অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुडदूस

लहान मुलात वयाच्या पहिल्या तीन वर्षांत, अस्थींच्या वृद्धिकालात 'ड' जीवनसत्त्वाची न्यूनता [⟶जीवनसत्त्व ड] उत्पन्न झाल्यामुळे उद्‌भवणाऱ्या विकृतीला मुडदूस म्हणतात. या विकृतीत कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्या चयापचयात्मक (शरीरातून सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमध्ये उद्‌भवणाऱ्या) बिघाडामुळे शरीरातील हाडांवर विशेष दुष्परिणाम होतात. याशिवाय स्नायू तंत्र (संस्था), जठरांत्र मार्ग (जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे यांनी मिळून बनणारा अन्नमार्ग), शरीरवाढ व विकास यांवरही दुष्परिणाम होतात.

इतिहास

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस या रोगाकडे वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रथम लक्ष गेले. १६४५ मध्ये डॅनिएल व्हिसलर या इंग्रज शास्त्रज्ञांनी या विषयावर पहिला निबंध लिहिला. सर फ्रान्सिस ग्लिसन यांनी १६५० मध्ये आपला दुसरा निबंध प्रसिद्ध केला. १६६० मध्ये शास्त्रज्ञ जॉन मेयो यांनी मुडदुसामधील अस्थींच्या मऊ बनण्याकडे प्रथम लक्ष वेधले. १७५१ मध्ये टॉमस सिडमन यांनी रोगाचे पहिले उपरुग्ण वैद्यकीय वर्णन लिहिले. १९०९ मध्ये रशियन वैद्य जे. ए. शाबाद यांनी दोन महिने कॉड माशाच्या यकृत तेलाचा उपचार करून एक मूल बरे केले. राझिन्स्की या शास्त्रज्ञांनी १९१२ मध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव रोगास कारणीभूत असल्याचा दावा केला. अमेरिकेत १९१७ मध्ये मुडदुसाकरिता बाह्यरुग्ण विभागातून कॉड माशाच्या यकृताचे तेल आरोग्य खात्यामार्फत मूळ किंमतीतच पुरविण्यात येऊ लागले.

प्रादुर्भाव

एके काळी हा रोग इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो 'इंग्लिश रोग' या नावानेच ओळखला जात होता. बहुतेक सर्व प्रगत देशांतून प्रसूतिपूर्व देखभाल, अर्भकाची देखभाल, राहत्या घरांचे वायुवीजन (हवा खेळती ठेवण्याची योजना) व प्रकाश व्यवस्था इत्यादींकडे लक्ष पुरवल्यामुळे या रोगाचे उच्चाटन झाले आहे. नैसर्गिक रीत्या हा रोग प्राण्यांत व आद्य पर्यावरणात आढळत नाही. आफ्रिकेतील आदिवासीत तो अजिबात दिसत नाही, तसेच चीन व जपान या देशांतही क्वचित आढळतो. ग्रीनलंड, आइसलँड, नॉर्वे व डेन्मार्क या देशांतून दैनंदिन आहारात माशाचे तेल वापरात असल्यामुळे, तसेच दक्षिण इटली, ग्रीस व तुर्कस्तान या देशांतून भरपूर सूर्यप्रकाश असल्यामुळे तेथे हा रोग आढळत नाही. यूरोप, अमेरिका व कॅनडा या ठिकाणच्या मोठ्या शहरांतील गरिबांच्या वस्त्यांतून ३० ते ९०% मुले या रोगाने पछाडलेली आढळतात.

भारतात अजूनही हा रोग मोठ्या प्रमाणात आढळतो. हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या संस्थेने केलेल्या एका पाहणीनुसार एकूण त्रुटिजन्य विकारांपैकी ५% रोगी मुडदुसाचे आढळतात. महाराष्ट्रात हे प्रमाण याहून थोडे अधिक असल्याचे या संस्थेने नमूद केले आहे. अकाल जन्म झालेल्या नवजात अर्भकात हा रोग अधिक संभवनीय असतो, कारण गर्भवासातील शेवटच्या तीन महिन्यांत शरीरातील कॅल्शियमाच्या एकूण संचयापैकी ८०% संचय होतो व तशी संधी या अर्भकांना मिळालेली नसते.

संप्राप्ती

१९५० सालानंतर झालेल्या संशोधनानुसार मुडदूस या रोगास ड जीवनसत्त्वाची न्यूनता कारणीभूत असल्याचे सिद्ध झाले आहे. रोगाचे कारण समजण्याकरिता ड जीवनसत्त्वविषयी काही माहिती असणे आवश्यक आहे. हे जीवनसत्त्व एक हॉर्मोन (उत्तेजक स्त्राव) आहे. अंतःस्त्रावविज्ञानातील (वाहिनीविहीन ग्रंथीतून स्ववणाऱ्या व रक्तामध्ये एकदम मिसळणाऱ्या उत्तेजक स्त्रावांसंबंधीच्या विज्ञानांतील) अलीकडील संशोधनामुळे या जीवनसत्त्वाबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. ड जीवनसत्त्वाचा चयापयातील बिघाड अनेक विकृतींशी संबंधित असल्याचे आढळले आहे.

मानवी शरीराला हे जीवनसत्त्व दोन प्रकारांनी मिळू शकते.

(१) अंतर्जात : म्हणजे शरीरांतर्गत काही प्रक्रियांनंतर उपलब्ध होणारे सर्व स्टेरॉइड हॉर्मोनांचा आधारभूत पदार्थ कोलेस्टेरॉल असतो व त्यापासून यकृत व आंत्र श्लेष्मकलेमध्ये (बुळबुळीत पातळ अस्तरामध्ये) ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल बनते. हा पदार्थ रक्ताभिसरणातून त्वचेतील आधारस्तरातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांतून वाहत असताना सूर्यप्रकाशातील जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरण त्याचे कोलेकॅल्सिफेरॉलात (ड३ जीवनसत्त्वात) रूपांतर करतात. या रूपांतराचे प्रमाण त्वचेतील मेलॅनीन नावाच्या रंजकद्रव्यामुळे नियंत्रित होते. कोलेकॅल्सिफेरॉल जेव्हा यकृतात येते तेव्हा २५-हायड्रॉक्सिलेज नावाचे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यात मदत करणारे प्रथिन) त्याचे २५-डायहायड्रॉक्सिकोलेकॅल्सिफेरॉलामध्ये रूपांतर करते. त्यानंतर हा पदार्थ जेव्हा रक्तप्रवाहातून वृक्कात (मूत्रपिंडात) येतो तेव्हा त्यापासून १, २५-डायहायड्रोकोलेकॅल्सिफेरॉल बनते. कोलेकॅल्सिफेरॉल व त्याचे सर्व अनुजात (त्यापासून बनणारी इतर संयुगे) मुडदूसरोधी असले, तरी हा शेवटी तयार होणारा पदार्थ अत्यल्प मात्रेतही अतिशय गुणकारी आहे.

(२) बहिर्जात : कॉड, हॅलिबट यांसारखे खोल सागरी मासे त्यांच्या यकृतात संश्लेषित (घटकद्रव्ये एकत्र आणून बनवलेले) कोलेकॅल्सिफेरॉल मोठ्या प्रमाणावर तयार करतात. याचे कारण अजून अज्ञात आहे. या माशांच्या यकृत तेलाचा औषधी उपयोग अनेक वर्षांपासून ज्ञात आहे. वनस्पतींतील अरगोस्टेरॉल या घटकापासून किरणीयनाने (जंबुपार किरणांच्या परिणामाने) अरगोकॅल्सिफेरॉल (ड२ जीवनसत्त्व) बनवता येते (ड१ जीवनसत्त्व हा प्रकार अस्तित्वात नाही). कोलेकॅल्सिफेरॉलप्रमाणेच शरीरांतर्गत चयापचयात्मक बदल अरगोकॅल्सिफेरॉलातही होतात व शेवटी तयार होणारा पदार्थ तेवढाच परिणामकारक असतो. लोणी, दूध व अंड्यातील पीतक (पिवळ्या रंगाचे पोषक द्रव्य) यांत ड जीवनसत्त्व अल्प प्रमाणात असते. मातेच्या दूधात पुरेसे ड जीवनसत्त्व असावे. अलीकडील संशोधनानुसार ते जलविद्राव्य (पाण्यात विरघळणाऱ्या) सल्फेटाच्या स्वरूपात असावे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate