অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्वेतकोशिकार्बुद

श्वेतकोशिकार्बुद

श्वेतकोशिकार्बुद

‘रक्ताचा कर्करोग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विकारामध्ये श्वेतकोशिकांची (पांढऱ्या पेशींची) अनिर्बंध निर्मिती होत असते, इतर सर्व प्रकारच्या कर्करोगाप्रमाणेच ही विकृती असली, तरी अनियंत्रित प्रमाणात वाढणार्‍या या कोशिका इतरत्र न जाता केवळ रक्तातच प्रचंड प्रमाणात सोडल्या जातात, हे या विकाराचे वैशिष्ट्य आहे [⟶ कर्करोग]. रक्तातील सर्व प्रकारच्या कोशिकांपैकी (लाल म्हणजेच रक्तकोशिका, बिंबाणू आणि श्वेतकोशिका) फक्त श्वेतकोशिकांची निर्मिती अनियंत्रित होऊ लागते. श्वेतकोशिकांचा कोणता उपप्रकार नियंत्रणमुक्त होतो, त्यानुसार रोगाची वर्गवारी केली जाते.

कर्करोगाच्या अन्य प्रकारांप्रमाणेच रक्तातील या कर्करोगाचे निश्चित कारण सांगता येत नाही. बहुक्षम स्कंधकोशिकांपासून श्वेतकोशिकांच्या ज्या तीन मुख्य मालिका निर्माण होतात (लसीका कोशिकीय,मज्जाभ किंवा कणिकाकोशिकीय आणि एककेंद्रकी किंवा महाभक्षी कोशिकीय) त्यांतील कोणत्याही एका मालिकेतील अगदी सुरूवातीच्या म्हणजेच पूर्वगामी कोशिकांपैकी एखादया कोशिकेत एकाएकी काही उत्परिवर्तन (अचानकपणे बदल) झाल्यामुळे तिच्यापासून मोठया प्रमाणात अकार्यक्षम आणि विकृत कोशिकांचे जनन होऊ लागते. एकासारख्या एक दिसणाऱ्या आणि रोगप्रतिरक्षेच्या कार्याची कोणतीही क्षमता नसणाऱ्या या कृत्तकांचे (क्लोनांचे) आगमन रक्तात मोठया प्रमाणात होऊ लागल्यावर त्या मालिकेतील नेहमी आढळणाऱ्या कोशिकांचे प्रमाण घटू लागते. इतर मालिकांच्या निर्मितीवरही याचा अनिष्ट परिणाम होतो, रक्तकोशिकांची संख्याही घटते. [ ⟶ रक्त].

कोशिकांमधील उत्परिवर्तकाचे स्वरूप जाणण्यासाठी केलेल्या संशोधनात विविध गुणसूत्रांमधील (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमधील) संरचनात्मक दोष आढळून आले आहेत. गुणसूत्राचा क्रमांक, त्यातील दोष आणि रोगाचे दृश्य स्वरूप यांचा परस्परसंबंध लावण्यात अभ्यासकांना बरेच यश मिळाले आहे. तरीही हे दोष निर्माण होण्यामागील कारणांचा शोध अजून अपूर्णच आहे. प्राण्यांमधील काही श्वेतकोशिकार्बुदांची निर्मिती विषाणुजन्य (व्हायरसजन्य) असू शकते हे प्रयोगान्ती सिद्ध झालेले आहे. मानवी रोगांपैकी प्रौढ व्यक्तींमध्ये आढळणारा एक दुर्मिळ प्रकार (‘प्रौढ टी-कोशिका श्वेतकोशिकार्बुद’) एचटीएलव्ही (HTLV)नावाच्या एड्स विषाणूशी साम्य असणार्‍या विषाणूंमुळे होतो, असे मानले जाते. हा विषाणू टी प्रकारच्या लसीका कोशिकांवर [⟶ लसीका तंत्र] आक्रमण करतो. विषाणूंप्रमाणेच किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) पदार्थांचा संपर्क हेही एक महत्वाचे कारण रक्तकर्कासाठी जबाबदार धरले जाते, जपानमधील अणुबॉंबच्या स्फोटानंतर तेथील लोकसंख्येत या विकाराचे प्रमाण कित्येक पटींनी जास्त झाले. अणुऊर्जा आणि इतर किरणोत्सर्गी क्षेत्रांमधील संशोधन व उदयोगात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही हे प्रमाण अधिक आढळते. त्यामुळे त्यांच्या नियमित रक्त तपासण्या केल्या जातात. बेंझीनसारखी रासायनिक द्रव्ये आणि काही कर्करोगनाशक औषधे यांच्या संपर्कामुळेही रक्तातील कर्करोगाचा धोका वाढतो असे दिसते. डाऊन सिंड्रोम (लक्षणसमूह), फँकोनी सिंड्रोम यांसारख्या काही जनुकदोषीय विकारांमध्ये कधीकधी रक्तकर्कासारखे बदल काही काळ निर्माण होऊन बरे होतात अथवा काही रूग्णांमध्ये कालांतराने तीव्र स्वरूप धारण करतात.

श्वेतकोशिकार्बुदाच्या विविध प्रकारांमध्ये रूग्णांचे चित्र भिन्नभिन्न असू शकते; परंतु कोशिकीय बदलांची प्रगती आणि त्यातून उद्‍भवणारी लक्षणे यांमधील संबंध सर्वत्र सारखाच असतो. तो प्रथम पाहणे सोयीचे ठरेल. गुणसूत्रांमधील उत्परिवर्तनामुळे पूर्वगामी कोशिकेपासून निर्माण होणाऱ्या कोशिका नेहमीपेक्षा कमी परिपक्व असतात. त्यांचे परिपक्वन कमी व निर्मितीचा वेग अधिक असतो. या वेगावर लक्षणांची तीवता (आणि त्यावर आधारित वर्गीकरण) अवलंबून असते. सुरूवातीस अस्थिमज्जेतील एखादया ठिकाणी निर्माण झालेल्या या कोशिका रक्तात उतरल्यावर सर्व ठिकाणांच्या अस्थिमज्जेत पोहोचतात व तेथे आपले गुणन (संख्यावाढ) सुरू करतात. अस्थिमज्जेतील निरोगी मज्जाभ आणि लसीकाभ कोशिकांसारख्या निर्मितिक्षम कोशिकांची जागा या कोशिका घेतात. त्यामुळे रक्तात येणाऱ्या परिपक्व कार्यक्षम कोशिकांची टक्केवारी कमी होऊन अपरिपक्व अशा जनककोशिकांची संख्या वाढू लागते. एकूण श्वेतकोशिकांची संख्या नेहमीच्या ४,००० ते ११,००० प्रतिमायकोलिटर (घन मिलीलिटर) वरून ५०,००० ते एक लाखापर्यंत वाढूनही प्रतिकारक्षमता कमी होऊन संकामणजन्य (सांसर्गिक) रोग होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ताप येतो. रात्री घाम येतो. श्वेतकोशिकांप्रमाणेच रक्तकोशिकांच्या पूर्वगामी कोशिकांवर आक्रमण झाल्याने हळूहळू अल्परक्तता आणि ऑक्सिजन वहनातील अकार्यक्षमता दिसू लागते. फिकटपणा, लवकर दमणे, वजन घटणे, भूक कमी होणे ही त्यातून उद्‌भवणारी लक्षणे असतात. अस्थिमज्जेतील बिंबाणूंची निर्मिती घटल्यामुळे रक्ताचे क्लथन होण्यास (साखळण्यास) वेळ लागतो. नाकातून रक्त येणे, हिरड्यांमधून सहजासहजी रक्तस्राव होणे, त्वचेखाली रक्तस्राव झाल्यामुळे जांभळे डाग दिसणे ही लक्षणे आढळतात. लसीका गंथींमध्ये अपरिपक्व कोशिकांची वाढ झाल्याने लसीका कोशिकांची नेहमीची निर्मिती कमी होते, प्रतिपिंडनिर्मिती (रक्तातील गॅमा ग्लोब्युलिनासारखी द्रव्ये) तसेच कोशिकीय प्रतिरक्षा यंत्रणा यांच्या कार्यक्षमतेस ओहोटी लागते. लसीका गंथी वाढलेल्या दिसतात.

रक्तनिर्मिती आणि लसीकानिर्मितीशी संबंधित कोशिकांचे विस्थापन कर्ककोशिकांकडून झाल्यामुळे वरील सर्व लक्षणे उद्‌भवतात. याबरोबरच इतरत्रही कर्कप्रक्षेप होऊ लागून अन्य लक्षणे हळूहळू दिसू लागतात. अस्थिमज्जेतून हाडांच्या कठिण भागात व सांध्यामध्ये रोग पसरल्यामुळे तेथून वेदना निर्माण होतात. हाडांमधील आकमण पुरेसे विस्तृत असेल, तर ठिकठिकाणी अस्थिभंग होतो. यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड येथे कोशिकांच्या आकमणामुळे कार्यक्षमता ओसरू लागते, उदरामध्ये जडपणा जाणवतो व त्याचे रूपांतर वेदनांमध्ये होते. तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) प्रवेश करून मस्तिष्कावरणावर आकमण करणारा कर्करोग अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोकेदुखी, उलट्या होणे यांसारखे परिणाम घडवितो. या सर्व कर्कप्रक्षेपांमध्ये प्रत्येक ठिकाणी कर्ककोशिकांची अनिर्बंध वाढ मूळ ऊतकाची पोषणद्रव्ये बळकावून घेत असल्यामुळे ऊतकाचा नाश होत राहतो व त्याचे पुनरूज्जीवन होत नाही. मोठया प्रमाणावर कोशिकानिर्मिती झाल्याने संपूर्ण शरीराच्या चयापचयी यंत्रणेवर [शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडी घडविणाऱ्या यंत्रणेवर; ⟶ चयापचय] भार पडतो आणि जीवनसत्त्वे, ॲमिनो अम्ले व इतर पोषक द्रव्यांची कमतरता भासून कुपोषणाची लक्षणे दिसू लागतात.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate