অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालकांचे लसीकरण

प्रस्तावना

लहान मुलांचे कर्दनकाळ असलेले सहा रोग घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ (पक्षाघात)  रोगप्रतिबंधक लस दिल्याने टाळता येतात.

आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्रात या लसी मोफत मिळतात. (वेळापत्रक व इतर माहिती आधुनिक औषधशास्त्र या प्रकरणात दिली आहे.)

प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात,किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसीत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो.

बी.सी.जी.

बाळाचा क्षयरोगापासून (विशेषत: मेंदूचा क्षयरोग) बचाव करण्यासाठी बी.सी.जी. उपयोगी आहे. ही लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचतात. ही लस जन्मल्यावर लगेच दुस-या दिवशीही दिलेली चालेल. शक्यतो ही लस तीन-चार महिन्यांपर्यंत टोचली जावी. काही कारणांनी हे राहून गेल्यास एक  वर्षापर्यंत तरी टोचून घेणे आवश्यक आहे.

टोचलेल्या जागी 15 दिवसांनी छोटी पुळी तयार होते. चार ते सहा आठवडयांत ही पुळी भरून येऊन बी.सी.जी. ची खू्रण तयार होते.

या जखमेवर कुठलेही औषध लावू नये. बी.सी.जी. टोचल्यावर त्या दिवशी आंघोळ घालू नये. तसेच एक दिवस ती जागा धुवू नये किंवा शेकू नये.

काही मुलांना बी.सी.जी. लस टोचल्यावर त्या बाजूच्या काखेत गाठी येतात. या गाठी दुख-या असतील तर त्यासाठी कोझालसारखे जंतुविरोधी औषध वापरावे लागेल. गाठी दुख-या नसतील तर तीन महिन्यांत गाठी आपोआप जिरतात. तीन महिन्यांत गाठी ब-या न झाल्या तर क्षयरोगविरोधी औषधे वापरावी लागतात.

त्रिगुणी लस

या लसीत डांग्या खोकला,घटसर्प, धनुर्वात या तीन लसींचा समावेश आहे. त्रिगुणी लस वयाच्या तिस-या महिन्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा याप्रमाणे तीन वेळा (शक्यतो मांडीवर) टोचतात. लस टोचल्यानंतर एक दिवस ताप येतो. त्यासाठी पॅमालची चतकोर गोळी किंवा तापाचे पातळ औषध द्यावे. संपूर्ण प्रतिकारशक्ती येण्यासाठी दरमहा पहिले तीन व नंतरचे बूस्टर डोस जरूरीचे आहे. शक्यतो पहिल्या दोन इंजेक्शनमधील अंतर दोन महिन्यांहून अधिक असू नये.

पोलिओ

हे डोस लाल रंगाचे थेंब असतात. बाळाला पोलिओचा पहिला डोस जन्मल्यानंतर 1/2दिवसांत द्यावा. नंतरचे डोस त्रिगुणी लसीच्या बरोबरीने मुलांना तोंडाने पाजतात. डोसच्या आधी व नंतर अर्धा तास  गरम पाणी, गरम दूध देऊ नये.

त्रिगुणी लस व पोलिओ डोसमधील शक्ती उष्णतेमुळे नाहीशी होते. यासाठी या लसी शीतकपाटात (रेफ्रिजरेटर)  ठेवाव्या लागतात. थंडाव्यात न ठेवलेले डोस देऊन न देण्यासारखे आहे. यासाठी डॉक्टरकडे,आरोग्यकेंद्रांमध्ये मुलांना डोस दिले जातात त्या ठिकाणी चालू स्थितीतील शीतकपाट असायला पाहिजे. काही वैद्यकीय व्यावसायिक शीतकपाटाची सोय नसतानाही तसेच हे डोस देतात. त्यामुळे बाळाचा फायदा तर होत नाहीच, पण बाळाला लस देऊन घेतल्याचे खोटे समाधान पालकांना मिळते व पोलिओचा धोकाही संभवतो.

पल्स पोलिओ - गेली अनेक वर्षे ही मोहीम भारतभर राबवली जाते. यात पोलिओ थेंब दिले जातात.

गोवर प्रतिबंधक लस



गोवर हा तसा साधा आजार असला तरी अशक्त किंवा कुपोषित मुलांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो. अशा मुलांमध्ये गोवरानंतर न्यूमोनिया, छातीत कफ (श्वासनलिकादाह) किंवा दबलेला क्षयरोगाचा आजार उफाळून येऊ शकतो. कित्येकदा या आजारानंतर हगवण, रक्ती आव लागते. यामुळे मुळात सौम्य कुपोषित असलेली मुले जास्तच कुपोषित होतात. म्हणून गोवर  लस महत्त्वाची असते.

बाळाला नवव्या महिन्यात एक गोवर लसीचे इंजेक्शन व 15 व्या महिन्यात किंवा दीड वर्ष पूर्ण झाल्यावर बूस्टर (फेरडोस) इंजेक्शन द्यावे. गोवर लसीनंतर ताप किंवा गाठही येत नाही. हे इंजेक्शन त्वचेखाली देतात. या लसीसाठीही शीतकपाट आवश्यक असते.

द्विगुणी लस



यामध्ये फक्त घटसर्प व धनुर्वात प्रतिबंधक लस असते. यात डांग्या खोकल्याविरुध्दची लस नसते. कारण चौथ्या वर्षानंतर डांग्या  खोकला होण्याची शक्यता कमी असते. चौथ्या वर्षाच्या बूस्टरसाठी द्विगुणी लसीची इंजेक्शने व पोलिओ डोस देतात.

काही कारणांनी मुलाला तिस-या वर्षापर्यंत कुठलीच लस दिलेली नसेल तर प्रत्येक महिन्यात एक अशी द्विगुणी लसीची तीन इंजेक्शने व पोलिओ डोस द्यावे. एक वर्षाने दोन्हींचे बूस्टर व पाचव्या वर्षी दुसरा बूस्टर द्यावा.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 7/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate