অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फेफरे

फेफरे म्हणजे काय

जेव्हा मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करतो तेव्हा फेफरे येतात ज्यामुळे हालचाल, लक्ष किंवा भान राहण्याच्या पातळीमध्ये फरक पडतो. मेंदूच्या विविध भागांमध्ये विविध प्रकारचे फेफरे येऊ शकतात. हे फेफरे त्याच भागात राहू शकतात (शरीराच्या त्याच भागापुरते मर्यादित) किंवा पसरू शकतात (संपूर्ण शरीरामध्ये). फेफरे अनेक कारणांमुळे येऊ शकतात, खासकरून लहान मुलांमध्ये. नवजात बालकांमध्ये येणारे फेफरे शिशुगटातील, शालेय वयातील बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये येणा-या फेफ-यांपेक्षा खूपच वेगळे असू शकतात. ज्या मुलांना आधी कधीही फेफरे आले नाहीत अशा मुलांच्या पालकांसाठी हे घाबरविणारे असू शकते.

  • सर्व मुलांपैकी सुमारे ३% मुलांना १५ वर्षांपेक्षा कमी वयामध्ये फेफरे येतात
  • यापैकी निम्मे फेफरे फिब्राईल (तापामुळे येणारे) असतात
  • १०० पैकी दर एका मुलाला अपस्मारामुळे झटक्यांचा (फेफ-यांचा) त्रास होत असतो.

फेफ-यांचे प्रकार

फिब्राईल फेफरे

हे अशा मुलांमध्ये आढळून येतात ज्यांना तापासोबतच कानाचा संसर्ग, सर्दी किंवा कांजण्या झालेल्या असतात.

  • या प्रकारचे फेफरे मुलांमध्ये खूप सामान्यपणे आढळतात
  • २ ते ५% मुलांना त्यांच्या बालपणी कधीतरी फिब्राईल फेफरे आलेले असतात
  • तापासोबत काही मुलांना फेफरे का येतात याचे कारण माहीत नाही, मात्र अनेक धोक्याचे घटक ओळखण्यात यश आलेले आहे:
    • ज्या मुलांच्या नातेवाईकांना, खासकरून भाऊ किंवा बहीणींना फिब्राईल फेफरे आलेले असतात, त्या मुलांनासुद्धा अशा प्रकारचे फेफरे येण्याची शक्यता जास्त असते.
    • ज्या मुलांचा विकासामध्ये उशीर झालेला आहे किंवा ज्यांनी नवजात अवस्थेत असताना अतिदक्षता विभागामध्ये २८ पेक्षा जास्त दिवस काढलेले आहेत त्यांना फिब्राईल फेफरे येण्याची शक्यता जास्त असते.
    • फिब्राईल फेफरे आलेल्या ४ पैकी एका मुलाला वर्षभरात असे फेफरे परत येण्याची शक्यता असते.
    • ज्या मुलांना याआधी फिब्राईल फेफरे आलेले आहेत त्यांना पुन्हा असे फेफरे येण्याची शक्यता जास्त असते.

नवजात फेफरे

हे सामान्यतः जन्मापासून २८ दिवसांच्या आत येतात. बहुतेक फेफरे बाळाचा जन्म झाल्याझाल्या येतात. यामागे विविध कारणे असू शकतात. नवजात बालकाला फेफरे येत आहे का हे तपासणे खूपच कठीण असते कारण त्यांच्यामध्ये झटके आल्याचे दिसून येत नाही. त्याऐवजी त्यांचे डोळे फिरू लागतात आणि वेगवेगळ्या दिशांमध्ये पाहू लागतात. त्यांचे ओठ मुडपू शकतात आणि श्वासोच्छवास अनियमित होऊ शकतो.

अर्धवट फेफरे

मेंदूचा काही भागच समाविष्ट असतो आणि त्यामुळे फेफरे शरीराचा काही भागांमध्येच येतात.

  • साधे अर्धवट (जॅकसोनियन) फेफ-यांमध्ये शरीराच्या एका भागामध्ये स्थित हालचालसंबंधी घटक सामील असतो. याप्रकारचे फेफरे येणारी मुले जागृत आणि भानावर असतात. आजार जसजसा वाढत जातो तसतशी हालचालींमधील असामान्यता शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकते.
  • जटील अर्धवट फेफरेदेखिल अशाच प्रकारचे असतात मात्र यामध्ये मुलाला काय होत आहे हे कळत नाही. अनेकदा अशा प्रकारचे फेफरे येणारी मुले झटक्याच्या कालावधीमध्ये एखादी क्रिया वारंवार करत रहातात. उदा. टाळ्या वाजविणे. त्यांना या क्रियेची काहीही आठवण रहात नाही. झटका संपल्यानंतर मूल ब-याचदा दिशाहीन झाल्यासारखे वागते ज्या स्थितीला पोस्टिक्टल काळ म्हणतात.

सामान्यीकृत फेफरे

यामध्ये मेंदूचा बराचसा भाग समाविष्ट असतो. याचे दोन प्रकार पडतात: निश्चेष्ट (स्नायू आखडणे) फेफरे आणि निश्चेष्ट नसणारे फेफरे. यांचे अनेक उपप्रकारदेखिल आहेत.

  • निश्चेष्ट फेफ-यांमध्ये स्नायू काही मिनिटांसाठी (सामान्यपणे ५ पेक्षा कमी मिनिटे) अनियंत्रितरित्या आखडले जातात. त्यानंतर काही काळ व्यक्ती थकल्यासारखी राहते. या काळाला पोस्टिक्टल काळ म्हणतात. मूल थकवा वगळ्यास साधारण १५ मिनिटांच्या आत सामान्य स्थितीमध्ये आले पाहिजे. ब-याचदा मूल अशावेळी मुत्र किंवा मलविसर्जन करते आणि त्याला आपल्याला फेफरे आल्याचे आठवत नाही ही सामान्य बाब आहे. काहीवेळा ताणले गेल्यामुळे इजा होऊ शकते. ही इजा जीभ चावली जाण्यापासून हाडे मोडण्यापर्यंत मोठी असू शकते.
  • टोनिक फेफ-यांमध्ये स्नायू सतत आखडले जातात आणि घट्ट होतात. तर टोनिक-क्लोनिक फेफ-यांमध्ये काही स्नायू लयबद्ध रितीने आळीपाळीने ताणले जातात.
  • नवजात मुलांमध्ये स्नायू आखडणे हा प्रकार १८ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांमधेय आढळून येतो. याचा संबंध बहुतेकदा मानसिक विकलांगतेशी जोडला जातो आणि यामध्ये काही स्नायू अचानक आखडले जातात आणि त्यामुळे बाळाचे शरीर ताणलेल्या स्थितीत दिसते. झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार अनेकदा होतो.
  • अनुपस्थित फेफरे: यांनाच “पेटिट माल” फेफरे असेही म्हणतात. हे कमी कालावधीचे असतात ज्यामध्ये मूल एकटक पहात राहते किंवा डोळे मिचकावत राहते आणि त्याला आजूबाजूच्या वातावरणाची शुद्ध राहत नाही. हा प्रकार काही सेकंदांपेक्षा जास्तवेळ टिकत नाही आणि अचानक चालू होतो व बंद होतो. मात्र मुलाला हा प्रसंग अजिबात आठवत नाही. ब-याचदा हा प्रकार जेव्हा बालक वाचताना विसरून जातो की आपण कोणते वाक्य वाचत आहोत किंवा अभ्यासाच्या सूचना विसरतो तेव्हा बालकाच्या शिक्षकांनी तो/ती दिवास्वप्ने पहात असल्याची तक्रार केल्यावर उघकीस येतो.
  • स्टॅटस एपिलेप्टिकस

    या प्रकारामध्ये फेफरे एकतर ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ चालतात किंवा व्यक्ती सामान्य स्थितीत न येता तिला एकामागून एक फेफरे येत राहतात. २ वर्षांपेक्षा कमी वय असणा-या बालकांमध्ये हा प्रकार खूपदा आढळून येतो आणि यातील बहुतेक मुलांना सामान्यीकृत टोनिक-क्लोनिक फेफ-यांचा त्रास असतो. स्टॅटस एपिलेइटिकस हा फेफ-यांचा खूपच गंभीर प्रकार आहे. फेफरे लांबत असल्याची शंका आल्यास १०८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

    लहान मुलांमधील फेफरे: कारणे

    जरी फेफरे येण्यामागील अनेक कारणे माहीत आहेत तरीही ४ पैकी ३ मुलांमध्ये याची कारणे ठाऊक नसतात. यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये कुटुंबामध्ये फेफ-यांचा इतिहास असतो. इतर कारणांमध्ये मेंदूज्वर, विकासात्मक अडचणी तसेच सेरेब्रल पाल्सी आणि डोक्यावर आघात होणे यांचा समावेश आहे.
    फेफ-यांची तक्रार घेऊन येणा-या बालकांपैकी एक चतुर्थांश बालकांमध्ये संपूर्ण तपासणी केल्यानंतर काही वेगळीच समस्या असल्याचे निदर्शास येते. या इतर समस्यांमध्ये बेशुद्ध पडणे, श्वास अडकणे, रात्री पडणारी दुःस्वप्ने, मायग्रेन (अर्धशिशी) आणि मानसिक समस्या यांचा समावेश होतो.

    • मुलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा फेफ-यांचा प्रकार म्हणजे फिब्राईल फेफरे जे संसर्गामुळे जोराचा ताप आल्यावर येतात.
    • फेफ-यांमागील इतर कारणे:
      • संक्रमण (इन्फेक्शन)
      • चयापचय क्रियेतील बिघाड
      • औषधे
      • मादक पदार्थ
      • विष
      • रक्तवाहिन्यांमधील बिघाड
      • मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे
      • यामध्ये मेंदूत गाठ येणे, जंतुसंसर्ग, ताप, जन्मजात झालेली इजा, इजा किंवा आघात यांचा समावेश होतो.

      लहान मुलांमधील फेफरे: लक्षणे

      मुलांमधील फेफ-यांची अनेक प्रकारची लक्षणे असू शकतात. दिसणा-या हालचालींच्या प्रकारांचे तसेच मुलाच्या जागृतपणाच्या पातळीचे विस्तृत वर्णन डॉक्टरांना मुलाला कोणत्या प्रकारचे फेफरे येत आहेत हे ठरविण्यास मदत करू शकेल.

      • सर्वात नाट्यमय लक्षण म्हणजे सामान्यीकृत आचके. मुलाचे स्नायू लयीमध्ये आंकुचन पावू शकतात किंवा त्यांमध्ये झटके येऊ शकतात, काहीवेळा श्वास घेण्यास त्रास होतो आणि डोळे फिरतात. फेफरे येऊन गेल्यानंतर मूल बहुतेकदा पेंगुळल्यासारखे आणि गोंधळल्यासारखे होते आणि त्याला नंतर फेफ-यांविषयी काहीही आठवत नाही. लक्षणांचा हा गट “ग्रॅण्ड माल” (सामान्यीकृत) आणि फिब्राईल फेफ-यांमध्ये सामान्यतः दिसून येतो.
      • अनुपस्थित फेफरे (पेटिट माल) येणा-या मुलांमध्ये आजूबाजूच्या गोष्टींचे भान हळूहळू कमी होऊ लागते आणि ते एखाद्या ठिकाणी टक लावून पाहत राहतात किंवा डोळे मिचकावत राहतात. हे लगेच सुरू होते आणि लगेच थांबतेही. यामध्ये स्नायू आखडत नाहीत. फेफरे थांबल्यावर लगेचच ही मुले सामान्य स्थितीमध्ये येतात.
      • वारंवार होणा-या हालचाली जसे की चघळणे, ओठ चोखणे, टाळ्या वाजवणे आणि त्यानंतर गोंधळ ही लक्षणे जटील अर्धवट फेफ-यांचा त्रास असणा-या मुलांमध्ये ब-याचदा पहायला मिळतात.

      अर्धवट फेफरे स्नायूंच्या केवळ एका गटामध्येच येतात. हे स्नायू आंकुचन पावतात आणि आखडतात. आंकुचन पावण्याची क्रिया एका गटातून दुस-या गटाकडे पसरू शकते. याला “मार्च” फेफरे म्हणतात. या प्रकारच्या फेफ-यांचा त्रास असणारी मुले फेफ-यांच्या प्रसंगामध्ये विचित्रपणे वागू शकतात आणि फेफरे थांबल्यावर त्यांना यातील काहीच आठवत नाही. अशी सर्व मुले ज्यांना पहिल्यांदाच फेफरे आलेले आहेत त्यांना डॉक्टरांकडून तपासून घेणे जरूरी आहे.

      • पहिल्यांदाच फेफरे आलेल्या बहुतांश मुलांना इस्पितळाच्या आपत्कालीन कक्षामध्ये तपासले पाहिजे. मात्र जर फेफरे २ मिनिटांपेक्षा कमी वेळासाठी आले असतील आणि त्यानंतर पुन्हा फेफरे आले नसतील आणि मुलाला श्वसनास त्रास होत नसेल तर त्याला बालरोगतज्ञाकडून तपासुन घेता येऊ शकते.
      • पहिल्यांदाच फेफरे आलेल्या बहुतांश मुलांना तत्काळ तपासणीसाठी इस्पितळाच्या आपत्कालीन कक्षामध्ये नेले पाहिजे.
      • सतत किंवा बराच वेळ फेफरे आलेल्या, श्वसनास त्रास अहोत असणा-या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या मुलांना १०८ क्रमांक फिरवून रुग्णवाहिकेतून इस्पितळात नेले पाहिजे.
      • जर बालकाला फेफ-यांचा इतिहास असेल आणि आता आलेले फेफरे आधी आलेल्या फेफ-यांपेक्षा वेगळे असतील उदा. फेफ-यांचा कालावधी, शरीराचा हालचाल होणारा भाग, पेंगण्याची दीर्घ अवस्था किंवा इतर कोणातीही वेगळी वा नवीन गोष्ट; तर बालकाला आपत्कालीन कक्षामध्ये तपासणीसाठी नेले पाहिजे.

      बालकाने स्वतःला जखमी करून घेऊ नये म्हणून तुम्ही करावयाचे प्राथमिक प्रयत्न:

      • बालकाला आडवे पडण्यास मदत करा.
      • त्या भागातील काचसामान किंवा इतर घातक वस्तू बाजूला ठेवा.
      • बालकाच्या तोंडात काहीही घालण्याचा प्रयत्न करू नका. असे करण्याने तुम्ही स्वतःला किंवा बालकाला इजा पोहोचवाल.
      • मूल श्वासोच्छवास करत आहे की नाही हे लगेचच तपासा. जर तो श्वसन करत नसेल तर १०८ क्रमांकावर संपर्क साधून वैद्यकिय मदत मिळवा.
      • फेफरे येऊन गेल्यानंतर बालकाला एका बाजूला ठेवा आणि तो/ती शुद्धीवर येईपर्यंत त्याच्यासोबत थांबा. बालक श्वसन करत आहे ना हे तपासा. फेफरे थांबल्यानंतर जर एक मिनिटाच्या आत त्याने श्वसनास सुरुवात केली नाही तर त्याला तोंडावाटे कृत्रिम श्वासच्छोवास द्या. फेफरे चालू असताना बालकाला कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे तुम्ही कदाचित बालकाला किंवा स्वतःला हानी पोहोचवाल.
      • बालकाला ताप असल्यास असेटामिनोफेन किंवा पॅरासिटमॉल देता येऊ शकते.
      • नुकतेच फेफरे येऊन गेलेल्या बालकाला अन्न, द्रव किंवा औषधे देऊ नका.
      • अपस्मार असलेल्या बालकांना त्यांच्या आजूबाजूच्या भागातील जड वस्तू बाजूला सारून त्यांना अधिक इजा होण्यापासून रोखावे.

      औषधोपचार

      मुलांमधील फेफ-यांचे उपचार प्रौढांमधील फेफ-यांच्या उपचारांपेक्षा वेगळे असतात. पहिल्यांदाच फेफरे आलेल्या बालकाला विशिष्ट कारण सापडल्याशिवाय औषधोपचार दिले जात नाहीत.

      • औषधे चालू न करण्यासाठी महत्त्वाची कारणे:
        • पहिल्या भेटीमध्ये अनेक डॉक्टर हे खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही की तो प्रसंग फेफरे येण्याचा होता की अन्य बाबींशी निगडीत होता.
        • फेफ-यांवरील अनेक औषधोपचारांचे दुष्परीणाम होतात ज्यामध्ये बाळाच्या यकृताला किंवा दातांना हानी पोहोचण्याचीही शक्यता असते.
        • अनेक मुलांना केवळ एकदाच किंवा खूपच कमी वेळा फेफरे येतात.
      • जर औषधोपचार सुरू केले असतील तर:
        • डॉक्टर औषधांच्या प्रमाणावर नजर ठेवतील ज्यामध्ये वारंवार रक्तचाचण्या करण्याची गरज भासते. ते औषधांच्या दुष्परीणामांवरही बारीक नजर ठेवतील. साधारणतः औषधांचे समायोजन करण्यासाठी काही आठवडे ते महिनेदेखिल लागू शकतात आणि काहीवेळा एकापेक्षा जास्त्स औषधांची गरज भासू शकते.

      जर तुमच्या पाल्याला स्टॅटस एपिलेप्टिकस असेल तर त्याला फेफरेविरोधी औषधांचे खूप अवजड उपचार दिले जातील, अतिदक्षता विभागात ठेवले जाईल आणि श्वसनयंत्रावरदेखिल ठेवले जाऊ शकते.

      प्रतिबंध

      अनेक झटके थांबविता येत नाहीत. याला काही अपवाददेखिल आहेत मात्र यावर नियंत्रण मिळविणे खूपच कठीण असते जसे की डोक्यावरील आघात आणि गर्भावस्थेमधील संक्रमण.

      • ज्या मुलांना फिब्राईल फेफरे येतात त्यांचा ताप आजारपणामध्ये व्यवस्थितरित्या नियंत्रित ठेवला पाहिजे.
      • जर फेफरे आलेच तर जास्त इजा पोहचू नये याची काळजी घ्यावी.

      फेफरे येणारी मुले इतर मुलांप्रमाणेच बहुतेक सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. मात्र पालकांनी अतिरिक्त सुरक्षाउपायांची काळजी घेणे जरूरी आहे जसे मूल पोहोत असेल किंवा अशा एखाद्या उपक्रमात भाग घेत असेल जेथे त्याला फेफरे आल्यास इजा होऊ शकते तर एखाद्या प्रौढ व्यक्तीने तेथे हजर राहणे. प्रत्येकाला फेफरे येऊ शकतात. काहीजणांना ते वारंवार येतात. फेफरे येण्याची ही समस्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीने पहायला मिळते. काहीजणांना फक्त प्रासंगिक फेफरे येतात तर काहीजणांना दररोज किंवा खूप वारंवार फेफरे येतात.

      • फेफरे येण्याचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये फक्त एखाद्या ठिकाणी टक लावून बसणे यापासून ते स्पास्टिक होऊन किंवा स्नायू आखडले जाऊन भान हरपणे यांचा समावेश होतो.
      • सामान्यतः खालील घटनांमध्ये फेफरे येणे ही एक आपत्कालीन स्थिती मानायला हवी:
        • फेफरे काही मिनिटांमध्ये थांबत नाहीत
        • फेफरे येऊन गेल्यानंतर खूप वेळ गोंधळल्यासारखे राहणे (१०-१५ मिनिटांपेक्षा जास्त)
        • फेफरे येऊन गेल्यानंतर व्यक्तीने प्रतिसाद न देणे
        • व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होणे
        • फेफ-यांमुळे व्यक्तीला इजा होणे
        • पहिल्यांदाच फेफरे येणे
        • व्यक्तीला नेहमी येणा-या फेफ-यांपेक्षा आता आलेले फेफरे वेगळ्या प्रकारचे किंवा स्वरूपाचे असणे
        • सावधगिरी

          सावधगिरी घेण्याची एक सामान्य जागा म्हणजे न्हाणीघर. शॉवर वापरणे जास्त सुरक्षित आहे कारण त्यामुळे बाथटबमध्ये बुडण्याचा धोका कमी होतो.
          अनेक व्यक्तींना असे फेफरे येतात ज्यांची कारणे माहीत नाहीत. इतर लोकांना येणा-या फेफ-यांमागे काही कारणे असतात ज्यामुळे मेंदूच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो.

          • मेंदूच्या कार्यावर परिणाम करणा-या आणि फेफरे येण्यास कारणीभूत ठरू शकणा-या काही समस्यांमध्ये मादक पदार्थ किंवा औषधे, अल्कोहोल, रक्तशर्करा कमी होणे किंवा इतर रासायनिक वेगळ्या गोष्टींचा समावेश होतो.
          • सतत उघडझाप होणारे दिवे, उच्च ताण किंवा पुरेशा झोपेची कमतरता यामुळे काही लोकांमध्ये फेफरे येऊ शकतात.
          • मुलांमध्ये येणारे फेफरे ही एक वेगळी श्रेणी आहे जिला थोड्या वेगळ्या पद्धतीने वागविले जाते. सामान्य सामान्यीकृत फेफरे सामान्यतः तेव्हा येतात जेव्हा व्यक्ती मोठ्याने ओरडते किंवा आवाज काढते. यानंतर बरेच सेकंद वेगळ्या पद्धतीने शरीर आखडणे, खांदे आणि पाय वेगळ्या पद्धतीने किंवा लयीत वेडेवाकडे होणे असे प्रकार होतात.
            • डोळे सामान्यतः उघडे असतात मात्र व्यक्ती प्रतिसाद देत नाही किंवा ती भानावर नसते.
            • व्यक्ती श्वासोच्छवास करत नसल्याचे आढळून येऊ शकते. मात्र ते प्रत्यक्षात फेफ-यांच्या लहानशा कालावधीसाठी पुरेसे श्वसन करत असतात. फेफरे येऊन गेल्यानंतरही व्यक्ती ब-याचदा काही वेळासाठी दीर्घ श्वास घेते.
            • ती ब-याच वेळाने हळूहळू भानावर येते.
            • मूत्रविसर्जन होणे सामान्य असते.
            • सामान्यीकृत (संपूर्ण मेंदूचा समावेश असणारे) फेफरे येऊन गेल्यानंतर व्यक्ती ब-याचदा आक्रमक होतात
          • फेफ-यांचे अजूनही अनेक प्रकार अस्तित्वात आहेत ज्यामध्ये एकाच हाताची वेगळ्या हालचाल होणे, बोलण्यात अडकणे किंवा लयीमध्ये वेडेवाकडे न होता वेगळ्या पद्धतीने ताठ होणे.
          • स्त्रोत: www.emedicinehealth.com

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate