অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नवजात अर्भक

नवजात अर्भक

नव्याने जन्मलेल्या अर्भकास प्रसूतीनंतरच्या पहिल्या चार आठवड्यांच्या काळात ‘नवजात अर्भक’ म्हणतात व या काळाला अर्भकाच्या संदर्भात ‘नवजात काल’ म्हणतात. प्रसूतीपूर्वी संपूर्णपणे परजीवी जीवन जगणाऱ्या आणि गर्भाशयांतर्गत परिस्थितीवर सर्वथा अवलंबून असणाऱ्या या नवजात जीवाला एकाएकीच संपूर्ण स्वतंत्र व गर्भाशयबाह्य जीवन जगावे लागते. या नव्या परिस्थितीस तोंड देण्यास योग्य असे अनेक सोयीस्कर फेरबदल नवजात अर्भकाच्या शरीरास करून घ्यावे लागतात. हे फेरबदल श्वसनक्रिया, रुधिराभिसरण, पोषण व उत्सर्जन (निरुपयोगी द्रव्ये शरीराच्या बाहेर टाकणे) या शारीरिक क्रियांविषयक असतात.

वजन

अर्भकाचे वजन त्याच्या त्वचेतील वसा साठ्यावर (स्निग्ध द्रव्यांच्या साठ्यावर) अवलंबून असते. विकसित देशांतील अर्भकांचे जन्म-वजन (जन्मल्यानंतर लगेच भरणारे वजन) विकसनशील देशांतील अर्भकांच्या वजनापेक्षा बरेच अधिक असते. एकाच दिवशी जन्मलेल्या नवजात अर्भकांच्या वजनात फरक असू शकतो व तो केवळ शरीरक्रियात्मकच असू शकतो. रतातील अर्भकांचे जन्म-वजन सर्वसाधारणपणे २·९३ किग्रॅ. असते. पुण्यातील २,१६६ अर्भकांचा एन्. व्ही. खलप यांनी अभ्यास केला असता ८५% अर्भकांचे वजन २·७० किग्रॅ. आढळले. तसेच संशोधनान्ती पुरुष अर्भकाचे वजन स्त्री अर्भकापेक्षा नेहमीच जास्त असल्याचे आढळले आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या अर्भकाचे वजन पुढच्या संततीच्या मानाने कमीच असते. एस्. टी. आचर आणि ए. यंकाऊर यांनी मद्रासमधील अर्भकांच्या वजनाचा व कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला. त्यांना गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीयांतील अर्भकाचे सर्वसाधारण वजन २·७३६ किग्रॅ., उच्च मध्यमवर्गीयांत २·९४८ किग्रॅ. आणि श्रीमंत व यूरोपियनांत याहून थोडे अधिक आढळले. प्राकृत (सर्वसाधारण) गर्भावधीपेक्षा अधिक काळानंतर जन्मलेल्या, तसेच मधुमेही मातेच्या अर्भकाचे वजन सर्वसाधारण अर्भकापेक्षा बहुधा अधिक असते. आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे २·४९ किग्रॅ. वजनापेक्षा कमी वजनाचे अर्भक (गर्भावधी विचारात न घेता) ‘अकाल अर्भक’ गणले जाते. खलप यांच्या सूचनेप्रमाणे भारतापुरता हा आकडा २·२५ किग्रॅ. असावा.

आ.१. एकाच दिवशी जन्मलेल्या एक आठवडा वयाच्या तीन नवजात अर्भकांमधील शरीरक्रियात्मक बदल (जन्म-वजने डावीकडून अनुक्रमे ५.७ किग्रॅ., ३.४ किग्रॅ. व २.५ किग्रॅ.).

युष्याच्या पहिल्या आठवड्यात अर्भकाचे वजन ५ ते १०% घटते. याहून अधिक घट- १० ते १५% किंवा त्याहून जास्त झाल्यास निर्जलीकरणजन्य (द्रव पदार्थांचा ऱ्हास झाल्यामुळे येणारा) ज्वर येतो. म्हणून जन्मानंतर ६ ते ८ तासांनी अर्भकास द्रव पदार्थ देण्यास सुरुवात केल्यास हा उपद्रव टळतो. सर्वसाधारणपणे दहाव्या दिवशी अर्भकाचे वजन जन्म-वजनाएवढे होते व त्यानंतर पहिले तीन महिने दर दिवशी २८ ग्रॅ. वाढत असते.

लांबी

नवजात अर्भकाची सर्वसाधारण लांबी ५०·८ सेंमी. असते. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांत ती ४८·७५ सेंमी. असते. ४६·०० सेंमी.पेक्षा कमी लांबीचे अर्भक अपक्व गणले जाते. मुंबईतील हाफ्‌कीन इन्स्टिट्यूटने मुंबईतील नवजात अर्भकांच्या लांबीविषयी पुढील माहिती दिली आहे. पु<रुष नवजात अर्भक : ३७·५ ते ५२·५ सेंमी. सर्वसाधारण : ४५·४२ सेंमी. स्त्री नवजात अर्भक : ४० ते ५० सेंमी. सर्वसाधारण : ४५·४ सेंमी. सिंगापूरमधील एका पाहणीत द. भारतीय रहिवाशांमध्ये नवजात अर्भकांची सर्वसाधारण लांबी स्त्री व पुरुष अर्भकांत ४५·४५ सेंमी. आढळली.

शरीरप्रमाण

धडापेक्षा डोके मोठे असून त्याचा घेर सु. ३४ सेंमी. असतो. पाय वरील दोन्हींच्या मानाने आखूड असतात. प्रसूतीच्या वेळी अती शिरोघटन झाल्यामुळे ‘प्रसवशीर्ष शोफ’ किंवा ‘मस्तक शोष’ (दाब पडून रक्त साचून शिरोवल्काला सूज येणे किंवा कवटीची हाडे प्रमाणापेक्षा अधिक पातळ होणे) आढळण्याचा विशेषेकरून ‘अकाल अर्भका’त संभव असतो. छाती दंडगोलाकार असते व तिचे अग्र-पश्च आणि पार्श्व व्यास सारखे असतात. छातीचा घेर डोक्याच्या घेरापेक्षा २·५ सेंमी. कमी असतो. बसल्या अवस्थेत (डोके ते ढुंगण) उंची २७-३४ सेंमी. असते. वरच्या शरीरभागाचे (डोके ते जघन संधानक) खालच्या शरीरभागाशी (जघन संधानक ते टाच) गुणोत्तर १·७ : १ असते. बेंबीच्या शरीराच्या मध्यबिंदूच्या खाली असते.

अंगस्थिती व तान

गर्भावस्थेत गर्भाची जी सुखावह अंगस्थिती असेल त्यावर नवजात अर्भकाच्या या शरीरावस्था अवलंबून असतात. तान म्हणजे जोम व ताण यांच्या बाबतीतील शरीराची प्राकृत अवस्था. डोके सतत मागे वळलेले असणे किंवा पाय सतत लांब (गुडघ्यात न वाकवता) असणे ही लक्षणे प्रसूतिपूर्व अप्राकृत अवस्था असल्याचे दर्शवितात. तसेच प्रसूतीच्या वेळी अप्राकृत गर्भदर्शन असण्याची शक्यता दर्शवितात.

निरोगी नवजात अर्भक लवचिक (बिलबिलीत) कधीच नसते म्हणजेच तो तानरहित मांसाचा गोळा नसतो. रडताना तान वाढतो व हात लावून पाहिल्यास तो असल्याचे समजते. केंद्रीय तंत्रिका तंत्राची [→ तंत्रिका तंत्र] विकृती किंवा अपुरा तंत्रिका (मज्जा)-स्नायू तान सबंध शरीरतानावर परिणाम करतात. श्वासरोध, मस्तकांतर्गत आघात इत्यादींमुळे तानावर होणारा परिणाम याच प्रकारचा असतो.

जन्म-चीत्कार

 

निरोगी नवजात अर्भकाचा जन्म-चीत्कार नेहमी जोरदार, ताकदवान व निरोगी असतो. उत्तम जन्म-चीत्कार अशक्त जन्म-चीत्कार उत्तम फुफ्फुस-प्रसरण निदर्शक असतो. अशक्त जन्म-चीत्कार किंवा कुंथत हळू आवाजात रडणे अपुरे फुफ्फुस-प्रसरण व इतर विकृती दर्शवितो. तीव्र स्वरातील रडण्याला ‘मस्तक जन्म-चीत्कार’ म्हणतात व तो बहुधा मस्तकांतर्गत आघाताचा निदर्शक असतो.

रंग

निरोगी नवजात अर्भकांत त्वचारंग बदलतात. जन्मानंतर निळा पडलेला चेहरा श्वसनक्रिया सुरू होताच गुलाबी दिसू लागतो. नवजात अर्भकाचे वाहिनी-प्रेरक तंत्र (रक्तवाहिन्यांच्या भित्तीचे आकुंचन-प्रसरण करणारी यंत्रणा) अस्थिर असते, तसेच परिसरीय रुधिराभिसरण मंद असते. ‘हस्तनील विवर्णता’ (दोन्ही हात निळे पडणे), एका बाजूवरून दुसरीवर झोपविल्यास रंग बदलणे, तसेच त्वचेवर रंगीबेरंगी ठिपके उमटणे हे प्रकार निरोगी अर्भकात याच कारणामुळे आढळतात. ‘हार्लेक्विन रंगबदल’ तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आढळतो. यामध्ये अर्धे शरीर फिक्कट तर अर्धे लाल झाल्याचे एकाच वेळी दिसते. अल्पकाल टिकणारा व बिनमहत्त्वाचा असा हा रंगबदल वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नाहीसा होतो.

त्वचा

जन्मवेळी त्वचा विटकरी रंगाची व तुकतुकीत असते. तीवर भ्रूणस्नेहाचा (तेलकट पांढऱ्या पदार्थाचा) थर असतो. हा पदार्थ गर्भाच्या त्वक्‌स्नेह ग्रंथींचा [→ त्वचा] स्त्राव असतो. निरोगी अर्भकाच्या अंगावर हा थर भरपूर प्रमाणात असून तो त्वचेचे संरक्षण करतो. अंग न धुतल्यास जन्मानंतर काही दिवसांनी तो नाहीसा होतो. गर्भलोम (कपाळ, कान व शरीराच्या बाजूवर आढळणारे बारीक मऊ केस) बहुधा आढळतात. भ्रूणस्नेहाचा रंग गर्भविकृतिनिदर्शक असू शकतो. उदा., सोनेरी पिवळा रंग ‘गर्भ रक्तकोशिकाजनक प्रसूमयता’ (नवजात अर्भकात आढळणारा रक्तविलयक रोग; यामध्ये रक्तात रक्तजनककोशिकाधिक्य, यकृतवृद्धी, प्लीहावृद्धी, कावीळ इ. लक्षणे असतात). पिवळसर काळपट किंवा भ्रूणस्नेहाचा संपूर्ण अभाव हे गर्भावधी उलटल्यानंतर काही कालांतराने प्रसूती झाल्याचे निदर्शक असतात (वार अपक्रिया लक्षणसमूह). जन्मानंतर पहिल्या आठवड्यात विशेषेकरून निरोगी अर्भकात त्वचेचे 'विशल्कन’ (बाह्यस्तरातील कोशिका-पेशी-झडून पडणे) होते. गर्भावधी उलटून गेल्यानंतर उशिरा जन्मलेल्या अर्भकात त्वचेचे थरच झडतात. डोक्यावरचे पुष्कळसे केस पहिल्या आठवड्यात गळून पडतात.

 

हालचाल

नवजात अर्भकाची हालचाल व झोप यांमधील लयबद्धता त्याच्या वर्तनबंधाचे (प्रवृत्तीचे) निदर्शक असू शकते. नवजात अर्भक जवळजवळ रात्रंदिवस म्हणजे २० ते २४ तास झोपते. क्वचितच स्तनपानाच्या वेळी व मलमूत्र विसर्जनाच्या वेळी ते जागे होत असावे. काही अर्भके जागी राहून काही तास निश्चेष्ट पडून राहतात किंवा हातपाय हळूहळू हलवीत राहतात. कधीकधी ते जवळपासच्या वस्तूकडे बघत राहते किंवा बोटे तोंडात घालून चोखत राहते. काही अर्भके एकसारखी अस्वस्थ असून हातापायांची जोरदार हालचाल करतात व जोराने रडतात. अशा अर्भकांना कमी झोप पुरत असावी व त्यांना ‘अतितानमय’ अर्भके म्हणतात. नवजात अर्भकाच्या हालचाल, झोप वगैरेंचे निरीक्षण करणे वैद्यकीय दृष्ट्या फार महत्त्वाचे असते. कारण त्यामधील बदलावरून (उदा., झोप कमी असणाऱ्यांत अती झोप किंवा निश्चेष्ट पडून राहणाऱ्यांत जोराची हालचाल) मेंदूच्या विकृतीचे निदान करता येते.

 

श्वसन तंत्र

अत्यंत जरूरीचा व एकमेव असा शरीरक्रियात्मक फेरफार म्हणजे फुफ्फुसाद्वारे श्वसन क्रिया सुरू होणे हा होय. काही शास्त्रज्ञांनी गर्भावस्थेतच श्वसन क्रिया सुरू झाल्याचे म्हटले आहे. मात्र श्वसनकार्याकरिता लागणारी फुफ्फुसांची गरज जन्मानंतरच सुरू होते एवढे निश्चित. जन्मानंतर काही सेकंदांतच बहुतेक अर्भके श्वासोच्छ्‌वास करू लागतात. ही क्रिया कशी सुरू होते याविषयी निश्चित माहिती पूर्वी नव्हती. अलीकडील संशोधनावरून असे दिसून आले आहे की, श्वसन क्रिया सुरू होण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय तंत्रिका तंत्राचे जैवरासायनिक कार्य सुरळीत होण्याकरिता योग्य तेवढ्या ऑक्सिजनाचा साठा तयार असणे ही होय. याशिवाय कार्बन डायऑक्साइडाचा वाढलेला ताण, मध्यम ऑक्सिजनन्यूनता, परिसरीय तापमानातील बदल, नाळ बांधणे, मूल हाताळणे व इतर काही अज्ञात कारकांचाही श्वसन क्रिया सुरू करण्यात वाटा असतो. प्रथम फुफ्फुसांचा शिखरभाग प्रसरण पावतो व नंतर बाजू व त्यानंतर खालचा तळाकडील भाग प्रसरण पावतात.

 

श्वसनाची लयबद्धता सुरुवातीस काही आठवडे अनियमित असली, तरी पुढे नियमित होते. नवजात अर्भक दर मिनिटास ४० वेळा श्वासोच्छ्‌वास करते.

हृदय व रुधिराभिसरण तंत्र

नाळ बांधल्याबरोबर परिसरीय रोध वाढतो. श्वसन क्रिया सुरू होताच फुफ्फुसातील रुधिराभिसरण वाढते व डाव्या अलिंदात (ज्यात शुद्ध रक्त येते त्या हृदयाच्या वरच्या कप्प्यात) अधिक रक्त येऊन तेथील रक्तदाब वाढतो. त्याच वेळी निम्नमहानीलेतील दाब कमी होऊन अंडाकार रंध्र (डाव्या व उजव्या अलिंदांच्या मध्ये असणाऱ्या पडद्यातील भोक) बंद होते. या तंत्रातील एकूण फेरफार पुढीलप्रमाणे असतात.

 

<अंडाकार रंध्र-जन्मानंतर लगेच कार्य बंद होते. पडद्यामधील शरीररचनात्मक बदल पूर्ण होण्यास ४ महिने लागतात आणि त्यानंतर रंध्राच्या जागी फक्त अंडाकार खाच उरते.

 

रोहिणीवाहिनी-फुफ्फुस रोहिणी आणि अवरोही महारोहिणी यांना जोडणाऱ्या रक्तवाहिनीला ‘रोहिणीवाहिनी’ म्हणतात. जन्मानंतर ३ ते १२ दिवसांत तीमधून रक्त वाहणे बंद होते. शरीररचनात्मक दृष्ट्या ही वाहिनी बहुधा दोन महिन्यांत पूर्ण बंद होते. कार्य बंद न होता ती कार्यान्वित राहिल्यास जी जन्मजात विकृती होते, तिली ‘विवृत रोहिणीवाहिनी’ म्हणतात.

 

(३) नाभिवाहिन्या-जन्मानंतर थोड्याच दिवसांत बंद होतात.

 

(४) परिसरीय रुधिराभिसरण-बहुधा मंद असते व त्यामुळे पहिले काही दिवस हातास व पायास नीलवर्णता येते. हे लक्षण बहुधा थंडीच्या दिवसांत आढळते व ऑक्सिजनन्यूनतेमुळे उद्‌भवते.

 

रक्त

नाभिवाहिन्यांतील रक्तात असणाऱ्या ६०% हीमोग्लोबिनास ‘गर्भहीमोग्लोबिन’ म्हणतात. जन्मानंतर त्याचे प्रमाण कमी होत जाते व ४ महिन्यांत ९% होते. जन्मतः एकूण हीमोग्लोबिन १६ ते १७ ग्रॅ. % व लाल रक्तकोशिका प्रत्येक मिमी. रक्तात ५५ ते ६० लक्ष असतात. यांचे प्रमाण हळूहळू कमी होऊन ३ महिन्यांच्या सुमारास ४० लक्ष लाल रक्तकोशिका आणि ११ ग्रॅ.% हीमोग्लोबिन उरते. जालिका कोशिकांची संख्या पहिल्या दोन दिवशी ३% असते ती दोन आठवड्यांच्या सुमारास १% व तीन महिन्यांच्या सुमारास ०·५% होते. पहिले दोन दिवस केंद्रकयुक्त (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज असलेल्या) लाल रक्तकोशिका (नेहमी त्या केंद्रकविरहित असतात) आढळतात. मात्र त्यानंतर त्या अजिबात दिसत नाहीत. श्वेत कोशिकांची संख्या वयाच्या दुसऱ्या दिवशी वाढलेली म्हणजे प्रत्येक मिमी. रक्तात २०,००० असते व ती दोन आठवड्यांनी ११,००० वर येऊन ठेपते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असते (नेहमीच्या ८० ते १२० मिगॅ.% ऐवजी फक्त ४० मिग्रॅ.%).

 

पोट

शरीराच्या मानाने पोटाचे आकारमान मोठे असते. यकृत उजव्या बाजूच्या फासळीच्या खाली १ ते ३ सेंमी. वाढलेले व तपासताना हातास सहज लागते. दोन्ही मूत्रपिंडाचे काही भाग चाचपडून पाहिल्यास हातास सहज लागतात.

 

जठरांत्र मार्ग

श्वसन क्रिया सुरू होईपर्यंत जठरांत्र मार्गात हवा अजिबात नसते; पण श्वसन क्रिया सुरू झाली की, सहा तासांच्या आत संपूर्ण जठरांत्र मार्गात हवा शिरते. न्यायवैद्यकात (न्यायालयीन कार्यात मदत करण्यासाठी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करणाऱ्या शास्त्रात) अर्भक मृतजात आहे किंवा नाही हे ओळखण्यास या गोष्टीचा उपयोग होतो. एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी संयुगे) पुरेशी असतात. मात्र अ‍ॅमिलेज अजिबात नसते. लाला ग्रंथिस्त्राव दोन ते तीन महिन्यांनी भरपूर सुरू होतो. प्रथिने व साध्या शर्करा सहज अवशोषिल्या जातात. जठरांत्र मार्गाच्या वरच्या भागातून अन्न (दूध, पाणी वगैरे) फार हळू खाली सरकते, तर खालच्या भागातून अती जलद सरकते.

 

जातविष्ठा (जन्मानंतर पहिल्याच मलविसर्जनाचा मल) पहिल्या १० ते २४ तासांत बाहेर पडतेच व ती हिरवट काळ्या रंगाची असते. ही पहिली मलविसर्जनक्रिया झाली किंवा नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे जरूर असते. जर ती क्रिया झालीच नाही, तर वैद्यास ताबडतोब कळवावे. जातविष्ठा बाहेर न पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात व वैद्यकीय तपासणी महत्त्वाची असते. उदा., ‘अच्छिद्री गुदद्वार’ ही जन्मजात विकृती दर १,५०० ते २,००० नवजात अर्भकांत एक या प्रमाणात आढळते व त्याकरिता छोटी किंवा मोठी शस्त्रक्रिया करण्याची तातडीची गरज असते.

 

मूत्रविसर्जन

 

पहिल्या दिवशी १५ घ.सेंमी. लघवी होते. कधीकधी पहिल्या २४ ते ३६ तासांत लघवी होत नाही. कारण प्रसूती होत असतानाच मूत्रविसर्जन नकळत होऊन गेलेले असते. दहाव्या दिवसापासून दर २४ तासांत १०० ते ३०० घ.सेंमी. लघवी होऊ लागते.

बाह्य जननेंद्रिये

 

पुरुष अर्भकात शिश्नमणिच्छद (शिश्नाच्या पुढील भागावरील त्वचा) शिश्नमण्याला चिकटलेला असतो. मूत्रविसर्जन ठीक होत असल्यास यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. ही चिकटलेली त्वचा जोराने मागे सारण्याचा प्रयत्न केव्हाही करू नये. मूल रडत असल्यास किंवा थंडीत मुष्कामध्ये वृषण (पुं-जनन ग्रंथी त्यांच्या नेहमीच्या पिशवीत) लागत नाहीत म्हणून अनवतीर्ण वृषण असल्याचे समजू नये.

मातेच्या रक्तातून मिळणारी स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) हॉर्मोने (उत्तेजक स्त्राव) कमी झाल्यामुळे नवजात स्त्री अर्भकात योनिस्त्राव किंवा रक्तस्त्रावही होतो; परंतु ते रोगाचे लक्षण नव्हे.

बृहत्‌भगोष्ठ कमी वाढलेले असल्यामुळे जननेंद्रियाचे इतर भाग, लघुभगोष्ठ व भगशिश्न [→ जनन तंत्र] प्रामुख्याने दिसतात. अकाल अर्भकात आणि जन्म-वजन कमी असलेल्या अर्भकात ही गोष्ट अधिक स्पष्ट दिसते.

आ.२. मॉरो प्रतिक्षेपी क्रिया

तंत्रिका तंत्र

शिंकणे, जांभई देणे आणि उचकी या सर्व क्रिया नवजात अर्भकात राहून राहून आढळतात. काही विशिष्ट प्रतिक्षेपी क्रिया [→ तंत्रिका तंत्र] जन्मानंतर लगेच मिळतात आणि त्यांपैकी पुष्कळशा तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात नाहीशा होतात. उदा., व्होस्टेक (फ्रांझ व्होस्टेक या ऑस्ट्रियन शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारे) लक्षण. या लक्षणात कानाच्या पुढे गालावर ज्या ठिकाणी आनन तंत्रिका (मेंदूपासून निघणारी सातवी मज्जा) पृष्ठांगाजवळ येते त्या ठिकाणी टिचक्या मारल्यास चेहऱ्याचे स्नायू आकुंचन पावतात. हे लक्षण पहिल्या आठवड्यानंतर बहुधा मिळत नाही. मॉरो (एर्न्स्ट मॉरो या जर्मन बालरोगतज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या) प्रतिक्षेपी क्रियेत मुलाचे डोके काही सेंमी. अधांतरी सोडताच हातापायाचे स्नायू आकुंचन पावतात. दोन्ही बाहू व पाय शरीरापासून दूर नेले जातात. ही प्रतिक्षेपी क्रिया चौथ्या किंवा पाचव्या महिन्यानंतर मिळत नाही.

चूषण (चोखून ओढून घेणे) आणि गिळणे या क्रिया स्तनपानाकरिता आवश्यक असतात. गर्भावधी संपण्याच्या सुमारास मेंदूच्या बाह्यकात (सर्वांत बाहेरच्या करड्या भागात) तंत्रिका कोशिकांचे पुष्कळ थर तयार झालेले असतात. बहुतेक सर्व संवेलके (वळ्या) आणि सीता (खाचा) असतात. मात्र त्या अल्पविकसित असतात. तंत्रिका कोशिकांचे कार्यानुरूप विभेदीकरण वयाच्या तिसऱ्या वर्षी पूर्ण होते. मेरुरज्जू जन्मवेळीच कार्यान्वित होण्यास योग्य असतो. मेंदूच्या बाह्यकाचे नियंत्रणात्मक कार्य सुरू झालेले नसते व म्हणून नवजात अर्भकातील सर्व जीवनावश्यक क्रियांवर उपबाह्यकाचे नियंत्रण असते [→ तंत्रिका तंत्र].

विशिष्ट ज्ञानेंद्रिये

 

(अ) दृष्टी : प्रखर प्रकाशात अर्भक पापण्यांची उघडझाप करते. बाहुली प्रतिक्षेप (प्रकाशात बाहुलीचे आकुंचन आणि अंधारात विस्फारण होणे) मिळतो. या प्रतिक्षेपाचा अभाव व बाहुली सतत विस्फारित राहणे मस्तिष्कांतर्गत विकृती दर्शवितात. (आ) श्रवणेंद्रिये : मोठ्या आवाजाने अर्भक दचकते. (इ) गंध : घाणेंद्रिय कार्यान्वित होण्यास सहा महिन्यांचा अवधी लागतो. (ई) चव : ही मात्र तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यापासून कळू लागते.

अंतःस्त्रावी ग्रंथी

 

[ज्यांचा स्त्राव सरळ रक्तात मिसळतो अशा ग्रंथी; → अंतःस्त्रावी ग्रंथि]. (अ) अधिवृक्क ग्रंथी : या आकारमानाने मोठ्या असतात व म्हणून नवजात अर्भकास कृत्रिम श्वासोच्छ्‌वास देताना त्यांना इजा होण्याचा संभव असतो. कधीकधी असा पुनरुज्जीवनाचा प्रयत्न करताना या ग्रंथीत आघाताजन्य रक्तस्त्राव होऊन अर्भक दगावते. (आ) अवटू ग्रंथी : जन्मतः विकसित असतात. (इ) पोष ग्रंथी : जन्मतः विकसित असतात. (ई) यौवनलोपी ग्रंथी : आकारमानाने बऱ्याच मोठ्या असतात व इतर शरीरावयवांच्या मानाने त्यांचे वजनही अधिक असते.

स्तन

 

स्त्री व पुरुष दोन्ही अर्भकांत जन्मानंतर चौथ्या ते दहाव्या दिवसांच्या दरम्यान कधीकधी स्तनवाढ झाल्याचे आढळते. याला ‘नवजात स्तनशोथ’ म्हणतात व त्यावर कोणताही इलाज करण्याची गरज नसते.

जन्मल्याबरोबर घ्यावयाची काळजी

 

जन्मल्याबरोबर अर्भकास दोन्ही पाय वर व डोके खाली अशा अवस्थेत उचलून धरावे. त्यामुळे श्वसनमार्गात प्रसूतीच्या वेळी शोषिले गेले असतील ते स्त्राव गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर निघून येतील. हे स्त्राव हलक्या हाताने मऊ जाळीदार कापडाच्या तुकड्याने पुसून काढून नाक व तोंड मोकळे करावे. या अवस्थेतच चोषक उपकरणाने (आ. ४) मुखगुहा आणि घशातील श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) चोषून घ्यावा.

वस्त्राच्या तुकड्याने मुखगुहेचा आतील भाग आणि घसा साफ करू नये, कारण तसे करण्याने तेथील श्लेष्मकलास्तरास (बुळबुळीत पातळ अस्तरास) इजा पोहोचून सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणास प्रोत्साहन मिळते.

डोळे ओल्या कापसाच्या बोळ्यांनी साफ करावेत. प्रत्येक डोळ्याकरिता स्वतंत्र बोळा वापरावा व शिवाय एकदा वापरलेला पुनःपुन्हा वापरू नये. प्रत्येक डोळा उघडून त्यामध्ये १% सिल्व्हर नायट्रेट विद्रावाचा एक एक थेंब टाकावा व नंतर ते मिठाच्या विद्रावाने लगेच धुवावेत. सिल्व्हर नायट्रेटाचा विद्राव एक आठवड्यापेक्षा जुना असता कामा नये. जठरातील पदार्थांच्या चोषणाची नेहमीच गरज असते असे नाही; परंतु अकाल अर्भक व सीझेरियन छेद शस्त्रक्रियेने प्रसूत झालेल्या अर्भकामध्ये, तसेच मधुमेही मातेच्या अर्भकात जठरातील पदार्थ रबरी नळीचा उपयोग करून काढून टाकावेत. कारण अशा अर्भकात प्रत्यावर्तन (जठरातील पदार्थ घशापर्यंत परत येण्याची क्रिया) संभवते आणि ते धोकादायक असते.

आ. ३. जन्मल्याबरोबर अर्भक उलटे धरावे

नाळेमध्ये बोटांना लागणारे स्पंदन थांबेपर्यंत ती कापू नये. ती नाभीपासून ५ सेंमी. अंतरावर दोन स्पेन्सर वेल्स (टॉमस स्पेन्सर वेल्स या इंग्रज स्त्रीरोगतज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या) रोहिणी चिमट्यांच्या दरम्यान कापावी. अर्भकाकडचे टोक कमीत कमी २ बंधांनी घट्ट बांधावे. काहींच्या मताप्रमाणे हे टोक मुडपून नंतर बांधल्यास रक्तस्त्रावाचा धोका टळतो. नाळ जेवढी जाड तेवढा हा धोका अधिक असतो, कारण पहिल्या दोन तासांतच ती एवढी सुकते की, बंध ढिला पडण्याची शक्यता असते. ५ सेंमी. पेक्षा कमी ठेवल्यास जेवढी लांबी कमी तेवढा रक्तस्त्रावाचा धोकाही अधिक. कापल्याजागी पहिल्या दिवशी हेक्झॅक्लोरोफिनाची भुकटी लावावी. दुसऱ्या दिवसापासून त्या जागी ट्रिपल डायअ‍ॅक्रिफ्लाविन १·१४ग्रॅ. जेन्शियन व्हायोलेट २·२९ ग्रॅ. व ब्रिलियंट ग्रीन २·२९ ग्रॅ. आणि ऊर्ध्वपातित जल १,००० मिलि. यांचे मिश्रण लावावे. कापलेल्या टोकावर वस्त्राचा लहान तुकडा बांधावा. सबंध पोटावर नाळ झाकण्याकरिता पट्टी बांधू नये. कारण त्यामुळे उदरीय श्वसन क्रियेत अडथळा येण्याची व पट्टी मलमूत्राने खराब होण्याची शक्यता असते. सहाव्या ते आठव्या दिवशी नाळ गळून पडते.

आ. ४. श्लेष्माचोषक उपकरणे

श्वसन क्रिया जन्मानंतर एका मिनिटाच्या आतच सुरू होते. ती तशी सुरू न झाल्यास तळपायावर बोटांनी हलकेच चापट्या मारणे किंवा नाकात छोटी रबरी नळी घालणे इ. सहजशक्य प्रयोग करावेत. इतके करूनही श्वासोच्छ्‌वास सुरू न झाल्यास अन्य तातडीचे उपाय करावे लागतात. त्याकरिता विशिष्ट उपकरणे, ऑक्सिजन वगैरेंची जरूरी असते व म्हणून प्रसूती शक्यतो प्रसूतिगृहात होणे हितावह असते. अर्भक नीट श्वासोच्छ्‌वास करीत आहे, असे वाटल्यानंतर त्यास पाळण्यात एका कुशीवर झोपवावे. पाळण्याची पायाकडची बाजू ३०° कोन होईल अशा बेताने उंच केलेली असावी. त्यामुळे उरले सुरले स्त्राव बाहेर पडण्यास मदत होते. ४ ते ८ तास या अवस्थेत झोपू द्यावे. मात्र मस्तिष्कांतर्गत आघात असल्याची शंका असल्यास डोके खाली करून झोपवू नये.

जन्मल्यानंतर लगेच आंघोळ घालण्याची पद्धत चुकीची व हानिकारक आहे. चेहरा व डोके स्वच्छ करावे आणि हात धुवावे. बगल व जांघ यांमधील भ्रूणस्नेहाचे थर काढून टाकावेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अर्भकास चादरीत (लोकरीपेक्षा कापसाच्या कापडात) गुंडाळावे. गुदद्वार, तोंड, जननेंद्रिये, पाठ व पावले नीट तपासून जन्मजात विकृती नसल्याची खात्री करून घ्यावी.

यानंतरच्या नवजात कालात अर्भकास पुढील गोष्टींची गरज असते. (१) योग्य पोषण : याविषयी अधिक माहिती ‘दुग्धस्त्रवण व स्तनपान’ या नोंदीत दिली आहे. (२) उष्ण व थंड हवामानात शारीरिक तापमान योग्य ठेवणे : पहिले दोन दिवस बगलेतील तापमान दर चार तासांनी व नंतर दर बारा तासांनी तपासावे. ३५·५° से. ते ३७·२° से. तापमान प्राकृत असते. (३) सूक्ष्मजंतू संक्रामणापासून संरक्षण : पुढील कारणांमुळे अर्भकास सूक्ष्मजंतू संक्रामणाचा धोका असतो.

(अ) गर्भकला अकाली फाटणे, वार शोथ (दाहयुक्त सूज), दीर्घकाल प्रसूती यांमध्ये अर्भकास मातेच्या जनन मार्गातील सूक्ष्मजंतूंपासून संक्रामणाचा धोका असतो. अशा वेळी प्रतिबंधक प्रतिजैव अंतःक्षेपणे (अँटिबायॉटिक इंजेक्शने) योग्य असतात.

(आ) देखभाल करणाऱ्या परिचारिका, दाई किंवा (रुग्णालयात जन्म झाला असल्यास) इतर रोगट अर्भकांपासून सूक्ष्मजंतू संक्रामण होऊ शकते. त्याकरिता विशिष्ट प्रतिबंधात्मक इलाज करावे लागतात.

(इ) स्टॅफिलोकोकाय, एश्चेरिकिया कोलाय, मोनिलिया यांसारखे सूक्ष्मजंतू परिसर, भांडी किंवा अर्भक विष्ठा यांद्वारे संक्रामण करण्याची शक्यता असते व म्हणून अर्भकाचे खराब झालेले कपडे ताबडतोब काळजीपूर्वक बदलावे. भांडी निर्जंतुक ठेवावी. (४) रोग लक्षणावर नजर ठेवणे : कोणतेही रोगलक्षण आढळल्यास वैद्यकीय सल्ला ताबडतोब घ्यावा.

अकाल अर्भक

 

सांख्यिकीय व्याख्येप्रमाणे २,५०० ग्रॅ.पेक्षा कमी जन्म-वजनाचे अर्भक गर्भावधीकाल विचारात न घेताच ‘अकाल अर्भक’ गणले जाते. आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे हीच व्याख्या सर्वत्र मान्य झाली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात २,४०० ते २,१५० ग्रॅ. वजनाच्या अर्भकास ‘अकाल अर्भक’ म्हणावयास हरकत नसावी.

अकाल अर्भकाच्या संगोपनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अर्भकाच्या शरीर तापमानातील बदल, अती थंड किंवा अती गरम होणे, अधूनमधून नीलवर्णता उत्पन्न होणे, दुग्धपान किंवा स्तनपानातील अडचणी इत्यादींचा समावेश यात होतो. अकाल अर्भक जेवढे अधिक अकाल तेवढे त्याचे वजन कमीच असते. त्याची लांबीही कमीच असते. त्वचालाली अधिक असते आणि वरील अडचणींचा संभवही अधिक असतो. ३० आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच जन्मलेल्या अर्भकात जिवंत राहण्याचे प्रमाण अत्यल्प असते, तर २८ आठवड्यांपूर्वी जन्मलेली जवळजवळ सर्वच अर्भके मरण पावतात. प्रथम-प्रसवा स्त्रियांतील नवजात अर्भकांत अकाल अर्भकांचे प्रमाण ४०% आढळते व बहुप्रसवा स्त्रियांत ते २०-२५% आढळते.

कारणे

 

५०% अकाल अर्भकांमध्ये अकालत्वाचे कारण निश्चित सांगता येत नाही. याबद्दल पुढील काही सत्य घटना निश्चित ज्ञात आहेत : (१) आर्थिक व सामाजिक दृष्ट्या पुढारलेल्या वर्गात फक्त ७% अर्भक अकाल असतात, तर गरीब व मागासवर्गीयांत त्यांचे प्रमाण १५% आहे. या मागासलेल्या वर्गात अपुरे पोषण, गर्भारपणाच्या शेवटच्या महिन्यांतील अविश्रांत श्रम व थकवा, चिरकारी (दीर्घकालीन) सूक्ष्मजंतू संक्रामणे व प्रसूतिपूर्व काळात घ्यावयाच्या काळजीकडे दुर्लक्ष, यांचा ज्ञात कारणांत समावेश आहे. (२) गर्भजन्यविषरक्तता [→ गर्भारपणा], (३) बहुगर्भावस्था (जुळे, तिळे वगैरे), (४) प्रथम प्रसूती आणि इतर कारणांमध्ये, (५) चिरकारी संक्रामणे, आजूबाजूची परिस्थिती, वांशिक फरक, सिगारेटचे अती धूम्रपान वगैरेंचा समावेश होतो.

अकाल अर्भकतेचे प्रमाण

 

अगदी काटेकोरपणे विचार केल्यास गर्भावधी काल विचारात घेणे जरूर असले, तरी मातेच्या या काळाच्या मापनावर अवलंबून राहता येत नाही. याच कारणाकरिता हे प्रमाण ठरविण्याकरिता (१) शारीरिक वाढ, (२) वजन आणि विशेषेकरून (३) लांबी विचारात घेतात.

(१) शारीरिक वाढ : त्वचालाली (नीग्रो अर्भकात सुद्धा) अशक्त आणि कुंथत झालेला जन्म-चीत्कार, सुरकुतलेला व सुकलेला चेहरा (त्वचेखालील वसा-अभावाचे लक्षण), नखे मऊ व बोटांच्या टोकांपर्यंत न वाढलेली, पुरुष अर्भकात मुष्क त्वचा लाल वा रंगहीन असणे या लक्षणांवरून अकाल अर्भकतेचे प्रमाण अजमावता येते.

(२) वजन : अर्भकाच्या वजनावरच अकाल अर्भकत्व ठरविणे पुष्कळसे स्वेच्छ आहे कारण स्वीडन किंवा उ. अमेरिकेत नवजात अर्भकाचे सर्वसाधारण जन्म-वजन ३·६ किग्रॅ. असते, तर भारतात ते फक्त २·९३ किग्रॅ. असते. याच कारणाकरिता जन्म-वजन २·१ किग्रॅ. पेक्षा कमी असणे, हे भारतात अकाल अर्भकतेचे प्रमाण मानावयास हवे.

(३) लांबी : लांबीवरून अकाल अर्भकतेचे प्रमाण ठरविणे अधिक खात्रीशीर असते. मद्रासमधील नवजात अर्भकांची सर्वसाधारण लांबी ४९ सेंमी. असल्याचे आढळले आहे. या लांबीत प्रत्येक २·५ सेंमी. कमी लांबी २ आठवड्यांचा कमी गर्भावधी काल दर्शविते. उदा., एका नवजात अर्भकाची लांबी ४१·५ सेंमी. आहे म्हणजे ती सर्वसाधारण लांबीपेक्षा ७·५ सेंमी. कमी आहे. यास २·५ ने भागले म्हणजे ३ ही संख्या येते व ३ X २ = ६ आठवडे हा कमी गर्भावधी काल मिळतो.

संगोपनातील अडचणी व त्यांवरील उपाय : अकाल अर्भकांच्या संगोपनातील अडचणी व त्यांवरील उपाय खाली दिले आहेत.

संगोपनातील अडचणी व त्यांवरील उपाय

 

अडचण

उपाय

१.

मस्तकांतर्गत रक्तस्त्रावाचा धोका: मऊ व शिरोघटन न झालेले डोके प्रसूतीच्या वेळी त्यामानाने कठीण अशा विटपावर (गुदद्वार आणि योनिमार्ग यांच्यामधील स्त्री शरीराचा भाग) आदळून किंवा मेंदूतील रक्तवाहिन्या भंगूर असल्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

अशी इजा होऊ नये म्हणून भग छेदन शस्त्रक्रिया (डोक्यावर जादा दाब पडू नये म्हणून किंवा भग-योनी-आडवा तिडवा फाटू नये म्हणून तिरपा सरळ छेद करणे) करावी. जन्मानंतर के जीवनसत्त्वाची १ मिग्रॅ.ची एकच मात्रा द्यावी.

२.

शरीर तापमान नियंत्रण: त्वचेखालील एकूण वसा प्रमाण कमी असणे व लंबमज्जेतील तापमान नियंत्रक केंद्र अपक्व असणे.

परिसरीय तापमान २९·४° ते ३२·२° से. या दरम्यान रात्रंदिवस कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा. अर्भकाचे शरीर तापमान (गुदद्वारातील) ३६° से. नेहमी राहील याकडे लक्ष द्यावे. परिसरीय आर्द्रता ८०% च्या आसपासच्या असावी. सुसज्ज रुग्णालयांतून याकरिता ‘उष्णपेटी’ नावाचे उपकरण वापरतात. यामध्ये अर्भकाचे संगोपन करता येते.

 

अडचण

उपाय

३.

श्वासरोध व नीलवर्णता अधूनमधून दिसणे : अपक्व श्वसन नियंत्रक केंद्र, खोकला उत्पन्न करणारी प्रतिक्षेपी क्रिया कमजोर असणे, चूषण तसेच गिळणे या क्रिया कमजोर असणे. यामुळे श्वासरोध व नीलवर्णता दिसते. पाजलेले दूध जठरांत्र मार्गाऐवजी फुप्फुसात जाण्याचा धोका असतो.

अर्भकाकडे बारीक लक्ष पुरवावे, योग्य त्या शरीर स्थितीत झोपवावे. पाजताना विशेष काळजी घ्यावी; चूषण नळी वापरून श्लेष्मास्त्राव काढून टाकण्याचा व पुनरुज्जीवनाचा प्रयत्न करावा; ऑक्सिजन द्यावा.

४.

स्तनपान व दुग्धपान यांमधील अडचणी : काही अर्भके चूषण करण्यास व काही गिळण्यासही असमर्थ असतात.

स्तनपानाचा प्रथम प्रयत्न करून पहावा; अर्भक त्यामुळे थकून जाते की काय याकडे लक्ष द्यावे. थकवा येत असल्यास बाटलीने कृत्रिम दुग्धपान द्यावे. त्याकरिता नेहमी मिळणारे रबरी बूच अधिक उकळवून जास्त मऊ करून घ्यावे आणि त्याचे छिद्रही मोठे ठेवावे. रबरी किंवा प्लॅस्टिक नळीने दूध पाजावे (नलिका प्राशन). प्रसूतिगृहातून घरी जाण्यापूर्वी तज्ञ व्यक्तीकडून मातेने नळीने दूध पाजण्याची क्रिया शिकून घ्यावी. न दमता मूल पिऊ लागले म्हणजे पुन्हा स्तनपानाचा किंवा बाटलीचा उपयोग करावा.

५.

मंद पचनक्रिया परंतु पोषणज पदार्थांची जादा गरज.

दररोज ६० कॅलरी दर ०·४५ किग्रॅ. वजनामागे देण्याकडे लक्ष ठेवावे. हळूहळू प्रमाण वाढवावे. जादा प्रथिने ३% व कमी वसा २% असलेले कृत्रिम दूध तयार करून द्यावे.

६.

सूक्ष्मजंतू संक्रामण धोका : (१) दाई किंवा परिचारिका संपर्क, (२) भेटावयास येणारी माणसे व (३) धुराळा यांपासून हा धोका असतो.

प्रतिबंधात्मक इलाज काटेकोरपणे पाळावे.

७.

कावीळ होण्याचा संभव-यकृत अपक्वावस्था.

तिसऱ्या ते सातव्या दिवसापर्यंत कावीळ वाढते किंवा कसे याकडे लक्ष द्यावे. रक्तरसतपासणीत पित्तारुण (पित्तातील तांबडे रंगद्रव्य) २० मिग्रॅ. पेक्षा अधिक आढळताच सबंध रक्त काढून टाकून संपूर्ण नवीन रक्तधानाची व्यवस्था नेहमी तयार ठेवावी.

८.

कष्टश्वसन लक्षण समूह : फुप्फुसपात (वायुकोश बंद अवस्थेतच राहणे), फुप्फुसशोथ इ. कारणांमुळे कष्टश्वसन व इतर लक्षणे उद्‌भवतात.

ऑक्सिजनन्यूनतेकरिता ४०% सांद्रतेपेक्षा अधिक सांद्रता नसलेला ऑक्सिजन ताबडतोब द्यावा.

 

 

मातेस द्यावयाच्या सुचना

 

(१) स्तनपान करताना स्तनाग्रांच्या स्वच्छतेकडे फार काळजीपूर्वक लक्ष द्यावे. (२) अर्भक स्तनपान करीत नसेल, तरीही दुग्धस्त्रवण चालूच राहावे म्हणून दर चार तासांनी स्तनातील दूध हाताने पिळून काढून टाकावे. (३) अधिक काळपर्यंत कृत्रिम दुग्धपान करावयाचे झाल्यास रुग्णालयातून घरी जाण्यापूर्वी या विषयाची सर्व तांत्रिक माहिती तिने करून घ्यावी. तज्ञांच्या देखरेखीखाली काही दिवस स्वतःच कृत्रिम दुग्धपान (नलिका प्राशन वगैरे) करवावे.

फलानुमान

सर्वसाधारणपणे १·५ किग्रॅ. जन्म-वजनापेक्षा कमी वजन असलेल्या अर्भकात मृत्यूचे प्रमाण ५०-६०% असते. १ किग्रॅ. वजनाच्या अर्भकामध्ये ९०% मरण पावतात. विशेष काळजी घेणाऱ्या साधनांच्या उपलब्धतेवर फलानुमान अवलंबून असते. रुग्णालयातून घरी गेल्यानंतरची काळजी सर्वस्वी मातापित्यांच्या बौद्धिक पातळीवर अवलंबून असते. अशा वेळी कमी समजूतदार, अडाणी मातापित्यांच्या अकाल अर्भकात सूक्ष्मजंतू संक्रामण किंवा अपुरी काळजी यामुळे मृत्युसंख्येत वाढ संभवते. योग्य संगोपनानंतरही अकाल अर्भकाच्या मेंदूस इजा होण्याचे प्रमाण नेहमीच अधिक असते.

नवजात अर्भकातील प्रमुख रोग : नवजात श्वासरोध

जन्मानंतर श्वासोच्छ्‌वास सुरू होण्यास एक मिनिटापेक्षा अधिक अवधी लागला किंवा तो असमाधानकारक असला, तर त्यास श्वासरोध म्हणतात. यामुळे मेंदूला ऑक्सिजनन्यूनतेमुळे कायमची इजा होण्याचा किंवा मृत्यूचाही धोका असतो. ऑक्सिजनन्यूनता हे मृतजात अर्भकांपैकी ५०% मृत्यूंचे आणि नवजात कालातील १५% मृत्यूंचे कारण असते. श्वासरोधात ऑक्सिजनन्यूनता तसेच कार्बन डाय-ऑक्साइडाचे आधिक्य (अपुऱ्या वायुवीजनामुळे झालेले) हे दोन्ही कारणीभूत असतात.

कारणे

(अ) श्वसनकेंद्राचे अनियमित कार्य : (१) प्रसूतीच्या वेळी मातेने सेवन केलेली गुंगी आणणारी, वेदनाशामक अथवा शुद्धिहारक औषधे. (२) गर्भाशयात असतानाच वार गर्भाशयापासून अलग होणे, मुखस्थ (गर्भाशयाच्या खालच्या भागात तयार झालेली आणि आंतर-मुखाला आवेष्टित वा संलग्न असलेली) वार, नाळेवर दाब पडणे, गर्भाशयाचे जोरदार आकुंचन, मातेच्या अवसाद (तीव्र प्रकारच्या आघातानंतर आढळून येणारा सार्वदेहिक प्रतिक्षोभ) किंवा गर्भहेतुक विषाक्तता यांसारख्या विकृती गर्भाला मिळणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा उत्पन्न करतात. (३) मेंदूतील श्वसनकेंद्राची अपूर्ण वाढ. उदा., वजनात अतिशय कमी असलेले अकाल अर्भक.

(आ) नवजात अर्भकाच्या श्वसनमार्गातील अडथळे : श्लेष्मस्त्राव, रक्त किंवा उल्बद्रव (गर्भाशयात गर्भाभोवती असणारा द्रव) श्वसनमार्गात शिरून अडथळा उत्पन्न होण्याचा संभव असतो.

(इ) अकाल अर्भकाचे अपुरे वाढलेले श्वसन क्रियावश्यक स्नायू आणि इतर विकृती. उदा., मध्यपटलातील (छाती व पोट यांना विभागणाऱ्या पटलातील) अंतर्गळ, फुफ्फुसपात.

(ई) नवजात अर्भकाच्या श्वसनमार्गातील जन्मजात विकृती. उदा.,⇨ खंडतालू.

प्रवृत्तीकर कारणांमध्ये अकाल अर्भक, गर्भहेतुक विषरक्तता, मधुमेही मातेचे अर्भक आणि छेदन शस्त्रक्रियेने प्रसूत झालेली अर्भके यांचा समावेश होतो.

उपचार

या विकारावर तातडीने उपचार सुरू करावे लागतात. याकरिता जेव्हा श्वासरोध उद्‌भवण्याची शंका असेल (उदा., मधुमेही माता) तेव्हा प्रसूती शक्यतो प्रसूतिगृहातच होणे जरूर असते. याशिवाय तात्पुरते उपाय करून श्वासोच्छ्‌वास सुरू न झाल्यास ऑक्सिजन द्यावा लागतो आणि म्हणून ही प्रसूती रुग्णालयात होणे अधिक हितावह असते. पुनरुज्जीवनाचे सर्व उपाय केवळ तज्ञ व्यक्तीच करू शकतात. नवजात अर्भक ऑक्सिजनन्यूनतेला १० ते १५ मिनिटे तोंड देऊ शकते म्हणून श्वासरोधावरील उपचार चालू ठेविल्यास ते यशस्वी होण्याचा संभव असतो.

नवजात कावीळ

 

नवजात कालात काविळीचे प्रमाण बरेच असते. कावीळ हा रोग नसून एक लक्षण आहे. अनेक रोगांमध्ये ती उद्‌भवते. नवजात अर्भकातही निरनिराळ्या रोगांत ती उद्‌भवते. त्यांपैकी काहींची माहिती येथे दिली आहे.

शरीरक्रियात्मक कावीळ : ५०% पेक्षा अधिक वेळा नवजात अर्भकातील कावीळ या प्रकारात मोडते. कोणताही इलाज न करता पाचव्या ते सातव्या दिवशी ती आपोआप बरी होते. तिची सुरुवात जन्मानंतर दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी होते. काविळीशिवाय इतर कोणतेही लक्षण आढळत नाही. पहिल्याच दिवशी दिसणारी कावीळ बहुधा या प्रकारची नसते, तसेच पहिल्या आठवड्यानंतर सुरू होणारीही या प्रकारात न मोडणारीच असते. शंका आल्यास रक्तरसातील पित्तारुणाचे प्रमाण मोजता येते. हे प्रमाण १५ मिग्रॅ. च्या वर गेले किंवा दररोज ५% ने वाढल्याचे आढळले, तर इतर कारणे शोधावी लागतात.

रक्तविलयजन्य कावीळ

 

नवजात अर्भकाच्या रक्तातील तांबड्या कोशिकांचा नाश होण्यास मातेने तयार केलेली प्रतिपिंडे (सूक्ष्मजंतू, त्यांची विषे व इतर हानिकारक पदार्थांना प्रतिरोध करण्यासाठी रक्तद्रवात निर्माण होणारे विशिष्ट पदार्थ) कारणीभूत असतात. मातेमध्ये ही प्रतिपिंडे दोन प्रकारच्या प्रतिजनांच्या (प्रतिपिंडे निर्माण होण्यास कारणीभूत होणाऱ्या पदार्थांच्या) प्रक्रियेपासून बनतात : (१) ऱ्हीसस ग्राही (ऱ्हीसस पॉझिटिव्ह) प्रतिजन आणि (२) ए किंवा बी प्रतिजन, गर्भाच्या रक्तातील ही प्रतिजने काही कारणांमुळे त्याच्या तांबड्या कोशिकांसह मातेच्या रक्तात मिसळल्यावर प्रतिपिंडे तयार होतात. गर्भाच्या रक्तात ती वारेतील रक्तप्रवाहातून शिरल्यानंतर गर्भाच्या तांबड्या कोशिकांचा नाश करतात. जन्मानंतर पहिले काही दिवस ही प्रतिपिंडे अर्भकाच्या रक्तात बऱ्याच प्रमाणात राहिल्याने कोशिकानाश चालूच राहून रक्तविलयजन्य कावीळ उद्‌भवते. पहिल्या प्रतिपिंडामुळे होणाऱ्या गर्भावरील परिणामाला ‘ऱ्हीसस विरुद्धधर्मीयत्व’ आणि दुसऱ्याला ‘एबीओ (मातेचा रक्तगट ओ असतो म्हणून) विरुद्धधर्मीयत्व’ म्हणतात. दोन्ही प्रकारच्या रक्तविलयामुळे रक्तरसातील पित्तारुणाचे प्रमाण अतिशय वाढून मेंदूवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. माता-पित्याचे रक्त, नवजात अर्भकाचे रक्त, विशिष्ट चाचणी परीक्षा यांवरून या प्रकारच्या काविळीचे निदान करतात. प्रसूतिपूर्व काळातही अशा प्रकारची कावीळ उद्‌भवण्याची शक्यता निरनिराळ्या परीक्षांवरून अजमावता येते व उपचार योजना अगोदरच करता येते.

सूक्ष्मजंतू संक्रामणजन्य कावीळ

या प्रकारच्या काविळीबरोबरच जंतू संक्रामणाची इतर लक्षणेही आढळतात. उदा., अधूनमधून नीलवर्णता दिसणे, दुग्धपान नीट न करणे व बेशुद्धी. कधीकधी कावीळ हेच एकमेव लक्षण असू शकते व म्हणून नाभी, त्वचा इ. शरीरभागांची काळजीपूर्वक तपासणी कोणत्याही प्रकारच्या काविळीत करतात कारण जंतू संक्रामणाचा धोका या विशेष शरीरभागामध्ये अधिक असतो. पूर्वी विंकेल रोग या नावाने (एफ्. सी. डब्ल्यू. फोन विंकेल या जर्मन स्त्रीरोगतज्ञांच्या नावावरून) ओळखली जाणारी विकृती केवळ सूक्ष्मजंतू संक्रामणजन्य गंभीर कावीळच होती, हे आता समजलेले आहे. उपचारामध्ये रक्ताधान व प्रतिजैव औषधे उपयुक्त असतात.

नवजात यकृतशोथ

या प्रकारात दीर्घकाल (कित्येक आठवडे) टिकणारी कावीळ असते आणि ती रोधजन्य असते. मूत्र गडद रंगाचे, तर मल फिकट रंगाचा असतो. यकृत व प्लीहा आकारमानाने वाढलेल्या असतात. ही विकृती बहुधा व्हायरसजन्य असावी. वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करणे हितावह असते.

वरील प्रमुख कारणांशिवाय नवजात अर्भकातील काविळीची इतरही कारणे आहेत [→ कावीळ].

जन्म-आघात

प्रसूतिशास्त्रातील प्रगती व मातेच्या आरोग्याची गर्भारपणी घेतली जाणारी काळजी यांमुळे प्रसूतीच्या वेळी आढळणाऱ्या अर्भकांच्या जन्म-आघातांचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. तरीदेखील मृतजातता व नवजात कालातील मृत्यू यांच्या कारणांत जन्म-आघात हे एक प्रमुख कारण आहे. अकाल अर्भकात जन्म-आघातांचे प्रमाण अधिक असते. कारण त्यांचे शरीर-ऊतक अपक्व व भंगूर असते. पूर्ण दिवसांचे अर्भक जसे या आघातांना तोंड देऊ शकते तसे अकाल अर्भक देऊ शकत नाही व म्हणून ते मृत्यू पावण्याची शक्यताही अधिक असते. प्रसूतीच्या वेळी अनेक प्रकारचे जन्म-आघात संभवतात. त्यांपैकी काहींची माहिती येथे दिली आहे.

प्रसवशीर्षशोफ

प्रसूतीच्या वेळी गर्भाच्या दर्शनी भागावर दाब पडून जी सूज येते तिला ‘प्रसवशीर्षशोफ’ म्हणतात. या सुजेला प्रसवशोफ असेही म्हणता येईल कारण दर्शनी भाग नेहमी डोकेच असत नाही. कधीकधी चेहरा, ढुंगण किंवा बाह्य जननेंद्रिये हेही दर्शनी भाग असतात आणि त्यांवरही अशी सूज संभवते. जन्मानंतर लगेच दिसणारी ही सूज रक्तमिश्रित द्रवसाठ्यामुळे आलेली असून डोक्यावर ती शिरोवल्कापुरती मर्यादित असते. सर्वसाधारणपणे कोणताही इलाज न करता ती २ ते ३ दिवसांत बरी होते.

मस्तक रक्तार्बुद : कवटीच्या हाडाच्या पर्यास्थिकलेच्या (भोवतालच्या दृढ तंतुमय पटलाच्या) खाली रक्त गोळा होऊन जी सूज येते तिली ‘मस्तक रक्तार्बुद’ म्हणतात. ही सूज जन्मानंतर बहुधा दुसऱ्या दिवशी दिसू लागते व ती हानिकारक नसते. काही आठवडे किंवा महिने टिकणारी ही सूज हळूहळू कमी होत जाऊन पूर्णपणे नाहीशी होते. कोणताही इलाज करावा लागत नाही.

आ. ५. मस्तक रक्तार्बुद युग्म

चिमटाजन्य आघात

प्रसूतीच्या वेळी कधीकधी शस्त्रक्रिया करून प्रसूती पूर्ण करावी लागते. त्याकरिता गर्भ विशिष्ट चिमट्यात पकडून बाहेर ओढावा लागतो. अशा वेळी गर्भाच्या पकडलेल्या शरीरभागावर इजा होण्याचा नेहमी संभव असतो. अगदी साध्या रक्त साखळण्यापासून ते थेट गंभीर विदारित जखमाही होतात. अलीकडील मामस्ट्रॉम निर्वात उत्सर्जक उपकरणाच्या वापरापासून चिमट्यांचा वापर कमी झाला असला, तरी काही शिरोवल्काचे आघात याही उपकरणापासून झालेले आढळतात.

मस्तकांतर्गत आघात : जन्म-आघातांमध्ये सर्वांत गंभीर प्रकारचे आघात मस्तकाच्या आतील भागांना होतात आणि ते अनेक वेळा नवजात अर्भकाच्या मृत्यूला कारणीभूत असतात. अशा प्रकारच्या आघातामध्ये कधीकधी फक्त मस्तिष्कावरणांनाच (मेंदूच्या भोवतील आवरणांनाच) इजा होते; परंतु गंभीर रक्तस्त्राव होत नाही. काही वेळा मेंदूचे प्रत्यक्ष विदारण होऊन गंभीर रक्तस्त्राव होतो. या प्रकारात अर्भक बहुधा मृत्यू पावते. आघातामुळे कधीकधी जलशीर्ष (कवटीच्या पोकळ भागात प्रमाणाबाहेर द्रव साचणे) अथवा दृढतानिकेच्या (मेंदूभोवतील सर्वांत बाहेरच्या दृढ व तंतुमय आवरणाच्या) खाली चिरकारी रक्तार्बुद तयार होते. पुष्कळ वेळा अधून मधून आकडी (झटके) येणे हा अशाच प्रकारच्या आघातांचा दूरगामी परिणामही असतो.

------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate