অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्तनांचे आजार

पुरुषामध्ये स्तन नावापुरतेच असतात. म्हणूनच पुरुषांमध्ये स्तनांचे आजार क्वचितच होतात. क्वचित पुरुषांमध्येही स्तनांमध्ये गाठ किंवा कर्करोग होऊ शकतो.

स्त्रियांमध्ये स्तनांचा आकार मोठा असल्याने आणि स्तनपानात त्यांचे प्रत्यक्ष काम असल्याने निरनिराळे आजार होतात. स्तनाची रचना म्हणजे संत्र्याप्रमाणे अनेक कप्पे असून त्यात मुख्यतः चरबी व दूध निर्माण करणा-या ग्रंथी असतात. प्रत्येक कप्प्यात दूध बोंडाकडे आणणारे दुग्धवाहिन्यांचे जाळे असते. दूध निर्माण करण्याची क्रिया स्तनपानाच्या काळात अखंडपणे वर्ष-दीड वर्ष चालू असते. यात मुख्यतः तीन प्रकारचे आजार आहेत. (1) दुधाच्या गाठी व जंतुदोष-गळू, इ., (2) स्तनांमधल्या साध्या गाठी, (3) स्तनांचा कर्करोग.

दुधाच्या गाठी व जंतुदोष

बोंडाला चीर पडली असेल तर दुखरेपणामुळे त्या बाजूला कमी पाजले जाते. यामुळे दुधाची गाठ बनू शकते व त्यात जंतुदोष होऊ शकतो.

कधीकधी एखाद्या स्तनातले किंवा स्तनाच्या भागातले दूध बाहेर न पडता आतच राहते. इथे आधी दुधाची गाठ तयार होते. या दुधाच्या गाठी सुरुवातीला मऊ असतात,पण चार-पाच तासांतच फुगून घट्ट होतात. दुधाची गाठ असून स्तन पिळून दूध काढले नाही तर त्यात बाहेरून जंतू शिरून गळू तयार होते.

एकदा जंतुदोष झाला, की त्या बाजूचा स्तन आकाराने मोठा व कडक होतो. या स्तनावर गरमपणा व दुखरेपणा आढळतो. दोन-तीन दिवसांत गळवावरची त्वचा ताणली जाते आणि आतल्या पुवामुळे तिथे पांढरटपणा दिसतो, जर गळू आत खोलवर असेल तर मात्र असा पांढरटपणा कदाचित आढळणार नाही. एकदा पू झाल्यावर शस्त्रक्रिया करून पू बाहेर काढणे आवश्यक असते.

स्तनपान चालू असताना स्तनात अशा गाठी व जंतुदोष होऊ शकतो. दुधाची गाठ होणे ही थोडी टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. यासाठी दोन्ही बाजूंना पाजणे व राहिलेले दूध रोज पिळून काढणे आवश्यक असते.

अर्भक मृत्यू झाल्यास औषधाने दूध येण्याचे बंद करता येते. (स्टिलबेस्ट्रॉल गोळी सकाळी-सायंकाळी एकेक याप्रमाणे पाच दिवस ) अशा वेळीही उरलेल्या सर्व दुधाचा निचरा होणे आवश्यक असते.

स्तनातल्या साध्या गाठी

या गाठी सहसा मध्यम वयात येतात. त्या आकाराने हळूहळू वाढतात. स्तनामध्ये ही गाठ बोटाने धरण्याचा प्रयत्न केल्यास ती हातातून सटकते. पण ही साधी गाठ आहे, की कर्करोगाची आहे हे ठरवणे अवघड असते. त्यासाठी ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे चांगले. स्तनाच्या कर्करोगाचे निदान उशिरा झाले तर पुढे उपचार जास्त किचकट होतात.

स्तनांचा कर्करोग

हाताला टणक लागणारी आकाराने वेडीवाकडी असलेली व न दुखणारी गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता असते. काही काळानंतर ही गाठस्तनाखालच्या स्नायूंपर्यंत पोचते. मग ती स्नायूंमध्ये मूळ धरते. कधीकधी वरच्या त्वचेलाही ही गाठ चिकटते. याबरोबरच त्या बाजूच्या काखेत कर्करोगाचे अवधाण येते. या गाठीही टणक लागतात. या अवस्थेत शस्त्रक्रिया करणे अवघड असते व तसे फायद्याचे नसते. कर्करोग नुसत्या गाठीच्या अवस्थेतच शोधणे आवश्यक असते. स्नायूंपर्यंत किंवा अवधाण येण्यापर्यंत वाढ झाल्यास जीवनाला आज ना उद्या धोका असतो. जवळजवळ निरुपाय होतो. स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकाराप्रमाणे शस्त्रक्रिया, रासायनिक औषधे, किरणोपचार करावे लागतात.

नवा लेख 7-12-2010

स्तनांचा कर्करोग

स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांसाठी महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. पण वाईटात चांगले म्हणजे आपण तो लवकर शोधून काढू शकतो.

कारणे

हा कॅन्सर स्त्रियांना 35-55 या वयात होण्याची शक्यता असते.  याची कारणे पुढीलप्रमाणे - स्थूलता म्हणजे चरबी वाढणे, स्तनभार जास्त असणे, खाण्यामध्ये तेल-तूप जास्त असणे,संततीप्रतिबंधक गोळ्यांचा दीर्घ वापर, अपत्य नसणे. यात काही आनुवंशिक कारणेपण असतात.

ज्या स्त्रिया एकूणच स्तनपान कमी करतात त्यांना कर्करोगाचा धोका थोडा जास्त असतो.

रोगनिदान

  • न दुखणारी छोटी गाठ किंवा गोळ्याने स्तन कर्करोगाची सुरुवात होते. नंतर स्तनांमध्ये दुखरेपणा आणि बोंडावर थोडा रक्तमिश्रित स्त्राव होऊ शकतो. त्या स्तनाचे बोंड ओढलेले किंवा संकुचित असू शकते. काखेमध्ये गाठी असतील तर मात्र कर्करोग वाढल्याची खूण आहे.
  • आपण आपल्या स्तनांची दरमहा एकदा तरी हाताने चाचपणी करणे चांगले. यासाठी घड्याळाच्या दिशेप्रमाणे क्रमश: स्तन तपासा. यात एखादी गाठ किंवा गोळा जाणवला तर ते महत्त्वाचे आहे. अर्थात प्रत्येकच गाठ किंवा गोळा कर्करोग नसतो नाही हेही लक्षात ठेवा.
  • नक्की खात्री करण्यासाठी त्या गाठीचा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शक तपासणी करावी लागते. सुईने हा नमुना घेता येतो.
  • मॅमोग्राफी या एक्स-रे चित्रातून स्तनातील छोट्या गाठीही शोधता येतात. ही तपासणी चाळीशीनंतर जास्त भरवशाची असते.
  • एम.आर.आय तपासणी ही जास्त चांगली पण खर्चिकही असते.

स्तन-कर्करोगाचे उपचार

स्तन कर्करोगाचा प्रकार आणि प्रसार यावर उपचार अवलंबून असतात. आपले डॉक्टर याबद्दल योग्य तो सल्ला देतील. इथे याबद्दल थोडी माहिती घेऊ या.

  • कर्करोगाच्या छोट्या गाठी काढून टाकता येतात. अशा वेळी उरलेला स्तन काढण्याची गरज नसते.
  • मात्र गाठ मोठी असली तर तो स्तन आणि काखेतील गाठी काढाव्या लागतात. या शस्त्रक्रियेनंतर किरणोपचार लागू शकतील.
  • स्तन कर्करोगासाठी शस्त्रक्रियेनंतर कॅन्सरविरोधी औषधयोजना केली जाते. सामान्यत:याच्या 6 फेऱ्या असतात. याशिवाय संप्रेरक आणि प्रतिघटक -अँटीबॉडी - उपचारही लागतात. यामुळे परत कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
  • हा कर्करोग शरीरात पसरू नये यासाठी औषधोपचार आवश्यक असतात.

विशेष सूचना

सर्व स्त्रियांनी स्वत:च्या स्तनांची तपासणी करायला शिकायला पाहिजे. आपण आपली तपासणी पाळीनंतर चार-पाच दिवसांनी करावी. किंवा तपासणी महिन्याच्या ठरावीक तारखेला करावी. शंका आल्यास डॉक्टरांना भेटावे.

  • रजोनिवृत्तीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी तपासणी करणे चांगले.
  • स्तन कर्करोग वेळीच काढला तर पुढे आयुष्यात तो परत होण्याचा धोका कमी होतो.पण यासाठी कर्करोगाचा प्रकारही महत्त्वाचा असतो.
  • निस्तेजपणा किंवा वजन घटणे हे कर्करोग बळावल्याचे चिन्ह असू शकते.
  • मॅमोग्राफी तपासणीतही 10-15% बाबतीत निदान चुकू शकते. स्तनभार जास्त असेल तर चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच वयाच्या पस्तीशी पर्यंत मॅमोग्राफी तपासणी फारशी भरवशाची नाही.
  • शिवाय क्ष किरण हे स्वत:च काही अंशी कर्करोगजनक ठरू शकतात. त्यामुळे मॅमोग्राफी तपासणीही आवश्यक तेव्हाच केली पाहिजे.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 8/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate