অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वेदनाशामके

वेदनाशामके

वेदना कमी करण्यासाठी सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या औषधांना वेदनाशामके म्हणतात आणि यांच्या रासायनिक संरचना व शरीरक्रियावैज्ञानिक परिणाम नानाविध प्रकारचे असतात. वेदनाशामकाने वेदना निवडक रीतीने कमी झाली पाहिजे अथवा थांबली पाहिजेच, शिवाय वेदनाशामकामुळे तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) पुढीलसारखे बिघाड होऊ नयेत असे ते असावे लागते: शुद्धीतील (जाणिवेतील) बिघाड, मानसिक गोंधळ, असमन्वय अथवा पक्षाघात.

संज्ञाप्रवाहात जाणवणारा वेदनेचा अनुभव आणि त्याची स्मृती दुख:दायक असतात. वेदनाजन्य शारीरिक व मानसिक प्रतिक्रिया दीर्घकाळ टिकल्यास हानिकारक ठरतात. त्यामुळे कोणत्याही उपायाने वेदनेचे शमन व शक्य तेव्हा प्रतिबंध करणे आवश्यक असते.

वेदनानिर्मितीच्या परिघीय व केंद्रीय यंत्रणांवर [→ तंत्रिका तंत्र] परिणाम करणारे पुढील उपचार वेदनाहरणासाठी वेळोवेळी त्यांच्या इष्टानिष्टतेप्रमाणे वापरले जातात :

(१) वेदनेचे कारण दूर करणे [विजातीय पदार्थांसाठी किंवा विकृतीसाठी शस्त्रक्रिया, रक्तपुरवठा सुधारणारी वाहिनीविस्फारक औषधे, शोथ (दाहयुक्त सूज) आणि संक्रामण विरोधी औषधे],

(२) संवेदनाहरण करणारी औषधे,

(३) तंत्रिकेचे (मज्जेचे) किंवा तंत्रिकामूलाचे छेदन आणि

(४) वेदनाग्राही तंत्रिकांची संवेदनक्षमता वाढविणाऱ्या प्रोस्टाग्लॅंडीन द्रव्यांच्या संश्लेषणात विरोधी द्रव्ये हे परिघीय यंत्रणांवर परिणाम करणारे उपचार आहेत;

(५) वेदनानियामक द्वार बंद करणारी द्रव्ये (अहिफेनाभे),

(६) कंकाल (सांगाड्याच्या) स्नायूंचा ताठरपणा कमी करणारी शिथिलीकारके,

(७) मानसिक प्रतिक्रिया सौम्य करणारी शांतके आणि सुखभ्रामके,

(८) तंत्रिका उद्दीपनाने वेदनानियमन करणारे ⇨सूचिचिकित्सा व ⇨विद्युत्‌ चिकित्सा यांसारखे उपाय आणि

(९) शस्त्रक्रियेसाठी शुद्धिहारके [→ शुद्धिहरण] हे केंद्रीय यंत्रणांवर परिणाम करणारे उपचार आहेत.

यांपैकी क्र. ४ ते ७ ही वेदनाशामके म्हणता येतात. समाधानकारक परिणामांसाठी अशी द्रव्ये प्रभावी, त्वरित क्रिया करणारी, सर्व प्रकारच्या वेदना कमी करणारी, तंत्रिका तंत्राच्या इतर कार्यात अडथळा न आणणारी (इतर संवेदना, जाणीव, विचारशक्ती, श्वसन, रक्तदाब, कृतिकौशल्य इ.) व दीर्घकालीन उपयोगाने वृक्क (मूत्रपिंड), यकृत, अस्थिमज्जा यांवर विषाक्त (विषारी) परिणाम न घडविणारी असावीत अशी अपेक्षा असते. यांकरिता उपलब्ध असलेल्या वेदनाशामकांचे पुढील प्रमुख गट असून त्यांतून योग्य वेदनाशामकाची निवड केली जाते.

मादक वेदनाशामके

अफू हे सर्वांत जुने व सर्वपरिचित मादक वेदनाशामक आहे. ⇨मॉर्फीन, हेरॉइन यांसारखी अफूतील⇨अल्कलॉइडे, पेथिडीन, ब्युप्रीनॉर्फीन ही मानवनिर्मित द्रव्ये आणि अल्प मादकता असलेली ⇨कोडीन, पेंटाझोसीन, प्रोपॉक्सीफेन ही औषधे या वर्गात प्रमुख आहेत. मेरुरज्जूतील वेदनानियामकद्वार आणि परिमस्तिष्कनालीय धूसर द्रव्य यांमधील अहिफेनाभ ग्राहींशी बद्ध होऊन त्यांची वेदनाशामक क्रिया घडते. याशिवाय बदामाभ केंद्रकासारख्या मनोव्यापाराशी संबंधित भागावर क्रिया करून चिंता कमी करणे, सुखभ्रांती (किंवा सुखभ्रम) आणि वेदनेबद्दल अलिप्तता अशा परिणामांनीही मादक द्रव्ये वेदनाशमन करतात; परंतु या क्रियांमुळे व्यसनासक्तीचा धोका असतो. म्हणून या वर्गातील औषधे फक्त अंतस्त्यजन्य [जठर, आतडे, वृक्क (मूत्रपिंड), हृदय यांसारख्या अंतर्गत अवयवांशी निगडित ] वेदनांसाठी व मर्यादित काळ वापरतात. श्वसनकेंद्राचे अवसादन हाही महत्त्वाचा दुष्परिणाम मात्रा वाढवल्यास होतो. शस्त्रक्रियेच्या वेदनांत आणि कर्करोगाच्या अंतिम अवस्थेत ही औषधे उपयुक्त ठरली आहेत.

[→ मादक पदार्थ].

अमादक वेदनाशामके

विसाव्या शतकात संश्लेषणजन्य औषधांच्या या गटात अनेक उपयुक्त औषधे विकसित झाली आहेत. उदा., फिनिलब्युटाझोन, ⇨अॅस्पिरीन, अॅनाल्‌जीन, पॅरॅसिटॅमॉल, इंडोमेथॅसीन वगैरे. डोकेदुखी, पाठदुखी, स्नायू व सांधेदुखी आणि इतर कंकालीय (सांगाड्याशी निगडित) वेदनाशमन करणारी ही औषधे संधिवाताभ, अस्थिसंधिशोथ [→ संधिवात; संधिशोथ] यांसारख्या दीर्घोपचाराने शमणाऱ्या विकृतींमध्ये उपयोगी ठरतात. ⇨ज्वरनाशके, प्रोस्टाग्लॅंडीन संश्लेषण निरोधके किंवा स्टेरॉइडेतर शोथप्रतिरोधके या क्रियादर्शक संज्ञांनीही हा वर्ग ओळखला जातो. अंतस्त्यजन्य (हृदय, आंत्र, जठर यांतील) वेदना मात्र ही औषधे कमी करू शकत नाहीत. दीर्घकाळ वापरात जठरशोथ, वृक्क व अस्थिमज्जाविषक्तता, अल्परक्तता (रक्तक्षय), अंतर्गत रक्तस्राव इ. परिणामांबद्दल जागरूक राहावे लागते. [→ औषधिक्रियाविज्ञान].

मनोनुवर्तनी औषधे

वर दिलेल्या वेदनाशामकांचे प्रभाववर्धन करण्यासाठी ही औषधे उपयोगी पडतात. क्लोरप्रोमॅझिनासारखी शांतके चिंतापूर्ण मानसिक प्रतिक्रियेचे रूपांतर वेदनेबद्दलच्या अलिप्ततेमध्ये करून वेदनाशमनास साह्यभूत होतात. त्याउलट मानसिक क्रिया करणारी काही अवसादरोधी द्रव्ये त्यांच्या मोनोअमाइन ऑक्सिडेज संदमनक्रियेमुळे तंत्रिकापारेषक रसायनांच्या संहतीत (प्रमाणात) वाढ करून वेदनानियामक द्वाराचे (केंद्रीय प्रभावाने) नियमन वाढवून वेदनाशमन करतात, उदा., अमिट्रिप्टीलीन, इमिप्रामीन; परंतु त्यांच्या इतर अनेक औषधांशी आणि विकृतिक्रियांशी अनपेक्षित आंतरक्रिया होऊ शकतात.

स्नायू शिथिलके

मेरुरज्जूतील प्रेरक कोशिकांच्या उद्दीपनामुळे निर्माण होणारी कंकालीय स्नायूची ताठरता (तानता) कमी करून ही औषधे स्नायुकंकालीय वेदना कमी करतात (उदा., पाठदुखी, सांधे आखडणे). मेफेनेसीन, डायझेपाम, बॅक्लोफेन इ. औषधे या वर्गात मोडतात.

संकीर्ण

विशिष्ट तंत्रिकेच्या क्षेत्रातील असह्य वेदना नष्ट करण्यासाठी (उदा., त्रिमूलतंत्रिकाजन्य वेदना) तंत्रिकापरिसरात अल्कोहॉल किंवा फिनॉलसारखी ऊतकनाशक द्रव्ये टोचून दीर्घकाळ परिणाम साधता येतो.

शोथजन्य द्रवामुळे तंत्रिकांवर दाब पडून निर्माण होणाऱ्या वेदना कॉर्टिकोस्टेरॉइड औषधांनी कमी होतात (उदा., मस्तकांतर्गत अर्बुदे).

वेदनाजनक तपासणी किंवा मलमपट्टी यांसारख्या विधींसाठी (उदा., सर्वांग भाजलेले रुग्ण) भूल न देता केवळ वेदनाहरण व वेदनेबद्दल अलिप्तता निर्माण करण्याचे तंत्र वियोजित संवेदनाहरण (विशेषत: शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनांच्या शमनाच्या संदर्भात शांतक व वेदनाशामक एकत्रितपणे देण्याचे तंत्र) आता विकसित होत आहे. केटामिनासारखी द्रव्ये त्यासाठी वापरतात.


पहा : अफू; अल्कलॉइडे; अॅस्पिरीन; औषधिक्रियाविज्ञान; कोडीन; मादक पदार्थ; मॉर्फीन; शांतके; शुद्धिहरण; संवेदनाहरण.

संदर्भ : 1. Grundy, G. F. Lecture-notes on Pharmacology, Oxford, 1985.

2. Rang, H. P. Dale, M. M. Pharmacology, Edinburgh, 1987.

श्रोत्री, दि. शं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate