे, दारिद्य्र हे मरणापेक्षाही कसं दुःखकारक आहे याचा जिवंत प्रत्यय रोजच्या रोज येणार्‍या रुग्णांच्या अनुभवांवरून ‘आपला दवाखाना’च्या चालकांना येऊ लागला. आपला उपक्रम किती आवश्यक होता, तो समाजाला किती उपयुक्त ठरतोय हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा या कामाशी त्यांची एकरूपता अधिक वाढली.

पहिला महिना संपला. घरभाडं, लाईटबील, औषध-गोळ्या, डॉक्टरचं मानधन याचा एकूण आकडा आणि डब्यात रुग्णांकडून आलेली रक्कम याचा काडीचाही मेळ नव्हता. पण कामाचे महत्त्व वादातीत होते. काम सुरूच होते. पहिल्यांदा फक्त रात्रीची ओपीडी होती, ती आता दोन्ही वेळेस सुरू झाली.

‘आपला दवाखाना’ म्हणून काही तरी सुरू झालंय हे लोकांना समजू लागलं. त्यातून पन्नास-शंभर-दोनशे रुपये असे दान मिळू लागले. कोणी दिवसाला एक रुपया याप्रमाणे वार्षिक तीनशे पासष्ठ रुपये देऊ लागले. हे चांगलं आहे आणि चाललं पाहिजे मुख्य म्हणजे काम करणारे लोक प्रामाणिक आहेत, या गोष्टीवर लोकांचा विश्‍वास बसू लागला. ‘लोग आते गये, कारवॉं बनता गया’, बस् तसंच झालं. बघता बघता वर्ष उलटले. त्यातून ‘आपला दवाखाना’ची दुसरी शाखा अगदी तळागाळात राहणार्‍या लोकांच्याच वस्तीत सुरू झाली. तिथे नवीन जागा-नवीन डॉक्टर, सर्वच नवीन! पण योग जुळून आले आणि शाखा सुरू झाली. अल्पावधीत या शाखेनेही वेग धरला. खर्च आणि आवक याचा मेळ बसवता-बसवता नाकात दम येई, पण म्हणून उपक्रमाच्या कुठल्याही भागाला धक्का लागणे शक्यच नव्हते. त्यात काही शस्त्रक्रियेचे अनिवार्य रुग्ण असत. अशांची शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अल्प खर्चात सोय लावून देणे हे एक नवीनच काम सुरू करणं भाग पडलं.

बोलता बोलता दुसरे वर्षही पार पडलं. या काळात केवळ ‘जनरल प्रॅक्टीस’ ची सेवा पुरेशी ठरत नाही हे लक्षात आले. मग पुढच्या आषाढीला रोज एक तज्ज्ञ डॉक्टर ‘आपला दवाखाना’त येऊ लागला म्हणजे सोमवारी हृदयरोगतज्ज्ञ, मंगळवारी बालरोगतज्ज्ञ, असे सहाही दिवस तज्ज्ञ डॉक्टर येऊ लागले. आठवड्याचा त्यांचा वार झाला आणि कोणाला त्यांची सेवा इतर वारी हवी असली तर त्यांच्या कन्सल्टींगमध्ये जाऊन ‘आपला दवाखाना’ची खूण पटवून अल्प दरात सोय होऊ लागली.

चौथ्या वर्षी एक मोठ्ठं धाडस ‘आपला दवाखाना’ने केले. दंतोपचाराची एक शाखा उघडली गेली. दंतोपचार ही अत्यंत खर्चीक गोष्ट होऊन बसली आहे आणि त्यामुळे अनेक लोक हे उपचार घेऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर दंतोपचाराची शाखा उघडावी असं ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे प्रयत्न सुरू झाले. दातांच्या डॉक्टरांची खुर्ची मोठ्या रकमेची असते. बाकीही सारी अवजारं खरेदी करणं अवघडच होतं. पण अशाच प्रयत्नातून दंतोपचार शाखा सुरू झाली. लोकांसाठी हे एक मोठं वरदान ठरलं.

एकीकडे ‘आपला दवाखाना’चा व्याप वाढत होता. रुग्णसेवा वाढत होती. दुसरीकडे खर्च वाढत चालला होता. दाते मिळत होते. कोणी रोख स्वरूपात तर कोणी वस्तूस्वरूपात देत होते. यातून ‘आपला दवाखाना’चा जो व्यवहार होत होता तो सर्वांना कळावा, त्यात अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी ‘आपला दवाखाना’ने दर महिन्याला एक पानाचे पाठपोट छापलेले हिशेबपत्रक देण्यास प्रारंभ केला. हे हिशेबपत्रक केवळ हिशेब सांगण्यापुरते मर्यादित नव्हे तर ‘आपला दवाखाना’च्या मागील सामाजिक भावना लक्षात यावी.

कोणालाही विचार करायला लावेल असा मजकूर या हिशेबपत्रकाच्या एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला त्या महिन्याचा संपूर्ण लेखाजोखा. ज्यामध्ये कोणी डॉक्टरांनी किती पेशंट तपासले, मागच्या महिन्याची एकूण रुग्ण संख्या, आलेले पैसे, झालेला खर्च, ‘आपला दवाखाना’च्या नवीन घडामोडी, दात्यांच्या सुखदुःखाच्या बातम्या असं सारं काही छापून ते दात्यांपर्यंत पोहचवण्याचा पायंडा पाडला गेला. आज हे पत्रक लोक अत्यंत आवडीने वाचतात आणि संग्रह करून ठेवतात.
बोलता बोलता पाच वर्षे होऊन गेली. पाचव्या वर्षाच्या आषाढी एकादशीला ‘आपला दवाखाना’ची जनरल ओपीडीची एक अजून शाखा उघडली गेली. अत्यंत अल्पावधीत या शाखेचाही प्रचंड उपयोग लोक करून घेऊ लागले.

‘आपला दवाखाना’ला वेळोवेळी मिळत गेलेले डॉक्टर्स या सार्‍या वाटचालीत सगळ्यात महत्त्वाचे घटक ठरले आहे. दवाखाना देत असलेल्या अल्प मानधनात या लोकांनी आपली सेवा उपलब्ध करून दिली. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन तशा प्रकारचे उपचार केले. या सार्‍या गोष्टी ‘आपला दवाखाना’साठी जमेच्या बाजू ठरल्या.
आज हा उपक्रम परिसरातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. २०१४च्या अखेरीस ‘आपला दवाखाना’चा लाभ घेतलेल्या रुग्णांची संख्या दोन लाखांच्यावर गेली आहे. चार-सहा लोकांनी मिळून सुरू केलेल्या एका वेगळ्या सामाजिक प्रकल्पाचे हेच खरे यश म्हणावे लागेल.
आज ‘आपला दवाखाना’चा दर महिन्याचा १ ते सव्वालक्ष रुपये एवढा खर्च आहे. स्वतःची कोणतीही मालामाल करायची नाही, ऑफिस थाटायचं नाही, कारकुनी अत्यल्प खर्च करायचा, चहापाणी स्वतःच्या खर्चाने करायचे आणि मुख्य म्हणजे कुठेही स्वतःच्या नावाची प्रसिद्धी करायची नाही ही पथ्यं कसोशीने या उपक्रमाच्या चालकांनी आजवर पाळली आहेत.

जीवन क्षणभंगुर असतं. एका क्षणात आजवर जमवलेलं सारं काही सोडून सार्‍याच्या पलीकडे मनुष्याला कुठलीही सबब न सांगता जावं लागतं. दैवी देणगीच्या रूपात मिळालेल्या या सुंदर जीवनाचा उपयोग चांगल्या कामासाठी केला तर त्याची नोंद निश्चितपणे ईश्‍वराच्या दरबारात कुठेना कुठे झाल्याशिवाय राहत नसेल.


विनोद गोरवाडकर
८५२, गोरवाडकर वाडा,
मालेगाव कॅम्प, नाशिक
चलभाष ः ९४२३४७७२७३
nagaraweekly@gmail.com

स्त्रोत : मिळून सार्‍याजणी

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate