অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाल कुपोषणाची व्याप्ती

अंगणवाडी-योजनेत मुलांची वजने घेऊन वयाप्रमाणे हिशोब करुन वजन कमी/जास्त/योग्य असे ठरवले जाते. यासाठी शासन भारतीय बालरोगतज्ञ परिषदेची शिफारस वापरते. यानुसार ग्रेड 1,2,3,4 वर्गवारी केली जाते. ग्रेड 3 व 4 म्हणजे तीव्र कुपोषण. ग्रेड 1 हे सौम्य कुपोषण आणि ग्रेड 2 मध्यम कुपोषण, वयाप्रमाणे वजन तपासण्यासाठी वजन तक्ता वापरला जातो. वजन करण्यासाठी लहान मुलांना झोळी व स्प्रिंगकाटा असतो. मोठया मुलांना गोल वजनकाटयावर उभे करुन वजन पाहिले जाते. कुपोषण मोजण्याचे इतर मापदंड अंगणवाडीत वापरले जात नाहीत उंची खुरटणे, (वयानुसार उंची) हा एक महत्त्वाचा मापदंड आहे, पण तो इथे वापरला जात नाही. या वयानुसार वजन पध्दतीने महाराष्ट्रातील एकूण कुपोषणाचे चित्र सोबतच्या तक्त्यात दिले आहे. यातून तीव्र कुपोषणाचे प्रमाण अगदी कमी असल्याचे दिसून येते. अनेकांना याबद्दल शंका आहे. कदाचित कुपोषण दाखवण्याच्या भीतीमुळे अंगणवाडी सेविका किंवा गटपातळीवरील अधिकारी हे आकडे कमी दाखवत असू शकतील. किंवा अंगणवाडीचा आणि या अतिकुपोषित मुलांचा संबंध येत नसेल/आलेला नसेल. वस्ती-तांडा दूर असणे,रोजगारासाठी वणवण या दोन कारणांनी असे होत असेल.

NFHS सर्वेक्षणात तीन मापदंड वापरतात - (अ) वयानुसार वजन, (ब) वयानुसार उंची, (क) उंचीनुसार वजन. यातला पहिला मापदंड अंगणवाडीत वापरला जातो हे आपण पाहिले आहे. मात्र ग्रेड 1,2,3,4 कशाला म्हणायचे याच्या व्याख्या अंगणवाडीत वेगळी तरNFHS  मध्ये वेगळी आहे. NFHS3  चे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सोबतच्या तक्त्यात मांडले आहेत. यावरून असे दिसून येते की मागील सर्वेक्षणापेक्षा यावेळी काही सुधारणा झालेली आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी ( 3) चे निष्कर्ष

देशभर दर  वर्षांनी  NFHS ही संस्था एक व्यापक सर्वेक्षण घडवून आणते. अर्थातच ही नमुना पाहणी असते, पण ती अगदी शास्त्रीय व प्रतिनिधीय पध्दतीने केलेली असते. नुकतेच याच्या तिस-या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. यात भारत व महाराष्ट्रादि प्रांतांची कुपोषणविषयक आकडेवारीही दिलेली आहे. यातील निवडक आकडेवारीचे विश्लेषण उपयुक्त ठरु शकेल. याचबरोबर बालमृत्यू, प्रजनन वेग, इ. माहितीही उपयुक्त ठरेल.

बालकांच्या लसीकरणाची टक्केवारी देशात मागील सर्वेक्षणात 43% होती ती किंचित सुधारुन 44% झालेली आहे. मात्र याचवेळी महाराष्ट्रात ती 89% पासून 81% पर्यंत घसरली आहे.

बालकुपोषणात वयानुसार वजन, वयानुसार उंची व उंचीनुसार वजन हे तीन मापदंड आहेत. याबरोबर ऍनिमियाचे (रक्तपांढरी) प्रमाण हा ही एक महत्त्वाचा निकष मोजला जातो. महाराष्ट्रात यानुसार पुढीलप्रमाणे आकडेवारी येते. (कंसातले आकडे भारताचे आहेत): वयानुसार अल्पवजनी मुलांचे प्रमाण 40% (भारत 46%), वयानुसार उंची खुरटलेली मुले38% (भारत 38%) उंचीनुसार वजन कमी असणे (रोडपणा) 15% (19% भारत)

महाराष्ट्रातली या तीनही समस्यांचे प्रमाण मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत थोडे कमी झाले आहे.

6 महिने -35 महिने वयोगटातील रक्त कमी असलेल्या मुलांचे प्रमाण 72% (भारत79%) तर स्त्रियांचे ऍनिमिया रक्तपांढरीचे प्रमाण 49% (भारत 56%) इतके आहे.

वजन, उंची ही झाली ढोबळ मोजमापे. कुपोषणाचे आणखीही पैलू आहेत - (अ) रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. - म्हणजे लालपणा कमी असणे. याला चुकीने'रक्तक्षय' असे म्हटले जाते; पण हा क्षयरोग नव्हे. आम्ही त्याला 'रक्तपांढरी' म्हणतो. महाराष्ट्रात अशा मुलांचे प्रमाण 80% इतके म्हणजे खूपच जास्त आहे. रक्तातले हिमोग्लोबिन मोजता येते. (ब) 'अ' जीवनसत्त्वाचा अभाव. हे मोजत नाहीत पण अभावाच्या खाणाखुणा किती प्रमाणात आहेत त्याची मोजदाद करता येते. (क) आयोडीन कमतरतेमुळे गलगंड होणे आणि मतिमंद बाळे निपजणे. (ड) डोळयात पांढुरके डाग असणे ही एक खूण आहे. याशिवाय वजन जास्त असणे हा देखील कुपोषणाचा महत्त्वाचा प्रकार आहे.

बालवयानंतरचे कुपोषण

कुपोषण म्हणजे केवळ बालकुपोषण नाही. कुपोषण यापुढेही होत राहते. शालेय वयातील मुले,तरुण वय, प्रौढक्य व वृध्दत्त्वातही कुपोषण असतेच. भारतात व महाराष्ट्रात ते आहेच. वयाच्या18-20 वर्षांपर्यंत उंची, वजन, स्नायुभार वाढत राहतात. या काळातले कुपोषण झाले तर वाढीवर कायमचा परिणाम होतो. कुपोषणावर उपाययोजना करण्यासाठी बालवय ही सगळयात योग्य वेळ म्हणून बाल कुपोषण महत्त्वाचे.

- बालवयातले कुपोषण टिकून राहते, त्यात सुधारणा होणे अवघड व मर्यादित असते. विशेषत खुरटलेली मुले पुढेही पुरेशी उंची गाठू शकत नाहीत.

- मात्र बालवयात कुपोषण नसले, पण पुढे निर्माण झाले तर त्यावर उपाययोजना जास्त उपयुक्त ठरते.

- आपल्या देशात स्त्री-पुरुषांना रक्तपांढरी, वजन कमी असणे, वगैरे कुपोषणाची समस्या आहेच.

- या समस्यांपेक्षा आणखी एक वेगळी समस्या म्हणजे स्थूलता. मुले, तरुण, स्त्री-पुरुष या सर्व वयोगटात अतिवजन किंवा स्थूलतेची समस्या निर्माण झाली आहे. स्थूलतेमुळे सांधेदुखी, अतिरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, आयुष्य कमी होणे हे सगळे धोके संभवतात.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate