অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाळाचा सुरुवातीचा आहार

बाळाला सुरुवातीला कोणता वरचा आहार दयावा ?

सहा महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबरच बाळाला वरच्या आहाराची गरज पडते. सुरुवातीला भाज्यांचे सूप, वरणाचे पाणी, वरचे दूध, फळांचा रस, शहाळ्याचे पाणी, टोमाटोचा रस असा पातळ आहार दयावा. त्यानंतर भाकरी/पोळी मऊ करून त्यात वरणाचे किंवा भाज्यांचे पाणी किंवा दूध घालून दयावे. भातावर वरण किंवा भाजीचे पाणी घालून दयावे. उकडलेला बतात, रताळे, गाजर, अंड्याचा पिवळा बलक, हेही अधून मधून द्यावं. पुढे-पुढे सर्व प्रकारची फळे, गव्हाची खीर, भाकरी, पोळी, पालेभाज्या, मोड आलेली उसळ, उकडलेले अंडे असा आहार दयावा. वर्षभरात इतरांप्रमाणे सर्व आहार बाळाला मिळाला पाहिजे. बाहेरचे पदार्थ देणे टाळावे.

बाळाला फळांचा रस दयावा का ?

संत्री, मोसंबीचा रस मुलं आवडीने पितात. ही फळे सर्वांनाच परवडणारी नसतात. जोपर्यंत बाळ आईचं दूध पीत असते तोपर्यंत त्याला फळांच्या रसाची आवश्यकता नसते, कारण जी जीवनसत्त्व फळात असतात तीच आईच्या दुधातून बाळाला मिळतात. बाळ ६-७ महिन्याचे झाल्यावर फळांचा रस देण्यास सुरुवात करावी. थंडीच्या दिवसातही रस देण्यास हरकत नाही. थंडीच्या दिवसात या रसामुळे सर्दी, पडसे होते ही चुकीची कल्पना आहे.

बाळाला वरचे दूध पाजताना काय काळजी घ्यावी ?

बाळाला वरचे दूध वाटी -चमच्याने पाजावे. दुधाच्या बाटलीने पाजू नये. गायीचे दूध सुरु करताना पहिल्या महिन्यातच दोन भाग दूध, एक भाग पाणी असे प्रमाण असावे. दूध म्हशीचे असेल तर एक भाग दूध, एक भाग पाणी असावे. एक महिन्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी करावे. ( दूध केंद्रावर मिळणारे दूध पाजावयास हरकत नाही.) पाजण्यापुर्वी कोणतेही दूध चांगले उकळून घेतले पाहिजे. ( पावडरचे दूध असेल तर त्यात योग्य प्रमाणातच पाणी टाकले पाहिजे, अधिक पाणी टाकू नये.) वरचे दूध पाजताना स्वच्छतेबद्दल दक्षता घ्यावी नाहीतर बाळाला जुलाब होण्याची शक्यता असते.

बाटलीने दूध पाजण्याची पद्धत :-

बाटलीने दूध पाजताना बाळाला मांडीवर घ्यावे. बाळाचे डोकं डाव्या कोपऱ्यावर थोडेसं उंच ठेवावे. शक्यतोवर बाळाला मांडीवर दूध पाजावे. बाटली अशा तऱ्हेने धरावी की बुचामध्ये दूध भरलेलं असेल. दूध फार गरम असू नये. दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन पाठीवरून हात फिरवावा. बाळाने ढेकर दिल्यावर त्याला झोपवावे. ढेकर न देता तसेच झोपवल्यास बाळाला उलटी होण्याची शक्यता असते. बुचाचे छिद्र बरोबर नसल्यास ( लहान किंवा फार मोठे ) बाळाला दूध पिण्यास त्रास होतो. बुचाचं छिद्र मोठे असल्यास बाळाला ठसका लागण्याचा संभव असतो. दुधाची भरलेली बाटली जात उलटी केली तर दूध थेंबाथेंबाने गळले पाहिजे. त्याची धार लागता कामा नये.

बाटली व बूच धुण्याची पद्धती कशी असावी?

शक्यतो वाती चमच्याने वरचे दूध बाळाला पाजावे. काही कारणांमुळे शक्य नसल्यास बाटलीने दूध पाजण्यास हरकत नाही. बाटली व बूच दोन्ही साबण आणि ब्रशने स्वच्छ धुवावे. बुचाचा चिकटपणा जाण्यासठी, बुचाला मीठ लावून ते चांगले चोळावे.एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात बाटली व बूच उकळून घ्यावे. बाटली उकळत्या पाण्यात टाकू नये. त्यामुळे ती फुटण्याची शक्यता असते. प्रत्येकवेळी बाळास दूध पाजल्यानंतर बाटली उकळून घ्यावी. शक्य असल्यास घरात १-२ बाटल्या बुचे जास्त असावीत म्हणजे ऐनवेळी अडचण येत नाही.

 

स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 8/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate